देशप्रेमानं भारलेल्या वातावरणात खाकी अर्धी चड्डी आणि पांढरा सदरा घालून मिरवणुकीत सहभागी होऊन ‘बोल गांधीचे मनी धरू, देशासाठी त्याग करू’ अशी घोषणा देत गावातील मैदानात जमायचो. तिथे गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी जमा होऊन मग ‘झंडा उँचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे झेंडागीत सामुहिक स्वरांत गायले जायचे.
प्रत्येकाने आपले स्वतंत्र अस्तित्व जपून मगच अन्यायाविरोधात लढे देण्याच्या कल्पनेला गांधींचा विरोध होता. आधी सगळे एकत्र येऊ आणि मग लढू असे ते म्हणत. परंतु अन्याय, अत्याचार करणारे आणि तो सहन करावा लागणारे ही समाजातील दोन टोके एकत्र कशी येतील असा प्रश्न चळवळ, आंदोलने, सुधारणा करू पाहणाऱ्यांना पडे. गांधींचे न ऐकता केल्या गेलेल्या सामाजिक सुधारणांचे झालेले भजे आपण आज पाहतो आहोत. कायद्यामुळे कागदावरून संपलेली जात समाजाच्या सर्व थरांत आजही फणा काढून उभी आहे. धर्माच्या भींती आजही तेवढ्याच मजबूत आहेत. गांधींचे नाव घेऊन राजकारण करणारेच मतदार संघ निवडताना जातीची वर्गवारी करून निवडतात. आदिवासी, दलित, मागासवर्गीय यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ करूनही त्या त्या समाजाचे भले तर झालेले नाहीच, भले करण्याची प्रामाणिक इच्छा असलेला एकही सच्चा प्रतिनिधी गेल्या ६५ वर्षात तयार झालेला नाही. कदाचित डॉ आंबेडकर हयात असते तर त्यांनी स्वतःच राखीव मतदारसंघ रद्द करण्यासाठी चळवळ केली असती. गांधींचा राखीव मतदारसंघांना विरोध होता त्यावरून झालेला संघर्ष हा भारतीय इतिहासातला मोठा तात्विक संघर्ष म्हटला जातो. या संघर्षात भूमिका घेताना गांधींनी भविष्याचे अचूक निदान केले होते, असे आता स्पष्टपणे दिसते. समजा गांधींचे निदान चुकले असते आणि गांधीजी हयात असते तर त्यांनी त्याची कबुली द्यायला मागेपुढे पाहिले नसते. आपल्या आयुष्याला ‘सत्याचे प्रयोग’ म्हणणारे गांधीजी कोणत्याही प्रयोगातील अपयशाची शक्यता गृहित धरूनच तसे म्हणतात. आय अम फार फ्रॉम क्लेमिंग एनी फायनॅलिटी ऑर इनफॉलिबिलिएटी अबाऊट माय कन्क्ल्यूजन. आपल्या कोणत्याही दाव्यात पूर्णत्व अथवा अचूकता असू शकत नाही,असे म्हणण्याचे धाडस,केवळ सतत सत्याचा शोध घेत राहणारी आणि आधी गवसलेले सत्य नाकारण्याची हिंमत असणारी व्यक्तीच करू शकते. आपल्या पुराणांमध्ये, इतिहासामध्ये किंवा एकूणच जगाच्या इतिहासामध्ये याबाबत स्वच्छ भूमिका घेणारी गांधी ही एकमेव व्यक्ती आहे. म्हणूनच जगाला गांधींचे सतत आकर्षण वाटत राहिले आहे. कुठलाही प्रयोग आधी स्वतःवर करून पाहायचा आणि त्याच्या योग्यतेची खात्री पटली की मग तो समुहाकडून करून घ्यायचा ही अतिशय योग्य अशी पध्दत त्यांनी अनुसरली होती. इंग्रजांशी लढा देताना आपण आधी एकत्र आले पाहिजे असे वाटण्यामागे त्यांची जी भूमिका होती ती मांडतांना त्यांनी म्हटले आहे की द इंग्लीश हॅव नॉट टेकन इंडिया,वी हॅव गिव्हन इट टू देम. मुळात ब्रिटिश इथे येऊन राज्यकर्ते होऊ शकले त्याचे कारण शोधून ते नष्ट करण्याचा विचार त्यांच्या मनात होता. आजारावर उपचार करताना आधी त्याच्या मूळावर घाव घालायला हवा म्हणतात,तसाच हा विचार आहे. त्यांची लोकशाहीची आणि स्वराज्याची व्याख्या अधिक व्यापक,संपन्न आहे. ते म्हणतात, ‘केवळ मूठभरांच्या हाती सत्ता येऊन स्वराज्य स्थापन होणार नाही, ज्यांच्यावर सत्ता केली जाते, त्या सामान्य माणसांच्या अंगी चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचे बळ येणे म्हणजे खरे स्वराज्य होय. सामान्यांना आपली क्षमता आणि कर्तव्ये यांची जाणिव होणे म्हणजे खरे स्वराज्य.’ आज सत्ताधाऱ्यांचे वागणे आणि सामान्य माणसांची भूमिका पाहिली तर गांधी किती खरे होते हे लक्षात येते. लोकशाहीचा वापर करून केवळ एका पक्षाची सत्ता उलथवणे आता लोकांच्या हाती राहिलेले आहे. सत्तेवर असलेले आणि नसलेले यांच्या कोणत्याही कृतीवर सामान्य माणसाचे काही नियंत्रण राहिलेले नाही.
फारच छान मांडले आपण गांधीजी बद्दल म्हणने अणि सुंदर वर्णन. थोडक्यात गांधीजी बद्दल बरेच काही समझले. असेच लिहित रहा. शुभेच्छा.