१९५७ ते १९७२ या काळातील जुन्या आठवणी – भाग १

 -ॲड. किशोर देशपांडे

भाग १

माझा जन्म जरी १९५१ साली झाला असला, तरी आजूबाजूच्या जगाची थोडीफार ओळख मात्र वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरू झाली. १९५७ ते १९७२ हा काळ आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक दृष्ट्या सारखाच होता. त्यामुळे त्या काळातील समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंची जी आठवण माझ्या मनात साठवली आहे, तीच मी इथे व्यक्त करणार आहे.

श्रीमंत नाही आणि गरीबही नाही, अशा मध्यमवर्गात जन्मल्यामुळे त्या वर्गाच्या आर्थिक, सांस्कृतिक आठवणी जास्त आहेत. पहिली आठवण म्हणजे त्या काळात अन्न खूप सकस असायचे, तसेच फळे व भाज्यादेखील. प्राथमिक शाळेत मधली सुटी झाली की धावतपळत घरी येऊन अर्धी भाकरी किंवा एक पोळी साध्या घट्ट वरणासोबत तिखट-मीठ कालवून खाताना मिष्टान्न खात असल्याचा अनुभव यायचा. डाळीला एक विशिष्ट छान चव असायची आणि त्यामुळे फोडणी वगैरे न दिली तरी काहीच बिघडत नसे. बटाटे आणि रताळेदेखील नुसते चुलीवर भाजून आम्ही खायचो आणि त्यात गोडवा असायचा.

रुपया, दीड रुपया शेकडा दराने पिकलेले आंबे दारावर विकत मिळायचे. पाढे मोजताना आंबेवाला १००च्या ऐवजी १२० आंबे टाकायचा. सर्व आंबे गावरान असायचे आणि रस काढण्यापूर्वी, काढताना आम्ही त्यातले अनेक आंबे चोखून फस्त करायचो. सर्व आंब्यांचा रस काढल्यानंतर घरातील स्त्रिया कोयी व साली पाण्यात पिरगळून पाणरस तयार करून त्याला फोडणी द्यायच्या. आंब्याचा रस उरला असेल, तर त्याला वाळवून पोळ्या करून ठेवायच्या.

उन्हाळ्याच्या दिवसांतली एक आठवण म्हणजे घरच्या व शेजारच्या सर्व स्त्रिया एकत्र बसून पापड, सांडगे, कुर्डया, शेवया इत्यादी साठवणीचे पदार्थ दुपारचे जेवण आटोपल्यानंतर तासन्‌तास बसून करायच्या. पापड लाटण्यापूर्वी त्याची जी बोटी करतात, ती आम्हा मुलांना नुसती खायला खूपच आवडायची. चिंचा, पेरू, बोरं, चारं हे विकत घेऊन नव्हे, तर दुसऱ्यांच्या झाडावरून हिकमतीने मिळवून खाण्याचे जिन्नस होते.

शाळेत असताना भर उन्हाळ्यात शेजारच्या मित्रांसोबत दुपारी १२-१ वाजता बर्फाच्या फॅक्टरीत जाऊन दहा पैशांचा बर्फ चाटत चाटत घरी परत येण्यात खूप गंमत होती. फ्रीज नावाचे प्रकरण तेव्हा घरोघरी उगवायचे होते.

माझ्या आठवणीप्रमाणे १९६०च्या दशकातही मध्यमवर्गीय लोकांजवळ पैसा शिल्लक राहत नसे. नोकरदार लोकांच्या घरी महिनाअखेरीस पैशांची चणचण जाणवायचीच. अगदी ब्राह्मण जातीतही बहुसंख्य परिवार हे भाड्याच्या घरात व आर्थिक अडचणीतच जगायचे. आमच्या नातेवाईकांमध्ये क्वचितच एखादे सधन कुटुंब असेल. परंतु मध्यमवर्गीयांना खाण्यापिण्याची ददात नसायची. बाजारातून विकत घ्याव्या लागणाऱ्या कपड्यालत्त्यांसाठी, दागदागिन्यांसाठी, खुर्ची-पलंगासारख्या फर्निचरसाठी मात्र पैशांची अडचण नेहमीच भासायची.

खाकी चड्डी, पांढरा सदरा हा शालेय गणवेशाचे दोन जोड आणि सणासुदीला अथवा कार्यप्रसंगी घालता यावे म्हणून दोन इतर जोड, इतकेच कपडे आम्हाला मिळायचे. १९७० पर्यंत टेरेलीन, टेरीकॉट नव्हते. त्यामुळे कॉटनचे कपडे रोजच्या वापरात, तोच शाळेचा गणवेश आणि कार्यप्रसंगी सिल्कचा सदरा मिळायचा.

असे असले तरी आमचे बालपण आनंदात गेले. आपल्या आर्थिक स्तरापेक्षा अधिक उंच स्तर गाठावा, अशी सर्वसामान्य मानसिकताही नव्हती. शिवाय बाजारात आज जी वस्तूंची रेलचेल आहे, ती नसल्यामुळे त्या वस्तू खुणावत नव्हत्या. पोशाखावरून श्रीमंत की मध्यमवर्गीय, हे ओळखता येत नसे. अगदी सधन घरातील स्त्री-पुरुष व मुले मध्यमवर्गीयांसारखेच राहायचे. ज्याला स्वतःच्या मालकीचे घर आहे, तो धनिक असे आम्ही समजायचो.

(क्रमश:…)

(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)

9881574954

Previous articleराजकारणाचा संदर्भ कोश रत्नाकर महाजन
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here