‘खेळीया’ नाना पाटेकर…

-प्रवीण बर्दापूरकर

नाना पाटेकरचं निधन झालं . जन्माला आलेला प्रत्येक जण कधी ना कधी मरणारच आहे असं म्हणून नानाच्या निधनाकडे बघता येणार नाही कारण नाना हे कवेत न येणार झाड होतं  . साहित्य , कला , क्रीडा , रंगभूमी , चित्रपट ,सामाजिक कार्य , सामाजिक वावर , दातृत्व अशा विविध क्षेत्रात नानाचं अफाट अस्तित्व होतं .  जगण्याच्या या सर्व दालनात मनापासून वावरताना अनेक चर्चा , ,प्रवाद आणि ना गॉसिपच्या लाटांवरही नाना स्वार झाला ; मग ते स्टारडम असो असो की त्याच्या स्त्री सहवासाच्या ( खऱ्या-खोट्या ) काही चर्चा .  नाना या संदर्भात कोणाचीही पर्वा न करता त्याच्या मस्तीत वादळासारखा स्वत:भोवती रांगडेपणानं गिरक्या घेत राहिला . त्याचा बोलभांड रांगडेपणा लोकांनी डोक्यावर घेतला . भेटलेल्या आणि न भेटलेल्याही असंख्य चाहत्यांवर नानांनं मनःपूर्वक प्रेम केलं आणि त्यांच्याकडूनही करुन घेतलं . जो स्वतःवर प्रेम करु शकतो तोच जगावर प्रेम करु शकतो , असा एक नानाच्या जगण्याचा रासवट धोपटमार्ग होता . त्या मार्गावर तो चालत राहिला . त्या अर्थानं जर बघायला गेलं तर स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या ‘नार्सिस’ सारखा  नाना हा एक ‘रांगडा रसिया’ होता .

नानाशी ओळख झाली ती १९७६ च्या दरम्यान त्यानंतर आम्ही अधूनमधून भेटत होतो . त्याच्या मुंबईतल्या अंधेरीच्या , आमच्या नागपूरच्या घरी . आम्ही   बोलत होतो ; कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवर . हे सगळं अर्थातच फारच अधून मधून घडायचं . त्यात कोणतीही नियमितता नव्हती पण , बोलणं व्हायचं हे मात्र खरं ; आडपडदा न ठेवता मोकळेपणाने व्हायचं . भरपूर ‘भ’कार असलेलं नानाचं बोलणं असायचं ; त्याच भाषेत उत्तर मिळाल्यावर नानालाही बरं वाटायचं . तो सरळ कोणाशीही ‘अरे-तुरे’वर यायचा आणि समोरचा वयाने कितीही लहान असला तरी त्यांनंही नानाला ‘अरे तुरे’ केल्याबद्दल केल्याबद्दल नानाची तक्रार नसायची .

नानाला ठोस अशी राजकीय भूमिका नव्हती . त्याबाबतीत तो स्वायत्त व्यक्तीनिष्ठ आणि ‘निवडक’ होता .  नाना कधी बाळासाहेब ठाकरेंची तारीफ करायचा तर कधी शरद पवारांची , कधी नितीन गडकरीच्या प्रेमात पडायचा तर कधी अजित पवारांच्या , राज ठाकरेच्या किंवा देवेंद्र फडणीसांच्या . त्याचं हे त्याचे वागणं व्यक्तिनिष्ठ होतं पण , तो व्यक्ती पूजक मात्र मुळीच नव्हता . या कुणाही राजकीय नेत्यांनं ‘अरे’ केलं तर त्याला ‘कारे’ करायला नाना कचरायचा नाही . या नेत्यांना स्पष्ट शब्दात सुनावण्याचा बेदरकारपणा नानांमध्ये ठासून होता आणि तो त्यांनं अगदी जाणीवपूर्वक जपून ठेवलेला होता . राज्याच्या काय किंवा देशाच्या काय , राजकीय परिस्थितीबद्दल त्याची मतं परखड होती आणि ती व्यक्त करताना सत्ताधारी कोण आहे याची तमा नानांनं कधी बाळगली नाही . मात्र कधी कधी एखाद्या राजकीय नेत्याशी त्यानं केलेली सलगी खटकायची , हेही तेवढंच खरं . देशात सध्या भडकलेल्या विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनांबाबत नानाच. गप्प असणं तो राजकीय भूमिकांबाबत निवडक असल्याचं निदर्शक आहे .

बालपणात आणि तारुण्याच्या सुरुवातीला अतिशय अभावग्रस्तता वाट्याला  आल्यानंतर नाना विशेषत: चित्रपट अभिनयाच्या क्षेत्रात आल्यावर आर्थिक पातळीवर चांगलाच स्थिरावला . मात्र त्याला पैशाचा लोभ असा नव्हता . याचा अर्थ आलेला पैसा उधळून टाकावा अशी त्याची वृत्ती नव्हती . मात्र उच्चतम खाण्या-पिण्या आणि जगण्या इतकं धन सांभाळून ठेवावं आणि उरलेलं दातृत्वात घालवावं याचं त्याला वैपुल्यांना भान होतं ; ते भान एखादं व्रत पाळावं तसं त्यानं पाळलं . नानांनं जितकं काही दातृत्व दाखवलं त्याची मोजदादही सहजासहजी करता येणार नाही कारण त्या संदर्भात तो फारच अंतर्मुख असायचा . एकदा गप्पा मारताना त्याला हा विषय निघाला तेव्हा मी त्याला याची यादी करु यात का , असं विचारलं . त्यावर ताडकन त्यानं नाही म्हणून सांगितलं आणि माझं दातृत्व हे जाहीर करण्याची बाब नाही असं मला सुनावून टाकलं . असं ताडकन बोलणं आणि समोरच्याला सुनावणं , हे नानाचं एक वैशिष्ट्य होतं .

दातृत्वाच्या याच ओढभावनेनं नाना ‘नाम’ या संस्थेमध्ये बहुदा गेला असावा . केवळ १५००रुपये नाहीत म्हणून कोणी आत्महत्या करत असेल ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही ; त्याचे डोळे हे ऐकल्यावर डबडबले . ज्या चंदेरी जगात नाना वावरत होता तिथे काही मद्यांच्या बाटलीची किंमतही १५००० रुपयांपेक्षा जास्त होती . मग मकरंद अनासपुरे सोबत नाम या संस्थेच्या कामात नाना रंगून गेला . विशेषतः मराठवाड्यात त्यांनं मकरंदच्या सोबतीनं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना जगण्याची जी काही उभारी दिली त्याला तोड नाही . त्यांनं केवळ धीर दिला नाही तर असंख्य कुटुंबांना स्वतःच्या पायावर कसं उभं केलं , हे मराठवाड्यात फिरताना जाणवतं . स्वतःच्या पायावर उभं करणं हे केवळ व्यक्तीनिष्ठ होईल म्हणून गावाची गरज ओळखून कोणताही गाजावाजा न करता नानांनं जल संवर्धनाचे काही प्रयोगही प्रकल्पही काही गावांमध्ये राबवले . एरवी वैरणीची काडीही न उगवणारं  माळरान हिरवंकंच झालं . ते पाहताना  नानाच्या डोळ्यात आलेल्या अश्रू बघायला मिळालेल्या त्याच्या काही मित्रांपैकी मी एक आहे  . म्हणूनच नाना रंगभूमी आणि चंदेरी पडद्यावरील सशक्त अभिनेता असण्यापेक्षा एक माणूस म्हणून अतिशय संवेदनशील होता , त्याची सामाजिक बांधिलकी बळकट व सक्रीय होती  ,त्याचं मन और्दायानं अथांग भरलेलं होतं हे जास्त महत्त्वाचं आहे . मैत्रीच्या बाबतीतही नाना असाच उदार आणि दिलेल्या शब्दाला पक्केपणानं जागणारा होता . एक अनुभवच सांगतो-

निवासी संपादकपद माझ्याकडे आल्यावर ‘लोकसत्ता’ची नागपूर आवृत्ती ‘रिलाँच’ करण्याची चर्चा सुरु झाली . त्यासाठीचा प्रस्ताव मी आमचे संपादक कुमार केतकर यांच्याकडे पाठवला. नागपूर आवृत्तीला ६ एप्रिल २००४ ला १२ वर्षे पूर्ण होणार होती. तपपूर्तीच्या या निमित्ताचं चांगलं भांडवल करुन घ्यावं असं आम्ही ठरवलं . एखादा बडा पाहुणा , त्याची जाहीर मुलाखत , हास्य कविसंमेलन आणि हास्यरंग पुरवणी , एखादी आघाडीची अभिनेत्री आणि चतुरा पुरवणी , एखादा आघाडीवरचा बालचित्रपट कलावंत आणि बालरंग पुरवणीचं विदर्भात लॉन्चिंग, महाराष्ट्रीयन फुड फेस्टिव्हल असे काही कार्यक्रम मी सुचवले. केतकर आणि शंकर शिंदे त्याच्या पूर्वतयारीसाठी नागपूरला आले. विमानतळावरुनच त्या दोघांना घेऊन मी जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. ग्रेट मराठा हे धनंजय देवधरचं हॉटेल तेव्हा नुकतंच सुरु झालं होतं पण , त्याचं अधिकृत उद्घाटन व्हायचं बाकी होतं. ‌‘लोकसत्ता’सोबत फुड फेस्टिव्हल घेण्याचा प्रस्ताव धनंजयनं स्वत:हूनच   दिला . प्रमुख पाहुणा कोण असावा यावर बराच खल झाला. प्रत्येक नाव कुणाला ना कुणाला पसंत पडेना, अचानक धनंजयनं नाना पाटेकरचं नाव सुचवलं . तेव्हा त्याचा ‌‘अब तक छप्पन’ हा हिंदी चित्रपट हिट चालला होता. नानाच्या नावावर एकमत झालं. केतकरांनी नानाशी संपर्क साधला. थोडा वेळ त्याच्याशी बोलून ६ एप्रिलचा कार्यक्रम निश्चित केला. नानाशी बोलता बोलताच केतकर मला म्हणाले, ‌‘प्रवीण, नाना रात्री आल्यावर त्याच्यासोबत पहाटे तीनपर्यंत जागावं लागेल ही त्याची अट आहे. तुला मंजूर आहे नं?’

मी ‌‘हो’ म्हणालो आणि नानाशी बोलून त्याला जागरणाची हमी दिली. कार्यक्रमाचा तपशील सांगितला. बोलता-बोलता मुलाखत कोण घेणार असं नानानं विचारलं. तोपर्यंत काहीच ठरलेलं नव्हतं. त्याला ते मी सांगितलं तर तो म्हणाला, ‌‘कुमार मुलाखत घेणार असेल तरच येतो मी.’ फोन पुन्हा मी केतकरांकडे दिला. ‌‘झकासच आयडिया की!’ असं म्हणत केतकरांनी अनुकूलता दर्शविली आणि नानाचा कार्यक्रम ठरला . दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत रामा, रॉबर्ट, वीरेन्द्र रानडे, रमेश कुलकर्णी आणि आम्ही तिघे अशी चर्चा झाली . हास्य कविसंमेलन, चित्रपट महोत्सव, छांदिष्टांच्या कलाकृतींचं प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम आम्ही फायनल केले. नाना पाटेकरची मुलाखत आय. एम. ए. सभागृहात घ्यायचं ठरलं, कारण वसंतराव देशपांडे सभागृह भरेल का याविषयी मी आणि वीरेन्द्र साशंक होतो. त्यावर बरीच गरमागरम चर्चा झाली. ‌अखेर ‘उगाच रिस्क नको, वाईट मेसेज जाण्यापेक्षा छोटं सभागृह तुडुंब भरलेलं जास्त चांगलं’ हे माझं म्हणणं सर्वांनी स्वीकारलं. एनएफडीसीच्या सहकाऱ्यांनी एक आठवड्याचा मराठी चित्रपट महोत्सव ठरविला . कवी निश्चित करण्यात आले. फूड फेस्टिव्हल ‌‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी नि:शुल्क ठेवण्याची कल्पना एव्हाना बैठकीत सहभागी झालेल्या धनंजय देवधरने मांडली..मग फूड फेस्टिव्हलचं उद्घाटन नाना पाटेकरच्याच हस्ते करायचं ठरलं . ‌‘ग्रेट मराठा’च्या देखण्या, वातानुकूलित हॉलचं उद्घाटन नानाच्याच हस्ते या निमित्ताने होऊन जाईल असं धनंजय म्हणाला . तपपूर्ती कार्यक्रमाच्या जाहिराती , निमंत्रण पत्रिका विवेक रानडे यानं अतिशय कल्पकपणे तयार केल्या हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही

‌‘अब तक छपन्न’ या चित्रपटाच्या नावावरून ‌‘अब तक बारह’ ही कॅच लाईन घेत आम्ही कामाला तर लागलो, पण आमच्यावर आचारसंहितेचा बडगा उभारण्यात आला . ही बॅनर्स लावता येणार नाहीत अशी भूमिका नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी घेतली गेली . अखेर राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडून ‌‘लोकसत्ता’च्या रि-लाँचचा आणि निवडणुकीचा कसा संबंध नाही , याच्या सूचना जारी करायला लावण्यात आल्या. कार्यक्रमाच्या आधी एक दिवस डॉ. यशवंत मनोहरांचा फोन आला. ‌‘हे सर्व चित्रपट इतके अभिजात आहेत की  , शो झाल्यावर प्रत्येक चित्रपटावर मला लिहायला आवडेल’ असं ते म्हणाले. ही तर झकासच आयडिया होती . मनोहरांचा प्रस्ताव मी लगेच स्वीकारला.

पाच तारखेला रात्रीच्या विमानाने कुमार केतकर आणि नाना पाटेकर येणार होते. त्यांच्यासोबत शंकर शिंदे आणि औरंगाबादहून सतीश कुलकर्णीही येण्याचं निश्चित होतं . फक्त संपर्क झालेला नव्हता तो नाना पाटेकरशी . नानाचा सेलफोन ‌‘आऊट ऑफ रेंज’ लागत होता . ऑफिसमधून निघून  मुंबईच्या विमानतळावर यायला कारमध्ये बसल्यावर केतकरांनी मला सांगितलं , ‌‘मी, शंकर आणि सतीश तिघंही निघालो आहोत . या क्षणापर्यंत नानाशी संपर्क झालेला नाही . तसा तो शब्दाला पक्का आहे . लेटस्‌‍ होप ही विल कॅच अस ऑन एअरपोर्ट’ , एवढं बोलून केतकरांनी फोन बंद केला . काळजाचा ठोका चुकला आणि मला खूप टेन्शनही आलं . मला हे कुणाशी शेअरही करता येत नव्हतं . सहन होत नाही आणि सांगताही येत नाही म्हणजे नेमकं काय याचा तो अनुभव होता .. मी आणि धनंजय एअरपोर्टकडे जात असताना केतकरांनी विमानात बसण्याआधी घाईघाईत केलेला एसएमएस मिळाला. ‌‘नाना रीचड्’ आणि मी अक्षरश: कार थांबवून सुटकेचा भला मोठा निःश्वास टाकला. धनंजयला कळेचना , काय झालं ते.

मग मी नाना प्रकरण त्याला सांगितलं आणि आम्ही एअरपोर्टकडे रवाना झालो. एअरपोर्टला पोहोचलो, तर बऱ्यापैकी गर्दी झाली होती . पोलीस बंदोबस्त लागला होता . आम्ही कार अगदी अरायव्हल गेटच्या समोर लावली . नाना बाहेर आला . धनंजयनं त्याचं स्वागत केलं . लोकांनी गर्दी केली. नाना अनेकांशी बोलला . त्याने शेकहँड केला. एकूण नानाचा मूड छान होता . सतीशनं कारची सूत्र स्वत:कडे घेतली . केतकर , धनंजय आणि मी मागे बसलो आणि कार धनंजयच्या फार्म-हाऊसकडे निघाली . ‌‘मला वाटलं, तू काही येत नाहीस आता . लावली शेंडी’ कार विमानतळाच्या बाहेर पडल्यावर असं मी नानाला म्हणालो .

त्यावर एक कचकचीत शिवी घालत ‌‘मी काय राजकारणात नाही’ असं नाना म्हणाला  . धनंजयनं नानाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती . स्कॉचचे दहा-बारा प्रकार होते . बाकीही किंमती व्हिस्की होत्या . खाण्याचीही जय्यत तयारी होती . दिमतीसाठी तीन-चार वेटर्सचा ताफा होता . स्पेशल कुक होता. बार टेबल न्याहाळल्यावर नानानं धनंजयला विचारलं , ‌‘रम नाही का रे ?’ इतक्या सगळ्या किंमती स्कॉचेस बघितल्यावर कोणी रम मागेल असं धनंजयला वाटलंच नव्हतं . नानानं वेटरला बोलावलं . कारमधली त्याची बॅग आणायला सांगितली . बॅगेतली रमची बाटली आणि चार-पाच हिरव्या मिरच्या नानानं काढल्या आणि आमच्या सर्वांच्या ‌‘कीर्तना’ला सुरुवात झाली . धनंजयच्या फार्म हाऊसवरून रात्री अडीच वाजता निघालो तेव्हा सकाळी आठ वाजेपर्यंत कोणीही कोणाला फोन करायचा नाही असं ठरलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासहालाच नानानं फोन करुन सगळ्यांना उठवून दिलं . ‌‘आठ वाजता ब्रेकफास्टला हजर राहा’ असा हुकूमही त्यानं सोडला. नानाचा कार्यक्रम ९ वाजता होता. आमच्या सर्व सहकाऱ्यांना ‌‘प्रत्येकानं किमान सोबत एकाला आणलंच पाहिजे’ असा दमच मी दिलेला होता . असे आमचे दीडेकशे आणि वाचक सव्वाशे-दीडशे आले तरी आयएमएचा हॉल बऱ्यापैकी भरलेला दिसला असता . रॉबर्ट , वीरेन्द्र आणि मी सतत एकमेकांना फोन करून उपस्थितीचा अंदाज घेत होतो . कार्यक्रम नागपुरी खाक्यानं साडेनऊ-पावणेदहाला सुरु करु असं मी ठरवलं होतं. तर साडेआठपासूनच नाना आणि केतकरांची चुळबुळ सुरु झाली. ‌‘चल, निघू या.’ असा लकडा त्यांनी दर मिनिटा-दोन मिनिटाला लावायला सुरुवात केली. अखेर मी त्या दोघांना नागपुरात नऊचा कार्यक्रम साडेनऊच्या आत कसा सुरु होत नाही हे सांगितलं तर केतकर म्हणाले, ‌‘अरे, आपण होस्ट आहोत. आपण वाचकांचं स्वागत करायला हजर असलं पाहिजे.’ हे असं सुरु असतानाच वीरेन्द्र रानडेचा फोन आला की , ‌‘रिस्पॉन्सचा प्रॉब्लेम नाहीये . हॉल आताच पॅक झालाय  .’ शेवटी नऊला आम्ही निघालो. दहा मिनिटांतच पोहोचलो तर रस्त्यापर्यंत गर्दी झालेली होती . नानातल्या ‘स्टार’ला सुखावणारं वातावरण होतं .  कारच्या खिडकीची काच खाली करुन नानानं हात उंचावत अभिवादनाला सुरुवात केली आणि जो प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली तो थंडावलाच नाही . गर्दीतून वाट काढत आम्ही सरळ व्यासपीठावर पोहोचलो . माझं प्रास्ताविक, सत्कार वगैरे संपलं आणि टेबलामागची खुर्ची स्वत:च उचलत नाना समोर येऊन बसला आणि म्हणाला, ‌‘चल, कुमार सुरु कर .’ आम्हाला काही कळायच्या आतच हे घडलं . मुलाखतीला सुरुवात झाली . तब्बल पावणेदोन तासांपेक्षा जास्त ही मुलाखत रंगली . आम्ही ऑफिसला गेलो . अगदी चहावाल्या पोऱ्यासकट नानानी सगळ्यांशी शेकहॅण्ड केला . ऑटोग्राफ दिला आणि प्रत्येकाची त्याच्यासोबत फोटो काढून घेण्याची हौसही भागवली .

दुपारचं जेवण माझ्याच घरी होतं . टेरेसवर आंब्याच्या झाडाच्या फांद्या दाटपणे पसरलेल्या होत्या . त्याची गर्द सावली होती . महत्त्वाचं म्हणजे लगडलेल्या कैऱ्या हातांनी तोडता येण्यासारख्या होत्या . ते बघून नाना अक्षरश: वेडावून गेला . शुद्ध शाकाहारी पण , झणझणीत जेवणावर झकास ताव मारल्यावर नानानं घरच्या सगळ्यांसोबत आवर्जून फोटो काढून घेतले आणि ‌‘तुम्ही बसा गप्पा मारत. मी झोप काढतो ,’ असं म्हणत जिना उतरायला सुरुवात केली . आमच्या फ्लॅट स्कीमच्या गेटच्या अगदी समोर पानविडीचं दुकान होतं. तिथे जाऊन नानानी पान मागितलं आणि पानवाला अनिल वेडाच झाला . नानाला बघून तिथे ‌‘ही’ गर्दी गोळा झाली. शेजारी खाण महामंडळाचं कार्यालय , चहाचा ठेला आणि रिक्शाचा स्टॅण्ड होता . गर्दीला काही तोटाच नव्हता . लोकांनी ऑटोग्राफ मागितले. पान खाता-खाता आणि सिगारेट पितापिता पंधरा-वीस लोकांना ऑटोग्राफ देऊन नाना कारमध्ये बसला आणि निघून गेला . अभ्यंकरनगरच्या त्या गल्लीत आमचा तर सोडाच आमच्या डॉगीचाही भाव एकदम वधारला !

रस्त्यातूनच नानाचा फोन आला. दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या काही मुलांना त्याला भेटायचं होतं . जमलं तर गरजूंना मदतही करायची होती . ‌‘संध्याकाळी सहाला फूड फेस्टिव्हलचं उद्घाटन करायला जाण्याच्या आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मुलांना भेटू . माझी झोप होईस्तवर सर्व माहिती काढून ठेव ,’ असं म्हणून नानानी फोन बंद केला . मी , डॉ. श्रीकांत चोरघडेंना शरण गेलो . त्यांनी भराभरा फोन करून अशा मुलांचा शोध घेतला . संबंधितांशी बोलून भेटीची सोय करुन दिली . साडेचारला हॉटेलला पोहोचून नानाला घेऊन या मोहिमेवर निघालो . धंतोलीतल्या एका हॉस्पिटलजवळ आम्ही पोहोचलो. कारमधून खाली उतरलो तर प्रेसफोटोग्राफर्सचा गराडा पडला . नानानं सगळ्यांना ‌‘नो फोटो’ असं दरडावत हुसकावून लावलं. फक्त तो , केतकर आणि डॉ. चोरघडे असे तिघेच त्या मुलांना भेटले . सोबतचे आम्ही तिघे बाहेर थांबलो . नंतर नानानं मदतीच्या रकमांचे पाच चेक पाठवले आणि त्याची कोणतीही वाच्यता न करण्याचा दम दिला . नानाच्या दातृत्वाचा आणखी अनुभव माझ्या पदरी जमा झाला .

‌‘ग्रेट मराठा’त आम्ही पोहोचलो , तर बाहेर चांगलीच गर्दी झालेली होती . हॉटेलपासून शंभर फुटांवर लोकांना रोखलं होतं . नानाच्या फॅन्सचा ‌‘नाऽना, नाऽना’ असा घोष सुरू होता . नानाची तबियत एकदम खूष झाली . ‌‘ग्रेट मराठा’च्या त्या अतिशय देखण्या हॉलच्या बाहेरच अडीच-तीन फूट उंचीची संगमरवरातली गणपतीची मूर्ती होती . त्या मूर्तीला हार अर्पण करुन तो देखणा हॉल आणि फूड फेस्टिव्हलचं उद्घाटन झाल्याचं नानानं जाहीर केलं . आम्हा सर्वांची भाषणं झाली . नाना आणि केतकर व्यासपीठावरून खाली उतरले आणि पब्लिकने त्यांना गराडा घातला. हॉटेलबाहेर तर गर्दीच उसळली होती. नानातल्या स्टारला हे सर्व सुखावणारं होतं .

एक गोष्ट सांगायलाच हवी. नानानं शेवटपर्यंत टांगवून ठेवलं तरी आल्यावर मात्र स्टारपणाचा कोणताही भाव न खाता तो आमच्यासोबत चोवीस तास राहिला . जाण्या-येण्याचं विमानाचं तिकीटही त्यानंच काढलं. विमानतळावर जाताना मी नानाला म्हटलं, ‌‘थँक्स म्हणू का रे?’

नाना उसळलाच. ‌‘दाढी आहे म्हणून कानाखाली आवाज निघत नाही असं वाटलं का तुला?’ मग केतकरांकडे वळून ‌‘कुमार, तू आणि प्रवीणसाठी मी आलो . मित्रांना शब्द दिला होता तो पाळला . आता जा तुम्ही उडत.’ असं म्हणून त्यानं सिगारेट काढून पेटवली आणि विषय संपवला .

-असा हा खेळीया नाना .

(नानाचं स्केच – तरुण नाना पाटेकर . १९७१ मध्ये दत्तात्रय पाडेकर यांनी एका बस प्रवासात काढलेलं. चित्रकार सतीश नाईक यांच्या  सौजन्याने )

(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)

+919822055799

 

Previous articleडॉ. आ. ह. साळुंखे : प्रज्ञा, करुणा आणि विवेकाचा जागर
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here