-अशोक नामदेव पळवेकर
…………………………
काल, पाब्लो मला भेटला!
तो नुकताच चिलीतून इकडे आला होता.
राजकमल चौकात
आम्ही टपरीवर चाय घेत गप्पा मारत उभे होतो.
तो म्हणाला :
“कसे-काय इकडचे
सामाजिक-राजकीय-साहित्यिक वगैरेचे वातावरण?”
मी म्हणालो :
“तसे ठीक आहे, पण ठीक नाहीय्…!”
“जे लिहितात :
व्यवस्थेच्या विरोधात थातुरमातुर..
किंवा, नाचवतात :
शब्दांना घुंगरू बांधून मैफलीत..
किंवा, बांधतात :
शब्दांच्या गळ्यात चापलुसीच्या मंजुळ घंटा..
त्यांना दिले जातात :
मान-सन्मान, पुरस्कार, मंडळांवर नियुक्त्या, सत्तेत स्थान
वगैरे वगैरे..
आणि, जे भरतात ठास्सून बार लेखणीने व्यवस्थेच्या विरोधात
लढतात सामान्य जनतेच्या हक्क-अधिकाराचा लढा
त्यांना पकडले जाते बनाव रचून
टाकले जाते गजाआड
किंवा, ठेवले जाते स्थानबद्ध करून
किंवा, पाडले जातात त्यांचे खून..”
“तूर्तास, जे आहे- ते असे, असे आहे…!”
तो शांतपणे ऐकत म्हणाला :
“मीही लिहायचो :
सामान्य माणसाच्या बाजूने;
आणि व्यवस्थेच्या विरोधात, तेव्हाही..
व्यवस्थेच्या पाठीराख्यांना फुटायचा दरदरून घाम..
हादरायची सत्ता मुळासकट..
पाठवायचे ते मारेकरी माझ्या घरात, माझ्यावर..
सत्तेला
सर्वात जास्त भीती जनतेच्या कवीचीच वाटत असते!”
“असेच, एकदा काय झाले..
मी होतो घराबाहेर
एका ‘भयंकर’ माणसाला मारायचे म्हणून
कंत्राट घेतलेले काही ‘भाडोत्री’ घुसले माझ्या घरात
माझ्या पश्चात् घेतली त्यांनी माझ्या घराची झाडाझडती..
विस्कटून टाकलीत माझी पुस्तकांची सर्व कपाटं..
आणखी, अन्य काही गोष्टीं वगैरे..
त्यांना, पुस्तकं आणि माझ्या कवितांच्या वह्यांशिवाय
काहीच लागलं नाही हाती त्यांच्या!”
“एवढ्यात, मी दाखल झालो तेथे.”
“विचारले : कोण-काय हवंय् तुम्हाला?”
“ते म्हणाले :
‘आम्ही शोधतोय् पाब्लो नेरुदाला’..”
“तो आहे एक महाभयंकर डेंजर माणूस..
स्फोटक, विद्रोही, बंडवाला वगैरे वगैरे..”
“आम्हाला, शोधायचाय् त्याच्या घरातला
त्याचा तोफखाना, त्याच्या बंदुका, त्याची हत्यारं..
आणि, करायचेय् ठार त्याला!”
“पण, आम्हाला असं वाटतंय् :
आमचा चुकलाय पत्ता, बहूतेक..
आणि,
आलो आहोत आम्ही एका चुकीच्या माणसाच्या घरात..
इथं बंदुका, हत्यारं वगैरे
कुठं काहीच दिसत नाहीत..पुस्तकांशिवाय!”
“तेव्हा,
मी म्हणालो त्यांना-
मीच तो, पाब्लो नेरुदा!”
“ते पुस्तक.. हां तेच.. ते आहे :
माझ्या कवितेचे पुस्तक ‘Heights of Macchu Picchu’
ते घ्या इकडे..
त्यात : मी जपून ठेवल्या आहेत-
माझ्या बंदुका..माझा तोफखाना..माझी हत्यारं..!
आणि,
वाचू लागलो माझी एकेक कविता..त्यांच्यासमोर..
“हे ऐकताच, ते क्षणभर भांबावले..”
“म्हणाले : ‘वेडा दिसतोय हा!’
आणि,
मला तसेच सोडून, ते तिथून पळून गेले..
भाडोत्रीच ते!
त्यांना काय कळणार, कविता-बिविता?”
“तेव्हा, तुमचा देश काय-आमचा देश काय, सगळीकडे सारखेच..!”
काल,
पाब्लो मला रस्त्यात भेटला तेव्हाची गोष्ट..
••
-अशोक नामदेव पळवेकर
9421829497