तुम्ही त्यांचे अखेरचे बळी ठरू शकता!

अॅटलस श्रग्ड- आय़न रॅन्ड

अनुवाद -मुग्धा कर्णिक

“तुम्ही इतके नीतीभ्रष्ट झाला आहात की तुम्हाला वाटतं तुम्ही अशा एखाद्या बुवाच्या हुकूमशाहीत कल्याणकारी राज्य अनुभवू शकाल. त्याची आज्ञा पाळली की तो खूष होईल असं वाटतं तुम्हाला. लक्षात ठेवा, अशा लोकांना कोणीही खूष करू शकत नाही. तुम्ही त्याच्या आज्ञा पाळायला सुरुवात केली की काही काळाने तो त्याविरुध्द आज्ञा देऊ लागतो. आपल्या आज्ञा पाळल्या जातात हे त्याला सतत सिध्द करायचं असतं. आपल्यात विनाश करण्याची शक्ती आहे हे सिध्द करण्यासाठी तो विनाश आरंभतो. तुम्ही इतके भ्याड झाला आहात की तुम्हाला वाटतं, या हुकूमशहापुढे गुडघे टेकलेत की तो तुम्हाला माफ करील.
त्याला असं शांत करणं तुम्हाला कदापि शक्य नसतं. त्याला शांत करण्याची किंमत स्वतःचं जीवन त्याच्यावरून ओवाळून टाकणं हीच असते किंवा मग मृत्यूच दान द्यावं लागतं. त्याच्या मनातला रिकामटेकडा राक्षस तुमच्या मृत्यूचंच खाद्य मागत असतो. आपल्याला जीवनात रस नाही हे स्वतःपासून दडवायचा त्याचा तो भयाकुल प्रयत्न असतो.

“तुम्ही धरून चालता… की तुमच्या जगात आज ज्या प्रवृत्तींनी थैमान घातलं आहे त्यांचा उद्देश संपत्तीची हांव हाच आहे. लूट करणारे सारे स्वतःचा खरा हेतू लपवण्यासाठीच लूटही करतात. संपत्ती हे मानवी जीवनाचं एक साधन आहे आणि म्हणून ते ही संपत्ती हवी असल्याचा आविर्भाव करतात. स्वतःला जीवनात रस असल्याचं नाटकही वठवतात. पण या लुटलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा त्यांचा देखावा पहा. त्यात जीवनाचा आनंद नसतो, पलायनाचा मार्ग असतो तो. त्यांना तुमची संपत्ती हवी असते असं नाही. ती तुमच्याकडे नसावी असं त्यांना वाटतं. त्यांना स्वतःला यश नको असतं, पण तुम्हाला अपयश यावं अशी मात्र फार दांडगी इच्छा असते त्यांची. त्यांना जगण्याची इच्छा नसतेच. पण तुम्ही मरावं अशी मात्र खास इच्छा असते. त्यांना कसलीच इच्छा नसते. अस्तित्वाचा द्वेष वाटतो त्यांना. पण हे जाणण्याचं ते टाळतात. स्वतःच स्वतःचा तिरस्कार करतात.

“तुम्हाला दुष्टत्वाचं स्वरूपच कळलेलं नाही. तुम्ही ज्यांना वाट चुकलेले आदर्शवादी म्हणता, -तुम्ही शोधलेला देव तुम्हाला क्षमा करो त्याबद्दल- ते तथाकथित आदर्शवादी म्हणजे दुष्टतेचा अर्क असतात. जीवनाविरुध्द असलेले हे मनुष्यप्राणी जगाच्या जिवंतपणाला गिळंकृत करून स्वतःच्या निःसत्व, स्वत्वहीन आत्म्याची पोकळी भरून काढू पहातात. ते काही तुमच्या संपत्तीच्या मागे नसतात. त्यांचं कारस्थान असतं बुध्दीप्रामाण्याच्या विरोधात. म्हणजे माणसाच्या किंवा अस्तित्वाच्या विरोधात.

“या कारस्थानाला नेता नाही की दिशा नाही. या क्षणावर स्वार झालेले बारीकसारीक भुरटे चोर, जे जगाच्या या नाही तर त्या भागात चाललेल्या संकटकाळाचा गैरफायदा घेऊन लुटालूट करतात. शतकानुशतकं तुंबत आलेलं गटार फुटून जो घाणीचा प्रवाह पसरतो आहे
त्यावरचा केवळ तवंग आहेत ते. बुध्दी, विवेक, तर्क, क्षमता, यश, आनंद या साऱ्या मूल्यांचा द्वेष करणाऱ्या वृत्तींच्या गटारात मानवाविरुध्द रडून विव्हळून सूर लावणाऱ्या प्रत्येकाने भर घातली. बुध्दीपेक्षा भावना श्रेष्ठ असं म्हणणाऱ्या सर्वांनी त्यात भर घातली.

“ज्यांना खऱ्या अर्थाने जगायचं नाही- केवळ आला जन्म घालवायचा आहे, अशा सर्वांनी मिळून रचलेलं कारस्थान आहे हे. यातला प्रत्येकजण वास्तवाचा एक तुकडा कुरतडून टाकू पहातो. आणि भावनेच्या बळावर या प्रकारातल्या सर्वांची एकी होते. शून्य हेच मूल्य मानणारा प्रत्येकजण सारं वास्तव टाळण्याच्या समान धाग्याने एकमेकाशी बांधला जातो. विचार करायला जमत नाही असा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याची बुध्दी पांगळी, खुजी करून टाकू पहातो. प्रगती करू न शकलेला अयशस्वी व्यावसायिक आपल्या सहव्यावसायिकांना साखळदंडांनी जखडलेलं पहाण्यात धन्यता मानतो. स्वतःचाच तिरस्कार करणारा विकल बुध्दीचा मनुष्य आत्मविश्वास, आत्मसन्मान असलेल्या दुसऱ्या माणसाचा अधिक्षेप करू पहातो. यशस्वितेला पराभूत करू पहाणारा अकार्यक्षम माणूस, बुध्दीमत्तेला पायदळी तुडवू पहाणारा सुमार कुवतीचा माणूस आणि या सर्वांना तर्कदुष्ट हत्यारं पुरवणारे बुध्दीवादी, सर्व प्रकारच्या सद्गुणांना तुच्छ लेखून दुर्गुणांनाच उच्च मानणारे उपदेशक या साऱ्यांच्या तत्वज्ञानाच्या मुळाशी आहे एक मृत्यूसन्मुख सूत्र. त्यांच्या सर्व कृतींची प्रेरणा मृत्यूच्याच विचारातून मिळते.
आणि लक्षात घ्या, तुम्ही सारे त्यांचे अखेरचे बळी ठरू शकता.”

अॅटलस श्रग्ड- आय़न रॅन्ड

Previous articleकाय असतो स्वैराचार?
Next articleकाल, पाब्लो मला भेटला!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.