आपल्या समाजात बोटावर मोजण्याइतकी माणसे ही खर्या अर्थाने ‘दखलपात्र’ असतात. म्हणजे तुम्ही त्यांचे समर्थन करू शकता वा विरोध! मात्र तुम्ही त्याची उपेक्षा करू शकत नाही. मराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात याच पध्दतीने अनेक वाद-विवादांना अंगावर घेणारे आणि यात सर्वांना पुरून उरणारे उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे होत. त्यांना ‘ज्ञानपीठ’ने गौरविण्यात आले ही समस्त मराठी जनांसाठी व त्यातही खान्देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.
भालचंद्र नेमाडे यांचे साहित्यक्षेत्रातील आगमन हे एखाद्या धुमकेतुसमान झाले. अवघ्या पंचविशीतला युवक आपल्या कॉलेज जीवनातील अनुभवांना नव्या शैलीत व्यक्त करतो इथेच ‘कोसला’ थांबली नाही. आज या कादंबरीच्या प्रकाशनानंतर अनेक पिढ्यांमधील तरूणाईने हे पुस्तक डोक्यावर घेतले याचा अर्थही आपण समजून घेतला पाहिजे. ‘शंभरातील नव्व्याणवांस’ समर्पित असणार्या या कादंबरीतील भाषाशैलीपासून ते नायकापर्यंत सारे काही तत्कालीन साहित्य विश्वाला हादरे देणारे ठरले. साठच्या अस्वस्थ दशकात जगभरातील तरूणाईमध्ये आढळून येणारा बंडखोरपणा पांडुरंग सांगवीकर कडे असला तरी जगाकडे बेपर्वाइने पाहण्याची वृत्ती, दांभिकतेबद्दल चीड आदी नवतारूण्यातील सर्व गुण-दोष त्याच्यात आहेत. तशा घरच्या सधनतेमुळे पोटापाण्याची चिंता नसली तरी अभ्यासातील अपयशाने तो हैराणही झाला आहे. पांडुरंगचे परावलंबीत्व, त्याचा पलायनवादी स्वभाव आदींवर मराठीत विपुल लिखाण झाले आहे. या न-नायकाची मानसशास्त्रीय चिरफाडही झाली आहे. मराठीत कुण्या कादंबरीच्या नायकाला असे भाग्य लाभले नाही. अगदी त्यांच्याच चांगदेव पाटील, नामदेव भोळे वा नुकत्याच ‘हिंदू’मधील खंडेरावच्याही नशिबात असा योग आला नाही. ‘कोसला’ ही संभ्रमित वयातल्या एका पिढीची कथा राहिली नाही तर आजच्या वाचकांनाही ती भावते याचा अर्थ ही कलाकृती काळाच्या कसोटीवर टिकणारी असल्याचे सिध्द झाले आहे.
भालचंद्र नेमाडे यांचे ‘कोसला’ नंतरचे लिखाण तितकेसे सकस नसल्याचा आरोप करण्यात येतो. अनेकांनी तर नेमाडेंनी आपल्या पहिल्याचा कादंबरीनंतर थांबले असते तरी ते मराठी साहित्यात अजरामर झाले असते असा दावा केला आहे. कोणत्याही प्रतिभावंताच्या सर्वोत्तम कलाकृतीची त्याच्या अन्य सृजनासोबत होणारी तुलना ही अटळ असते. यातुन अस्सल-कमअस्सल अशी वर्गवारीदेखील ठरविण्यात येते. नेमाडे यांच्या कादंबर्या आणि त्यांच्यातील नायकांचीही अशी अनेकदा तुलना झाली. बहुतांश समीक्षक आणि वाचकांच्याही मते ‘कोसला’ ही कादंबरीच त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम सृजन आहे. bhalchandra_nemade1अर्थात या पुस्तकातील नायक पुढे परिपक्व कसा होतो हे जरीला’, बिढार’, झुल’ आणि हिंदू’तुनही स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. मराठी साहित्याच्या जाणीवा या पांढरपेशा वर्गाच्या तसेच फडके-खांडेकर यांच्या सौदर्यशास्त्रापर्यंत मर्यादीत असतांना नेमाडेंचे साहित्यात आगमन झाले. तोपर्यंत मराठी कादंबर्यांचा नायक हा बंगाली साहित्याच्या प्रभावाने गुलछबू असे. मालती-माधव यांच्यासमान मध्यमवर्गीय नायक-नायिकांच्या प्रेमभावनांपलीकडे बहुतांश लेखक पाहण्यास तयार नसतांना खान्देशातल्या सांगवी गावातल्या शेतकर्याचा मुलगा कुण्या कादंबरीचा नायक बनू शकतो हे तेव्हापर्यंत तरी कुणी कल्पना करू शकत नव्हते. ‘कोसला’नंतर भाऊ पाध्ये यांच्यासारख्या लेखकांनी महानगरीय जीवनाचे जीवंत चित्रण केले. यासोबतच दलीत लेखकांनी मराठी जाणीवांना धक्का देण्याचे काम केले. विस्तारलेल्या जाणीवांचा हा पट नव्वदोत्तर साहित्यात अजून प्रवाही बनला. मात्र याची सुरूवात नेमाडे यांनीच केली होती. त्यांच्या साहित्यातील आगमनाचा कालखंड हा मध्यमवर्गीय जाणीवा असणार्या कादंबर्या आणि लघुकथांचा होता. त्यांनी सातत्याने कथा आणि विशेषत: लघुकथांवर टीका केली. अगदी हा साहित्याचा खरा प्रकार नसल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या मते कादंबरी आणि कविता हेच खरे साहित्यप्रकार होत. अनेकदा त्यांनी यावर सविस्तर विवेचनही केले आहे. त्यांचे फक्त ‘देखणी’ आणि मेलेडी’ हे दोन काव्यसंग्रहच आलेत. अनेकदा त्यांनी काव्याकडे दुर्लक्ष झाल्याची कबुलीदेखील दिली आहे. अर्थात त्यांच्या मोजक्या कविता हा अत्यंत ताकदीने स्त्रवल्या आहेत यात शंकाच नाही.
कादंबरी आणि कवितेसोबत नेमाडेंनी समिक्षेतही वेगळेपणे जोपासले. मुळातच टिका करतांना त्यांची तिरकस शैली अगदी धारदार बनली. यातून त्यांनी मांडलेली मते आणि सिध्दांत वादग्रस्त बनले. मराठीतला सर्वोत्तम कवि तुकाराम असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपल्या भाषेत एकही सर्वश्रेष्ठ कादंबरीकार नसल्याचा त्यांचा दावा खळबळजनक ठरला. यातून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. अर्थात साने गुरूजी यांचा शाम हा मराठीतला सर्वोत्तम नायक असल्याचे त्यांचे मतही अनेकांच्या पचनी पडले नाही. ‘टिकास्वयंवर’ या ग्रंथाशिवाय त्यांनी वेळोवेळी साहित्य आणि साहित्यिकांवर मार्मिक मत प्रदर्शन केले. यातील अनेकांवर वाद-प्रतिवाद झाले. मात्र नेमाडे आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. साधारणत: ऐशीच्या दशकाच्या शेवटी त्यांनी देशीवादाची मांडणी सादर केली. म्हैसूर येथे विख्यात लेखक आर.के. नारायण यांच्यासह अनेक इंग्रजीत लिखाण करणार्यांसमोर त्यांनी प्रथम हा विचार मांडला. यात पहिल्याच वेळी यावर प्रतिवाद करण्यात आला. हा विचार प्रतिगामीपणाचा असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर त्यांनी याचे सविस्तर विवेचन केले. काळाच्या ओघात हा विचार प्रबळ झाला. अनेक क्षेत्रांमध्ये याची प्रचिती आली. इथे उदाहरणच द्यावयाचे तर भारतीय जनता पक्षाने राजकारणात धार्मिक आणि राजकीय पातळीवर याचा प्रयोग केला. मात्र यातील भंपकपणा खुद्द नेमाडे यांनीच उघड केला.
आज जग हे जवळ आले आहे. अगदी ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना सर्रास वापरण्यात येते. या पार्श्वभुमीवर नेमाडे यांचा देशीवाद खरं तर कस्पटासमान उडून जायला हवा होता. मात्र एकविसाव्या शतकातील दुसर्या दशकाच्या मध्यावरही देशीवाद जिवंतच नव्हे तर अनेक क्षेत्रांमधील याची उपयुक्तता वारंवार अधोरेखित होत आहे. देशीवादात भुसांस्कृतीक प्रतिकांना जोपासणे अभिप्रेत आहे. आपला भोवताल आणि त्यातील एकजीनसीपणा याला महत्व देण्यात आले आहे. आता तर देशीवाद आपल्यासमोर नवनवीन स्वरूपात येत आहे. आज आपल्याला जगातील कोणतेही धान्य, फळ वा अन्य खाद्यपदार्थ खाणे शक्य आहे. मात्र दुसर्या भागातील खाद्यान्य हे त्या भागातील व वातावरणातील लोकांसाठी असते. आपल्याकडे ते आरोग्याला घातकही ठरू शकते असे संशोधनातून दिसून येत आहे. अगदी थंड प्रदेशांमध्ये दारू ही शरीराला आवश्यक असली तरी भारतासारख्या उष्ण प्रदेशात ती घातकच. तसेच पाश्चात्य राष्ट्रांमधील टाय-सुट आपल्याकडे त्रासदायक ठरू शकतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. आता विदेशी भाषा, संस्कृतीपासून ते विविध फॅशन्स, पॉप-कल्चरमधील प्रतिके या बाबी बाजारकेंद्रीत असून त्या अनावश्यक आहेत. याच्या उलट आपला भोवताल-अगदी भौगोलिक वैशिष्टांसह तेथील पर्यावरण, इतिहास, बोली-भाषा, संस्कृती, परंपरा, चालिरीती आदींनीयुक्त जीवनपध्दती आणि याचे साहित्यात पडणारे प्रतिबिंब म्हणजे देशीवाद अनुपयुक्त कसा? असा नेमाडे आणि त्यांचे समर्थक प्रश्न विचारतात तेव्हा समोरचे निरूत्तर झाल्याशिवाय राहत नाहीत. अनेकदा यावर टीका करण्यात आली. हा विचार प्रगतीचा विरोधक, परभ्रुत व प्रतिमागी असल्याचा आरोप करण्यात आला. नेमाडे हे चातुर्वण्याचे समर्थक असल्याचा दावाही झाला. याचे खंडण लेख, परिसंवाद व अगदी पुस्तकांच्या माध्यमातूनही करण्यात आला तरी त्याला पुर्णपणे नाकारणे कुणाला शक्य झाले नाही हाच नेमाडेंचा ग्रेटनेस!
भालचंद्र नेमाडे हा माणूस फक्त कादंबरी, कविता, लेख, चर्चा वा भाषणांइतकाच मर्यादीत नाही ही बाबही आपण लक्षात घ्यावी. या सर्व माध्यमातून त्यांनी जीवनाच्या जवळपास प्रत्येक अंगावर बिनधास्त, बेधडक भाष्य केलयं. तसे ते रूढ अर्थाने विचारवंतही नाहीत. मात्र अनेक विषयांवरील त्यांची मते ही त्यावर अगदी युगप्रवर्तक नसले तरी नव्याने व्याख्या करणारी ठरली. विशेषत: ब्राह्मणी विचारधारेला त्यांनी सातत्याने झोडपून काढले. अर्थात अन्य विचारधारांमधील काही बाबींनाही त्यांनी लक्ष्य केले. हिंदू कादंबरीच्या प्रकाशनानंतर त्यांनी इतिहास, मिथके आणि दैवतांबद्दल अत्यंत स्फोटक वक्तव्ये केलीत. अलीकडच्या काळात त्यांनी साहित्य संमेलनास ‘रिकामटेकड्यांचा उद्योग’ म्हणून संबोधून वाद ओढून घेतला होता. त्यांची अनेक वक्तव्ये वादाला आमंत्रण देणारी ठरली. नेमाडेंनी अनेकदा आपल्या विचारांना हरताळ फासला तेव्हा त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. कधी काळी लेखकांचा ‘लेखकराव’ होण्याबद्दल हल्लाबोल करणारे नेमाडे यांचा स्वत:चा ‘लेखकराव’ झाल्याचा आरोपही करण्यात आला. आपल्या कादंबरीतून कुसुमाग्रजांची अत्यंत अश्लील भाषेत खिल्ली उडविणार्या नेमाडेंनी त्यांच्याच नावाने असणारा जनस्थान पुरस्कार बिनदिक्कतपणे स्वीकारला. जगातील कोणताही पुरस्कार हा वशिलेबाजीशिवाय मिळत नसल्याचे अनेकदा सांगणार्या या लेखकाने ‘पद्मश्री’ आणि ‘जनस्थान पुरस्कार’ तर स्वीकारलेच पण ते आता ज्ञानपीठही स्वीकारणार आहेत. वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि वृत्तवाहिन्यांकडे तुच्छतेने पाहणाच्या नेमाडेंना ‘हिंदू’च्या प्रकाशनानंतर या माध्यमांचा मुकाट स्वीकार करावा लागल्याचेही जगाने पाहिले. कदाचित जगाकडे निरिच्छ भावाने पाहणारा ‘पांडुरंग सांगवीकर’ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात विचारांनी पोक्त बनला असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.
काहीही असो मी वर सांगितल्याप्रमाणे भालचंद्र नेमाडे हा माणूस थोर प्रतिभावंत लेखक आणि आपल्या मतांवर ठाम राहणारा माणूस आहे. (ते एक उत्कृष्ट शिक्षकही आहेत.) त्यांच्या प्रतिभेतून स्त्रवलेले विचार मराठी भाषा अस्तित्वात असेपर्यंत कायम टिकतील अन् त्यांच्यातील धाडसी माणसाने ओढवलेले वादही कुणी विसरणार नाही. नेमाडेंच्या सोबत असणार्या अनेकांच्या स्वभावातील आक्रमकता व विद्रोहीपणा कालौघात मालवला. बहुतेकांनी परिस्थितीशी तडजोड केली. मात्र आपल्या अटी, शर्ती आणि नियमांवर लिखाण वा ठाम मत प्रदर्शन करणे हे फक्त भालचंद्र नेमाडे यांनाच जमले. अनेक वाद अंगावर घेऊनही ते सर्वांना पुरून उरले. अर्थात याचमुळे त्यांच्या विचारांना पंथाचे (कल्ट) स्वरूप मिळाले. आणि याच नेमाडपंथाला आता भारतीय पातळीवर ज्ञानपीठच्या माध्यमातून मान्यता मिळालीय. भालचंद्र नेमाडेंनी आयुष्यात सातत्याने ज्या विचारधारेवर कडाडून प्रहार केले त्याचेच अनुयायी राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहेत. तसेच त्यांनी संबोधिलेले ‘रिकामटेकड्यांचे’ घुमान येथील साहित्य संमेलन तोंडावर असतांना त्यांना मिळालेला हा पुरस्कार ‘काळाचा काव्यात्मक न्याय’ असाच आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची ‘टायमिंग’ ही नेमाडेंच्या वादळी साहित्यीक कारकिर्दीला साजेशीच म्हणावी लागेल.
काही दिवसांपुर्वीच कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनांच्या दबावाला बळी पडून दक्षिण भारतातील नामवंत साहित्यिक पेरुमल मुरुगन यांनी उद्विग्नतेने आपल्यातील लेखकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करत लिखाणास पुर्णविराम दिला. इकडे याच पध्दतीने किंबहुना त्यापेक्षाही ज्वालाग्राही स्वरूपात हिंदूत्व आणि कट्टर विचारधारेवर प्रहार करणारे भालचंद्र नेमाडे यांच्या विचारांना मराठी समाजाने विलक्षण समजुतदारपणे ऐकून घेतले ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. खरं तर महाराष्ट्राप्रमाणे तामिळनाडूलाही पुरोगामी चळवळीचा एक शतकापेक्षा जास्त इतिहास आहे. अलीकडच्या काळात तेथेही संकुचितपणाचे हिंस्त्र फुत्कार ऐकू येत आहेत. या पार्श्वभुमीवर भालचंद्र नेमाडे यांचे विचार महाराष्ट्रीय लोक उदारमनाने ऐकत आहेत. भलेही यावर वाद होत असले तरी ते विचारांच्या माध्यमातून आहेत ही बाबही आपल्या पुरोगामीत्वाला साजेशी आहे. या संदर्भात खुद्द भालचंद्र नेमाडे यांनी ‘ज्ञानपीठ’ जाहीर झाल्यानंतर ‘‘मराठी माणसाच्या अभिरुचीचा अभिमान वाटतो. त्यांनी माझं लिखाण सहन केलं. मला तुरुंगात जावं लागलं नाही की माझ्याविरोधात कुणी आंदोलनं केली नाहीत.’’ अशा शब्दांत प्रकट केलेली कृतज्ञता बरेच काही सांगून जाणारी आहे. अशा या महान भुमिपुत्राचे ‘ज्ञानपिठा’बद्दल अभिनंदन!!
(पत्रकार शेखर पाटील यांचा हा लेख. हा लेख आधी दैनिक साईमत आणि त्यांच्या ब्लॉगवर प्रकाशित झाला आहे. )