-अविनाश दुधे
आतापर्यंत यायला पाहिजे होतं, असं ते म्हणाले. त्यांनी पायलटला काय झाले? , अशी विचारणा केली. ‘आपण जवळपास आलो आहोत मात्र हेलिपॅड दिसत नाही,’ असे उत्तर पायलटने दिले. आणखी पाचेक मिनिटे गेली. पायलट चांगलाच गोंधळल्यासारखा दिसत होता. काही क्षणातच हेलिकॉप्टर नियोजित मार्गावरून भरकटल्याचे लक्षात आले. आबा काहीसे अस्वस्थ झालेत. मात्र आमचा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास असल्याने कुठल्या का निमित्ताने होईना प्रवास थोडा लांबतो आहे, हे पाहून आम्हाला थोडं बरं वाटत होतं. दरम्यान, आणखी काही मिनिटे गेलीत. एव्हाना अमरावती हेलिपॅड सोडून एक तास झाला होता. पायलटच्या चेहर्यावर गोंधळ कायम होता. तो हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रासोबत (एटीएस) संपर्क साधून होता. ‘तुम्ही नेमके कुठे आहात ते सांगा. म्हणजे आम्हाला योग्य मार्ग सांगता येईल,’ असे तिकडून विचारले जात होते. मात्र पायलटला ते व्यवस्थित सांगता येत नव्हते. तो बंगाली असल्याने त्याला भाषेचाही प्रॉब्लेम दिसत होता. शेवटी आबांनी पायलटला हेडफोन मला आणि रघुनाथला देण्यास सांगून एटीएसला तुम्ही नेमकी माहिती द्या, असे सांगितले. आम्ही आकाशातून जमिनीवर दिसणार्या काही खाणाखुणा सांगत होतो, पण ते काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये मोबाईलची रेंज होती. राष्ट्रवादीचे आमदार रमेश बंग व इतर नेत्यांचे आबांना फोन सुरू झाले. अमरावती सोडून दीड तास झाले तरी पोहोचले कसे नाही यामुळे सार्यांची घालमेल सुरू झाली होती. दरम्यान, मी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके व अमरावती पोलीस आयुक्तांसोबत संपर्क साधून हेलिकॉप्टर भरकटले असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर सार्यांचीच धावपळ सुरू झाली. अमरावती पोलीस नियंत्रण कक्ष, नागपूर पोलीस नियंत्रण कक्ष, वाडी, कळमेश्वर अशा सर्व ठिकाणांहून हेलिकॉप्टरचा शोध सुरू झाला. इकडे वर हवेत हेलिकॉप्टर एका दिशेतून दुसर्या दिशेला भटकत होते. आबा मात्र शांत होते. ते ओळखीच्या काही खाणाखुणा दिसतात का ते बारकाईने पाहत होते. आम्ही सारेच ओळखीची एखादी तरी खूण दिसते का हे शोधत होतो.मात्र काहीच दिसत नसल्याने शेवटी हेलिकॉप्टर थोडं खाली आणण्याचा निर्णय पायलटने घेतला. हेलिकॉप्टर खाली येताच चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी कोळसा खाण दृष्टिपथास पडली. मोठमोठी यंत्र कोळसा उचलत होती. ट्रकमध्ये कोळसा भरला जात होता. लगेच माजरी रेल्वेस्थानकाचा फलकही दिसला. तेथेही रेल्वे वॅगनमध्ये कोळसा भरला जात होता. हेलिकॉप्टरने जवळपास तीन-चार चकरा खाणींभोवती मारल्या. आकाशातून त्या खाणी पाहताना काहीसे भोवंडल्यासारखे वाटत होते. लगेच हवाई नियंत्रण केंद्राला आम्ही माजरीजवळ आहे, अशी माहिती पायलटने दिली. आता नेमका मार्ग सापडेल व हेलिकॉप्टर योग्य दिशेने निघेल, असा दिलासा मिळाला. पुन्हा थोड्या तुटक-तुटक गप्पा सुरू झाल्या. मात्र नंतर दहा मिनिटे होऊनही वाडी हेलिपॅड दिसत नसल्याने आता मात्र आबा वैतागले. त्यांनी स्वत: हेडफोन कानाला लावून नियंत्रण केंद्रातील कर्मचार्याला झापले. मात्र तरीही गोंधळ सुरूच होता. हेलिकॉप्टर कधी चंद्रपूर, कधी यवतमाळ, कधी भंडारा तर कधी नागपूर जिल्ह्याच्या कक्षेत भटकत होते. एका ठिकाणी शाळेचे एक मोठे मैदान दिसले. आबांनी पायलटला तिथे हेलिकॉप्टर उतरवायला सांगितले. मात्र पायलटने नम्रपणे, पण ठाम नकार दिला. ‘सॉरी सर. इमर्जन्सी असल्याशिवाय मला हेलिकॉप्टर अनोळखी ठिकाणी उतरवता येणार नाही. हेलिकॉप्टरमध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे. आपण चिंता करू नका. लवकरच मार्ग सापडेल,’ असे तो म्हणाला. पायलटचे उत्तर ऐकून आम्हा कोणालाच काय करावे कळत नव्हते. भीती वगैरे कोणाला वाटत नव्हती. मात्र हा अधांतरी प्रवास किती काळ चालणार, हे कळायला काही मार्ग नव्हता. एकीकडे रोमांच वाटत होता दुसरीकडे हुरहूरही होती. तिकडे जमिनीवर आबांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचे प्रय▪जोरात होते. खालून आबांचे हेलिकॉप्टर अनेकांना दिसत होते. पायलटला मात्र हेलिपॅड काही केल्या दिसत नव्हते.