मातीतला मोती

माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांच्या रूपाने एका स्वच्छ प्रतिमेच्या कार्यक्षम नेत्याला महाराष्ट्राने गमाविले आहे. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आबादेखील अकालीच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात एखाद्या मंत्र्याने घेतलेले निर्णय त्यांची ‘ब्रँड व्हॅल्यु’ बनल्याची दुर्मिळ बाब आबांच्या रूपाने मुर्त स्वरूपात आपल्यासमोर आली.

एखाद्या राजकीय नेत्याचे मुल्यमापन करण्यासाठी लावण्यात येणार्‍या फुटपट्टीत उत्कृष्ट संसदपटूता, लोकहितार्थ निर्णय, लोकसंग्रह, विविध निवडणुकांमधील विजय, पक्षासाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आदी निकषांचा समावेश असतो. या पार्श्‍वभूमीवर संबंधित सर्व निकषांवर पुर्णपणे खरे उतरलेले नेतृत्व म्हणून आबांची ख्याती होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाच महत्वाचे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या पातळीवर काम केले. दुसर्‍या टप्प्यात आमदार तर तीन टप्प्यात मंत्री. १९९० ते ९५ या कालखंडात ते सत्ताधारी आमदार असले तरी नवखे होते. ९५ ते ९९ या युती शासनाच्या कालखंडात त्यांच्यातील संसदपटू अवघ्या महाराष्टाने पाहिला. खरे तर शरद पवार यांनी शिवसेनेकडील छगन भुजबळ यांच्यासारखा धडाकेबाज नेता आधीच आपल्या गळाशी लावला होता. यामुळे युतीच्या मंत्र्यांना सळो-की-पळो करून r.r. patilसोडण्यासाठी पवारांनी भुजबळांचाच वापर केला. विधानपरिषदेत भुजबळ हे सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल करत असतांनाच विधानभेत आर.आर. पाटील हा चाळीशीच्या आतील तसा नवखाच सदस्य जेव्हा अत्यंत मुद्देसुद भाषेत बोलू लागला तेव्हा मातब्बर राजकारण्यांनी कान टवकारले. अर्थात ते शरद पवार यांच्या नजरेत भरले. परिणामी पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या रूपाने वेगळा मार्ग निवडला तेव्हा त्यांच्यासोबत साहजिकच आर.आर. पाटील गेले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी मुरब्बीपणे कॉंग्रेससोबत आघाडीचा निर्णय घेतला तेव्हा आबांकडे ग्रामविकास मंत्रालयासारखे तसे फारसे वलय नसणारे खाते सोपविण्यात आले. यानंतर आघाडी सरकारच्या तिन्ही मंत्रीमंडळांमध्ये त्यांच्या कारकिर्दीचे तीन टप्पे पडले. यात त्यांनी अनुक्रमे ग्रामविकास, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री व गृहमंत्री ही पदे सांभाळली. यात गृहमंत्री म्हणून त्यांनी डान्स बार बंदी, सावकार विरोधी कायदा आदी महत्वाचे निर्णय जरूर घेतले. मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचे जनक म्हणून कायम ओळखले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे लोकसहभागातून अत्यंत यशस्वी ठरलेल्या या दोन्ही योजनांचा केंद्रबिंदू ग्रामीण भाग होता.

ग्राम अर्थात खेडेगाव हे विकासाच्या दृष्टीने परिघावरील घटक असल्याची आजची स्थिती आहे. वास्तविक पाहता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामस्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यांना स्वयंपूर्ण खेडेगाव अपेक्षित होते. मात्र कालौघात खेडी ओस पडून शहरे आणि महानगरे ओसंडून वाहू लागली. नव्वद नंतरच्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाने खेड्यांच्या उद्ध्वस्त होण्याला वेग आला. वास्तविक तत्पूर्वी खेड्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले, मात्र याला फारसे यश लाभले नाही. मात्र ग्रामस्वच्छता आणि तंटामुक्ती योजनेला लाभलेले यश अत्यंत आश्‍चर्यकारक असेच आहे. अर्थात या योजनेत लोकसहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. यातील ग्रामस्वच्छता योजनेत गावातील स्वच्छता तर तंटामुक्तीमध्ये सामाजिक सलोख्याला महत्व देण्यात आले. महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, या दोन्ही योजनांसोबत आरोग्य आणि शिक्षण खात्यातर्फेही गावकेंद्रीत उपयुक्त योजना अंमलात आणल्या गेल्या नाही. असे झाले असते तर ग्रामीण भागाचा चौफेर विकास झाला असता, असो. आजही या दोन्ही योजना यशस्वीपणे सुरू आहेत. महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून राज्यात ग्राम पातळीवर अनेक आपसी वाद पोलीस स्टेशन व कोर्टाची पायरी चढण्याआधीच मिटवण्यात यश आले आहे. साधारणपणे गावात तंटे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाययोजना आखणे, दाखल झालेले तंटे मिटवणे आणि नवीन वाद मिटवणे या तीन पातळ्यांवर ही योजना काम करते. गावात तंटामुक्ती समिती आणि त्याचा अध्यक्ष हे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनता आणि पोलीस प्रशासनातील सक्षम दुवा म्हणून काम करत आहेत. या समितीची कार्यक्षमता वाढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतात. यातून निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. हीच बाब ग्रामस्वच्छता अभियानाची. विविध प्रोत्साहनपर पारितोषिकांमुळे यात विविध गावांचा सहभाग वाढला आहे. यातून निकोप स्पर्धा सुरू झाली आहे. आबा एवढ्यावरच थांबले नाहीत. पोलीस पाटील आणि कोतवाल हे ग्रामीण भागाचे अविभाज्य पण दुर्लक्षित घटक आहेत. आबांनी या दोघी पदांसाठी पारदर्शक भरती प्रक्रिया सुरू केली. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या वेतनात वाढ केली. गत जुलै महिन्यातच पोलीस पाटलांचे वेतन वाढवण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. मात्र याची अंमलबजावणी करणे त्यांच्या नशिबात नव्हते.

ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्ती योजनेप्रमाणेच सावकारविरोधी कायद्याचा केंद्रबिंदूदेखील खेडेगावच होता. अवैध सावकारीची खरं तर ग्रामीण महाराष्ट्रात एक समांतर अर्थव्यवस्था आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू अल्पभूधारक शेतकर्‍यांना या सावकारांना शरण जाण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नाही. बहुतांश सावकार अव्वाच्या सव्वा वसुली करत असल्याचे उघड आहे. या सावकारी जाचाला कंटाळून अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणेदेखील घडली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात आबांच्या पुढाकाराने सक्षम सावकारविरोधी कायदा लागू झाला आहे. या माध्यमातून अवैध सावकारीला बर्‍याच प्रमाणात आळा बसला, हे कुणी अमान्य करू शकणार नाही. अलिकडच्या काळात ग्रामसभेला अनेक महत्वाचे अधिकार देण्यात आले. यात प्रामुख्याने एखाद्या गावात दारू विक्रीचे दुकान वा बियरशॉपी आदींना परवानगी हवी असल्यास ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता असते. हा निर्णयदेखील आबांच्या गृहमंत्रीपदाच्या कालखंडातच घेण्यात आला. यासाठी महिलांना आक्षेप घेता येतो. यावर मतदानही करण्याची तरतूद या नियमात आहे. या माध्यमातून गावात दारू विक्रीला मान्यता देण्याचे अधिकार हे थेट ग्रामसभेला मिळालेले आहेत. याचे श्रेयदेखील आबांचेच.

खरं तर आर.आर. पाटील यांच्याप्रमाणे अनेक राजकारणी हे अत्यंत गरीबीतून वर आले आहेत. मात्र आबांची महत्ता हीच की यशाच्या पायर्‍या चढल्यानंतरही ते आपले मुळ विसरले नाहीत. त्यांनी जी पदे भुषविली त्या माध्यमातून पंचतारांकीत संस्कृतीत रंगून जाणे त्यांना सहजशक्य होते. सामान्य पार्श्‍वभूमी असणार्‍या अनेक राजकारण्यांचे असे नैतिक अध:पतन आपण पाहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एक शिंतोडाही उडू न देणारा हा माणूस शेवटपर्यंत शेती-शिवारात रमला. त्यांनी आपल्या मुलांना जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवले. त्यांचे कुटुंब अजूनही शेतीत राबते; यातच सारे काही आले. महाराष्ट्राच्या मातीने अनेक माणिक-मोती जगाला दिले आहेत. यात स्वकष्टावर वाटचाल करून राजकारणात ‘आयकॉन’ बनूनही आपल्या मातीचे ऋण फेडणारा आणि गावावर खर्‍या अर्थाने प्रेम करणार्‍या आर.आर.आबा पाटील यांचासारखा नेता एकच! अशा या नेत्याला आदरांजली.

(पत्रकार शेखर पाटील यांचा हा लेख. हा लेख आधी त्यांच्या ‘ओपन स्काय‘ या ब्लॉगवर प्रकाशित झाला आहे. )

Previous articleमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा- संदीप वासलेकर
Next articleआबांसोबतचे हवेतील ते दोन अविस्मरणीय तास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.