Gandhi-150
-उत्पल व्ही .बी.
गांधीजी : हे काय रे बघत असतोस?
मी : अरे, तुम्ही आलात होय.
गांधीजी : हो…अरे, चष्म्याचं दुकान बंदच होतं. म्हणून लगेच आलो.
मी : ओके.
गांधीजी : तर मुद्दा असा की हे काय भयंकर बघतोयस?
मी : हां…सिनेमा व्हायोलंट आहे. पण पोएटिक व्हायोलंस आहे.
गांधीजी : पोएटिक व्हायोलंस? म्हणजे काय आता?
मी : पोएटिक व्हायोलंस म्हणजे व्हायोलंसच…पण पोएटिक. म्हणजे लय व्हायोलंस म्हणा ना…
गांधीजी : तुला लै व्हायोलंस म्हणायचंय का?
मी : नाही हो. ते लै वेगळं…म्हणजे लैच वेगळं. ही लय…ऱ्हिदम.
गांधीजी : असो. तुझं हे पोएटिक व्हायोलंस प्रकरण मला कळेल असं वाटत नाही.
मी : तुम्ही ना अॅक्चुअली सुखी आहात…
गांधीजी : का बरं?
मी : कारण तुमचं एकूण जगणं सिम्प्लिफाइड आहे. तुम्हाला आर्टिस्टिक कॉम्प्लेक्सिटीज फारशा प्रभावित करत नाहीत.
गांधीजी : आर्टिस्टिक कॉम्प्लेक्सिटीज…हं…
मी : ‘हं’ म्हणजे?
गांधीजी : म्हणजे काही नाही..
मी : नाही. त्या ‘हं’ मध्ये तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं वाटत होतं.
गांधीजी : काही नाही रे…मला असं वाटलं एकदम की आपण आर्टला कधी भिडलो नसल्याने आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. पण मग जाणवलं की आपण जगण्याला भिडलो आहोत…असा तो एक जाणिवेचा कॉम्प्लेक्स ‘हं’ होता…मला पोएटिक व्हायोलंस कळणार नाही आणि तुला बहुधा व्हायोलंस कळणार नाही.
मी : का बरं?
गांधीजी : कारण तू सिनेमे पाहिले आहेस, पण नौखाली पाहिलेली नाहीस.
Very useful.