सफल प्रेमाच्या असफल गोष्टी- ६
–– सानिया भालेराव
तिने उगाचच पुन्हा स्वतःला आरशात पाहिलं. आज जरा जास्तच मोठं कुंकू लावलं आहे का आपण ती स्वतःशीच पुटपुटली. राहू दे तेच बरं असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. अमर तिची वाट पाहतच होता. त्याचा हात हातात पकडून जोडीने दोघे बाहेर आले. घर माणसांनी वाहत होतं. सगळ्यांचं लक्ष फक्त ह्या दोघांवर. रुबाबदार अमर आणि नितांत सुंदर ती. दृष्ट लागेल कोणाची तरी असं म्हणत मावशीने दोघांना जवळ घेतलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला केवढे लोकं जमले होते. आपण किती खुश आहोत, आनंदी आहोत ह्याचा हा दिखावा असं तिला वाटत होतं पण आता इतक्या वर्षांत ती सरावली होती ह्या सगळ्याला. शिताफीने ओठावर हसू आणून, डोळ्यात समाधान साठवून अमरच्या बाजूला उभं राहून सगळं कस परफेक्ट आहे हे दाखवण्यात ती गुंग झाली.
साज़-ए-उल्फ़त छिड़ रहा है आँसुओं के साज़ पर
मुस्कुराए हम तो उन को बद-गुमानी हो गई
दुरून तो तिला पाहत होता. किती वर्ष सरली पण तिच्यात तसूभरही बदल त्याला जाणवत नव्हता. आजही त्याला ती वीस वर्षांनी दिसत होती पण तरीही तिला आपण खूप वर्षांनी बघतो आहोत हे त्याला जाणवलंच नाही. तिचे बोलके डोळे, पाढंरेपण लपवण्याचा अजिबात प्रयत्न न करता काहीसे निष्कळजीपणे स्टाईल केलेले तिचे केस, समजूतदारीचं चेहेऱ्यावर पसरलेलं तेज, बोलण्यातून जणवणारी तिची हुशारी आणि काळजाचा ठाव घेणारं ते हसू.. तो तिला न्याहाळण्यात बुडून गेला होता. तिचं साधं लक्ष सुद्धा जाऊ नये आपल्यावर असं देखील वाटलं त्याला. एखाद्या वाट चुकलेल्या प्रवाशासारखा तो बराच वेळ त्या पार्टीत बसून होता. त्याला नक्की काय हवंय हे सुद्धा समजत नव्हतं. तू सुद्धा एखादी फर्माईश सांग की हा गायक फार छान गझल गातो असं अमर त्याला म्हणाला. त्याने हसून मान डोलवली. अकरम नक़्क़ाश ची ती गझल… तो म्हणायचा तिच्यासाठी….
ब-रंग-ए-ख़्वाब मैं बिखरा रहूँगा
तिरे इंकार जब चुनता रहूँगा
कभी सोचा नहीं था मैं तिरे बिन
यूँ ज़ेर-ए-आसमाँ तन्हा रहूँगा
तू कोई अक्स मुझ में ढूँडना मत
मैं शीशा हूँ फ़क़त शीशा रहूँगा
ताअफ़्फ़ुन-ज़ार होती महफ़िलों में
ख़याल-ए-यार से महका रहूँगा
जियूँगा मैं तिरी साँसों में जब तक
ख़ुद अपनी साँस में ज़िंदा रहूँगा
गली बाज़ार बढ़ती वहशतों को
मैं तेरे नाम ही लिखता रहूँगा
पहिली ओळ कानावर पडताच तिचं हृदय हाललं जणू. स्वतःला त्याच्याशी नजरानजर होऊ नये म्हणून सतत बजावणारं तिचं मन आता तिच्या अखत्यारीत नव्हतं. सगळं काही उचंबळून वर येऊ पाहत होतं. अधीरतेने तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याक्षणी आता आपला बचाव अशक्य आहे हे तिला कळून चुकलं होतं. तो आजही तितकाच देखणा होता. जेव्हा तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा भान हरपणं म्हणजे काय ते तिला उमजलं होतं. तेव्हापासून तो तिचा हीरो होता तो आजतागायत! फरक इतकाच की आता आता भावनांवर बुरखा घालायला ती शिकली होती. गझल छान रंगली होती एव्हाना. जुनं सगळं आठवून तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं होतं. अश्रूंचा तो उबदार स्पर्श कित्येक महिन्यात तिला झाला नव्हता. आनंदी आहोत हे भासवण्याच्या नाटकात इतकी समरसून गेली होती ती! पण असेच बेसावध क्षण आपल्याला भावनाविवश करतात आणि हरवतात हे कळून चुकल्यामुळे तिने स्वतःला सावरलं आणि तेच मिलियन डॉलर स्माईल चेहेऱ्यावर आणून ती त्याच्याकडे जायला वळली.
गझल संपल्यावर त्याने पाहिलं. ती त्याच्याकडे येत होती. हृदय आता बंद पडेल की काय असं त्याला वाटायला लागलं. ती जवळ येताच तिने पहिल्यांदा अगदी सहजपणे अमरच्या हातात हात अडकवला आणि अगदी प्रेमाने त्याच्या खांदयावर डोकं टेकवत तिने अमरकडे पाहिलं. किती छान होती ना गझल.. ह्याची चॉइस बरं का? अमर तिला म्हणाला. ती फक्त हसली आणि कसा आहेस तू ,असं सहज त्याला विचारलं. अमरच्या हाताची तिची पकड अजून घट्ट होत आहे हे पाहून काहीसा अस्वस्थ झालेला तो. ती अस्वस्थता लपवत मी बरा आहे असं म्हणाला. हिला काहीच कसं वाटत नाही आपल्याबद्दल, सगळं कस विसरू शकते ही इतक्या सहज… ह्याच विचारामध्ये अडकला होता.
तू कशी आहेस गं? हा त्याचा प्रश्न तिच्या कानावर पडला आणि ह्यावर खरं काय ते सांगावं का असा विचार तिच्या मनात चमकून गेला क्षणभर. अमरचा हात सोडून त्याच्या गळ्यात पडून निवांत रडावं असं वाटलं तिला. त्याला सांगावं की फक्त तुझ्या आठवणींमुळे जिवंत आहे मी. तुझ्याप्रेमाने माझं अंतरंग भरून गेलं आहे रे… डोळ्याची किनार ओली झाली होती तिच्या. पण मुरलेल्या खेळाडूसारखं सुंदर हसत मी एकदम मस्त आहे रे! असं अमरला जवळ घेत म्हणाली ती! त्याला दिसेल का ह्या हसण्यामागचं दुःख? त्याला उमजेल का की त्याची साधी आठवण सुद्धा तिला इतक्या वर्षात आली नाही कारण ती त्याला एक सेकंदभर सुद्धा विसरली नव्हती. तो जणू प्रत्येक श्वासागणिक तिच्या अंतरंगात समावत होता आणि प्रेमाचा रंग अधिकाधिक गडद होत होता. तिने स्वतःशीच विचार केला आणि ताबडतोब झटकून सुद्धा टाकला. आजकाल कोण एवढं खोलवर जाऊन विचार करतं. त्याला समजणार सुद्धा नाही काही.. त्यासाठी समोरच्यात गुंताव लागत. आणि तो तर फक्त काठावरून बघत होता सगळं ..
मोहब्बत को समझना है तो नासेह ख़ुद मोहब्बत कर
किनारे से कभी अंदाज़ा-ए-तूफ़ाँ नहीं होता
मला काठावर उभं राहून प्रेम करताच नाही आलं कधी हिच्यासारखं, तो विचार करत होता. त्याला वाटलं जावं तिच्याजवळ, तिचा हात धरावा आणि फक्त एकदाच तिला जवळ घेऊन सांगावं की फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो मी. तुझ्याशिवाय स्वतःच अस्तित्व देखील मला माझं वाटत नाही. तू आज माझ्याबरोबर नाहीयेस ह्यामुळे काळजाला भोकं पडतात माझ्या. आता हा दुरावा असह्य झाला आहे मला. तो तिच्याकडेच पाहत होता. एक क्षणभर त्यांची नजरानजर झाली आणि त्याला एका सेकंदासाठी का होईना तिच्या डोळ्यातले भाव दिसले आणि आत काहीतरी लक्खकन चमकलं. त्याने तिच्याकडे जाण्यास पाऊल उचललं आणि त्याने अविश्वासाने पाहिलं .कारण ती सुद्धा त्याच्याकडे चालत येत होती.
तिच्या मनात एव्हाना भावनांच काहूर माजलं होतं. इतके वर्ष ती वेगवेगळी नाती स्वतःवर ओढवून जगत राहिली पण आज ती फक्त ती स्वतःसाठी जगणार होती. प्रत्येक पावलागणिक तिच्या डोळ्यातलं प्रेम त्याला अधिकाधिक गहिरं वाटत होत. जेमतेम एक फूट अंतरावर ते उभे ठाकले होते. दोघांनाही हे अंतर पार करायचं होतं. त्यांनी पाऊल उचललं इतक्यात तिची नजर माधवीकडे गेली. ती त्याच्याजवळ येऊन त्याला घरी जाऊया का असं विचारत होती. ती तिथेच गोठली. तिने त्याच्याकडे पाहिलं तो सुद्धा असहाय्यपणे तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला आता स्पष्ट दिसत होतं. तो तिला आवाज देणार इतक्यात ती गर्रकन वळली आणि झपाझप पावलं टाकत दुसऱ्या टोकाला पोहोचली. तिने स्वतःला सावरलं. डोळे पुसले आणि काही क्षणात तिच्या चेहेऱ्यावर तेच हसू तरळलं. तिने अमरचा हात हातात घेतला आणि जोडीने ती दोघं पाहुण्यांना निरोप देऊ लागले. कार्यक्रमाचा शेवट तिच्या फर्माईशने होत होता. …अकरम नक़्क़ाश ची गझल….
ऐ अब्र-ए-इल्तिफ़ात तिरा ए’तिबार फिर
आँखों में फिर वो प्यास वही इंतिज़ार फिर
तुझ्या दयाळूपणावर ( दयाळूपणाच्या मेघा) पुन्हा विश्वास ठेवावासा वाटतो आहे ,डोळ्यात ती तृष्णा आहे आणि पुन्हा ते वाट बघणे आहे
इतकं सगळं होऊनही मला तू दयाळू भासतोस आणि तुझ्यावर पुन्हा एकदा नव्याने विश्वास ठेवायला माझं हृदय आतुर आहे. आजही मी तुझ्याशिवाय अधुरी आहे. तुला कितीही डोळेभरून पाहिलं तरी माझी मी अतृप्त आहे. आजही मी तू पुन्हा माझा होशील ह्याची वाट बघते आहे.
रख्खूँ कहाँ पे पाँव बढ़ाऊँ किधर क़दम
रख़्श-ए-ख़याल आज है बे-इख़्तियार फिर
पाय ठेऊ कुठे पाऊल नक्की कोणत्या दिशेला टाकू … माझ्या विचारांचे घोडे आज बेभान उधळले आहेत.
कित्येकदा मला तुझ्याजवळ यायची इच्छा होते पण नक्की कोठे गेले कि तू मला सापडशील हेच मला उमगत नाही. मी स्वतःलाच शंभर वेळा अडवते कारण मी स्वतःच्या सीमा ओळखून आहे. असं असलं तरीही आज मात्र माझं सैरभैर आहे आणि माझं चित्त थाऱ्यावर नाही. तुझ्या विचारांनी माझ्या मनात काहूर मांडलं आहे.
दस्त-ए-जुनूँ-ओ-पंजा-ए-वहशत चिहार-सम्त
बे-बर्ग-ओ-बार होने लगी है बहार फिर
उन्मादाचे हात आणि वेडेपणच्या लहरी जणू चारीही कोपऱ्यामध्ये पसरत आहेत … वसंत ऋतू पुन्हा एकदा बहाराशिवाय फुलू लागला आहे जणू.
तुझ्यासाठी मी वेडीपिशी झाले आहे. माझं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही. तू माझ्याजवळ नसलास कि वसंत ऋतू सुद्धा रुक्ष भासतो आहे मला. जणू काही पानगळ होते आहे असं वाटतंय मला तू नसलास की.
पस्पाइयों ने गाड़ दिए दाँत पुश्त पर
यूँ दामन-ए-ग़ुरूर हुआ तार तार फिर
पराभवाने जणू पाठीवर पुन्हा दात रोवले आहेत .. अभिमानाचे पुन्हा तुकडे तुकडे झाले आहेत
प्रेमात एकदा तू बेवफाई केलीस तरीही मी हार मानली नाही. मी तुझ्यावर प्रेम करत राहिले. अविरत प्रेम! पण आता मात्र मी पराभूत झाले आहे असं वाटतंय. कारण अजूनही तुझ्यावरचं माझं प्रेम तसूभरही कमी झालं नाहीये. माझ्या अभिमानाची पार लक्तरं झाली आहेत पण तरीही माझं तुझ्यावरचं प्रेम शाबूत आहे.
निश्तर तिरी ज़बाँ ही नहीं ख़ामशी भी है
कुछ रह-गुज़ार-ए-रब्त हुई ख़ार-ज़ार फिर
तुझं बोलणंच नाही तर तुझं मौन सुद्धा मला चाकू सारखं भासतं. पुन्हा एकदा आपल्या नात्याचा रस्ता जणूकाही असंख्य काट्यांनी भरून गेला आहे ……..
तू मला आपलंस केलं नाहीस. चार शब्द प्रेमाचे बोलला नाहीस. मला दुखावेल असं बोललास. पण तू माझ्यावर नुसतं शब्दांनी नाही तर तुझ्या न बोलण्याने सुद्धा वार करतोस. तुझं न बोलणं खूप जिव्हारी लागतं रे जणू काही चाकूचे असंख्य वेळा वार होत आहेत असं वाटतं. आपल्या नात्याच्या या वाटा अगणित काट्यांनी भरून गेल्या आहेत. आपल्या नात्याचा हा प्रवास म्हणजे मरणप्राय वेदनांचा अविष्कार आहे.
मुझ में कोई सवाल तिरे मा-सिवा नहीं
मुझ में यही सवाल हुआ एक बार फिर
तुझ्याशिवाय कोणताही प्रश्न मला पडत नाही .. परत हाच प्रश्न मला सतावतो आहे
माझ्या अंतरंगात फक्त तूच सामावलेला आहेस. तुझ्याशिवाय दुसरं कोणीही तिथे नाही. तुझ्याशिवाय दुसरं मला काहीही का रुचत नाही ह्याशिवाय दुसरा कोणताही प्रश्न मला पडत नाही. इतकं सगळं असूनही पुन्हा पुन्हा हाच प्रश्न मला पडतो आहे.
-लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
[email protected]
……………………………………………………………………………………………………
हे सुद्धा नक्की वाचा –
सुगंधाचा प्रवास सोपा नाहीये!– http://bit.ly/2Y62z66
कुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं… http://bit.ly/2W9rbdN
बे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता…. http://bit.ly/2DpsbCS
दिल धडकने का सबब याद आया http://bit.ly/2D28ktu
कुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते http://bit.ly/2X9YRIa