मागे बघत पुढे जाणारा द्रष्टा

साभार -महाराष्ट्र टाइम्स

– जयंत पवार

सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईत माटुंग्याच्या म्हैसूर असोसिएशनमध्ये नाटककार गिरीश कार्नाड यांच्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. अनेक भाषांतले रंगकर्मी आपले प्रयोग करणार होते. त्याच्या उद्घाटनाला स्वत: कार्नाड आले होते. त्यांची उपस्थिती नाटकवाल्यांसाठी विशेष कुतुहलाची होती. कार्नाड तिथे अगदी गडबडीत आल्यासारखे आले. बहुधा त्यांना लगेच कुठेतरी जायचं होतं. त्यांनी भाषणही अगदी छोटं केलं. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘भारतीय रंगभूमीचा इतिहास हा अडीच हजार वर्षांचा सांगितला जात असला तरी आधुनिक भारतीय रंगभूमीचा इतिहास हा दीडशे वर्षांचा आहे आणि आपण जेव्हा तो दीडशे वर्षांचा आहे असं म्हणतो तेव्हा खरंतर तो गेल्या चाळीस वर्षांचाच असतो. या संपूर्ण इतिहासात तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक श्रेष्ठ नाटक आहे.’ एक नाटककार अत्यंत मोकळेपणाने आणि थेट आपल्या एका समकालीन नाटककाराला त्याचं श्रेय देत होता. गंमत म्हणजे तेंडुलकर एकदा म्हणाले होते की, गिरीशचं ‘तुघलक’ हे नाटक रचनेच्या दृष्टीने श्रेष्ठ नाटक आहे. एकमेकांचं श्रेष्ठत्व खुल्या दिलाने मान्य करणारे आणि ‘भारतीय रंगभूमी’ या संकल्पनेला पहिल्यांदा चेहरा देणारे बादल सरकार, विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड आणि मोहन राकेश हे चारही नाटककार आज नाहीत. गिरीश कार्नाड यांच्या निधनाने या साखळीतला शेवटचा दुवाही आता निखळला आहे.

तेंडुलकर आणि कार्नाड यांच्यातलं आणखी एक साम्य म्हणजे त्यांचं अस्तित्व समाजाला शेवटपर्यन्त जाणवत राहिलं. त्यांच्या लेखनाच्या पलीकडेही ते जाणवत राहिलं. काहींना ते त्रासदायक वाटत राहिलं तर काहींना दिलासदायक. लेखकाची लेखनकारकीर्द संपली की तो लौकिकदृष्ट्याही बहुतेक संपतो. पण हे लेखक जिवंत राहिले. कार्नाड तर नाकाला ऑक्सिजनची नळी लावून गळ्यात पाटी अडकवून रस्त्यावर आंदोलनाला उतरल्याची छायाचित्रं अनेकांनी पाहिली असतील. स्वातंत्र्य, समानता आणि विवेक या मूल्यांचा पुरस्कार करण्यासाठी ते रस्त्यावर आले. बोलत राहिले. कर्नाटकाला महाराष्ट्राप्रमाणे प्रगत विचारांचा वारसा आहे, पण महाराष्ट्राप्रमाणे तो विझलेला नाही. बाराव्या शतकात बसवेश्वराने उभारलेल्या शरणांच्या चळवळीने जी समानतेची बीजं रोवली त्यांच्या रक्षणासाठी तिथे आजही लेखक-कलावंत अस्वस्थ होऊन रस्त्यावर येतात. त्या अस्वस्थतेचा कोंभ कार्नाड वार्धक्यातही हृदयात जपून होते.
खरंतर अस्वस्थपणा हीच लेखकाच्या जिवंतपणाची खूण असते. आणि अस्वस्थ लेखक हा सतत आपण आणि भोवताल यातलं नातं तपासून बघतो. गिरीश कार्नाडानी हे नातं तपासून बघताना इतिहास, पुराणकथा, लोककथा, प्राचीन कथावाङ्मय यांना माध्यम म्हणून वापरलं. त्यांच्या समकालीनांमध्ये ते यामुळेच वेगळे उठून दिसतात. १९५६च्या सुमारास ते एका नाटकाच्या सेमिनारच्या निमित्ताने दिल्लीला गेले होते, तेव्हा त्या चर्चासत्रात डाव्या विचारांचा पगडा असलेलल्या नाटककारांनी आपल्या मिथकांकडे आणि पुराणकथांकडे वळणं हे प्रतिगामीपणाचं लक्षण असल्याचं मत नोंदवलं. त्यांच्या दृष्टीने वास्तवाला थेट भिडणं महत्त्वाचं होतं. पण कार्नाड इतिहास-पुराणांच्या अरण्यात शिरले.

त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवातच महाभारतातल्या मिथककथेपासून झाली. लंडनला जाण्यापूर्वी रामायण-महाभारताची माहिती आपल्याला हवी म्हणून त्यांनी सी. राजागोपालाचारी यांची पुस्तकं वाचली आणि ययातीच्या कथेने त्यांना घेरलं. आपल्या इच्छा-आकांक्षांचं ओझं पुढच्या पिढीवर लादून तिला जर्जर करणाऱ्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून कार्नडांचा ययाती नाट्यवाङ्मयात चिरंतन झाला. आजच्या भोगवादी जमान्यात तर तो अगदीच आजचा वाटू लागतो. पण या प्रतिकात्मक व्यूहातही शर्मिष्ठेच्या रूपाने व्यक्त झालेली आदिवासी संवेदना या नाटकाला वेगळे राजकीय आयाम देऊन गेली. कार्नाडांच्या बहुतेक नाटकांत राजकीयता ओतप्रोत भरलेली आहे. त्यांचं ‘तुघलक’ हे नाटक तर कुठल्याही राज्यकर्त्याला आपला आरसा वाटेल. एक कविहृदयाचा, तत्त्वज्ञ सुलतान कावेबाज आणि दगलबाज माणसांच्या गराड्यात सापडून संशयी होतो. वेडा ठरवला जातो. त्याच्या राज्यात नशीब आजमावायला घुसलेले अझीम आणि अझीझ हे भुरटे चोर कसे सत्तेच्या जवळ जातात हे पहिलं तर हे नाटक म्हणजे अर्वाचीन भारतीय राजकारणाचा दस्तावेज ठरेल. कार्नाड ‘तलेदंड’ या राजा बिज्जळ आणि बसवेश्वर यांच्या संबंधावरच्या नाटकात थेट जातीय आणि सनातनी धार्मिक राजकारण आणतात आणि त्यातले भेसूर चेहरे दाखवतात. पण या सगळ्या सामाजिक-राजकीय चित्रणात ते व्यक्तीचा चेहरा हरवत नाहीत. कार्नाड व्यक्ती आणि समाज यांच्यातला ताण सतत दाखवतात. ही व्यक्तिकेंद्रितता भारतीय पुराण साहित्यात नाही. ती आधुनिक आहे. कार्नाड हे परांपरावादी आहेत आणि आधुनिकही आहेत. या दोन्हींचं एक अजब आणि सुंदर मिश्रण त्यांच्या नाटकांत सापडतं. ‘बळी’ या नाटकासाठी त्यांनी तेराव्या शतकातलं जन्न या कवीचं ‘यशोधराचरित’ हे महाकाव्य आधाराला घेतलं, पण त्यातून त्यांनी जैनांच्या अहिंसा तत्त्वाचा संघर्ष दाखवताना गांधींच्या ‘अहिंसा’ मूल्याचा शोध घेतला. ‘हयवदन’ मधल्या नाट्यविषयाला जर्मन लेखक थॉमस मान याच्या ‘द ट्रान्सपोज्ड हेड्स’ या कथेचा संदर्भ असला तरी मान याने मुळात त्यासाठी ‘कथासरित्सागर’मधल्या ज्या कथेपासून प्रेरणा घेतली, त्या कथेतल्या प्रश्नापाशी कार्नाड गेले. यालाही स्त्रीच्या लैंगिक राजकारणाचा घट्ट धागा आहे, आणि तसाच तो पंचतंत्रातल्या कथेवरून लिहिलेल्या ‘नागमंडल’ या नाटकालाही.

कार्नाड यांची ही नाटकं बघताना ध्यानात येतं की ते हिंदू परंपरेविषयी सजग होते. पण या परंपरेचा आधुनिक अन्वयार्थ ते लावत होते. त्यातल्या व्यक्तिगततेकडे लक्ष वेधू इच्छित होते. या परंपरेला दिल्या गेलेल्या आव्हानांकडे डोळसपणे बघत होते. परंपरेला प्रश्न विचारत होते. एका अर्थाने ते मागे बघत पुढे जाणारे द्रष्टे नाटककार होते. त्यामुळेच आजच्या प्रश्न विचारणाऱ्यांचीच मुस्कटदाबी करणाऱ्या परंपरावाद्यांना त्यांचा विरोध होता. परंपरेतला एक खुलेपणा गुदमरताना त्यांना यातना झाल्या असतील. कन्नडमधले ए. के. रामानुजन आणि यू. आर. अनंतमूर्ती हे त्यांचे ज्येष्ठ सहकारी. रामानुजन काही आजचा काळ बघायला नाहीत. पण त्यांचा ‘थ्री हंड्रेड रामायनाज’ हा निबंध दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची नामुष्की मनमोहन सिंग सरकारवर आली आणि अनंतमूर्ती तर त्यांच्या वक्तव्यामुळे शिव्या आणि टीकेचे धनी झाले आणि लवकरच निवर्तले. आता कार्नाडही टीका झेलत झेलतच आपल्यातून निघून गेले आहेत. ही घटनादेखील आजच्या काळाच्या संदर्भात प्रतिकात्मक आणि बोलकी आहे. पंतप्रधान मोदींनी कार्नाड हे अष्टपैलू अभिनेते होते, असं आपल्या आदरांजलीपर संदेशात म्हटलं आहे. एखाद्या माणसाचं शक्तिस्थान इतक्या सहजपणे दुर्लक्षिण्याची हुशारी दाद द्यावी अशीच आहे.
————-

 

 

(लेखक हे नामवंत पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत.)

(महाराष्ट्र टाइम्स ११/६/२०१९)

Previous articleआत्मभान जिवंत आहे का, हे तपासणारा ‘फोटोग्राफ’
Next articleसोनिया गांधींनी इब्न खल्दून का वाचायला हवा?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here