आत्मभान जिवंत आहे का, हे तपासणारा ‘फोटोग्राफ’

– सानिया भालेराव

रितेश बत्राचा चित्रपट येणार आहे आणि त्यात नवाजुद्दीन आहे.. हे कळल्यापासून ‘फोटोग्राफ’ ची प्रचंड उत्सुकता होती. लंचबॉक्स मध्ये त्याचं वेगळेपण दिसून आलं होतंच पण ज्युलियन बार्न्सच्या माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकावर त्याने जेव्हा ‘सेन्स ऑफ ऍन एंडिंग’ हा चित्रपट बनवला तेव्हा तर तो माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसला. ‘फोटोग्राफ’ हा सुद्धा असाच त्याच्या सिग्नेचर स्टाईलचा चित्रपट.. सगळ्यांना आवडेल असं नाही.. कारण धीम्या गतीने, प्रेमाच्या चकचकीतपणा पासून दूर, झगमगीत दिखाव्यापासून दूर, हाडामासाच्या माणसांचे प्रेम.. जे मुंबईच्या ओबडधोबड गल्यांमध्ये फुलतं, हळुवारपणे आत झिरपत जातं आणि शेवट हा आपल्या आकलनावर सोडतं.. हा प्रवास एक प्रेक्षक म्हणून सगळयांना आवडेलच असं नाही आणि म्हणूनच कमर्शियल गल्लाभरू शेकडो क्लिशेज असलेले इल्लोजिकल आणि फक्त करमणूक..

चित्रपट आहे रफी (नवाजुद्दीन सिद्दीकी) या गेटवे ऑफ इंडिया वर फोटो काढून देणाऱ्या फोटोग्राफरची आणि टिपिकल गुजराथी घरात वाढलेल्या सीए आणि मग परदेशी लग्न असं चौकटीतलं विश्व असणाऱ्या हुशार पण बंदिस्त मिलोनीची (सान्या मल्होत्रा). प्रेमकथा या टिपिकल बॉलिवूड कन्सेप्टला तडा देणारी ही गोष्ट.. दोघांचे दोन वेगळे विश्व.. चार जणांच्या बरोबर एक रूम शेयर करणारा रफी, वडिलांच्या मृत्यू नंतर लोन घेऊन दोन मोठ्या बहिणींची लग्न धुमधडाक्यात करणारा, गेटवेच्या गर्दीत ‘सालों बाद यह फोटो देखोगे तो आपके चेहरे पे यही धूप दिखाई देगी’.. असं म्हणून पन्नास रुपयात गेटवे बरोबर ताज देणारा, प्रचंड इरिटेट करणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या आजीवर प्रेम करणारा, सगळी मिळकत गावाकडे पाठवून वडिलांनी गहाण ठेवलेलं घर मिळवण्यासाठी धडपड करणारा.. आणि कपडे घेताना कुठल्या रंगाचे घ्यायचे इतकं साधं देखील जी ठरवू शकत नाही, सीए इंटरमध्ये टॉप करून मुंबईच्या एका क्लासच्या बोर्डवर नाव झळकवणारी, सीए आणि परदेशातला नवरा हेच जिच्या आयुष्याचं फायनल डेस्टिनेशन, अभ्यास, पुस्तकं यात जिचं आयुष्य कैद आहे, रोज तेच रुटीन, आनंद कशात आहे हे माहित नसणारी, स्वतःमध्ये न डोकवणारी.. मिलोनी.. यांच्या नात्याची ही गोष्ट..

या चित्रपटात मला आवडलेल्या खूप गोष्टी.. एकतर कुठलंही पात्र बिच्चारं वाटत नाही.. अमीर- गरीब, पॅशन- सेक्स, वो पहला किस, फॅमिली ड्रमा, एक नोसेन्स कॉमेडी करणारं पात्र असल्या कोणत्याही मेलोड्रॅमॅटिक गोष्टी यात नाहीत.. साधी पात्रं, साधे कपडे.. बटबटीत मेकअप नाही, चमकधमक नाही आणि अतिरंजित किंवा अतिक्लेशकारक सीन्स नाहीत.. भावना पोहोचतात पण कमालीच्या हळुवार पद्धतीने.. दुःखाचा भडीमार, वियोग, आर्थिक दरी ह्या सगळ्या बोगस गोष्टींपासून दूर.. कॅम्पाकोलाचा शेवटचा सीन सुद्धा खूप परिणामकारक… खूप आर्त, आतून ढवळून टाकणारा, सूक्ष्मसा आशावाद निर्माण करणारा आणि तरीही डोळे भिजवणारा.. एडिटींग ही सुद्धा अत्यंत जमेची बाजू.. कमीत कमी संवादात कॅमेरा काय कमाल दाखवू शकतो याचं उत्तम उदाहरणं.. गीतांजली कुलकर्णीची रामप्यारी.. मिलोनीकडे राहणारी मदतनीस.. कमाल काम.. तिच्या पायातल्या पैंजणापासून ते तिच्या डोळ्यातल्या खिन्न हास्यापर्यंत.. कमाल.. गीतांजली कुलकर्णी ही तशीही नट- नट्या यांच्या टिपिकल चौकटी मोडणारी.. एका छोट्या भूमिकेत ऍक्टर काय कमाल करू शकतो याचं उत्तम उदाहरणं.. अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी या चित्रपटांत आहेत.. बघाल तर महत्वाच्या आणि लक्ष नाही दिलंत तर कायमच्या सुटून जाणाऱ्या.. काहीसं आपल्या स्वतःच्या आयुष्यासारखं.. कुठे बघायचं,काय बघायचं आणि काय सोडून द्यायचं.. हे सर्वस्वी आपल्यावर असतं. एकच आयुष्य दोन वेगळ्या दृष्टीकोनाची माणसं वेगवेगळ्या पद्धतीने जगतात.. तसंच काहीसं…

चित्रपटाची मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा शेवट.. चित्रपट संपला.. लाईट लागले.. तरीही पंचवीस डोकी हालेनात.. खत्म हो गया?? असं आमच्या पुढची ललना पेप्सी गटकावत आपल्या जोडीदाराला विचारतं होती.. मला तर हे या चित्रपटाचं खरं यश वाटतं.. एकतर शेवटाला का कोणास ठाऊक कथानकात अनन्य साधारण महत्व असतं.. एरवीच गोष्टीचा शेवट खूप महत्वाचा होऊन जातो.. आणि ती दोघं सुखाने नांदू लागले किंवा त्यांची ताटातुट झाली.. किंवा कोणीतरी एक मेलं आणि दुसरा टिपं गाळत बसला.. याची आपल्याला खूप सवय झाली आहे.. बात्रा सारखे मोजके दिग्दर्शक या चौकटी मोडणारे.. प्रेक्षक म्हणून, माणूस म्हणून आपल्याला काही गोष्टी डी-लर्न करायला लावणारे… चित्रपट संपला तेव्हा चेहऱ्यावर पाहिलं उमटलं ते हसू आणि मग डोळ्यात तरळलं ते पाणी.. आयुष्याकडे असलेल्या दृष्टीकोनाप्रमाणे आपण या शेवटाचा अर्थ लावू शकतो.. म्हटलं तर गोष्ट संपली, म्हटलं तर सुरु झाली.. म्हटलं तर वियोग म्हटलं तर साथ.. आणि म्हणूनच हा चित्रपट आपल्याला स्वतःमध्ये डोकावण्याची संधी देतो.. करमणूक वगैरे यांच्या पलीकडचं आहे हे..

आयुष्यात येणाऱ्या कित्येक घटना आपण ठरवलं तर नुसत्या बघू शकतो, बघून न बघितल्या सारख्या करू शकतो, जगून सुद्धा अनुभवू शकत नाही आणि न जगून सुद्धा अनुभवू शकतो.. हे जे काही आहे ना.. अलगद, अलवार.. मनाच्या तळात पोहोचू शकणारं.. यासाठी आपलं मन नितळ आहे का हे सुद्धा चाचपून बघायला हवंय. पाणी गढूळ असेल तरीही हरकत नाही.. ते पुन्हा एकदा स्वच्छ करायला हवं.. आपण कशाकरिता जगतो आहोत, कोणत्या चौकटींमध्ये स्वतःला बांधून ठेवतो आहोत, जे दिसतो ते आहोत का आणि जे आहोत ते दिसतो का. आत्मभान, अंतर्मन जिवंत आहे का.. अशा कित्येक गोष्टी चाचपडून बघायला लावतो.. हा फोटोग्राफ..

असा एक फोटो मनात जतन करायला हवाय.. जो काळ, वेळ. सुख- दुःख, प्रेम, वासना, पैसे, नाती, नीती- अनिती या सगळ्यांपलीकडे आपल्याला घेऊन जाईल.. आयुष्याची गती धीमी करून स्वतःला स्वतःमध्ये डोकावण्याची संधी देईल आणि मग चेहेऱ्यावर एक हसू उमटेल.. न विझणारं.. न संपणार..
Cheers to photograph.. Cheers to seeing Beyond frames…

लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

हे सुद्धा नक्की वाचा-

अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्र– http://bit.ly/2VPJKXv

नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे– http://bit.ly/2LgHILE

जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’!– http://bit.ly/2VVvmcR

‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी–  http://bit.ly/2UAWW2m

९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

 

Previous articleनेहरूंची जिनांशी लढत
Next articleमागे बघत पुढे जाणारा द्रष्टा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.