‘वेलकम होम’…प्रत्येक बाईने पाहायलाच हवा असा चित्रपट

– सानिया भालेराव

वेलकम होम’.. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित हा चित्रपट मस्ट वॉच या लिस्टमध्ये होताच. त्यांचे या आधीचे चित्रपट विशेषतः ‘अस्तु’ हा अत्यंत प्रिय. स्वतःशी संवाद साधायला लावणारे चित्रपट ही या दोघांची खासियत आणि ‘वेलकम होम’ म्हणून स्पेशल. या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत वेलकम होम थोडासा लूज आणि सैरभैर वाटला असला तरीही ज्या सटलटीने पितृसत्ताक समाज आणि त्या अनुषंगाने आपल्या अवती भोवती असणाऱ्या माणसांचं वागणं यात दाखवलं आहे ते केवळ म्हणजे केवळ अप्रतिम. स्वतःला स्वतःमध्ये डोकावून पाहायला लावणारे चित्रपट विरळा असतात. वेलकम होम यात मोडणारा आणि म्हणून हा सगळयांना आवडेल असं नाही. संथ गतीने जाणारा, काही जागांवर ‘अरे आपण असा विचार करतो का?’ असं स्वतःलाच स्तब्ध करून प्रश्न विचारायला लावणारा, क्लिशेड मेलोड्रामा नसलेला, कुठेतरी रिलेट करायला लावणारा आणि हे रिलेट होतंय असं जाणवून अस्वथ करायला लावणारा, सुखांत वा शोकांतिका असा शिक्का लावून शेवट न करणारा.. असा हा चित्रपट. फार उपदेशात्मक न वाटताही अगदी रेअर, पकडता न येणारं असं काहीतरी आपल्याला जाणवून जातो हा चित्रपट आणि हे अनुभवण्याची संवेदनशीलता, पेशन्स आणि सहृदयता ज्यांच्यामध्ये अजूनही शिल्लक आहे केवळ त्यांच्यासाठीच हा चित्रपट.

ही गोष्ट आहे सौदामिनीची. पीएचडी असलेली विद्यापीठात शिकवणारी मिनी ( मृणाल कुलकर्णी) ही तिचा सीए नवरा सदानंद आणि पाचवीत असणारी मुलगी व स्मृतीभंश असणारी सासू यांच्या सोबत राहत असते. संसार सुखी नसतोच आणि एव्हाना त्यांच्यातलं अंतर इतकं वाढलं असतं की मिनी आपलं सामान घेऊन, सासूसकट आपल्या आई (उत्तरा बावकर) बाबांच्या (मोहन आगाशे) घरी येते. या चित्रपटातली पात्र ही समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीला दाखवणारी माणसं. जसं की मिनीची बहीण स्पृहा ही तिच्या बॉयफ़्रेंड बरोबर एक छान ओपन नातं जगणारी, रिपोर्टींग करणारी ‘माय रुल्स’वाली आजच्या काळातली तरुणी, तिचा बॉयफ़्रेंड थोडासा कुल असणारा सिद्धार्थ मेनन, नातेवाइकांमधलं ते कॅरेक्टर जे ‘लोक काय म्हणतील’ मधले “लोक” या कॅटेगरीत मोडतात ते म्हणजे दीपा श्रीराम आणि मनातून मिनीवर प्रेम करणारा तिचा जुना मित्र, आपल्या ऐवजी मिनीने सदानंदला पसंद केला याचा मनात कुठेही त्रागा न करता , मित्राचं नातं अगदी सच्चेपणाने निभावणारा सुरेश (माझ्या अत्यंत अत्यंत आवडता ” द सुमीत राघवन”). तसंच मिनीची खूप वर्षेनंतर भेटलेली अमेरिकेत स्थायिक असणारी मैत्रीण इरावती हर्षे एकदम खास. मिनीचा भाऊ सुबोध भावे याचं पात्र पण परफेक्ट.

लग्न मोडतं म्हणजे नक्की काय होतं? त्यात त्या बाईची, तिच्या आई वडिलांची, नातेवाईकांची काय मानसिकता असते, त्यात मुलांची होणारी फरफट की त्यामुळे त्यांच्यात येणारी सजगता, नात्याचं तुटणं सोपं की अवघड, स्त्रीच मानसिक मागासलेपण, स्त्री कमावती असूनही नवऱ्यावर असणारं भावनिक परावलंबन, त्यातून येणारी समज, स्वतःचा शोध घेऊ पाहणार मन, त्या अनुषंगाने येणारी आव्हानं आणि ती आव्हानं आपण पेलू शकू हा वाटणारा विश्वास.. हा प्रवास म्हणजे ‘वेलकम होम’! आपलं घर कायमचं सोडून आलेली मिनी आता माझं घर कोणतं या विचारात पडते. नवऱ्याचं घर माझं, आई वडिलांचं घर माझं? स्त्रीच्या बाबतीत अगदी आजही माझं घर म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इन्सिक्युरिटीज याचं उत्तम चित्रण यामध्ये केलं आहे. चित्रपटातले संवाद ही अजून एक जमेची बाजू.

आगाशे आपल्या मुलीला म्हणतात हे ‘असं करताना तुम्ही मुलांचा विचार कसा नाही करत’? यावर मिनी म्हणते ‘आपल्या आई वडिलांचे फायदे आणि तोटे हे दोनीही या मुलांना घ्यायला लागतीलच’ किंवा’ निर्णय घेताना ताकद लागतेच’ असं मिनी आपल्या वडिलांना म्हणते तेव्हा ते म्हणतात ‘निर्णय घेताना लागतेच पण त्याच ताकदीचा वापर निर्णय टिकवताना सुद्धा करावा लागतोच’. असे कित्येक संवाद आपल्याला इंट्रोस्पेक्ट करायला लावतात. मिनीच्या बांबाना त्याचं लहानपण आठवतं किंवा तिच्या आईला जेंव्हा तीच नुकतंच लग्न झालं तेंव्हा जे प्रसंग आठवतात आणि त्यांचा आत्ताच्या प्रसंगाशी जो काहीही न बोलता दिग्दर्शकाने रिलेव्हन्स लावला आहे तो केवळ लाजवाब. कुठपर्यंत सहन करायचं, काय सहन करायचं हे व्यक्तिसापेक्ष असतं. सुबोध भावे म्हणतो आपल्या बहिणीला ” तडजोड तपशिलात करावी, मुद्द्यात नाही”.

मिनी आणि तिच्या मुलीमधले संवाद सुद्धा अप्रतिम. विशेषतः आपलं घर म्हणजे काय या संबंधातले. मिनी आणि तिच्या नवऱ्यात कशामुळे बिनसलं हे अंधुक ठेवलं आहे ही सुद्धा एक अत्यंत आवडलेली गोष्ट. मिनी सुरेशबरोबर बाहेर पडलेली असते. तो सगळा प्रसंग, ते न बोलता झालेलं संभाषण इतकं सहज आणि सुंदर चित्रित केलं आहे. सुमीत राघवन यांनी सहज अभिनयाने सुरेशला इतकं लाइकेबल केलं आहे की तो एका मिनीटात आपल्याला आवडून जातो आणि या मिनीने सदानंदमध्ये काय पाहिलं असं त्या सदानंदला आपण न पाहताही विचार करायला लागतो.. सुमीतदादाचा तसाही मी खूप मोठा पंखा आहेच पण इथे एक नट आपल्या सहज अभिनयाने आणि अनएन्डिंग चार्म ने काय जादू करतो हे नक्कीच बघण्यासारखं आहे. मिनी आणि सुरेशच्या एका संभाषणात ती म्हणते “जबाबदारीचं असंच असतं, ती ज्याला वाटते त्याचीच असते.” मनात कोरून ठेवावं असं हे वाक्य.

मिनी तिच्या नवऱ्याच्या घरी राहिलेलं पुस्तक घ्यायला जाते तेंव्हा त्याने कुलूप बदलून टाकलेलं असतं, किंवा तो दोन दिवस महाबळेश्वरला रिलॅक्स व्हायला गेला आहे हे कळल्यावर मिनीला जे काही तुटल्यासारखं वाटतं ते मृणाल कुलकर्णींनी खूप कमाल पद्धतीने दाखवलं आहे.ज्या सहजतेने मिनीचं थोडंसं अवघडलेपण, थोडंसं निडर, थोडंसं संभ्रमित आणि थोडंसं स्ट्रॉंग कॅरेक्टर त्यांनी पकडलं आहे ते केवळ कमाल. इतकं सगळं होऊनही नवऱ्याच्या घरी, बदललेल्या कुलुपाची किल्ली नवीन करून, घर उघडून, तिथे पडलेलं सगळं सामान नीट आवरून, भांडी वगैरे घासून जागच्या जागी ठेवून देणाऱ्या मिनीला आपण पाहतो, तेंव्हा जे काही वाटतं ना.. थोडासा राग, मग ममत्व मग थोडंसं हसू आणि अचानक डोळे ओले व्हायला लागतात.. ते जे काही जाणवतं आतवर, त्यासाठी या दोन्ही दिग्दर्शकांना सलाम करावासा वाटतो.

बाईचं घर म्हणजे असतं नेमकं कोणतं? घटस्फोटानंतर ती आई वडिलांकडे आली ज्या घरात ती लहानाची मोठी झाली असते तरीही तिथे आपल्यामुळे गैरसोय होते आहे.. किंवा ही खोली बहिणीची ही खोली आता बोस्टन मध्ये राहणाऱ्या भावाची.. आणि लग्न मोडून मुलगी घरी आली की तिला स्वतःहून वाटणारं उपरेपण..ना आई बाबांचं घर तिचं, ना नवऱ्याचं घर तिचं.. तिची असते ती फक्त जबाबदारी.. मुलांना पाहायची, सासूला सांभाळायची. मला कायम वाटतं की घटस्फोट घेतल्यावर आपलं कसं होणार? आपलं घर कोणतं? आता आपल्या मुलाला समाज काय म्हणेल? मुलं असतील तर त्यांचं पालन पोषण कोण करणार असे प्रश्न आणि त्यातली सीव्हीएरिटी पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पडत असेल का? आजही मुलाचं पाहून नोकरी करणाऱ्या किंवा त्यामुळे घरी बसणाऱ्या स्त्रिया, हुशारी असूनही या जबाबदाऱ्या पेलून समंजसपणे संसार करणाऱ्या बायका यांना आपण समजावून घेतो का? घटस्फोट घेताना मुलगी कमावती असणं हे इतकं गरजेचं होऊन जातं की बाईपणाच्या मणा मणाच्या ओझ्यांमध्ये हे पण एक ओझं.. वेगळं व्हायची वेळ आली तर.. ह्याहुन अधिक इडिऑटीक काय असू शकतं? म्हणजे मुलांसाठी ती घरी राहिली आणि नंतर वेगळं व्हायची वेळ आली तर तिने तिच्या आयुष्यातला जो महत्वाचा वेळ संसाराला दिला त्याचं काहीही मूल्यमापन होणार नाही का? तिने कमवायचं कारण पुढे मागे काही झालं तर, तिने सांभाळून घ्यायचं कारण नातं टिकवायचं म्हणून, तिने शिकायचं कारण ती हुशार आहे म्हणून, तिने काम असं करायचं ज्यातून पैसे येतील पण फार अडकावं लागणार नाही कामाच्या ठिकाणी, तिने मुलांकडे लक्ष अधिक द्यायचं कारण दोघांपैकी एकाने तर पाहायलाच पाहिजे, तिने जास्त इमोशनल नाही राहायचं कारण भावनिक गुंतवणूक चांगली नाही.. हजार गोष्टी.. हजार ओझी.. आगाशे म्हणतात तसं.. ज्याची माणुसकी जागी आहे तो संन्याशी अडकलेलाच राहणार..

यावर खरंतर खूप काही आहे लिहिण्यासारखं पण काही कलाकृती या स्वतः अनुभवाव्या अशा असतात आणि त्यातलीच एक ‘वेलकम होम!’ माझं घरं असतं ते काय? शेवटी आपण मानू ते आपलं घर असतं. मग ते एक असो वा एकापेक्षा जास्त. आपल्या सगळ्यांना आपली अशी गोष्ट असतेच. ती जगायची आहे.. या गोष्टीची सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे ती लिहून जरी ठेवली असेल त्याने तरीही ती जगायची कशी हे आपल्यावर सोडून दिलं आहे त्याने. माझी गोष्ट.. माझ्या अनुभूती, माझं शिकणं, माझं धडपडणं, माझ्या भावना, माझं विखुरणं, पुन्हा नव्याने उभं राहणं.. हा शोध स्वतःचा आहे. स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढूया. जे आहे त्याचा स्वीकार, जे नाही त्याचाही स्वीकार आणि जे होऊ शकतं त्यासाठी भरारी घेण्याचं बळ आपल्या सगळयांच्याच पंखांमध्ये येवो. जे आपलं वाटतं, जिथे आपण मी म्हणून राहू शकतो, जिथे जीव विसावतो, जिथे डोळे मिटले की निवांत झोप लागते.. असं घर आपल्या सगळ्यांनाच मिळो.. कधी वाट चुकेल कधी ती बिकट असेल कधी दिसणारही नाही.. पण चालत राहायचं आहे.. कारण असं घर सगळ्यांसाठीच असतं.. कुठे ना कुठेतरी.. फक्त चालत राहायचं बळ हवंय.. Cheers to being in place where your heart lies.. Cheers to ‘Welcome Home ”

लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

Previous articleसिंग विल बी किंग , ऑल्वेज !
Next articleआमचा कांबळे…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here