आमचा कांबळे…

-नितीन चंदनशिवे.

आमचा कांबळे लईईई हुशार
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला
हुं करून…

कांबळे शाळेत गेला
मास्तरने फळ्यावर सरस्वती काढली,
पण,
कांबळेनं पाटीवर सावित्री काढली…
मग
मास्तरने असा तुडवला असा तुडवला….
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच नाही रडला
नुसताच कण्हला हूं करून….

कांबळे वयात आला
आणि प्रेमात पडला
तिनं विचारली जात
तो म्हणाला
अगं वेडे मी फक्त माणूस…
माणूस माझी जात
मग
तिनं बी असा तुडवला असा तुडवला
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून…

लग्नाला सत्यनारायण
कांबळे म्हणला चालणार न्हाय…
मुहूर्त बघून करूया
कांबळे म्हणला पटणार न्हाय…
जागरण घाला
बोकड कापा
कांबळे म्हणला जमणार न्हाय…
मग घरच्याच
लोकांनी असा तुडवला
असा तुडवला अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून….

कांबळे मित्रांच्या नादाने
चुकून मुकमोर्चात गेला
त्यालाबी वाटलं माझ्याही मित्रांना
आरक्षण मिळावं..
एक मराठा लाख मराठा म्हणत म्हणत
चुकून जय भिम बोलला
मग काय
त्याच्याच मित्रांनी
असा तुडवला असा तुडवला
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून…..

कांबळे चळवळीत आला
इस्कुट बघितला चळवळीचा
कांबळेला वाईट वाटलं
आणि चौकात उभा राहून
सर्वाना म्हणला
सगळ्यांनी एकत्रित या
एकत्रित या
मग
आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला
असा तुडवला असा तुडवला
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून….

परवा कांबळेच्या मुलाने
कांबळेला एक प्रश्न विचारला
पप्पा,बाबासाहेब कोण होते?
भारत म्हणजे काय?
संविधान हि काय भानगड आहे?
आत्ता मात्र कांबळे लईई पेटला….।
मग त्यानेच त्याच्याच मुलाला
असा तुडवला
असा तुडवला अस्सा तुडवला…
पण चिरंजीव कांबळे बी
लईईई हुशार
त्यो पण न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून..

आत्ता कांबळे वेडा झालाय
वेड्यांच्या दवाखान्यात असतो
पण,
हातात तिरंगा असतो
आणि
मांडीवर असतं संविधान
आणि कांबळे सारखा मानवतेच्या
बाता बडबडत असतो
अंधश्रद्धेवर बोंबलत असतो
दाभोळकरांचे खुनी शोधा म्हणतो
देश वाचवा,लोकशाही वाचवा
म्हणून पाय आपटून आपटून
ओरडत असतो
मग
डॉक्टर पण असा तुडवत असतो
असा तुडवत असतो
अस्सा तुडवत असतो

पण कांबळे आमचा लय हुशार…।
तो कधीच न्हाय रडत
नुसताच कण्हतोय
कसा
हूं…..करून.
————–

संबंधित कवितेमधला कांबळे हा एकाच कोणत्या जातीचा नसून तो केवळ भारतीय आहे.हे एक प्रतिक आहे.आणि असा कांबळे प्रत्येक गावात आपण पाहिलाय. पाहत आहात.त्यांना ही कविता समर्पित.

कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली
7020909521

 

Previous article‘वेलकम होम’…प्रत्येक बाईने पाहायलाच हवा असा चित्रपट
Next articleरोबो आर्टीस्ट : नव्या युगाची चाहूल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.