– सानिया भालेराव
“Love makes us whole… Again” – Plato
प्लेटोने प्रेमाबद्दल काढलेले हे उद्गार मला फार भावतात. आपण प्रेम करतो ते कशा करता? तो एक पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास असतो खरंतर. ‘सिम्पोझियम’ मध्ये प्लेटो एका प्रसंगाबद्दल लिहितो. Aristophanes हा एका पार्टीत एक गोष्ट सांगत असतो. पूर्वी मनुष्य अँड्रोगायनस होता. म्हणजे त्याला स्त्री आणि पुरुष अशी दोनीही लिंग होती. दोन डोकी, चार हात, चार पाय.. पण देवांना म्हणे या राक्षसरुपी मनुष्याची भीती वाटायला लागली. याच्याकडे सगळी सत्ता निघून जाते की काय असं वाटायला लागलं ( यावर अजून थोड्या वेगळ्या थिअरीज देखील आहे जसं की हा मनुष्य देवांना राग येईल अशी कामं करू लागला वगैरे वगैरे) आणि म्हणून झूस ( Zeus) या देवाला राग आला आणि त्याने या मनुष्याला दोन तुकड्यात कापलं. आता तो विभागला गेला आणि मग स्त्री आणि पुरुष अशी त्याची दोन रूपं झाली. तर प्लेटो म्हणतो आयुष्यभर मनुष्य आपला दुसरा तुकडा शोधत असतो.. पुन्हा एकदा पूर्ण होण्यासाठी!
आता शरीरं दोन झाली तरी ही एकाच मनुष्याची दोन रूपं ह्रदय मात्र तुकड्यांमध्ये घेऊन फिरतात. जर कधी आत डोकवलात तर दिसेल एक अर्धवट हृदयाचा तुकडा.. जो वेड्यासारखा धडधडत असतो. आपण सगळेच हे असे हृदयाचे अर्धे अर्धे तुकडे घेऊन या जगात येतो असं वाटतं कधीकधी.. तो वेडा तुकडा कधी कधी वागतो शहाण्यासारखा पण बऱ्याचदा त्याला दुसरं काहीही दिसत नसतं.. त्याला ध्यास असतो तो आपला साथीदार शोधण्याचा. आता इतक्या मोठ्या या जगात असंख्य अशा तुकड्यांमध्ये कसा मिळावा आपला तुकडा? आणि मग सुरु होतो प्रवास.. या प्रवासात कधी कधी मिसफिट तुकड्याला बसवावं लागतं आपल्या तुकड्यासोबत. अशा वेळी हा तुकडा करतो प्रतिकार, ओरडून बघतो, रडून बघतो.. चालतं असं नाही ना त्याचं प्रत्येक वेळेला. मग तो दुसरा तुकडा बळजबरीने घेतो बरोबर. आता हृदय एक झालं असलं तरी त्यात फटी असतात कारण ते नीट बसलेलं नसतं. मग ते दोनीही तुकडे अपूर्ण राहतात. दोन डोकी, चार हात, चार पाय असं झालं तरीही मन.. ती सुद्धा दोनच.. दोन अर्धवट हृदयं.. आणि दोन भिन्न आत्मे.. ते एक कधीच होत नाहीत..
काहीवेळेला जर हे सर्व नाकारण्याची हिंमत असेल तर तो तुकडा देतो झुगारून सगळं. चालू लागतो वेगळ्या दिशेने. त्याच्या पूर्णत्वाच्या प्रवासात येतात अडथळे.. तो चालत राहतो ठेचाळत.. मग अचानक एक दिवस त्याला दिसतो तो दुसरा तुकडा. दोघे बघतात एकमेकांकडे डोळे भरून. येतं लक्षात आपण आहोत एकमेकांसाठी ते.. पण.. आता हे दोन तुकडे होतील एक असं सुद्धा नाही होत प्रत्येक वेळेला. तळमळत राहतात आपापल्या जागी.. कधी कधी पडझड झालेली असते, कधी एकत्र येणं नसतं संभव.. अगदी काही काळासाठी जरी हे दोन तुकडे एकत्र आले तरी ते पूर्णत्वाचा तो क्षण अनुभवू शकतात. मग ते अनुभवणं क्षणिक असलं तरीही.. ते पुरतं.. पुरून उरतं देखील.. पण वाटतं जे काही असो.. जिथे कुठे दोन तुकडे असो.. त्यांनी एकत्र यावंच. देवांवर अधिराज्य गाजवण्याची शक्ती जर हे दोन तुकडे मिळून मनुष्याला देऊ शकत असतील..एवढी ताकद जर प्रेम निर्माण करू शकत असेल.. तर मग मिलन व्हायला हवं नाही?
असतील असे तुकडे जे आता तुकडे न राहता. एकजीव झाले असतील.. पुन्हा एक होणं ही दैवी देणगी लाभलेले .. पण कुठे तरी असेल तळमळत एखादा तुकडा, दुसरा असेल उशी भिजवत.. एक बसला असेल खिडकीत पाऊस बघत.. दुसरा असेल बसलेला काळ्या काचेच्या गाडीतून पावसाकडे पाठ करून, एक असेल डोळे ओले करत तर दुसरा असेल आपलं एकटेपण झाकायच्या प्रयत्नात.. एकाने केला असेल समझोता स्वतःशीच.. दुसरा असेल लढायची तयारी करत.. प्रवास म्हटला तर साधा.. नाहीतर कठीण. मानलं तर पूर्ण.. नाहीतर अपूर्ण.. आत डोकवायचं का नाही की वरवर जे आहे तेच बघायचं.. प्रत्येकाचा आपला असा हा निर्णय.. पूर्ण होऊनही अपूर्ण राहायचं की अपूर्ण राहूनही पूर्ण.. भासवणं आणि असणं यांच्यातलं म्हटलं तर सूक्ष्म आणि म्हटलं तर अशक्य मैलांचं अंतर.. दिसेल.. दिसणार नाहीही.. पूर्णत्वाकडे नेणाऱ्या .. पुन्हा एकदा माणूसपणाकडे आणणाऱ्या या प्रेमाला.. Cheers to love that makes us Whole again!
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )