धंदेवाईक डॉक्टरांना जाब विचारण्याची वेळ आली आहे

सलग दुसर्‍या आठवड्यात अमरावतीचे डॉक्टर चर्चेत राहलेत. अर्थात हे चर्चेत राहणं चांगल्या अर्थाने नव्हतचं. डॉ. सावदेकर रुग्णालयातील प्रकरणानंतर डॉक्टरांच्या मनमानीविरुद्ध राजकीय कार्यकर्ते व सामान्य जनतेचा संताप समोर आल्यानंतर डॉक्टर मंडळी समजदारी दाखवतील अशी अपेक्षा होती. मात्र कुठल्याही सुस्थापित संघटीत वर्गाप्रमाणे त्यांनी हेकेखोरीचं धोरण अवलंबविलं. रुग्णालयात मारहाणीचे प्रकार होत असल्याने आम्ही राजीव गांधी जीवनदायी योजना राबविणार नाही, अशी संतापजनक भूमिका त्यांनी घेतली. आम्ही रुग्णांना वाट्टेल त्या पद्धतीने लुटू, मात्र आम्हांला कोणी जाब विचारायचा नाही, असाच हा प्रकार होता. सामान्य माणसासोबतची बांधिलकी अशा प्रकारे नाकारणारे हे डॉक्टर समाजाचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या डॉक्टरांची खरी जागा त्यांना दाखविण्याची वेळ आता आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ‘तुम्ही शासनासोबतचा करार मोडीत काढत आहात’, अशी कायदेशीर भाषा केल्याबरोबर या मस्तवाल डॉक्टरांचे डोके ताळ्यावर आले. मात्र यानिमित्ताने सामान्य माणसाने आता डॉक्टरांसोबत कसं वागायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

पुण्यनगरीने गेला संपूर्ण आठवडा डॉक्टरांबद्दल लोकांच्या मनात एवढा संताप का, हे जाणून घेण्याचा प्रय▪केला. गेल्या रविवारच्या डॉक्टरांनो, तुम्ही सहानुभूती गमावून बसले आहात! या मीडिया वॉचवर लोकांच्या अफाट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे अनुभव जेवढे धक्कादायक आहे., तेवढेच संतापजनक आहे. अमुक डॉक्टरच्या बेपर्वाईमुळे, तमुक डॉक्टरच्या पैशाच्या हव्यासापोटी आपल्या आप्तस्वकीयांचे जीव कसे गेलेत, हे सांगतांना माणसं ओक्साबोक्सी रडत होते. लोकांना पैसे गेल्याचं दु:ख नाही, मात्र डॉक्टर पैसे कमावितांना माणसासारखे वागत नाही, याचा संताप त्यांच्या मनात धगधगत आहे.कोणकोणत्या डॉक्टरांची नावं घ्यायची? दोन-चार अपवाद सोडलेत, तर सारेच सडके आंबे आहेत. डॉक्टर लूट कशी करतात, याचे लोकांनी सांगितलेले अनुभव लिहितो म्हटलं, तर एक भलंमोठं पुस्तक होईल. अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम अनुभव सगळीकडे सारखेच आहेत. यवतमाळ व अकोला येथील दोन्ही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलबद्दल लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे. सामान्य माणसाला हतबल करुन त्याला मल्टिस्पेशालिटीत अँडमिट व्हायला भाग पाडणार्‍या डॉक्टरांबद्दल यवतमाळ, अकोल्यात कधीही रोष उफाळून येऊ शकतो. काय-काय सांगायचं? रुग्णाच्या शरीराला प्रयोगशाळा समजून त्याच्यावर प्रयोग करणारे डॉक्टर, कारण नसतांना आयसीयूत ढकलणारे डॉक्टर, औषध कंपन्यांचे टारगेट पूर्ण करण्यासाठी ठरावीक औषधं लिहून देणारे डॉक्टर, खुलेआम कट प्रॅक्टीस करणारे डॉक्टर, रुग्णालयाच्या परिसरातील औषध विक्रीचं दुकान लाखो-करोडो रुपयांचा करार करून भाड्यानं देणारे डॉक्टर, रुग्णालयातील घाणेरड्या रूमचे हॉटेल्सच्या रुमपेक्षा अधिक भाडे लावणारे डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसताना त्यांच्या सेवेचे दर बिलात लावणारे डॉक्टर…डॉक्टरांच्या लुबाडणुकीचे असे असंख्य किस्से लोकांनी ऐकविले, लिहून पाठविले. विशेष म्हणजे सामान्य माणसांचा हा आक्रोश बाहेर येत असतांना कुठल्याही प्रथितयश डॉक्टरला आपल्या व्यवसायाच्या या काळ्याकुट्ट बाजूचा निषेध करावासा वाटला नाही. किंवा स्वत:ची बाजूही मांडावी असंही वाटलं नाही. उलट वर्तमानपत्रांतील बातम्या कशा थांबविता येतील, आपल्या सहकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल कसे होणार नाही या खटपटीत डॉक्टरांची लॉबी आहे.

डॉक्टर आपल्या पांढर्‍या अँप्रनवर काळे डाग पडू नये यासाठी केविलवाणी धडपड करत आहे. मात्र डाग केव्हाचाच पसरलेला आहे. डॉक्टरांचे कारनामे सांगावे तेवढे कमी आहेत. सावदेकर प्रकरणाने राजीव गांधी जीवनदायी योजनेतील अपहाराबाबत शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड, नाना नागमोते यांनी जी माहिती समोर आणली ती पाहता लुटारु डॉक्टरांनी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार केल्याचे लक्षात येते. एकट्या अमरावती जिल्हयात १९.५0 कोटी रुपये डॉक्टरांनी या योजनेतून शासनाकडून वसूल केले. काही मोजक्या रुग्णालयांचा अपवाद वगळता बर्‍याच डॉक्टरांनी कागदोपत्री केसेस तयार करुन या योजनेतून पैसे काढले आहेत. कोणत्या रुग्णालयात किती रुग्णांवर या योजनेतंर्गत उपचार झालेत याची यादी जरी बारकाईने तपासली तरी गडबड लक्षात येते. एकट्या अमरावती जिल्ह्यात एवढा मोठा घोटाळा, तर संपूर्ण राज्यात काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच करता येत नाही. या योजनेत डॉक्टर कसे पैसे कमवितात, याचे किस्से डॉक्टर मंडळीच सांगतात. छातीत साधं दुखणं असलेल्या रुग्णाला गंभीर असल्याचं भासवून सात-आठ दिवस आयसीयूत टाकलं जातं. त्यानंतर अँजिओग्राफी, अँजिओप्लॉस्टी केल्याचं भासवून त्याचं बिल शासनाकडून काढलं जातात. इतर किरकोळ आजाराबाबतही असंच घडतं. विशेष म्हणजे काही महाभाग डॉक्टर रुग्णांनाही यात वाटा देतात. वैद्यकीय व्यवसायाला कलंक असणार्‍या या डॉक्टरांबद्दल इतर डॉक्टर व त्यांच्या आयएमएसारख्या संघटनांनाही संपूर्ण माहिती आहे. मात्र तोंड उघडायला कोणी तयार नाही.

आपल्या क्षेत्रातील कीड डॉक्टर्स किंवा त्यांच्या संघटना काढू शकत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. प्रश्न एवढाचं आहे की, लोकांनी हे किती काळ सहन करायचं? डॉक्टरांना आता जाब विचारण्याची सुरुवात केली पाहिजे. रुग्णांनी आपले मुलभूत हक्क जरा जाणून घेतले पाहिजे. कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यावर तुम्हाला काय झालं आहे, हे त्याने तुम्हाला सांगितलं पाहिजे, तो सांगत नसेल, तर तुम्ही बाध्य केलं पाहिजे. रुग्णालयात अँडमिट होण्याची गरज असेल, तर उपचारासाठी किती खर्च येणार, कोणत्या तपासण्यांसाठी संभाव्य खर्च किती, किती दिवस उपचारासाठी लागतील, हे प्रश्न जरा विचारले पाहिजे. औषध अमुक दुकानातूनच का घ्यायची आणि तपासण्या ठराविक डॉक्टरकडेच का करायच्या, हे जरा डॉक्टरच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं पाहिजे. वैद्यकीय व्यवसायाला आता मिशन ऐवजी प्रोफेशनचे स्वरुप आले असतांना आपल्या पैशाच्या बदल्यात योग्य सर्व्हिस मिळविण्याचा हक्क आपल्याला आहेच. राजकीय कार्यकर्ते व नेत्यांनीही डॉक्टरांना मारहाण करण्याऐवजी या धंद्याला आता धंद्याचे नियम लागतील, व्यवस्थित दरपत्रक असेल, पैसे मोजण्याच्या बदल्यात डॉक्टर व त्यांचा स्टॉफ विनम्रपणे वागेल, अशा गोष्टींवर लक्ष दिले, तर सामान्य माणसाच्या भल्याचं काही होईल. नाहीतर त्यांच्या वाट्याला मरणच आहे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleडॉक्टरांनो, तुम्ही सहानुभूती गमावून बसला आहात!
Next articleडॉ . जयंत आठवले म्हणतात – डॉक्टर दाभोळकरांचा मृत्यू ही ईश्वराने केलेली कृपाच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here