-उत्पल व्ही. बी.
गांधीजी : मेधा पाटकरांनी उपोषण सोडलं ना रे?
मी : हो, सोडलं. लेखी आश्वासनानंतर.
गांधीजी : चांगलं झालं.
मी : हो, पण हे सगळं एकूण उदास आणि काहीसं निराश करणारं आहे.
गांधीजी : काय?मी : हेच…डेव्हलपमेंट पॉलिसी, डेव्हलपमेंट मॉडेल, विस्थापितांचे वर्षांनुवर्षांचे लढे, गव्हर्नन्स फेल्युअर…
गांधीजी : व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट?
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे केंद्रीकृत गव्हर्नन्स, केंद्रीकृत विकास आणि अनरेस्ट्रिक्टेड कंझमशनच्या मॉडेलकडून आणखी वेगळी अपेक्षा काय असणार?
मी : तेही आहेच. आणि शिवाय गंमत बघा. लोक मेधा पाटकरांनासुद्धा नावं ठेवतात. म्हणजे अर्थातच क्रिटिकल इव्हॅल्यूएशन काही नाही. नुसती शेरेबाजी…
गांधीजी : हं. दाभोळकरांचा तर खून केला लोकांनी.
मी : हो. म्हणजे प्रश्न असा पडतो की हे सगळं काय आहे? हे जे ‘लोक’ आहेत ते कशाचे बनले आहेत नेमके?
गांधीजी : हं…पण काय रे, तू तरी कशाचा बनला आहेस?
मी : व्हॉट डू यू मीन?
गांधीजी : आय मीन लोक विस्थापित झाले, कुणी कार्यकर्ते मारले गेले तरी तुझं रूटीन सुरू असतंच की. तू थोडंच नेटफ्लिक्स बघणं थांबवतोस?
मी : तुम्ही कसलीही काय तुलना करताय? नेटफ्लिक्स वगैरेचा काय संबंध इथे?
गांधीजी : ट्रायिंग टू बी डेव्हिल्स अॅडव्होकेट. बट ऑन अ सीरियस नोट, नेटफ्लिक्सचा संबंध केंद्रीकृत विकास, अनरेस्ट्रिक्टेड कंझमशन वगैरेंशी नाही असं तुला वाटतं?
मी : आहे असं तुम्हाला वाटतं?
गांधीजी : हो. पण त्यावर नंतर सविस्तर चर्चा करू.
मी : बरं. तर माझा मुद्दा हा की मी जनआंदोलनांना समजून घेतोय. त्यात जमेल तसा भाग घेतोय. मला आस्था आहे त्याबद्दल. आंदोलनं आणि गव्हर्नन्स या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोन्हीची चिकित्सा व्हावी असं वाटतं मला. यातूनच कदाचित विकेंद्रीकरणाचा मार्ग सोपा होईल.
गांधीजी : ते अर्थातच योग्य. स्वागतार्ह. तू विकेंद्रीकरण हा शब्द वापरल्यानंही भरून आलं मला. माझा मुद्दा हा की रिअॅलिटी, सेन्स ऑफ रिअॅलिटी आणि सेंटिमेंट्स या तीन गोष्टींमध्ये गल्लत करू नये. त्यांच्या सीमारेषा ओळखाव्यात.
मी : हे मान्यच आहे.
गांधीजी : आणखी एक.
मी : काय?
गांधीजी : डेव्हिल्स अॅडव्होकेट होत जा अधूनमधून.
मी : त्याने काय होईल?
गांधीजी : अरे डेव्हिलला पूर्णपणे नाहीसं करता येईलसं वाटत नाही.
मी : मग?
गांधीजी : पण त्याला शांत करता येऊ शकतं…
मी : म्हणून डेव्हिल्स अॅडव्होकेट व्हायचं?
गांधीजी : राइट…
मी : हं, मी बघतोय काही दिवस…तुम्ही श्रूडली वागता हां कधीकधी…
गांधीजी : चला, तुझाही गैरसमज दूर झाला तर…
मी : कसला?
गांधीजी : हाच की मी अगदी भोळा-भाबडा आहे, मला व्यवहार कळत नाही वगैरे…
मी : हं…
गांधीजी : आता तुला म्हणून सांगतो.
मी : काय?
गांधीजी : मी अव्यवहार्यपणे का वागतो माहितीय?
मी : का?
गांधीजी : कारण मुळात मला व्यवहार कळून चुकलाय.
-9850677875