चंद्रावर स्वारी ,गंमतच भारी

साभार-साप्ताहिक चित्रलेखा

-ज्ञानेश महाराव

अन्य समाजमाध्यमांवर दोन आठवड्यांपूर्वी एक क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये एक गृहस्थ अंतराळयात्रीच्या पोशाखात खड्यांतून वाट काढत असल्याचं दिसत होतं. ही क्लिप कोणत्यातरी ग्रहावरील असल्याचं वाटत असतानाच शेजारून टार टार आवाज करत एक रिक्षा जाते. ही क्लिप रस्त्यावरच्या खड्ड्यांवर भाष्य करणारी होती. या काळात आपली चांद्रयान मोहीम सुरू झाली होती. हा एक योगायोग समजला जात असला, तरी आपलं नेमकं दुखणं हेच आहे की, ज्यावर कुणी फारसं भाष्य करत नाही ! आतापर्यंत आठ देशांनी चंद्र मोहिमा आखल्या. त्यातील काही देशांना अपयशसुद्धा आले. पण भारताच्या अपयशाची जेवढी व ज्या पद्धतीने चर्चा झाली, तो एक सामूहिक मूर्खपणा होता. त्यातून आपले प्रश्न कोणते ? याचं आपल्याला भान नसल्याचं स्पष्टपणे जाणवतं. आपण जगातल्या इतर देशांच्या खूप मागे आहोत, याची मोजणी आपण कधीतरी करणार आहोत की नाही ? आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण कुठे आहोत, यांची खातरजमा करणार की नाही ?

बालमजुरीच्या क्षेत्रात काम करणारे कैलास सत्यार्थी यांना २०१४ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्याचवेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की, १९६८ साली भारतीय असणार्‍या हरगोविंद खुराणा यांच्यानंतर आपल्या देशातील कुणीही व्यक्ती विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळवू शकलेले नाही. राष्ट्रीय पातळीवर जागतिक पातळीवरील विविध स्वरूपाच्या प्रयोगांचे, उपक्रमांचे अनुकरण जरूर होते. पण नवीन संशोधन शून्यावर आहे. कदाचित भारताने शून्याचा शोध लावण्याचा गर्व आपल्याकडील संशोधकांना (शास्त्रज्ञांना नव्हे) इतका आहे की, त्यांना वाटतं आपल्याला कुणी जाबच विचारत नाही. आपली चांद्रयान मोहीम ही मुळातच पाश्‍चात्त्य देशांचे ढळढळीत अनुकरण आहे. आतापर्यंत आठ देशांनी आपल्या पातळीवर या मोहिमा आखल्या. रशियाने सर्वात अगोदर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे जाण्यात यश मिळवलं. तो काळ शीतयुद्धाचा होता. रशिया पुढे की अमेरिका पुढे, असा तो काळ होता. अमेरिकेने या स्पर्धेत म्हणजे अवकाश स्पर्धेत आघाडी घेतली आणि चंद्रावर थेट माणूसच पाठवला. या घटनेला ५० वर्षं उलटली. तरीही आपण फक्त यानच पाठवित आहोत. ते उतरले की आपण खूप खूप मोठे यश मिळविले, अशा आनंदात दणदणाट करतो आणि त्यात अपयश आले की आपल्याला सुतक आल्याची भावना बळावते.

हे फक्त भारतातच घडू शकतं. कारण आपली बनावटच दुनियेपेक्षा जरा वेगळी आहे. त्याचं दर्शन भारतीय न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रादी माध्यमं दुनियेला घडवत असतात. भारताचं यान चंद्रावर उतरण्यास काही सेकंदांचा अवधी होता; तेवढ्यात नरेंद्र मोदी यांनी चंद्रावरचीही निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावात ‘अब चॉंद मोदी के मुठ्ठी मे ‘ अशी जाहिरातबाजी सुरू झाली. ऑर्बिटरपासून वेगळे झालेले ‘विक्रम’ नावाचे लँडर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि त्याचा संपर्क तुटला. हे पहिल्यांदाच झालं, असंही नाही. २२ ऑक्टोबर २००८ ला आपल्या पहिल्या चांद्रयानाने उड्डाण केलं. या मोहिमेचा उद्देश चंद्राभोवती एक उपग्रह प्रस्थापित करणे होता. सुमारे १० महिने आपल्या उपग्रहाने काम केलं. चंद्रावर पाणी किंवा पाण्याशी साधर्म्य असणारे अंश असल्याचे जगासमोर आणले. या उपग्रहाचाही संपर्क तुटला. त्यानंतर ‘चांद्रयान यान २’ मोहीम हाती घेण्यात आली. ती प्रत्यक्ष लँडर पाठवण्यासाठीची मोहीम होती. या पहिल्या मोहिमेची फारशी चर्चा झाली नाही. त्यापेक्षा जास्त चर्चा चांद्रयान २ची झाली किंवा करवली गेली. चांद्रयान १ चे अपयश अदखलपात्र होते आणि चांद्रयान २ चे अपयश दखलपात्र बनले. हा सरळसरळ दुटप्पीपणा आहे. मुळामध्ये प्रश्‍न तोच आहे की, हे अनुकरण कुणासाठी आणि कशासाठी? शेजारणीने गळ्यात सरी (हा एक दागिना आहे) घातली म्हणून आपण दोरी बांधून घेण्यासारखं आहे.

चंद्रावर काय आहे किंवा ते मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरेल का, असा प्रश्‍न पडल्यावर अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांनी अशा मोहिमा पुनः पुन्हा आखल्या नाहीत. अमेरिकेला अत्याधुनिक शस्त्रं आणि इतर स्वरूपाचं तंत्रज्ञान विकसित करून ते जगाला विकण्यात आणि पैसा कमावण्यात रस आहे. ३२ वर्षांपासून या देशात बोफोर्स हा शब्द गाजतोय. ३२ वर्षांनंतरही आपण या देशात बोफोर्स बनवू शकलेलो नाही. स्वीडनच्या तंत्रावर आपण ती चालू वर्षी बनविली. पण स्वतःची किंवा भारतीय तंत्राची नाही. आपण राफेल घोटाळ्यावर चर्चा करतो; पण आपण राफेलसारखी विमाने अजून का बनवू शकलो नाही ? असा प्रश्‍न ना संशोधकांना, (शास्त्रज्ञांना नव्हे; कारण या देशात शास्त्रज्ञ म्हणावे असे आता कोण आहेत ?) पडत नाही. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्काही तरतूद आपण अशा गोष्टींसाठी करून ठेवत नाही. इस्रोच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात करतो आणि गप्पा मात्र इतर देशांच्या बरोबरीच्या करतो, हे आपणास शोभतं का ? तद्दन भंपक, अवैज्ञानिक, अनपढ लोकांनी एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाचं श्रेयही घ्यावं आणि अपश्रेयही लाटावं याचाही ठोकताळा समाजमनाने केला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी हवाई दलाचे ‘ए.एन.३२’ हे विमान बेपत्ता झाले. अरुणाचल प्रदेश मधील ही घटना. त्या विमानाचे अवशेष सापडत नव्हते. म्हणून हे विमान एलियननी गिळंकृत केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. गणपतीचे शीर म्हणजेच जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी असं खुद्द प्रधानमंत्र्यांनी म्हणावे आणि त्यांनीच ग्लोबल वार्मिंग असे काही नसतेच; प्रत्यक्षात आपलं जीवनमान, आयुष्यमान बदललं आहे. असंही त्यांनी म्हणावं, हा शहाणपणा नाही. त्यांच्याच पक्षातील इतरेजनांनी डार्विनचा सिद्धान्त नाकारावा. गोमूत्रात कॅन्सरचा इलाज आहे, असं जाहीरपणे सांगावं. महाभारत काळात इंटरनेट (म्हणून त्याला मायाजाल म्हणायचे) होते. वेदांमध्ये विमाननिर्मितीचे सूत्र सांगितले आहे. अशा परिस्थितीत आपण चांद्रमोहिमेचे कौतुक करतो आणि सुतक पाळताना ते साजरेही करतो, हा बेशरमपणा आहे. यामुळेच इस्रो प्रमुख के. सिवान आणि प्रधानमंत्री यांची पहली बारची मिठीही वाजली-गाजली. हाही एक इव्हेंटचा केला गेला. मोदी सरकारच्या इव्हेंटचं हे सहावं वर्षं आहे. खरे विषय मागे पडून उपविषय मूख्य विषय बनवले जातात. लोकांना वरपासून खालपर्यंत किती मूर्ख बनवावे याला काही मर्यादा आहेत.

तथापि, जे इस्रोच्या कार्यालयात, कार्यालयाबाहेर झाले, तेच आपल्या आजूबाजूला चालले आहे. सांगलीचे मनोहर भिडे हे तथाकथित विज्ञानाचे डबल ग्रॅज्युएट म्हणाले की, ‘भारताचे चांद्रयान अमेरिकेप्रमाणे जर एकादशी दिवशी हवेत झेपावले असते, तर यश मिळाले असते.’ भिडे गुरुजी जणू त्या दिवशी अमेरिकेत साबुदाण्याची खिचडी आणि वरीच्या भाताबरोबर शेंगदाण्याची आमटी ओरपायला हजर होते. वस्तुस्थिती अशी की, अमेरिकेचे ‘अपोलो ११’ हे यान जेव्हा अवकाशात झेपावले, तेव्हा तारीख होती १६ जुलै १९६९. त्या दिवशी हिंदू कालगणनेनुसार , आषाढ शुक्ल द्वितीया होती. हे ‘माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यावर मुलगाच होणार,’ असा दावा करणार्‍या या गुरुजीला कोण सांगणार ? म्हणून विषय आहे, तो वास्तवाचा. त्याला आपण आपले खरे प्रश्‍न जाणून कधी भिडणार ? मोहिमेवर खर्च झालेल्या ९८० कोटी रुपयांचा हिशोब कुणी मागायचाच नाही काय?

जिथे भय , तिथे अपयश
संशोधनासाठी प्रतिभा आवश्यक असते. पण ती प्रतिभा म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा, कल्पनेचा विलास नसावा. पण तसे झाल्यानेच महाभारतातील विमानांचा वापर तुकोबांना सदेह वैकुंठाला पाठवण्यात झाला. ‘ज्ञानेश्वरी’तील लवण या शब्दातून बाष्पीभवन प्रक्रियेचा शोध सांगितल्याचा दावा करण्यात आला. मुलं होण्यासाठी स्त्री-पुरुषांत शारीरिक संबंध घडावे लागतात. महाभारताच्या आदिपर्वात कथा येते. भारद्वाज हे व्रतशील मुनी होते. ते गंगास्नानाला गेले असता, त्यांनी पाहिलं की, ‘घृता’ नावाची अप्सरा स्नानासाठी पाण्यातून बाहेर येतेय. तिचं सौंदर्य पाहून भारद्वाज मुनींच्या मनात कामवासना उफाळली आणि डोळ्यांनीच ते त्या अप्सरेशी कामक्रीडा करीत आहेत, असे चित्र रंगवू लागले. या आँख मिचौलीने भारद्वाज मुनींचे वीर्यस्खलन होऊ लागले. ते त्यांनी पानाचा द्रोण करून त्यात जमवले. निवासस्थानी आणून यज्ञपात्रात ठेवले; आणि द्रोणाचार्यांचा जन्म झाला. या कथेचा दाखला देत कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्य हे ‘विश्वातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी’ होते, असं सांगितलं जातं. हे जीभ लांब करून सांगताना टेस्ट ट्यूब बेबीसाठी पुरुष आणि स्त्री बीज एकत्र येणे आवश्यक असतं. जे कमी असेल, ते दुसर्‍याकडून घेऊन दोहांचा संयोग घडवावा लागतो, याची फिकीर आंबेवाले भिडे गुरुजी करतील ! वेद-पुराणे, ज्ञानेश्वरी ही आपल्या जागी ठीक आहे. पण त्यात खरंच काही वैज्ञानिक संकल्पना असत्या, तर त्यावर निश्चितपणे संशोधन झालं असतं. तसं विदेशात झालंय.

हर्बर्ट जॉर्ज तथा एच.जी. वेल्स यांची इंग्रजीतील ‘व्हिजनरी रायटर’ अर्थात ‘द्रष्टा लेखक’ अशी ओळख होती. (जन्म: २१ सप्टेंबर १८६६; मृत्यूः १३ ऑगस्ट १९४६) इंग्लंडमधील केंट परगाण्यात जन्मलेल्या वेल्स यांनी डझनभर कांदबर्‍या, लघुकथा, सामाजिक वास्तव सांगणारे लेख, उपरोधिक लेख आणि चरित्रं लिहिली. पण त्यांनी आणखी पुढे जाऊन विज्ञान कथा-कांदबर्‍या (फिक्शन) लिहिल्या. मानवी प्रगतीचा अंदाज घेत भविष्यात काय निर्माण होऊ शकते, यावर त्यांनी लिहिलं. जुलस वेर्ने (Jules werne) आणि ह्युगो गर्नस्बॅक यांच्याप्रमाणे एच. जी. वेल्स हेदेखील विज्ञानकथेचे जनक झाले. त्यांच्या कथा, कादंबर्‍यांतून तेव्हा प्रत्यक्षात नसलेली; पण कागदावर उतरलेली अत्याधुनिक विमानं, रणगाडे, अंतरिक्ष यान, अण्वस्त्र, उपग्रह, टेलिव्हिजन, वर्ल्ड वाइड वेब आणि त्यांची कार्यप्रणाली सारं काही वाचायला मिळत. द टाइम मशीन (१८९५), द आयलँड डॉक्टर मॉरो (१८९६), द वॉर ऑफ द वर्ल्ड (१८९८), द वॉर इन द इयर (१९०७) या पुस्तकांना प्रत्येकी एक, असे चार नोबेल प्राइझ मिळाले. कारण त्यातून वैज्ञानिक प्रगती सांगतानाच संभाव्य धोकेही सांगितले होते. तसेच पुढे घडले. तरीही ते लिहीत राहिले. द आऊट लाइन ऑप हिस्ट्री (१९२०), द सायन्स ऑफ लाइफ (१९३१) ही त्यांची पुस्तकंही गाजली.

त्यांच्या प्रतिभेच्या अनुषंगाने अंतराळ संशोधन करण्यासाठी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स ऍड स्पेस ऍड मिनिस्ट्रेशन) या संस्थेची २९ जुलै १९५८ रोजी स्थापना झाली. अंतराळ संशोधनात अमेरिका आणि रशियाने सुरुवातीपासून मुसंडी मारली. सातत्याने २० वर्षं संशोधन, मोहिमा, यश-अपयश पचवल्यानंतर रशियाचा युरी गागारीन हा १२ एप्रिल १९६१ रोजी अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर ठरला. तर २० जुलै १९६९ रोजी नासाच्या अपोलो-११ या यानातून चंद्रावर पहिला पाय ठेवणारा मानव नील आर्मस्ट्रॉंग होता. त्याने अमेरिकेचा झेंडा रोवताना ‘मानवाचे हे छोटेसे पाऊल, ही सर्व मनुष्य जातीसाठी मोठी झेप आहे’ असा संदेश समस्त पृथ्वीवासीयांना पाठवला होता. त्यानंतर अमेरिका-रशिया यांच्या स्वतंत्र आणि संयुक्त अशा कित्येक अंतराळ व चांद्रमोहिमा झाल्या. रशिया आणि भारत संयुक्त अंतराळ मोहिमेत पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कठोर प्रशिक्षण घेऊन २ ते ९ एप्रिल १९८४ अशी सात दिवसांची अंतराळ यात्रा केली. तेव्हा त्यांनी भारतीयांशी संवाद साधताना, ‘आकाशात वा त्यांच्या अवतीभोवती देवाचं राज्य नाही, देव नाही,’ असं सांगितलं. तरी गणेश भक्तांच्या संकष्ट्या आणि मुस्लिमांचे रोजे चंद्रोदयानंतर सुटतात. इस्रोचे प्रमुख सिवन चंद्रयान मिशन-२ यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेण्यास मठाधीपतीला भेटतात. तरीही चांद्रयान सुटण्याची वेळ तीनदा बदलावी लागते. अपोलो ११ जेव्हा चंद्रावर पोहोचलं, तेव्हा ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी “चंद्रावरून ससा पळाला” हे मार्मिक व्यंगचित्र काढलं होतं. याला ५० वर्षं उलटली तरी भारतीयांच्या मनात अजूनही भित्रा ससा ठाण मांडून आहे. चंद्रावर भारतीयाने पाय ठेवला तर देवाधर्माचे काय, याची चिंता त्याला आहे. जिथे चिंता, भय, तिथे अपयश, हे ठरलेले असते.

पाय मानवी चंद्राला लागला
चंद्रावर मानवाने पाय ठेवला, तेव्हाच थोतांडी पुराणकथांवर वैज्ञानिक हातोडा पडायला हवा होता. तथापि, विज्ञान संशोधन क्षेत्रात ज्यांनी नाव कमावलं, लेखन केलं. अशा डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कोल्हापूरच्या अंबाबाईंचं दर्शन सोवळं घालून घ्यावसं वाटतं. विकासाच्या वाटा सांगताना बापाच्या (जन्मदग्नी) संशयीवृत्तीला बळी पडून आईची (रेणुका) हत्या करणार्‍या परशुरामाचे दाखले द्यावे लागतात. डॉ. जयंत नारळीकर यांनाही हेल्मेट वापराचं महत्त्व सांगण्यासाठी यमा बरोबरचा संवाद लिहावासा वाटतो. याउलट, फक्त ७ वी इयत्ता शिकलेल्या शाहीर आत्माराम पाटील यांनी प्रतिभेचा आणि प्रबोधनाचा कळस ५० वर्षांपूर्वी गाठला होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आत्माराम पाटील यांच्या गाण्यांवर आणि शाहीर अमर शेख यांच्या गळ्यावर लढला गेला. आत्माराम पाटील यांची गीतं अमर शेख हेदेखील गात. शीघ्रकवी म्हणून आत्माराम पाटील यांची ख्याती होती. २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पाऊल ठेवल्याची बातमी आकाशवाणी केंद्रावर थडकली. त्या निमित्ताने कार्यक्रमाची जुळणी झाली. पण सगळी भाषणबाजी होती. ती तेव्हा मुंबई आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम अधिकारी असलेल्या बाळ कुरतडकर यांना रुचेना. ती भाषणबाजी त्यांनी होऊ दिली आणि आत्माराम पाटील यांना निरोप पाठवला, ‘उद्या कामगार सभाच्या कार्यक्रमानंतर चंद्रावर मानवी पाऊल पडल्याने काय बदल घडणार, यावर आपल्या पथकासह १५ मिनिटांचा शाहिरी कार्यक्रम सादर करा.’ आत्माराम पाटील यांच्याकडे फक्त १२ तास होते. त्यांनी रात्र जागून काढली. कल्पना केली की, थंड हवेच्या ठिकाणी पार्टी, संमेलनाचे आयोजन केले जाते. तशी चंद्रलोकी देवांचं संमेलन भरले आहे. तेवढ्यात त्यांना मानवाने चंद्रावर पाय ठेवल्याची बातमी समजली आणि काय झाले, ते आत्माराम पाटील यांनी गाण्याच्या चालीसह मुंबई आकाशवाणीवर ठरल्यावेळी सादर केले. ते गाणे असे होते –

ब्रह्मा-विष्णू-महेश रडती,
गळ्यात घालून गळा –
हाय हाय रे, पाय मानवी
चंद्राला लागला ॥ ध्रु.

ब्रह्मा बोले, हाय ! महेशा,
पहा काय झाले-
विष्णू बोले हाय अमुचे,
वैकुंठच गेले !
जप्त डिपॉझिट झाले शंकर,* *घामाघुम बोले-
गणरायाचा धाव करिती
तिघेही मतवाले !
मूषकावर लंबोदर आले,
नारदही ठाकला -* हाय हाय रे -१

तिघांस बोले गणेश अमुचा,
धावा का केला ?
कसले संकट पडले सांगा,
आलो हाकेला !
नारद बोले, सांगा सांगा,
रिपोर्ट द्या मजला –
स्वर्ग मृत्यू-पाताळ उठवतो,
मजला नि मजला !
आणि तिघांच्या आक्रोशाचा,
तारसूर लागला-* हाय हाय रे…

ब्रह्मा बोले पूर्वी आम्ही,अमृतमंथन केले –
विष्णू बोले सागरी तेव्हा,
चंद्रबिंब सापडले !
महेश बोले त्या चंद्राला,
भाळी मी धरिले –
तेव्हापासून नाव आमुचे,
भालचंद्र पडले !
(मग आता बिघडले काय ?)
खोटे ठरले पुराण आता
पुराणिक दाखला-* हाय हाय रे…

गणेश हबकून बोले आता,
करू मी काय तरी ?
मूषकावरूनी पडलो जेव्हा,
तुमच्या दरबारी !
हसला मजला चंद्र शापिला,
कटू मी उद्गारी –
चंद्र चवथीचा पाहू नये,
कुणी हिंदू परिवारी !
धाव नारदा फजितीतूनी या,* *वाचव आम्हाला !* हाय हाय रे…

बिंग हेरूनी नारद चिडला,
मारी ललकार –
पुढारी अमुचे लबाड सारे,
घबाड रचणार !
आजपासूनी तुमची लबाडी करितो जाहीर –
हा घ्या कीर्तन सोडून बनलो,
आता शाहीर !
पराणास त्या पुरावया हा, पुरावाच चांगला –
वा रे, वा रे विज्ञानाने
चंद्रमा जिंकला !*……..

अशा कविता-गाणी इयत्ता दहावी-बारावीच्या पाठ्यपुस्तकात पाहिजेत. चंद्र-सूर्य, तारे-ग्रह आता देवाचे नाहीत. सूर्याच्या अधिक जवळ जाण्याच्या प्रयत्नात नासाचे संशोधक आहेत. हे विद्यार्थी दशेतल्या मुलांना नीटपणे समजलं, तरच चंद्र-सूर्यावरची स्वारी दूर राहो,पण ‘उद्याचा भारत’ होमात जळणारा नाही, तर यानातून अंतराळात फिरणारा दिसेल !

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत)

9322222145

Previous articleडिजिटल युगातले सहजीवन ‘सही’ जीवन होईल?
Next articleडेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.