डिजिटल युगातले सहजीवन ‘सही’ जीवन होईल?

साभार -कर्तव्य साधना वेब पोर्टल

-विवेक सावंत, पुणे

 

डिजिटल युगात कौटुंबिक सहजीवनाचा परीघ आकुंचित होत आहे. दैनंदिन जीवनातल्या कित्येक गोष्टींमधला कौटुंबिक संदर्भदेखील नष्ट होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासासोबत भंगत चाललेले सहजीवन, यावर दृष्टीक्षेप टाकत कौटुंबिक विसंवादामागची नेमकी कारणं काय आहेतभंग पावत चाललेले हे कौटुंबिक सहजीवन सहीजीवन होऊ शकेल का? याचा वेध विवेक सावंत यांनी या लेखात घेतला आहे. प्रत्येक जोडप्याने , कुटुंबाने अवश्य वाचावा असा हा लेख आहे

 

ऐंशीचे दशक सरत असताना शीतयुध्द संपले. बर्लिनची भिंत जमीनदोस्त करण्यात आली. त्यापाठोपाठ खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचे (‘खाउजा’चे) वारे जगभर वाहू लागले, व्यक्तीवाद फोफावू लागला. आणि मग सामाजिकता, सामुहिकता, सामुदायिकता यांचा अवकाश संकोच पावू लागला. मी, माझे, माझ्यासाठी अशी आत्मकेंद्री वृत्ती वाढू लागली.  “We are, therefore, I am” या धारणेला तडे जाऊ लागले.

‘खाउजा’मुळे आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतीवर बाजारपेठीय अरिष्ट आले. ग्रामीण भागातील सामाजिक व कौटुंबिक सहजीवनालाही तडे जाऊ लागले. लक्षावधी लोकांचे शहरांकडे सक्तीचे स्थलांतर वाढू लागले. शेतीतून बाहेर फेकले गेलेले बहुसंख्य स्त्री-पुरुष शहरात बांधकाम मजूर/कामगार बनले, स्थिर कौटुंबिक सहजीवनाऐवजी भटके व अस्थिर आयुष्य त्यांच्या वाटयाला आले.

कृषी क्षेत्रातून शहराकडे होणाऱ्या अशिक्षितांच्या सक्तीच्या स्थलांतराबरोबरच,  सेवा क्षेत्रातील रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षितांचे ऐच्छिक स्थलांतरही वाढीस लागले. त्यामुळे शहरीकरणाने अफाट वेग घेतला. परिणामी एकाच कुटुंबातील व्यक्ती निरनिराळ्या शहरात किंवा देशात स्थायिक व्हायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. आणि मग कौटुंबिक सहजीवनाचा परीघ अधिकच आकुंचित झाला.

नियोजनशून्य वाढीमुळे शहरे कितीही बकाल झाली तरी, वाढत्या व्यक्तीवादाच्या प्रभावामुळे शहरांच्या या प्रचंड अनोळखी गर्दीत मिळू लागलेल्या प्रायव्हसीचे आकर्षण ग्रामीण युवांमध्येही वाढू लागले. याचा परिणाम, ग्रामीण व शहरी कौटुंबिक सहजीवनावर होणे अपरिहार्य होते.

ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस वाढीस लागलेल्या व्यक्तीवादी जीवनशैलीला अधिक व्यक्तीकेंद्री बनवणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाची (पुढल्या तीन दशकात) भर पडत गेली. त्या दशकाच्या अखेरीस समुदायाने मिळून परस्पर सहकार्याने सामाईकपणे वापरण्याच्या ‘टाईम शेअरिंग’ संगणकांचा अस्त सुरू झाला. आणि पूर्णपणे एकाच व्यक्तीच्या खासगी वापरासाठी बनवण्यात आलेल्या ‘व्यक्तीगत संगणकांचा’ (Personal Computers म्हणजेच PC चा) जमाना आला. एका दशकानंतर त्यात ‘व्यक्तीगत सेलफोन’ची भर पडली आणि त्यानंतरच्या दशकात त्याची जागा इंटरनेट-रेडी ‘व्यक्तीगत स्मार्टफोन’ने घेतली.

पुढल्या दशकात अक्षरश: कोट्यवधी लोकांच्या हातात स्मार्टफोन आले. त्यावर उपलब्ध झालेली हजारो apps, भूमिती श्रेणीने वाढणारा मल्टीमिडिया स्वरुपातील कंटेंट (माहिती/आशय) आणि आता बहुपरिचित झालेला समाजमाध्यमांचा माहोल, या सर्वांमुळे जगात डिजिटल युगाचा महाप्रवाह अवतरला. व्यक्तीवादाच्या वाढत्या प्रभावाला तंत्रज्ञान व मुक्त बाजारपेठ यांनी अधिक चालना दिली. अर्थातच, त्या तंत्रज्ञानाचे सर्वसामान्यांना विलक्षण फायदे झाले. पण त्याच्या अवाजवी वापरामुळे व्यक्तीकेंद्री व आभासी वास्तवातील जीवनशैलीचा अतिरेक सुरू झाला.

पूर्वी पोस्टमनने घरात टाकलेली पत्रे हा कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय असायचा, घरी येणाऱ्या वर्तमानपत्राचे सहवाचन नित्याचीच बाब असायची. रेडिओ व टेपरेकॉर्डरचेही सहश्रवण व्हायचे. घरी कॅमेरा असलाच तर तो व त्याच्या सहाय्याने काढलेले फोटो, वर्षानुवर्षे जपून ठेवण्याची व मधून मधून अख्या कुटुंबाने बघून नोस्टाल्जिक होण्याची गोष्ट असायची. लँडलाईनचा फोन (व क्वचित त्यावरील संवादसुद्धा!) आणि टीव्ही  तर केवळ कौटुंबिक नव्हे तर जणू काही अख्या चाळीची/वाड्याची किंवा छोट्या सोसायटीचीच मालमत्ता असायची! घरी आणलेली पुस्तके व नियतकालिके यांचेही तेच. सिनेमा, नाटक किंवा गाण्याची मैफिल ही तर कुटुंबाने किंवा मित्र-मंडळींनी सहआनंद घेण्याची पर्वणी. मनीऑर्डरचे पैसे स्वीकारणे किंवा बँकेतून पैसे काढून आणणे हे  घरातच नव्हे तर वाड्यातही सर्वज्ञात असायचे. कौटुंबिक व सामुदायिक सहजीवनात रंग भरण्यासाठी निमित्त ठरणाऱ्या, कटू-गोड प्रसंगांनी नातेसंबंधांची वीण घट्ट करणाऱ्या या आणि अशा कितीतरी (वरकरणी साध्या वाटणाऱ्या) गोष्टी आता स्मार्टफोननामक बहुगुणी यंत्राने पूर्णपणे व्यक्तीगत, अतिजलद व सोयीस्कर आणि म्हणूनच कदाचित निरस करून टाकल्या आहेत.

पूर्वी परस्परांच्या प्रत्यक्ष भेटीत (अर्थात सिंक्रोनस मोडमध्ये) संवाद घडायचे. आता त्यांची जागा ज्याला त्याला वेळ आणि मूड असेल तेव्हा मिळणाऱ्या असिंक्रोनस प्रतिसादांनी घेतली. आता तर असिंक्रोनस प्रतिसाद हीच जणू संवादाची एकमेव पद्धत आहे असा समज दृढ झाला आहे. त्यामुळे एकमेकासमोर बसलेल्या व्यक्तीही परस्परांशी सर्रास Whatsappवर चॅट करताना दिसतात आणि त्यात त्यांना काहीच अनैसर्गिक वाटत नाही!

परस्परांच्या भावभावनांविषयी संवेदनशील असणे, परस्परांना समजून घेणे,  जुळवून घेणे, तडजोड करणे, परस्परांचा वेळ हक्काने मागणे, परस्परांचे सहकार्य/ सहभाग गृहीत धरणे, इतरांच्या आनंदासाठी त्याग करणे,  मन मोकळे करणे, ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दु:खे डोळा पाणी’ अशा बोरकरी अनुभूतीने सहज जगणे या कौटुंबिक जीवनातील व  मैत्रीतील अध्याहृत गोष्टी  दुरापास्त होत चालल्या आहेत.

इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे अवतरलेल्या डिजिटल युगात आणि क्लाउडच्या जगात आता अनेक गोष्टी व्यक्तीगत होत आहेत. कुटुंबातील इतरांचा सहभाग अनावश्यकच नव्हे तर अडचणीचा वाटू लागला आहे. प्रत्येकजण दिवसातला बराच काळ स्मार्टफोनवरचे आभासी जगातले क्षणभंगुर अनुभव घेण्यात व्यस्त, ग्रस्त किंवा क्वचित मस्त आहे. तो आणि त्याच्या भोवतीचा समाज वयाचे भान विसरून ‘टीनएजर’ आणि ‘स्क्रीनएजर’ होत आहेत. विभक्त कुटुंबांप्रमाणे आता ‘विभक्त व्यक्ती’चा उदय होत आहे. आपण आत्ता ज्या स्थानी आहोत तिथे नसावे आणि ज्या स्थानी या क्षणी असू शकत नाही तिथे असायलाच पाहिजे ही आर्त इच्छा सर्वांना ग्रासते आहे. घरात आजारी आईशी चार प्रेमाचे शब्द बोलण्याऐवजी आणि तिला आश्वासक स्पर्शाचा आधार देण्याऐवजी दूर आफ्रिकेतील कुपोषित मुलाच्या समाजमाध्यमातील केविलवाण्या प्रतिमेवर कोरडी इमोजी करुणा व्यक्त करून पुढच्या क्षणी पुढच्या पोस्टवर जाणे हे संवेदनशीलतेचे समाजमान्य लक्षण ठरत आहे.

वर सांगितलेल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टीमधील हरवलेल्या कौटुंबिक सहभागाची आणि सह्भावाची जागा तितक्याच प्रभावीपणे घेऊन, परस्परसंबंधातील ओलावा व ऊब टिकवू शकतील असे नवे अवकाश निर्माण होताना दिसत नाहीत. त्यामुळे सहजीवनाचा संकोच होऊन माणसे यंत्रवत व एकाकी होत आहेत.

डिजिटल युगामुळे अर्थातच काही स्वागतार्ह बदलही होत आहेत. अनेक शहरांत किंवा देशांत कामानिमित्त गेलेल्या किंवा स्थायिक झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांशी सहज संपर्क/संवाद साधता येत आहे. याला डिजिटल विश्वात ‘रिमोट टुगेदरनेस’ म्हणजे ‘दूरस्थ एकोपा’ असे संबोधले जाते. शिवाय माहितीच्या सर्वदूर उपलब्धतेमुळे बाह्य जगाशी संपर्काची व्यापक संधी मिळणाऱ्या पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. तुलनेने अधिक काळ घरात व्यतीत करणाऱ्या स्त्रिया व मुलांनादेखील निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य मिळत आहे.

मात्र दुसरीकडे, इतरांना आपल्यासाठी वेळ नसल्याची, आपल्याला महत्व मिळत नसल्याची भावना पुरुष, स्त्रिया व मुले यांच्यामध्येही निर्माण होते आहे. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे व दबावामुळे व्यक्तींमधील परस्परसंबंधांचे व संवादांचे संकेत बदलत आहेत. आता घरात समोर असलेल्या व्यक्तीला हाक मारली तर प्रतिसाद येईलच याची खात्री नाही. कारण ती शरीराने समोर असली तरी मनाने स्मार्टफोनवरील तिच्या आवडत्या दूरदेशी असू शकते!

‘सुखी कुटुंब’ किंवा फार तर ‘सुखी कुटुंबातील व्यक्ती’ या उद्दिष्टाकडून ‘कुटुंबातील सुखी व्यक्ती’ अशा व्यक्तीकेंद्री उद्दिष्टाकडे आपला प्रवास वेगाने होत आहे. कुटुंबाची  म्हणून असणारी संस्कृती, संस्कार, मूल्ये नामशेष होत आहेत. कुटुंबाने एकत्र राहण्यातला भावनिक आशय लोप पावत असून , केवळ भौतिक किंवा ऐहिक गरज त्याची जागा व्यापत आहे. म्हणजे प्रेमळ सहवास देणाऱ्या ‘होम’चे सहअस्तित्वाची जबरदस्ती असलेल्या ‘हाउस’मध्ये क्षुल्लकीकरण होत आहे.

डिजिटल युगाने ‘शेअरिंग’चे बाह्य पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, पण कुटुंबात मिळणारे ‘केअरिंग’ बाहेर कसे मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कुटुंबातील चार जणांची तोंडे आपापल्या स्मार्ट फोनवरील चार भिन्न जगांच्या चार दिशांना असतील, तर कुटुंबाच्या सांस्कृतिक ओळखीच्या केवळ बाह्य आणि तकलादू आवरणाखालची परस्पर-असंबद्ध या अर्थाने ‘स्व-तंत्र’ व्यक्तिमत्त्वे ही त्यांची नवी ओळख आहे. अर्थात त्यामुळे कुटुंबातील प्रस्थापित पितृ अथवा मातृसत्ता लोप पावून तेथे या ‘स्व-तंत्र’ व्यक्तिमत्त्वांची ‘मिली-जुली’ सत्ता तयार होत आहे आणि हे कुटुंबाच्या लोकशाहीकरणासाठी उपयुक्तच आहे.

मात्र व्यक्ती घरात व कुटुंबात जो वेळ व्यतीत करते तेव्हा ती नक्की काय करते हे कुटुंबातील इतरांना कळेनासे झाले आहे. व्यक्तीचे खासगी जीवन आणि तिचे कौटुंबिक खासगी जीवन या आता दोन भिन्न वास्तवता आहेत. त्यामुळे परस्पर विश्वासाची जागा अविश्वासाने घेतली आहे. कुटुंबातील व्यक्ती परस्परांचे चारित्र्य-परीक्षण आता समाजमाध्यमांच्या सहाय्याने करत आहेत. कुटुंबाची एकात्मता आणि अखंडता कशी राखायची हा चिंतेचा विषय बनत आहे.

ऑल्विन टॉफ्लर यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भांतून हे दाखवून दिले आहे की, सामाजिक संवादांचे आकृतीबंध हे अनेक कारणांमुळे बदलत गेले आहेत. उदाहरणार्थ : स्त्रियांचे समाजातील स्थान व स्वातंत्र्य, समाजाची मूल्यव्यवस्था, युद्धे – पूर- दुष्काळ अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे ओढवलेले लोकसंख्येतील चढ-उतार, वेळोवेळी झालेले धार्मिक परिवर्तने, पर्यावरणीय बदल इत्यादी. या व अशा अनेक कारणांनी  कुटुंबाचे ढाचेही बदलत गेले आहेत. मात्र टॉफलर असेही दाखवून देतात की, हे बदल निश्चित करण्यात ‘कामाचे स्वरूप/आकृतीबंध’ हा घटक सर्वांत प्रभावी राहिला आहे. म्हणजे एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब हा आपला प्रवास,  कृषीप्रधान सभ्यतेकडून उद्योगप्रधान सभ्यतेकडे आपला समाज संक्रमित झाला त्याचा परिपाक आहे. आजही कृषिप्रधान व उद्योगप्रधान या दोहोंना समाजमान्यता आहे. पण पहिला लोप पावत आहे आणि दुसरा  कसाबसा टिकून आहे.

हा मुद्दा नीट लक्षात यावा यासाठी,  कामाच्या ठिकाणांचा व कामाच्या स्वरूपाचा इतिहासक्रम दाखवणारे F हे आद्याक्षर असलेले शब्द पाहूया- Forest, Farm, Fishery, Forces, Field, Factory, Fleet, Facility, Flat, Freelancing Portals. म्हणजे जंगल, शेत / शिवार, मासेमारी, सैन्य, युद्धक्षेत्र ,  खाणक्षेत्र , कार्यक्षेत्र, कारखाने, व्यापारी किंवा व्यावसायिक वाहनांचे तांडे, कार्यालये, इस्पितळे, संशोधनसंस्था, उपहारगृहे, शाळा, दुकाने, विमानतळ, बँका, इ. नानाविध सेवा क्षेत्रातील कामाच्या जागा (facilities) आणि घर (flat) वा घरबसल्या कमाई  करण्यासाठी ऑनलाईन फ्रीलान्सिंग पोर्टल्स.

या कामांच्या जागा व त्यांचे स्वरूप यातील संक्रमणानुसार , कुटुंबाचे केवळ ढाचेच बदलले असे नाही तर कौटुंबिक सहजीवनाचे स्वरूपही बदलले. वस्तुतः को-लिव्हिंग हा सहजीवनाचा पाया नसून , को-वर्किंग किंवा को-क्रिएटिंग हा पाया आहे. म्हणजे को-वर्किंग या साध्याचे को-लिव्हिंग हे साधन आहे.

याचाच अर्थ, सहवास किंवा सहअस्तित्व यातून मानसिक गरजांची परिपूर्ती करणारी व्यवस्था म्हणजे कुटुंब ही संकल्पना फार काळ टिकू शकत नाही. बाह्यत: जरी अशी कुटुंबे टिकून असल्याचे दिसले तरी त्यातील सहजीवन शुष्क, निरस आणि निर्जीव होत जाते. मग नात्यांमध्ये रसरशीतपणाचा अभाव आणि वाढत जाणारा थंडपणा हाच त्या कुटुंबांचा स्थायीभाव बनतो. म्हणजे केवळ सहवास, साथसंगत, मानसिक आधार, केअरिंग-शेअरिंग, प्रेम, प्रणयरम्यता, लैंगिक समागम, संततीप्राप्ती यावर आधारलेले (भावनिक एकक – इमोशनल युनिट म्हणून उभे राहिलेले) कुटुंब  दीर्घकालीन सुखी सहजीवनाची हमी देऊ शकत नाही. कारण या सर्व भावनिक आशयांसह त्या कुटुंबात सहनिर्मिती करणाऱ्या लोकांचे आर्थिक एककही (इकॉनॉमिक युनिटही) असावे लागते.

ही ताटातूट कधी झाली? डिजिटल युगापूर्वी अस्तित्वात आलेल्या उद्योगप्रधान समाजात ती झाली. त्यावेळी काम शेतावरून कारखान्यात व कार्यालयात हलले आणि कुटुंबाचे को-वर्किंग थांबले. आणि मग हळूहळू ताण-तणाव वाढायला सुरुवात झाली, त्याचीच परिणती घटस्फोटांचे प्रमाण वाढण्यात होऊ लागली. हा बदल समजून घेतला तर या लेखाच्या पूर्वार्धात वर्णन केल्याप्रमाणे डिजिटल युगात कौटुंबिक सहजीवन का भंग पावत आहे हे लक्षात येईल.

आजही कृषक समाज हा को-वर्किंगच्या भक्कम पायावर उभा आहे, पण त्यात कामावरील भर केंद्रस्थानी आहे. त्यामुळे त्यातील व्यक्तींना विशेषत: स्त्रियांना मानसिक आधार, संवेदनशीलता व स्वातंत्र्य अभावानेच मिळाले. परिणामी, कृषक समाजातल्या नातेसंबंधांमध्ये परस्परप्रेमाचा अंश कमी राहिला. आणि उद्योगप्रधान व सेवाप्रधान समाजात को-वर्किंग शक्य नसल्याने, त्यांच्यातील नातेसंबंध व सहजीवन खुरटणार हे उघड होते. कारण कारखाना किंवा कार्यालय घरात आणता येत नव्हते, त्यामुळे पती-पत्नी जणू दोन भिन्न ग्रहांवर राहत होते!

त्यांची कामे, त्यांचे भावविश्व, विचारविश्व पूर्णपणे भिन्न होऊ लागले. त्यातही पैसे मिळवण्याची मक्तेदारी पुरुषांची झाली, मग घरकामाला औपचारिक कामाचा दर्जा मिळाला, प्रतिष्ठा नाही मिळाली. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त होऊ लागले. स्वातंत्र्य आणि विकासाच्या संधींचा अभाव निर्माण होऊ लागला. स्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याची आज सर्वदूर आढळणारी विकृत मनोवृत्ती वाढू लागली. त्यांना इक्वल पार्टनरचे स्थान द्यायला सर्वत्र नकार मिळू लागला.

पण आता हळूहळू कारखान्यातील माणसांचे काम रोबोंकडे हस्तांतरित होत जाईल, मग माणसे सेवा क्षेत्रातील कामांकडे अधिकाधिक वळू लागतील. म्हणजे डिजिटल युगात माहिती व ज्ञानप्रधान व्यवस्थेमधील काम, तसेच कल्पकता व नवोन्मेषप्रधान व्यवस्थेमधील सेवाक्षेत्र वाढीस लागेल. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना  अधिकाधिक काम शहरापासून दूरवरच्या व प्रदूषणमुक्त वस्तीतील घरातून करणे शक्य होणार आहे. या शक्यता संगणक, इंटरनेट, 3D प्रिंटींग, यांच्या सहाय्याने विस्तारणार आहेत. सेवाक्षेत्रातील या ऑनलाईन फ्रीलान्सिंग स्वरूपाच्या कामाच्या जोडीनेच हीच माणसे घरालगतच्या शेतातही काम करू शकतील. मग  Decent and dignified work in low carbon world असे नव्या कामाचे स्वरूप तयार होत जाईल. कदाचित एका ‘ग्रीनएजर’ समाजाची ही सुरुवात असेल. त्यामुळे स्त्रियांनाही औपचारिक क्षेत्रातील ( बौद्धिक स्वरूपाच्या उत्पादक व  सर्जनशील ) कामाच्या समान संधी घरबसल्या मिळू शकतील.

मग पुरुषांना असे काम स्त्रियांबरोबर परस्पर सहकार्याने करण्यासाठी नव्या संहिता शोधाव्या लागतील. सहवासाचा उपयोग करून एकमेकांच्या कामात ती दोघे सर्जनशील सहभाग घेऊ शकतील. त्यांची मुलेही त्यात काही प्रमाणात सहभागी होतील. आज लिव्हिंग आणि वर्किंग भिन्न जागी असल्यामुळे मुलांना औपचारिक काम काय असते, याचा आज अजिबात नसलेला परिचय नव्या स्वरूपामुळे घरीच होईल, अर्थातच पुढे त्यांचा  बेकारीपासून बचाव करता येईल. यामुळे मोठी माणसे परस्परात अधिकाधिक गुंतागुंतीच्या बौद्धिक देवाण-घेवाणीत रमू शकतील, त्यातून परस्परांविषयीची संवेदनशीलता वाढेल, भावनिक जवळीकही वाढेल. घरात व्यतीत होणाऱ्या परस्परांच्या वेळेची पारदर्शकता वाढेल, विश्वासाचे वातावरण तयार होईल. सहनिर्मितीत रममाण झाल्यामुळे त्यांची सुख-दु:खे एकरूप होतील, म्हणजेच ते समसुखी आणि समदु:खी होतील. मग जीवनातील अर्थपूर्णतेचा त्यांना सातत्याने प्रत्यय येईल. म्हणजे आता सहजीवनाला तडा देत असणारे डिजिटल तंत्रज्ञान, नव्या सहजीवनात सहनिर्मितीचा आनंद देईल, समाधान निर्माण करण्याचे साधन बनेल.

ज्या कुटुंबांना हे जमणार नाही, त्यांना सुखी सहजीवनासाठी सहनिर्मितीचे इतर आयाम शोधावे लागतील. म्हणजे सहजीवनातील विसंवाद हे ‘को-वर्किंग विरहित को-लिव्हिंग’ मुळे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना स्वत:मध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी घराघरातील स्त्री-पुरुषांमधील कामाची नव्याने विभागणी करावी लागेल. आणि मग स्त्रियांना केवळ शारीरिक व मानसिक गरजा भागवणारे यंत्र म्हणून न वागवता, भावनिक व बौद्धिक भागीदार अशी प्रतिष्ठा द्यावी लागेल.

सारांश- सहवास, सहप्रवास, सहभाव, सहअध्ययन, सहविचार, सहकार्य, सहनिर्मिती, सहअनुभव, सहअनुभूती, सहआनंद, समप्रतिष्ठा यातून फुलते तेच खरे सहजीवन;  सह्य जीवन, सुसह्य जीवन,

सही जीवन !

 

 

[email protected]

(डिजिटल तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या  ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ (MKCL) या संस्थेचे विवेक सावंत हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Previous articleचार्ली चॅप्लीनचे लेकीस पत्र
Next articleचंद्रावर स्वारी ,गंमतच भारी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.