विजय चोरमारे
माणसाला हरण्यासाठी नाही बनवलेलं. माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो, पराभूत नाही होऊ शकत….
हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड सी’ कादंबरीतलंच हे वाक्य.
शरद पवारही कधी हरत नाहीत. लढतात. यश मिळत नाही अनेकदा, परंतु अपयश म्हणजे पराभव नव्हे, हे त्यांना कळतं. प्रत्येक पराभवातून उसळी घेऊन ते नव्या मांडणीसाठी सज्ज होतात.
शरद पवारांना उदध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले. देशाच्या राजकारणातील सर्वात अविश्वासार्ह माणूस म्हणून हिणवण्यापासून ते दाऊदशी संबंध असल्यापर्यंत अनेक विशेषणांनी, आरोपांनी पवारांना राजकारणातूनच नव्हे तर व्यक्तिगत आयुष्यातून उदध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले. परंतु जेव्हा जेव्हा निकराची वेळ आली तेव्हा पवार थेट रस्त्यावर, माणसांमध्ये उतरले. कारण लोक हीच त्यांची ताकद होती आणि आहे. गोपीनाथ मुंडे यांनी थेट दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांची राळ उडवून दिली, तेव्हा १९९५च्या पराभवानंतर पवारांनी लाखांच्या मोर्चासमोर, ‘एकही आरोप सिद्ध झाला तर हुतात्मा चौकात फाशी द्या’, असं आव्हान दिलं होतं.
गोष्ट ज्या मुद्यापासून सुरू झाली होती, संपवताना समारोपाकडं नेताना त्याच मुद्यापाशी घेऊन येणं हे नैसर्गिक न्यायाला धरून होईल. ही त्या गोष्टीची गरज असेलच असं नाही, परंतु ज्यांची ती गोष्ट आहे त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. मग तो अर्नेस्ट हेमिंग्वेचा म्हातारा -सँटियागो असो नाहीतर महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राच्या मुद्यांवर आणण्यासाठी एकहाती लढणारा दुसरा म्हातारा – शरद पवार असोत !
साधारण सव्वा महिन्यापूर्वी ही गोष्ट सुरू झाली होती. `ओल्ड मॅन इन वॉर : शरद पवार’ या शीर्षकानं सुरू झालेल्या या गोष्टीतल्या नायकाची लढाई पुढं महिनाभर महाराष्ट्रानं अनुभवली! हजारोंनी ती कानात आणि डोळ्यात साठवली. पुढच्या पिढ्यांना सांगण्यासाठी आपल्या आयुष्यात काहीतरी रोमहर्षक गवसल्याची अनेकांची भावना झाली.
`मुक्काम पोस्ट ढेबेवाडी` नावाचा एक नितांतसुंदर चित्रपट मराठीत येऊन गेलाय. ब्लॅक-व्हाइटच्या जमान्यातल्या या चित्रपटात चंद्रकांत मांडरे, निळू फुले, उषा चव्हाण वगैरे कलावंत मंडळी होती. मधुकर पाठक यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा लिहिला होता व्यंकटेश माडगूळकर यांनी. या सिनेमाच्या मूळ कथेचं शीर्षक होतं, `देवाच्या काठीला आवाज नसतो`. नंतर ते नाव बदलून `मुक्काम पोस्ट ढेबेवाडी` असं करण्यात आलं. महाराष्ट्र विधानसभेच्या ताज्या निवडणुकीच्या निमित्तानं याची आठवण होण्याचं कारण म्हणजे या निवडणुकीची पटकथा आपणच लिहिली-दिग्दर्शित केली आहे, अशा भ्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नरेंद्र मोदींनी स्टोरी आयडिया दिली, अमित शहा यांनी त्याचा विस्तार केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं. सगळं आपल्या या कथेबरहुकूम घडणार असा त्यांना विश्वासच नव्हे, तर शंभर टक्के खात्री होती. म्हणूनच ते `मी परत येईन, मी परत येईन…` असं ओरडून ओरडून सांगत होते. आत्मविश्वास असतो तेव्हा आपलं म्हणणं ठसवण्यासाठी ओरडावं लागत नाही. किमान पातळीमध्ये सांगितलं तरी त्याचा परिणाम होतो. परंतु आत्मविश्वास अहंकाराकडं जातो तेव्हा तारतम्य सुटतं. तसंच काहीसं घडलं. आपण लिहिलीय तशीच कथा पुढं चालल्याची त्यांना शंभर टक्के खात्री होती आणि मतदान झाल्यानंतर लगोलग आलेल्या एक्झिट पोलनी तर त्यांची पुष्टीही केली. परंतु देवाच्या काठीला आवाज नसतो, तसाच लोकांच्या भावनांनाही आवाज नसतो. व्यासपीठावरून लंबीचौडी भाषणं देणाऱ्या नेत्यांना वाटत असतं आपण बोलतोय त्याच लोकांच्या भावना आहेत. किंबहुना आपण व्यक्त करतोय त्यापलीकडं लोकांच्या काही वेगळ्या भावना असूच शकत नाहीत, असाही भ्रम असतो. आणि तो भ्रमच होता. मोदींनी आखून दिलेली, शहांनी कथन केलेली आणि फडणवीसांनी लेखन-दिग्दर्शन केलेली पटकथा पुढं सुरू आहे, असं वरवरचं चित्र दिसत असतानाच समांतरपणे दुसरं एक कथानक आकाराला येत होतं. चांगदेव पाटलाच्या कथानकात नामदेव भोळेचं कथानक सुरू झाल्यासारखं.
हे दुसरं कथानक चाऊन चोथा झालेलं आहे, जुन्या बाटलीत जुनीच दारू आहे त्यामुळं ते शंभर टक्के फ्लॉप होणार याबद्दल समोरच्यांच्या मनात अजिबात शंका नव्हती. आपल्या गोष्टीत जसा थरार आहे, वीररस आहे, बंदुकीच्या फैरी आहेत, शत्रूसैन्यावरचे बाँबहल्ले आहेत तसा मसाला त्यांच्याकडच्या कथानकात अजिबात नाही. ती कोण ऐकणार आणि कोण पाहणार? परंतु बेतीव गोष्टीपेक्षा काळजातून आलेली गोष्ट काळजाला भिडते, याची त्यांना कल्पना नसावी. म्हातारा मूळचाच गोष्टीवेल्हाळ. उमेदीच्या काळातल्या गोष्टींचा खजिना त्याच्याकडं होता. परंतु म्हातारा त्यात रमला नाही. तो भूतकाळात गेलाच नाही. तो वर्तमानकाळाबद्दल बोलत राहिला. समोर दिसणारं शेतकऱ्यांचं दैन्य सांगू लागला. कारखाने बंद पडून नोकरी गेल्यामुळं उपासमारीची वेळ आलेल्या माणसांबद्दल बोलू लागला. अवतीभवतीच्या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल बोलू लागला. सगळं नेहमीचंच असलं तरी त्याची तीव्रता लोकांपर्यंत पोहोचत होती. आपल्या वेदनांना कुणीतरी जाहीरपणे वाचा फोडतंय याची जाणीव हळुहळू लोकांना होऊ लागली होती. सैनिकांच्या शौर्याचा राजकीय वापर करून मारलेल्या बढाया आणि काश्मीरमधल्या निर्णयाचं भांडवल करून मिरवला जाणारा अहंकारही लोक पाहात होते. लोक आपल्या शौर्यकथांवर फिदा आहेत असा त्यांचा भ्रम होता. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी होती.
दिल्ली आणि काश्मीरच्या बढायांपेक्षा म्हातारा सांगत असलेल्या आपल्या घरातल्या, अवतीभवतीच्या गोष्टी लोकांच्या मनाचा ठाव घेत होत्या. म्हाताऱ्याला बोलताना त्रास व्हायचा. उच्चारांची गडबड व्हायची. अनेक शब्द कळायचे नाहीत. पण माणूस काळजातून बोलतो तेव्हा शब्द दुय्यम ठरतात. ऐकणारानंही कानांचे प्राण केलेले असतात त्यामुळं म्हाताऱ्याच्या भावना लोकांपर्यंत नीटपणे पोहोचत होत्या, थेटपणे भिडत होत्या. लोक मन लावून ऐकताहेत असं वरवर तरी दिसत होतं. एकदा तर म्हाताऱ्याची गोष्ट रंगात आली असताना धो धो पाऊस कोसळायला लागला. त्या पावसात म्हातारा आणि म्हाताऱ्याची गोष्ट दोन्ही वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. पण वादळात दिवा लावण्याची धमक असलेला म्हातारा जराही विचलित झाला नाही. एवढे उन्हाळे-पावसाळे अनुभवल्यामुळं त्याला माहीत होतं की अर्ध्या गोष्टीतून लोक उठत नाहीत. त्यानं गोष्ट सुरूच ठेवली. ऐकणारे गोष्टीत एवढे तल्लीन झालेले, की धो धो पावसाचं अस्तित्वही जाणवलं नाही. हळुहळू पावसाच्या आणि ढगांच्या आवाजात शब्दही ऐकू येईनात. तेव्हा पावसात भिजणारा म्हातारा आणि त्याचे हलणारे ओठ एवढंच लोकांना दिसत होतं. हजारो डोळे पावसाच्या पार्श्वसंगीतामध्ये ते चित्र डोळ्यात साठवून घेत होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासातलं ते एक सर्वांगसुंदर चित्र होतं. ते दृश्य महाराष्ट्राच्या मन:पटलावर कोरलं गेलं.
हेमिंग्वेचा म्हातारा सँटियागो समुद्रात महाकाय शार्क माशाशी झुंजला होता. या शरद पवार नावाच्या म्हाताऱ्यानं भर पावसात दिवा लावला आणि अवतीभवतीचा आसमंत उजळून टाकला. म्हाताऱ्याचं धैर्य पाहून तरणी पोरं चाट पडली. त्यांनी आधी जे काही म्हाताऱ्याबद्दल ऐकलं होतं ते सगळंच विपरित होतं. म्हातारा म्हणजे भ्रष्टाचाराचा पर्यायी शब्द असं त्यांच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. चंद्रावरच्या जमीन खरेदीचा विषय निघतो तेव्हा या म्हाताऱ्यानं तिकडं आधीच प्लॉट घेऊन टाकल्याचे व्हाट्सअपवर मेसेज त्यांनी वाचलेले होते. मुंबई-पुण्यात मोठी बिल्डिंग उभी राहू लागली तरी त्याच्याशी शरद पवार हे नाव जोडलं जातं. गेली काही वर्षे पद्धतशीरपणे हे सुरू आहे. ईडीची बातमी आल्यावर अनेकांना वाटलं की आता पापाचा घडा भरला. पण घडलं भलतंच. ईडीच्या नावानं सगळे चळाचळा कापत असताना पवारांनी ईडीलाच चॅलेंज केलं आणि ईडीची पळता भुई थोडी झाली. दिल्लीच्या तख्तापुढं महाराष्ट्र झुकणार नाही, या निर्धारानं अनेकांची मनं जिंकली. पक्षाचं नाव स्वाभिमान ठेवणारे आणि स्वाभिमानाच्या गप्पा मारत सत्तेची मलई चाखणारे पाहण्यात असल्यामुळं अलीकडं स्वाभिमान हा शब्दच बदनाम झाला होता, त्याला शरद पवारांनी त्याचा मूळ अर्थ पुन्हा मिळवून दिला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्षे सातत्यानं हल्ले करून घायाळ केल्यानंतर अंतिम घाव घालून महाराष्ट्राच्या राजकारणातलं शरद पवार यांचं नामोनिशाण मिटवून टाकायचं, असा निर्धारच जणू मोदी-शहा जोडगोळीनं या निवडणुकीत केला होता. त्यांना माहीत होतं, की म्हातारा आहे तोपर्यंत महाराष्ट्रावर पकड मिळवता येणं कठीण आहे. परंतु त्यांचे मनसुबे न ओळखता येण्याइतपत पवार दुधखुळे नव्हते. त्यानं त्यांचे सगळे डाव उधळून लावले. तरुणांचं मानस बदलत होतं. ऐकलेला म्हातारा आणि समोर दिसणारा म्हातारा यातला जमीन अस्मानाचा फरक त्यांच्या लक्षात येऊ लागला. आपल्या चुकांची जाणीव होऊन महाराष्ट्रभरातली पोरं सैराट पळायला लागली. आपण पवार साहेबांना ओळखायला कमी पडलो याची जाणीव त्यांना होऊ लागली. आणि `आवाज कुणाचा आवाज जनतेचा दाही दिशांतून घुमला…` हे गाणं म्हणत लाखो तरुण पोरं कामाला लागली. ऐनवेळी दगा देऊन सत्तेच्या सावलीत गेलेल्या लोकांना घरी पाठवण्यासाठी तीस वर्षांपूर्वीचा काळ आठवत म्हातारा जोमानं कामाला लागला. गेल्या काही वर्षांतल्या लढाईत आणि आताच्या लढाईत एक मूलभूत फरक होता. आधी मोठेमोठे सहकारी सोबत होते. पण तरुण कार्यकर्त्यांची वानवा होती. आता अनेक जिवाभावाचे सहकारी सोडून गेले असताना, महाराष्ट्रातले तरूण पुढं सरसावले होते. या तरुणांच्या बळावर म्हाताऱ्यानं एक अवघड लढाई लढली. ही लढाई सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. सत्तेच्या अहंकाराला आव्हान देणारी होती. सत्तेचा अहंकार ठेचण्याचं काम शरद पवार नावाच्या म्हाताऱ्यानं केलं.
हेमिंग्वेचा म्हातारा अठरा फूट लांबीच्या माशाचा सांगाडा किनाऱ्यावर सोडून आपल्या झोपडीत येऊन झोपून जातो. हा म्हातारा थोडा वेगळा आहे. मोहीम संपल्यावर तो दमून भागून झोपी गेला नाही. कारण तो झोपेत स्वप्नं पाहात नाही. तो जागेपणी स्वप्नं पाहतो. ती साकार करण्यासाठी कामाला लागतो. अनेकांना कामाला लावतो. दिवाळीतल्या चार दिवसांच्या गाठीभेटींनंतर तो पुन्हा कामाला लागेल. इथं पुन्हा हेमिंग्वेच्या म्हाताऱ्याचं वर्णन आठवतं, जे शरद पवारांनाही तंतोतंत लागू होतं –
‘….त्याच्या डोळ्याखेरीज त्याचं सारं काही जीर्ण होतं. पण डोळे मात्र समुद्राइतके निळे होते. हसरे होते आणि त्यांनी कधी हार खाल्ली नव्हती…’
(लेखक महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक आहेत.)