राष्ट्रीय संघाबाबत नवे पुस्तक -‘द आरएसएस : अ व्ह्यू टु द इनसाइड’
-साभार:लोकसत्ता
-देवेंद्र गावंडे
विद्यापीठीय, अभ्यासकी शैलीत लिहिलेले हे पुस्तक संघ चांगला की वाईट, हे सांगत नाही. वाचून तुम्ही काय ते ठरवा, असे अप्रत्यक्षपणे सुचवते. मात्र २०१४ नंतर संघ कसा बदलतो आहे आणि या बदलाच्या प्रक्रियेत गोंधळाचे प्रसंग येऊनसुद्धा ते कसे हाताळले गेले, याची माहिती पुस्तकातून नक्कीच मिळते..
शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेकांच्या मनात आजही कुतूहल आहे. रा. स्व. संघाची आजवरची वाटचाल बघितली, तर संघ प्रसारमाध्यमांसमोर फारसा आलेला नाही असे दिसेल. संघालाच ते आवडत नाही, अशी चर्चा त्यामुळे होत राहिली. परिणामी कधी तथ्यावर आधारित, तर कधी तथ्यहीन अशा चर्चा संघाच्या बाबतीत कायम होत राहिल्या. भारतात संघाच्या कार्याचे गुणगान करणारी तसेच संघावर कठोर टीका करणारी बरीच पुस्तके लिहिली गेली. मात्र संघाच्या कार्याचा तटस्थपणे आढावा घेण्याचे काम फारसे झालेले नाही. याला जबाबदार कोण, या प्रश्नाच्या उत्तरात शिरण्यापेक्षा ‘पेंग्विन’ने नुकतेच प्रकाशित केलेले ‘द आरएसएस : अ व्ह्य़ू टु द इनसाइड’ हे पुस्तक वाचले तरी या संघटनेविषयीचे बरेच कुतूहल शमवता येते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात प्राध्यापक असलेले वाल्टर अॅण्डरसन आणि मुक्त पत्रकार तसेच भारताचे अभ्यासक म्हणून अमेरिकेत कार्यरत असलेले श्रीधर दामले यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या या पुस्तकात संघाची संरचना नेमकी कशी आहे, संघाचे काम कसे चालते, याविषयी विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. या पुस्तकाची शैली विद्यापीठीय पठडीतील आहे; त्यामुळे वाचताना ते कदाचित रंजक वाटणार नाही. मात्र संघाच्या भूमिकेवर कोणतेही थेट भाष्य न करता या संघटनेच्या कामकाज पद्धतीचा आढावा यात अगदी तटस्थपणे घेण्यात लेखकद्वय कमालीचे यशस्वी ठरले आहेत.
गंमत म्हणजे, याच दोघांनी ३० वर्षांपूर्वी संघावर पुस्तक लिहिले होते. त्यानंतर पुन्हा आता का लिहावेसे वाटले, याची कारणमीमांसा करताना लेखकांनी नव्या राजवटीचा संदर्भ दिला आहे. त्यामुळे हे पुस्तक २०१४ नंतरचा संघ याभोवती फिरत राहते. सोबतच संघाचा इतिहास, आधी घेतलेल्या भूमिका, आता बदललेल्या भूमिका याचाही आढावा घेते. २०१४ ला देशात मोदींची राजवट सुरू झाल्यावर अनेकांना संघामध्ये रुची निर्माण झाली. याचे कारण संघ याच काळात प्रसारमाध्यमांसमोर ठळकपणे दिसायला आणि व्यक्त व्हायला लागला. आधी साधी प्रतिक्रियासुद्धा न देणारा संघ अचानक माध्यमस्नेही होण्याकडे वाटचाल करू लागला. यामुळे संघ नक्की काय आहे, याविषयी अनेकांची उत्सुकता आणखी चाळवली. त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक संघाची कार्यपद्धती, त्याचे हेतू, मनसुबे व ते प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी आखलेल्या योजना यांविषयीचे सर्वसमावेशक चित्र उभे करते. मात्र, हे करताना लेखकांनी संघाचे कुठेही उदात्तीकरण होणार नाही, याची काळजी घेतल्याचे सतत जाणवत राहते. संघ चांगला की वाईट, हे पुस्तक सांगत नाही. वाचून तुम्ही काय ते ठरवा, असे अप्रत्यक्षपणे सुचवते.
खास अमेरिकी शैलीत संघाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकाची सुरुवातच २०१४ च्या निवडणुकीपासून होते. मोदींना पंतप्रधान करायचे ठरल्यावर त्यांच्या प्रचाराची आखणी आणि त्याची अंमलबजावणी यात संघाचा सहभाग नेमका कसा होता, हे यात तपशीलवार मांडले आहे. एकीकडे हे पुस्तक संघाचा नागपूर ते दिल्ली हा प्रवास कसा घडला ते सांगतेच; तर दुसरीकडे संघाने हिंदू राष्ट्राचे बघितलेले स्वप्न, त्यादृष्टीने तयार करण्यात आलेले ‘व्हिजन’, ते साध्य करताना येत असलेल्या अडचणी, त्यावर मात करताना काही ठिकाणी कशी माघार घ्यावी लागली, याचाही प्रवास उलगडून दाखवते. हिंदुत्व हा संघाचा श्वास. मात्र त्याची मांडणी करताना संघ बाल्य, तारुण्य व प्रौढावस्थेत कसा बदलत गेला, संघाची भूमिका कशी परस्परविरोधी होत गेली, हे या पुस्तकात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे. मुळात संघाच्या हिंदुत्वाची सुरुवात सावरकरांपासून झाली. मात्र हिंदुत्वाच्या सावरकरी मांडणी स्वीकारण्यात अडचणी आहेत, हे लक्षात आल्यावर संघाप्रणीत हिंदूुत्वाची व्याख्या हळूहळू बदलत गेली. ‘ज्यांची पुण्यभूमी व पितृभूमी भारत तो हिंदू’ ही सावरकरांची व्याख्या मान्य करायला गेले तर या देशात राहणाऱ्या इतरांचे, विशेषत: मुस्लिमांचे काय करायचे? या आणि अशा प्रश्नांमुळे संघाची हिंदुत्वाची व्याख्या उत्क्रांत होत गेली. मग ‘सारेच मूळचे हिंदू’ अशी भाषा सुरू झाली. केवळ ही व्याख्या वापरून हा विचार पुढे नेता येणारा नाही, तर त्यासाठी जमिनीवर प्रयत्न व्हायला हवेत, हे लक्षात घेऊन एकीकडे विश्व हिंदू परिषद तर दुसरीकडे राष्ट्रीय मुस्लीम मंच अशा – प्रसंगी परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या – संघटना तयार झाल्या. त्याआधी हिंदुत्व अथवा हिंदुराष्ट्राची संकल्पना पुढे न्यायची असेल तर जातिव्यवस्था तोडावी लागेल, असे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांना वाटायचे. त्या दृष्टीने संघाने कसा प्रयत्न केला, याचे रोचक वर्णन या पुस्तकात आहे.
‘तरीही भूमिकेवर ठाम’!
मुस्लीम मंचच्या माध्यमातून मुस्लिमांना, तर विहिंपच्या माध्यमातून हिंदूंना संघाचे उद्दिष्ट सांगताना अनेकदा संघाचा घोळ होतो. संघ परिवारातील वेगवेगळे लोक त्यांच्या आकलनानुसार यावर अनेकदा परस्परविरोधी वक्तव्ये करत असतात. ते निस्तरताना किंवा सावरताना संघाची धांदल उडते. त्यावरून संघात एकवाक्यता नाही असे चित्र कसे समोर जाते, याचा वेधक आढावा हे पुस्तक घेतेच; शिवाय सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत संघाला त्यांच्या संकल्पना मांडताना अनेकदा स्पष्ट व नि:संदिग्ध कसे बोलता येत नाही, माघार कशी घ्यावी लागते, तरीसुद्धा संघ स्वसंकल्पनेपासून तसूभरही कसा ढळत नाही, हेसुद्धा लेखकद्वय यात तपशीलवार स्पष्ट करून सांगतात. २०१४ ला भाजपला सत्ता मिळताच संघाने ‘घरवापसी’ मोहीम सुरू केली. खरे तर ती संघाने आधीच आखलेली होती, पण सत्ता मिळाल्यावर जोश आला व ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू झाले. त्यात संघ परिवारातील लोक वाटेल तसे बोलले व वागले. त्यामुळे अख्खी मोहीमच कशी अडचणीत आली हे या पुस्तकात तपशीलवार नमूद आहे. शिक्षण व इतिहास हे संघाचे आवडीचे विषय. देशातील शिक्षण भारतीय गाभ्याचे असावे, असा संघाचा कायम आग्रह राहिला आहे. ‘काँग्रेसच्या राजवटीत शिक्षणात हा गाभा नव्हता. तेव्हा डाव्यांनी इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून मुस्लीम राजवटीत हिंदू व मुस्लिमांमध्ये सौख्य होते अशी मांडणी जाणीवपूर्वक केली. याच डाव्यांनी इतिहास मांडताना वर्ग व अर्थव्यवस्थेवर भर दिला. संघाला मात्र संस्कृती व सभ्यता हवी आहे. त्यासाठी सत्ता मिळण्याच्या आधीपासून संघात नव्याने इतिहास मांडण्यासाठी हालचाली सुरू होत्या. हा प्रकल्प पूर्णत्वाला जावा म्हणून अखिल भारतीय इतिहास संकलन योजना परिवारात सुरू करण्यात आली. त्यातून पुढे आलेल्या बत्रांची काही पुस्तके भाजपशासित राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात लावण्यात आली. केंद्रात सत्ता आल्यावर हा नवा इतिहास अधिकृत स्वरूपात लोकांपर्यंत जावा यासाठी संघाने खूप प्रयत्न केले. त्यावरून मोठा गदारोळ उठला..’ अशा प्रकारे घटनाक्रम मांडतानाच, ‘तरीही संघ या भूमिकेवर ठाम राहिला’ तसेच विद्याभारती व एकल विद्यालयाचा विस्तार करून त्या माध्यमातून हा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाने कसे प्रयत्न केले, याचे वर्णन या पुस्तकात आहे.
अनेक संघटनांचा उपयोग
अभाविप ही रा. स्व. संघ परिवारातील प्रमुख संघटना. २०१६ ला अफजल गुरूला फाशी देण्याच्या मुद्दय़ावरून दिल्लीतील जेएनयूमध्ये वातावरण तापले व अचानक राष्ट्रवादाचा मुद्दा समोर आला. हा मुद्दा केवळ संघाचा अजेंडाच पुढे नेणारा नाही तर निवडणुकांमध्येसुद्धा फायदेशीर ठरणारा आहे हे लक्षात येताच संघाने अभाविपसाठी चर्चासत्रे घ्यायला सुरुवात केली. सोबतच जयपूर व नागपूरला दोन मोठे अभ्यासवर्ग घेण्यात आले. जेएनयूमधील उठलेले वादळ देशभर कसे नेता येईल, यावर यात सखोल विचारमंथन करण्यात आले. त्यानुसार मग देशभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. एकाच शहरात एकाच विषयावर वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून तीन ते चार कार्यक्रम आयोजित करण्याची कला संघाने कशी साध्य केली आहे; याचे रोचक विश्लेषण या पुस्तकात आहे.
‘द्वैत आणि अद्वैत’
केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीशी युती करण्याचा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला. हा युतीचा विचार सर्वप्रथम जेव्हा सरकारच्या मनात आला तेव्हा संघाने त्याला कडाडून विरोध केला. मग संघातील धुरिणांची समजूत काढण्याची जबाबदारी मोदींनी राम माधवांवर सोपवली. नाराजांची समजूत काढण्यात व हा निर्णय दूरदृष्टीने विचार केला तर कसा हिताचा आहे, हे समजावून सांगण्यात सरकारचा बराच वेळ गेला. अखेर संघ राजी झाला, हे सांगताना संघ व भाजपमधील नाते नेहमी कसे द्वैत व अद्वैताच्या पातळीवर जात असते याचे वर्णन लेखकांनी या पुस्तकात केले आहे. ‘केंद्रात सत्ता आल्यावर स्थापन करण्यात आलेला नीती आयोग एकाच रात्रीतून स्थापन झाला नाही, देशातील अनेक राज्यांत भाजपची राजवट सुरू असतानाच यावर विचार सुरू झाला होता’ अशी माहिती या पुस्तकातून मिळते. ‘मोदी राजवट सुरू झाल्यावर वाजपेयी-अडवाणींच्या काळात केलेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. सरकारवर जहरी टीका करायची नाही. ही राजवट दीर्घकाळ चालेल यासाठी समन्वयवादी भूमिका घ्यायची हे संघाने अगदी आरंभापासून ठरवले. त्यामुळे परिवारातील अनेक संस्थांनी सरकारवर टीका करूनही संघ समन्वयावर ठाम राहिला. यात खरी भूमिका बजावली ती अखिल भारतीय प्रचारक सभेने. हेच प्रचारक संघाचे कान, नाक, डोळे असतात. भाजपमध्येसुद्धा तेच जात असतात. त्यामुळे संघनेतृत्वाचा या प्रचारकांशी उत्तम समन्वय ठेवण्याचा प्रयोग यशस्वी ठरला’ – असे हे पुस्तक सांगते. याच कार्यकाळात गोव्यात संघाच्या व्यक्तीनेच बंड केले. ते संघाने अगदी कौशल्याने शमवले, पण त्यात वेलींगकरांची भूमिका योग्य होती. तेथील भाजप सरकारची भूमिका घोषणेपासून घूमजाव करणारी होती, असे या पुस्तकात नमूद आहे.
संघ स्वत:ला सांस्कृतिक संघटना समजतो. तरीही राजकीय पक्षाकडून गोष्टी कशा साध्य करून घ्यायच्या याचे तंत्र त्याने कसे आत्मसात करून घेतले आहे, हे यात अगदी तपशीलवारपणे सांगण्यात आले आहे. ‘मोदींच्या माध्यमातून राजकारण साध्य करून घेतानाच मागास प्रवर्गातील व्यक्तींना परिवारात मोठे स्थान दिले तरच हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार होईल याची पूर्ण कल्पना संघाला आली आहे’ असे हे पुस्तक सुचवते. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर संघाची भूमिका मांडताना अनिवासी भारतीयांचा वापर संघाने कसा करून घेतला, त्यासाठी मोदींची मदत कशी घेण्यात आली, भारताला जागतिक पातळीवर प्रभावी करण्यात संघाचे योगदान काय, याचेही सविस्तर विवेचन या पुस्तकात आहे. संघाचा देशभर विस्तार होण्यात वनवासी कल्याण आश्रमांचा मोठा वाटा राहिला आहे. आजही, संघाचे काम असलेल्या आदिवासी भागांतून भाजपचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून येतात. मात्र पुस्तकात यावर फारच त्रोटक माहिती आहे. शिवाय संघ जाती, धर्मात द्वेष पसरवतो, दंगली घडवून आणतो असे आरोप अनेकदा झाले आहेत. संघाच्या भूमिका याला अनेकदा कारणीभूत असतात. यावर या पुस्तकात भाष्य करण्याचे टाळण्यात आले आहे. एकूणच प्रात:स्मरणीय भूमिका बाजूला ठेवून तटस्थ दृष्टिकोनातून संघाची रचना व कार्य समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे असेच आहे.
(लेखक लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे संपादकीय प्रमुख आहेत)
9822467714
………………………………………………
पुस्तकाचे लेखक : वाल्टर अॅण्डरसन, श्रीधर दामले
प्रकाशक : पेंग्विन
पृष्ठे: ४००, किंमत : ६९९ रुपये