गांधी आणि आंबेडकर यांना एकत्र आणताना…

साभार:साप्ताहिक साधना

-रामचंद्र गुहा

आंबेडकर किंवा गांधी त्यांच्या आयुष्यात कधी चुकलेच नाहीत असे नाही. त्यांनी चुका केल्या, शत्रुत्व आणि पूर्वग्रहही ठेवले. म्हणून त्यांना यांत्रिकपणे उद्‌धृत करू नये, किंवा अंधपणे त्यांचे अनुसरणही करू नये. कारण ते ज्या जगात राहात होते त्याहून आपले जग पूर्णपणे वेगळे आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातील राजकीय आणि तंत्रज्ञानिक आव्हाने विसाव्या शतकाच्या मध्यातील दशकांहून खूपच वेगळी आहेत. तरीही नैतिक व सामाजिक आव्हाने स्थूल मानाने सारखीच राहिलेली आहेत. जात आणि लिंग यातील समानतेसाठीचा लढा संपलेला नाही. आंतरधर्मीय सरावासाठीची लढाई अत्यंत महत्त्वाची आणि निकडीची झाली आहे. त्यामुळे व्देषाने पछाडलेल्या हिंदुत्ववादी झुंडींना हरवायचे असेल, तर आवश्यकता आहे गांधी आणि आंबेडकर हे दोघेही एकाच बाजूला असण्याची!
……………………………………………………

इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी अमृता दत्त यांनी कन्नड लेखक (आणि कार्यकर्ता) देवनूर महादेव यांची मागील वर्षी एक मुलाखत घेतली. त्यामध्ये लोकशाहीवाद्यांना ते आग्रहाने सांगतात की, ‘आंबेडकर आणि गांधी यांना तुम्ही प्रतिस्पर्धी वा विरोधक म्हणून पाहू नका. खऱ्या समानतेच्या दिशेने प्रवास करणारे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.’

महादेव पुढे अशी टिप्पणी करतात की, ‘निद्राधीन दलितांना जागे करून पुढचा प्रवास आंबेडकरांना करावा लागला. त्याचप्रमाणे धर्माच्या आणि जातीच्या खोल दरीत बुडालेल्या हिंदूंना वर काढण्यासाठी, त्यांना सुधारण्यासाठी व त्यांच्यात बदल घडवण्यासाठी गांधींना प्रचंड प्रयत्न करावे लागले, जेणेकरून हे हिंदू एक पाऊल पुढे टाकतील. इथे असे दिसून येते की- आंबेडकर नसते तर कदाचित एवढा मोठा टप्पा गांधी पारच करू शकले नसते. त्याचप्रमाणे, जातीभेद असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये गांधींनी तयार केलेले उदारमतवादाचे आणि सहिष्णुतेचे वातावरण नसते, तर क्रूर सवर्ण समाजाने आंबेडकरांना इतके खपवून घेतले नसते.’

महादेव त्यापुढे म्हणाले, ‘भारत देश जाती-भेदातून मुक्त होण्यासाठी सवर्णांनी बदलण्याची गरज आहे, अशी आपली समजूत असेल तर गांधी गरजेचे आहेत. आणि दलितांच्या नागरी हक्कांसाठी आंबेडकर निखालस गरजेचे आहेत. म्हणून त्या दोघांना एकत्र आणले पाहिजे असे मी म्हणतो’.

महादेव पुढे असेही निरीक्षण नोंदवतात की, ‘गांधी अस्पृश्यतेला पाप म्हणतात, तर आंबेडकर अस्पृश्यतेला गुन्हा समजतात. तरी आपण त्यांच्याकडे एकमेकांचे विरोधक म्हणून का पाहतो आहोत? ते दोघेही आवश्यक आहेत, असे समजण्यातच शहाणपण आहे.’

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांमध्ये आंबेडकर आणि गांधी यांच्या छायाचित्रांचे फलक एकत्र झळकताना पाहून मला देवनूर महादेव यांचे वरील उद्‌गार आठवले. ही घटना अभूतपूर्व नसली तरी दुर्मिळ आहे. कारण गांधी आणि आंबेडकर निरनिराळ्या उत्सवात/समारंभात साजरे होणे हेच नेहमीचे चित्र आहे. आणि बहुतांश वेळा त्या दोघांना एकमेकांविरोधीच उभे केलेले दिसते.

पूर्वी गांधींचे प्रशंसकच या दोन महान भारतीयांना प्रतिस्पर्ध्यांच्या भूमिकेत पाहायचे. 1930-1940 च्या दरम्यान गांधी आणि त्यांच्या विचारांवर हल्ला करण्यासाठी आंबेडकरांनी वारंवार वादंग निर्माण करणारी भाषा वापरली. प्रिय बापूंवर केलेल्या टीकेला तोंड देऊ न शकणारे काँग्रेसजन तेव्हा संतापले आणि त्याला उत्तर देताना त्यांनी आंबेडकरांना ब्रिटिश शासनाचा याचक ठरवले. आणि 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळात आंबेडकरांनी व्हॉईसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये काम केल्याबद्दल त्यांचा धिक्कार केला गेला… आणि असे बरेच काही.

अलीकडील दशकांत मात्र आंबेडकरवाद्यांनी वारंवार गांधीवर टीका केलेली आहे. जातिव्यवस्थेतील सुधारणांसाठी गांधींचे प्रयत्न दुर्बल मनाने आणि निरुत्साही हृदयाने केलेले आहेत, असेच त्यांना वाटत आलेले आहे. गांधींनी आंबेडकरांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली, असा आरोपही त्यांनी केला (पुणे करारादरम्यान आणि त्यानंतरही). आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकत्र काम करताना गांधींचे वारसदार जवाहरलाल नेहरू यांनी आंबेडकरांचे कौशल्य आणि क्षमता पूर्णपणे वापरून घेतल्या नाहीत, अशी टीकाही केली.

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांतील दलित समाजातून आलेल्या बुध्दिवाद्यांनी गांधींवर केलेले हल्ले प्रखर आणि निर्दयी राहिलेले आहेत. कर्नाटकमधील तळाच्या घटकांतून आलेल्या लेखकांनी मात्र अधिक विशाल दृष्टी स्वीकारली. ‘गांधी आणि आंबेडकर हे एकमेकांना पूरक आहेत’, अशा पध्दतीने त्यांच्याकडे पाहिले जावे असे ‘द फ्लेमिंग फिट’ या पुस्तकात दिवंगत लेखक डी.आर. नागराज यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. म्हणजे जातिव्यवस्था अधोरेखित करण्याच्या आणि अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवण्याच्या कार्यामध्ये दलितांचा स्वतःचाही जोर लागला पाहिजे (जो आंबेडकरांनी पुरवला) आणि उच्चवर्णीयांतही सुधारणा घडल्या पाहिजेत (या सुधारणांचे प्रतिनिधित्व गांधींनी केले.)

त्या दोघांच्या कार्याविषयी माहिती असो वा नसो, जामियाच्या विद्यार्थ्यांनी आणि शाहीन बागमधील महिलांनी डी. आर. नागराज आणि देवनूर महादेव यांनी विशाल हृदयाने केलेल्या विश्लेषणाला भक्कम पुरावा सादर केला आहे.कर्नाटकच्या त्या दोन विचारवंतांप्रमाणेच हे दिल्लीचे धाडसी आंदोलक आग्रहाने आपल्याला सांगत आहेत की, ‘आंबेडकर आणि गांधी यांना विरोधक म्हणून उभे करू नका.’ किंबहुना त्यांना सहकाऱ्यांच्या रूपात पाहा, लोकशाही व बहुलतावादाच्या लढाईमध्ये त्यांच्या अनुयायांनी एकत्र यावे असेच ते सांगत आहेत.

शाहीनबागला भेट देऊन आल्यानंतर दिल्लीचे एक लेखक ओमर अहमद यांनी ट्वीटरवर लांबलचक आणि चित्तवेधक थ्रेड लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी अशी नोंद केली आहे की, तिथे गांधींपेक्षा आंबेडकरांचे फलक अधिक होते, याचे एक कारण- ‘स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्याचे आभार मानत बसणे इथपासून, ज्या नेत्याने स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याचे हक्क मिळवण्यासाठी साधने दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याइतपत लोक पुढे आलेले आहेत.’

हे वाचून मी ओमर अहमद यांना लिहिले, ‘मी तुमच्याशी सहमत आहे (आणि रिट्वीटही करत आहे) पण एका इशाऱ्यासह. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करण्याची वेळ आली तेव्हा अन्य कुठल्याही भारतीय नेत्याची (अगदी नेहरूंचीही) गांधींशी तुलना होऊ शकत नाही. अर्थात तो तपशिलाचा भाग आहे. पण सामान्यत: आंबेडकर आणि गांधींना एकमेकांचे विरोधक म्हणून उभे करण्यापेक्षा (जे पाहण्याची आपल्याला सवयच झालेली आहे) त्यांना एकत्र पाहणे ही आनंददायक गोष्ट आहे.’

यावर अहमद यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. पण मी हेतुपुरस्सर अशी शब्दरचना केलेली आहे. ती केवळ त्यांच्या योगदानातील तफावत दाखवण्यासाठी नव्हे, तर ते दोघे एकमेकांना कसे पूरक आहेत हे दाखवण्यासाठी-देखील.’

अहमद पुढे असे निरीक्षण नोंदवतात की, ‘त्या काळच्या नेत्यांमध्ये मतभेद होते (दोषही होते) आणि सामान्यजनांनी त्यांना जे वैयक्तिक दृष्ट्या भावेल ते निवडणे साहजिक आहे, पण एकाला गौरवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणे मला स्वत:ला फारसे पटत नाही.’

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधी आता देशभर चालू असणारी आंदोलने, लोकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि महिलांनी घेतलेली नेतृत्वाची भूमिका यासोबतच इतर अनेक कारणांनी कौतुकास्पद आहेत. यामध्ये एकत्रितरीत्या होणारे आंबेडकर आणि गांधींचे स्मरण अगदी योग्य आहे. लिंग समभावाविषयीची आंबेडकरांची बांधिलकी अधिक दिसते. त्याचे प्रतिबिंब आपल्या संविधानात तर दिसतेच (ज्याचा मसुदा त्यांनी तपासून दिला), पण हिंदू व्यक्तिगत कायद्यांमधील सुधारणांमध्येही दिसते, ज्याचा त्यांनी कसोशीने पाठपुरावा केला. व्यक्तिगत जीवनात पत्नीला दिलेल्या वागणुकीचा विचार करता- गांधी हे ‘पारंपारिक भारतीय कुटुंबप्रमुख’ ठरू शकतात. सार्वजनिक जीवनात मात्र स्त्रीमुक्तीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे.1925 मध्ये पश्चिमेतील तथाकथित प्रगत लोकशाही देशातही एखाद्या प्रमुख पक्षाची अध्यक्ष एखादी स्त्री होणे कल्पनेतही शक्य नव्हते, त्या काळात सरोजिनी नायडू ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’च्या अध्यक्ष झाल्या त्या गांधींमुळेच. शिवाय गांधींकडून प्रेरणा घेतलेल्या कमलादेवी चट्टोपाध्याय, उषा मेहता, मृदुला साराभाई, अनिस किडवाई, सुभद्रा जोशी, अरुणा असफ अली आणि हंसा मेहता अशा आंदोलक स्त्रियांची व्यक्तिमत्त्वे किती जबरदस्त आहेत.

आंबेडकरांनी शोषित भारतीयांना उद्देशून ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असे केलेले आवाहन प्रसिध्द आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी दाखवलेले धैर्य व घेतलेली भूमिका जणू आंबेडकरांच्या आवाहनाला साथ देणारी आहे. दुसरीकडे, हिंदू बहुसंख्याकवादाच्या विरोधात जाऊन लोकशाही आणि विविधता यांच्या रक्षणासाठी त्या आंदोलकांनी दाखवलेली प्रतिबध्दता आंतरधर्मीय सुसंवादासाठी गांधींनी तहहयात दिलेल्या लढ्याच्या वाटेनेच जाणारी आहे.

तर हिंदुत्वाच्या वाढत्या धोक्यामुळे आंबेडकर आणि गांधी यांना एकत्र आणण्यावाचून आपल्याला गत्यंतरच नाही, अशी जाणीव देवनूर महादेव यांनी करून दिली. त्यामुळे अमृता दत्ता यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘‘वाराणसीच्या त्या 16 वर्षांच्या मुलाचे बोलणे आपण लक्षपूर्वक ऐकायला हवे. तो म्हणतो : ‘गोडसेच्या देशात मी गांधींसोबत उभा राहीन.’ कारण, कोणतीही धर्मांधता सर्वांत आधी स्वत:ला आंधळे करते. नंतर मेंदू गहाण टाकल्यामुळे विवेक नष्ट होतो. पुढे हृदय काढून राक्षस बनवले जाते. आणि मग बळी मागितला जातो. या प्रकाराला सध्या जोर आला आहे. या धर्मांधतेच्या जबड्यातून आपल्या मुला-मुलींची दृष्टी, त्यांचे मेंदू आणि त्यांचे हृद्य यांची सुटका करायला हवी.गांधींचा खून करणाऱ्या गोडसेच्या अतृप्त आत्म्याला मोक्ष मिळाल्यानंतर आता दलित महिलांनी पुढील वाटचालीसाठी गांधींचाही आधार घेणे संयुक्तिक आहे. कारण दलितांमध्ये ही जागरूकता नसेल तर, हे संकट दलितांच्या वर्मी घाव करेल याची मला भीती वाटते.’’

आंबेडकर किंवा गांधी त्यांच्या आयुष्यात कधी चुकलेच नाहीत असे नाही. त्यांनी चुका केल्या, शत्रुत्व आणि पूर्वग्रहही ठेवले. म्हणून त्यांना यांत्रिकपणे उद्‌धृत करू नये, किंवा अंधपणे त्यांचे अनुसरणही करू नये. कारण ते ज्या जगात राहात होते त्याहून आपले जग पूर्णपणे वेगळे आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातील राजकीय आणि तंत्रज्ञानिक आव्हाने विसाव्या शतकाच्या मध्यातील दशकांहून खूपच वेगळी आहेत. तरीही नैतिक व सामाजिक आव्हाने स्थूल मानाने सारखीच राहिलेली आहेत. जात आणि लिंग यातील समानतेसाठीचा लढा संपलेला नाही. आंतरधर्मीय सरावासाठीची लढाई अत्यंत महत्त्वाची आणि निकडीची झाली आहे. त्यामुळे व्देषाने पछाडलेल्या हिंदुत्ववादी झुंडींना हरवायचे असेल, तर आवश्यकता आहे गांधी आणि आंबेडकर हे दोघेही एकाच बाजूला असण्याची!

(अनुवाद: मृद्‌गंधा दीक्षित, पुणे)

Previous articleआपल्यातला बांडगुळाला हलवणारा…’पॅरासाईट’!
Next articleसत्ताशक्ती आणि ‘सांस्कृतिक संघटना’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.