आपल्यातला बांडगुळाला हलवणारा…’पॅरासाईट’!

©सानिया भालेराव

यंदाच्या ऑस्कर नॉमिनेटेड ९ चित्रपटांपैकी मला सगळ्यात जास्तं आवडलेला आणि अस्वथ करणारा चित्रपट म्हणजे ‘पॅरासाईट’. या यादीतले सगळे चित्रपट पाहिल्या खेरीज असं म्हणायचा आपल्याला नैतिक अधिकार नाही असं मला वाटत होतं आणि म्हणून काल जोजो रॅबिट पाहिला आणि मग आपल्याला जे वाटतंय ते परफेक्ट आहे यावर शिक्कामोर्तब केलं.

यंदाच्या ऑस्कर्सच्या नामांकनात असलेला आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये Palme d’Or हे प्रतिष्ठित अवॉर्ड मिळवणारा बोंग जून-हो या दिग्दर्शकाचा ‘पॅरासाईट’ हा चित्रपट खूप कारणांसाठी आवडला आहे. एकतर ज्यांना पिक्चर या प्रकारचं वेड आहे किंवा काहीतरी वेगळं आणि अर्थपूर्ण पाहायचं असेल त्यांनी अजिबात चुकवू नये असा बोंग जून-हो या डायरेक्टरचा कोरियन भाषेतला पॅरासाईट हा चित्रपट. विशेष स्पॉयलर्स न देता या बद्दल लिहिणं ट्रिकी आहे. हे चित्रपटाचं परीक्षण नाही. ते मला जमत सुद्धा नाही कारण मला त्यातलं टेक्निकल ज्ञान नाही. चित्रपट पाहिल्यानंतर चिमटीत न पकडता येणाऱ्या पण जाणवणाऱ्या गोष्टी मला लिहायला आवडतात आणि इथेही मी तेच केलं आहे. गोष्ट फारशी रिव्हील न करता लिहितेय पण ज्यांना कोरी पाटी घेऊन हा पिक्चर पाहायचा असेल त्यांनी तो पाहिल्या नंतर हे वाचावं ही विनंती.

आपण आज काल ज्यांना बिलो द पिरॅमिड असं म्हणतो म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली असणारे लोक.. त्यांचा आयुष्यात आपण या चित्रपटातून डोकावतो. सुरवातीला हे डोकावणं वाटलं तरी हळूहळू आपण त्या दलदलीत फसत जातो. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून आर्थिक आणि सामाजिक दरी आपल्याला जाणवते आणि काही वेळाने ती किती खोल आहे, गहिरी आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. विष कसं हळूहळू उतरतं रक्तात, सुरवातीला एक हलकासा डंख, मग शासोच्छवास जलद होणं, हृदयाची धडधड वाढणं, मग मधूनच शास खोल घेतला की बरं वाटणं, कदाचित आता ठीक वाटेल असं वाटत असतानाच जीव गुदमरायला लागणं, आणि मग तडफडत प्राण जाणं.. हा प्रवास.. तसाच काहीसा हा चित्रपट अलगद, हळुवार जीव घेतो आणि तेही आपल्या नकळत.

ही गोष्ट आहे किम या कुटुंबाची. आई – वडील, मुलगा आणि मुलगी असं हे कुटुंब. बेसमेंट मध्ये राहणारं. पित्झाचे बॉक्सेस बनवणं, अशी मिळेल ती कामं करून पोट भरणारं साऊथ कोरियामधलं हे कुटुंब. यातल्या मुलाला एका श्रीमंत घरातल्या मुलीला इंग्रजी शिकवण्याचं काम मिळतं आणि मग अत्यंत चलाखीने एक एक करून तो आपल्या सगळ्या कुटूंबाला या घरात काम मिळवून देतो. सुरवातीला काहीसा डार्क ह्युमर आपल्याला जाणवतो पण नंतर त्या घरातल्या बेसमेंटमधलं रहस्य आणि त्या अनुषंगाने चित्रपटाचा बदलत जाणारा मिस्ट्रीअस फॉरमॅट.. जो शेवटला आपल्याला स्तब्ध करून सोडतो.

या संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला जे सांगायचं आहे ते तो फार सटली सांगून जातो. पावसामुळे किम कुटुंबाच्या बेसमेंटमधल्या घरात जेंव्हा पाणी आलेलं असतं तेंव्हा वडील जे जमेल ते सामान गोळा करत असतात आणि ती मुलगी, घाण काळया रंगाचं पाणी कमोडधून अक्षरशः कारंज्यासारखं बाहेर येत असताना सुद्धा त्या कोमोडचं झाकण बंद करून वर एकाठिकाणीलपवून ठेवलेल्या काहीश्या ओल्या झालेल्या सिगरेटच्या पाकिटातून एक सिगरेट काढून थंडपणे ती ओढत बसते.. हा सिन अंगावर येतो. बेसमेंट मधल्या त्यांच्या घराच्या त्या शिडंबीडीत खिडक्या, त्याच्याउलट ज्या घरात हे लोक काम करतात तिथल्या मोठाल्या, उंच, निळं आकाश दिसणाऱ्या काचेच्या सुबक खिडक्या.. खूप काही सांगून जातात.

या चौघांनी ज्या घरात ते काम करत असतात त्यांना सांगितलेलं नसतं की ते सगळे एकाच कुटुंबाचा भाग आहेत म्हणून.. पण त्याच्या मालकाचा लहान मुलगा.. तो म्हणतो या सगळ्यांचा वास सारखाच आहे.. आर्थिक विषमता आणि त्या अनुषंगाने येणारा भेदभाव जो उघडपणे मन किती मोठं आहे हे दाखवण्यासाठी केला जात नाही पण तो असतो.. डीप रूटेड.. हे जाणवतं.. चित्रपटाच्या शेवटाला तो वास आपल्या पर्यंत पोहोचतो आणि मग अस्वस्थ व्हायला होतो. आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी या पांढरपेशा समाजचा भाग आहोत की काय असा विचार मनात येऊन दचकायला होतं… हा वास काही केल्या माझा पिच्छा सोडत नाहीये आता.. आणि हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे.

एखाद्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून मारल्यानंतर तो खरंच मेला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पुन्हा एकदा बंदूक चालवल्या जाते.. तसा काहीसा शुअरफायर किल सारखा शेवट या दिग्दर्शकाला हवा होता आणि तो त्याला नक्कीच सापडला आहे. चित्रपट संपल्यानंतर पाच मिनिटं तर जागेवरून साधं कणभरही हलवंस वाटलं नाही. दिग्दर्शक सांगतो की या चित्रपटाचे वेगवेगळे शेवट होऊ शकले असते.. सगळं आलबेल होतं असं दाखवण्यापेक्षा त्या जुनाट घराच्या बेसमेंट मध्ये बसून आलबेल होऊ शकतं ही वेडी आशा बाळगणारा तो मुलगा.. आणि ती आशा किती खोटी आहे याचं भयानक वास्तव माहित असणारा प्रेक्षक.. विदारक वास्तवाचं ओझं, त्या मुलाच्या वेड्या स्वप्नांचं, आशेचं ओझं अचानक आपल्या पाठीवर आलंय असं आपल्याला जाणवतं… आणि आपण सुद्धा अशा एखाद्या वेड्या आशेवर जगणारे पॅरासाईट तर नाही आहोत ना.. असा विचार मनात येऊन अस्वस्थ व्हायला होतं.

या दशकातला सर्वोत्तम चित्रपट असं याला का म्हटलं जातंय ते किती बरोबर आहे हे चित्रपट पाहिला की उमगतं. चित्रपटाच्या नावापासून, त्यातल्या घरांच्या, बेसमेंट्च्या, पायऱ्यांच्या आर्किटेक्चरपासून, खाद्यपदार्थांच्या प्लेट्स, पात्रांच्या संवादातला डार्क ह्युमर, ते त्या वासापर्यंत… सगळ्या गोष्टी फार विचारपूर्वक पेरल्या आहेत. चित्रपटाचं नावात सुद्धा फार सुरेख मेटाफर दडला आहे. पॅरासाईट… असा एखादा जीव जो दुसऱ्या जीवावर अवलंबून राहातो आणि दुसऱ्या जिवाकडून स्वतःच्या जगण्यासाठी लागणारे घटक शोषून घेतो. इव्होल्यूशनरी बायोलॉजी शिकताना मला या सिम्बायोटिक रिलेशनशिप फार इंट्रेस्टिंग वाटायच्या. हे अवलंबून असणं मग ते एखाद्या व्यक्तीवर, प्रेमावर, रागावर, द्वेषावर, आशेवर.. अशा कोणत्याही गोष्टीवर अवलंबून असणारे आपण.. एक पॅरासाईट जणू.. आपल्यातल्या बांडगुळाचा नको वाटणारा शोध घ्यायला लावणारा असा हा चित्रपट आहे खरं तर. आपण आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यात कदाचित अशी बांडगुळं बनून राहिलेलो असतो आपण. जाग आली तर ठीक नाहीतर कित्येक लोक तसंच बनून राहतात सुद्धा. दुसऱ्याला पोखरतो आहोत याचं भान राहत नाही, आलं तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं.. डार्विनची सर्व्हायव्हल थिअरी म्हणून कितीही निर्दयी आणि पाशवी वाटली तरी ती ह्युमन आहे याची जाणीव.. भयंकर वास्तवाची जाणीव.. आतून अस्वथ करणारी..
आपल्यातला बांडगुळाला हलवणारा .. जरूर पाहावा आणि निदान एकदा तरी अनुभवावा असा हा ‘पॅरासाईट’!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

 

Previous article‘पुस्तकांच्या गावा’ ला गवसली समृद्धीची वाट
Next articleगांधी आणि आंबेडकर यांना एकत्र आणताना…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.