‘पुस्तकांच्या गावा’ ला गवसली समृद्धीची वाट

साभार:दैनिक दिव्य मराठी

-अविनाश दुधे 

ग्रेट ब्रिटनमधील हे-ओन-वे या गावानंतर जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून लौकिक मिळविलेल्या भिलारमध्ये पुस्तकप्रेमींची गर्दी वाढतेय. यातून गावाची सांस्कृतिक उंची तर वाढते आहेच; सोबतच गावाचं अर्थकारणही बदलते आहे.

पुस्तकं आणि पुस्तकांचं जग एखाद्या गावाला, तेथील माणसांना पैसा मिळवून देत आहे, हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. भारतातील पुस्तकांचं पहिलं गाव म्हणून ख्याती मिळालेल्या महाबळेश्वरनजीकच्या भिलारमध्ये हे घडते आहे. महाबळेश्वर व पाचगणी या हिलस्टेशनच्यामध्ये डोंगररांगात वसलेल्या चिमुकल्या भिलारला पुस्तकांनी समृद्धीची नवीन वाट दाखवली आहे. महाराष्ट्र शासनाने ४ मे २०१७ रोजी भिलारला पुस्तकांचं गाव घोषित केलं; तेव्हा या प्रयोगाचे कौतुक झालं खरं, पण या प्रयोगाच्या यशाबाबत अनेकांना शंका होती. हिलस्टेशनला आनंद लुटण्यासाठी जाणारी माणसं पुस्तकांच्या वाट्याला कशाला जातील, हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात होता.

मात्र आता जवळपास पावणेतीन वर्षाच्या अनुभवानंतर पुस्तकाच्या गावाचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. पाचगणीपासून सहा, तर महाबळेश्वरपासून १६ किमीवर असलेल्या भिलारमध्ये महिन्याला सरासरी पाच हजाराच्या आसपास पुस्तकवेडे भेट देत आहेत. भिलारमधील ४० घरांमध्ये पुस्तकांचं जग उभं करण्यात आलं आहे. एकाच्या घरी कथा-कादंबऱ्या, दुसरीकडे इतिहास सांगणारी पुस्तकं, कुठे व्यक्तिचित्रणात्मक, तर कोणाकडे निसर्गचित्रण, विज्ञान-तंत्रज्ञान, दिवाळी अंक अशा वेगवेगळ्या विषयातील ५० हजारांपेक्षा अधिक पुस्तकं भिलारमध्ये उपलब्ध आहेत.

गावातील वेगवेगळ्या रस्त्यांवर त्या गल्लीतील घरांमध्ये कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत, याचे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत. गावातील एखाद्या गावकऱ्याने स्वतःच्या घरी पुस्तकं ठेवण्याची लेखी विनंती केली की मराठी भाषा विभाग संबंधित गावकऱ्याला पुस्तकं ठेवण्यासाठी कपाट व वाचकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देतो.  पुस्तकांचं गाव म्हणून नावारूपास आल्यानंतर पावसाळ्यातील ४ महिने सोडलेत तर वर्षभर आता पर्यटक व पुस्तकप्रेमींची गर्दी येथे पाहायला मिळतेय. शाळा-महाविद्यालयाच्या सहली तर मोठ्या संख्येने येतात. पाचगणी सोडलं की भारतातील पहिले पुस्तकांचे गाव…  असे फलक थोड्या थोड्या अंतरावर लावलेले दिसतात. हे फलक पाहून ज्यांना पुस्तकात रस नाही त्यांच्या वाहनांची चाकेही इतक्या दूर आलो आहोत तर बघूया पुस्तकांचं गाव कसं असतं, या उत्सुकतेपोटी भिलारकडे वळतात.

सुरुवातीला शासनाच्या एका चांगल्या उपक्रमाला साथ द्यायची या भावनेने पुस्तकांचं गाव आकारात आणण्यात मदत करणाऱ्या भिलारवासीयांना काही दिवसातच  यानिमित्ताने पैसेही कमविता येतात, हे लक्षात आले. गावात येणारे पुस्तकप्रेमी, पर्यटक किमान ४-५ तास गावात रमतात. पुस्तकं चाळताना-वाचताना येथे चहापाणी, खायला काही मिळेल का, याची चौकशी ते करतात. यामुळे ज्या घरात पुस्तकं ठेवण्यात आली आहेत, त्यांच्या मालकांनी अल्पोपहार, चहा-पाणी, हवं असल्यास जेवण तयार करून देण्यास सुरुवात केली. आता गावातील अनेकांसाठी हा जोडधंदा झालाय

गावाचं देखणं व टुमदार स्वरूप पाहून पुस्तकात रमलेल्या काही पर्यटकांनी येथे मुक्कामाची सोय उपलब्ध होऊ शकते का, अशीही विचारणा सुरू केली. ही आणखी एक संधी आहे, हे हेरून काही भिलारवासीयांनी लगेच’होम स्टे’ प्रकारातील निवास व्यवस्था उभारली. आज गावात जवळपास १०० घरांमध्ये निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती भिलारच्या सरपंच वंदना भिलारे देतात. महाबळेश्वर व पाचगणीला दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सिझनमध्ये तेथील हॉटेलचे दर प्रचंड कडाडतात. अशा वेळी पर्यटक भिलारमध्ये जागा शोधतात. येथे १००० ते १५०० रुपयात अतिशय उत्तम व्यवस्था उपलब्ध होते. त्यामुुळे येथे मुुक्कामाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढतेय.

पुस्तकाचं गाव म्हणून नावारुपाला आलेल्या भिलारची स्वतःची काही वैशिट्य आहेत. १९४४ मध्ये पाचगणीत नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर जो हल्ला केला होता, तो येथील भिलारे गुरुजींनी थोपवला होता. तेव्हा त्यांनी नथुरामला चांगला चोपलाही होता. ‘स्ट्रॉबेरीचं गावं’ म्हणूनही भिलारची ख्याती आहे. महाबळेश्वरपेक्षा ३० ते ४० टक्के कमी दरात शेतातील ताजी स्ट्रॉबेरी येथे मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजलखानाला जिथे नामोहरम केलं ते जावळीचं घनदाट व डोळ्यांचं पारणं फिटेल, असे निसर्गरम्य खोरे भिलारला अगदी लागून आहे. मोजके इतिहासप्रेमी सोडलेत तर फार कमी मंडळी तिकडे जातात. त्यामुळे यापलीकडे महाबळेश्वरला जाताना भिलारला जायला अजिबात विसरू नका. अद्भुत निसर्गसौन्दर्य, ताजी स्ट्रॉबेरी आणि सोबतीला पुस्तकांचा सहवास. सुख…सुख…म्हणजे दुसरं काय असतं?

(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleसरकार पुरस्कृत झुंडशाही !
Next articleआपल्यातला बांडगुळाला हलवणारा…’पॅरासाईट’!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.