साभार: साप्ताहिक साधना
-सुरेश द्वादशीवार
आपण जवळची माणसे कळत नकळत तोडून एकाकीपणाकडे जातो काय, की ते एकाकीपणच आपल्याला जवळच्या माणसांपासून दूर नेते? याला आपला स्वभाव कारणीभूत असतो की जवळच्या माणसांचे वागणे? पण मग माणसे जवळ असूनही हे एकाकीपण का घेरत असते? माणसांच्या निष्ठा त्यांना इतरांपासून व प्रसंगी स्वतःपासूनही दूर नेतात काय? पायथागोरस हा तत्त्वज्ञ काहीसा श्रद्धावानही होता. शेंगा खाऊ नये असे तो आपल्या शिष्यांना सांगायचा. शेंगांमधील बियांत मृतात्मे राहत असतात असे तो म्हणायचा. पुढे त्याचे हल्लेखोर त्याला मारायला आले तेव्हा जीव बचावून पळत असताना शेंगांचे एक शेतच त्याच्या मार्गात आले. परिणामी तो थांबला व हल्लेखोरांनी त्याचा गळा कापून त्या थोर तत्त्वज्ञ माणसाचा शेवट केला. ही बाब पुढे अनेक निष्ठावानांच्या टोकाच्या निष्ठांपर्यंत त्यांना अनुभवावी लागली. पायथागोरस साधा तत्त्वज्ञ नव्हता. त्याचे शिष्य त्याला परमेश्वर मानत होते. भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र इत्यादी विषयांवरील बीजग्रंथ व सिद्धांत त्याच्या नावावर आहेत.
पायथागोरसचे उदाहरण सर्वसाधारण नाही. पण सर्वसाधारण माणसेही जरा एकारली की ती अशीच होतात. स्वतःला एकटी व एकाकी समजतात. सभोवतीचे सारे दूरचे होतात आणि त्यांचे ते एकटेच राहतात. अशावेळी माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे अॅरिस्टॉटलचे विधानच विवाद्य ठरून चुकीचे वाटू लागते. व्यक्तीची सामाजिकता ही तिची गरज असेल, पण गरज म्हणजे व्यक्तिमत्त्व असणार नाही. समाजामुळे व्यक्तीला सुरक्षितता लाभते तशी भावना लाभते. आपण एकटे नसून या जगात आपले कुणीतरी आहे, असेही तिच्या मनात येते. पण हे सामाजिकतेचे देणे असते की व्यक्तीचे नुसतेच तसे वाटून घेणे असते? समाज व त्यातली माणसे खरोखरीच व्यक्तीच्या वाटण्यात, सुखदुःखाविषयीच्या जाणिवात सहभागी होतात काय? की ती नुसतीच दुरस्थ प्रेक्षकासारखी, कधी सहानुभूतीचा तर कधी कंटाळ्याचा भाव चर्येवर आणणारी असतात? व्यक्तीला सभोवारच्या माणसांचा कंटाळा येतो तसा समाजालाही व्यक्तीचा कंटाळा येतोच की नाही? माणसे एकत्र राहण्याने मित्र, स्नेही, सहकारी, सहयोगी वा सहभोगी खरोखरीच होतात काय?
माणसा-माणसातील वाद वा भांडणे स्वार्थाखातर, मतभेदांखातर होतात असे मानले तरी ज्यांच्यात मतभेद वा स्वार्थांतर नसते त्यांच्यात तरी सरळसरळ मैत्र वा सहयोग होताना कुठे दिसतो? अगदी एकमेकांचे शेजारी, आणि शेजारीच नव्हे तर पती-पत्नीदेखील परस्परांशी सारेच मनासकट वाटून घेतात काय? त्यांचे स्वतःचे असे काही त्यांच्याजवळ असतेच की नाही? क्वचित प्रसंगी कुणा त्रयस्थाजवळही ते उघड होताना आपण पाहतोच की नाही? माणसे बोलतात, खूप बोलतात पण सांगत काहीच नाहीत असे का होते? हिरॉक्लिटस् नावाचा तत्त्वज्ञ खूप काही लिहून गेला. पण त्याचे लिखाण कोणाला समजले तर कोणाला समजलेच नाही. त्यातून तो आपले लिखाण होमरला आवडणार्या वृत्तातून कवितेतून सांगायचा. अगदी सॉक्रेटिस म्हणाला, ’ जे वाचले ते चांगले होते. पण ते काय होते ते मात्र कळले नाही. हिरॉक्लिटस् कळायला समुद्राच्या तळापर्यंत बुडी मारू शकणारा संशोधक वृत्तीचा पोहणाराच असावा लागतो. ’ सॉक्रेटिसला न उमगलेले वास्तव मग आपल्याला तरी कितीसे उमगणार? ज्ञानेश्वर म्हणाला, ’शब्देवीण संवादिजे.’ हे शब्दावाचूनचे समजणे म्हणजे काय? तर आपलेसे वाटणे, ते समजले असेलच वा असतेच काय?
ग्रीकांच्या इतिहासाने ज्याला आपला पहिला तत्त्वज्ञ मानले तो थेल्स म्हणाला, ’स्वतःला जाणा.’ (नो दायसेल्फ) आपले ऋषीमुनी आणि संतश्रेष्ठही स्वतःला जाणून घेण्याचाच उपदेश सातत्याने करीत आले आहेत. मात्र आपल्या ऋषीमुनींचा वेध ’त्या’ ईश्वरी सत्तेचा होता. थेल्स माणसांना स्वतःविषयी जाणून घेण्याचा सल्ला देत होता. माणूस स्वतःला तरी कितीसा समजून घेतो? ज्यांना ’स्व’ कळला आहे अशी किती माणसे आपल्यात आहेत? जे समजले वा आवडले ते म्हणजेच मी असे मानणारेच बहुधा भेटतात. काहींना ’स्व’ म्हणजे काही असते याचाच पत्ता नसतो. तर काहींमध्ये ते समजून घेण्याची तळमळ असते. ही तळमळ म्हणजेच आत्मशोध असतो. या शोधालाच विल् ड्युरांट तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) म्हणतो. ते ज्ञात झाले की शोधाचाही शेवट होतो. तो घेणे, घेत राहणे हेच तत्त्वज्ञानात जगणे असते. ते ईश्वराच्या शोधाकडे वळत नाही असे नाही मात्र त्या शोधात काहीएक हाती लागत नाही, लागते ते स्वतःचेच वाटणे वा जगणे असते. मात्र या शोधाने स्वतःविषयीची दृष्टी विकसित होऊन मोठी मात्र निश्चित होते. आळस व कंटाळा यासारख्या गोष्टी या शोधाच्याही आड येतात. त्या ज्यांच्यात सर्वाधिक आढळतात ती माणसे मग आपल्यालाही दखलपात्र वाटत नाहीत. शोधाचा प्रवास हेच तत्त्वज्ञान असेल आणि त्यातले प्रवासी हेच तत्त्वज्ञ असतील तर तो प्रवास व त्याची वाटचाल केवढी अवघड, खोलवर जाणारी, अंतरंग शोधणारी व जगात न दिसणारे पाहत राहणारी असेल ’माणसांचे आयुष्य संपते पण त्यांना त्यांचा तो शोध लागत नाही. त्यांनाच ती समजायची राहून जातात. स्वतःला समजून न घेताच जगाचा निरोप घेणारी माणसे आपण पाहत असतोच की नाही? आणि जे समजले तेच आपण असे मानणारी व अज्ञानात रमणारी माणसेही आपल्याला दिसतातच की नाही?
परमेनिड्स हा तत्त्वज्ञ या संदर्भात लिहिलेल्या आपल्या कवितेत म्हणतो, एकदा एक तरुण रथातून लांबवर देवतेला भेटायला गेला. ती त्याला म्हणाली, ’तुला जे समजायचं ते सगळं मी सांगेन. पण तू ते स्वतःच्या विवेकावर तपासूनच स्वीकारलं पाहिजे.’ (आपला बुद्धही त्याच्या शिष्यांना हेच सांगतो. जे सांगतो ते ऐका पण त्याचा स्वीकार तुमच्या विवेकाच्या आधारावरच करा.) मग ती त्याला सत्य (ट्रूथ) काय ते प्रथम व मत (ओपिनियम) काय ते नंतर सांगते. सत्याचा संबंध ’काय आहे’ या विषयाशी तर मताचा संबंध जे नाही त्याच्याशी वा जे असावेसे वाटते त्याच्याशी आणि समाजातील समजांशी असतो. ’काय आहे’ हे सत्य कळले की ’काय नाही’ तेही कळते व ते मताच्या मालिकेच जमा होते… अगदी दैवते झाली वा ज्ञानी पुरुष झाले तरी ते आपल्या आयुष्यातील खर्या खोट्याचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्यावरच टाकतात हा या कथेचा मथितार्थ.
आपल्या परंपरेत शंकराचार्यांचे प्रसिद्ध वचन आहे. ’ ब‘ह्म सत्यम् जगन्मिथ्या’ ते परमेनिड्सच्या शिकवणीच्या अगदी उलट जाणारे आहे. जे आहे ते जग मिथ्या आणि जे नाही वा अनुभवसिद्ध किंवा इंद्रियगोचर नाही ते ब‘ह्म सत्य असा त्याचा अर्थ आहे. पुढची संतांची तत्त्वपरंपरा मग जे आहे ते नाहीच हे सिद्ध करण्यात खर्ची पडते मग त्यावर हे जग नाहीच असे नसले तरी ते अनिर्वचनीय आहे अशी पळवाट काढली जाते. या जगाविषयीची वा वस्तूविषयीची तृष्णा बाळगू नका हा यातला संन्यास धर्मासाठी केलेला उपदेश असतो. तो टोकाचा, एकारलेला व संभ्रम करणारा आहे हेही लगेच लक्षात येते. सारे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आहे ते व अनुभवाला येते ते सत्य मानते व त्यामागील अदृष्टाचा शोध घेते. उलट आपले ब्रह्मज्ञान अनुभवाला न येणारे ब्रह्मसत्य मानून अनुभवाला येणारे जग मिथ्या ठरविते ही यातली गंमत. या स्थितीत अनुभवच असत्य ठरतो आणि अननुभवच तेवढा सत्य होतो. मग जे असत्य ते एकाकी बनवील की माणसे व जग जोडील? सभोवतीचे जग हे एकदा नेपत्थ्य ठरले वा नाहीच असे मानले की मग आयुष्यात उरते काय? यावरचा मार्ग म्हणजे ही अवस्था ज्ञानप्राप्तीनंतरची आहे असे म्हटले जाते. पण हे ज्ञान कोणाला, कधी व कशाने प्राप्त होते, ते झाले याची प्रचिती काय? आणि त्याला पुरावा कोणता? हे कोणी सांगत नाही. सांगणारा सांगतो म्हणून ते खरे मानायचे असते काय?
महाराष्ट्रात आपल्या प्रवचनांसाठी फार प्रसिद्ध असलेल्या महाराजांना जेव्हा विचारले की ’या जगात ज्याला अध्यात्माचा वा ब्रह्मज्ञानाचा स्पर्श झाला आहे असा कोणी तुम्हाला भेटला काय’ बराच विचार करून ते निराशेने ’नाही’ असे म्हणाले. त्यांच्या सारख्या सदैव अध्यात्मात लोळणार्याला तो सापडला नसेल तर इतर मर्त्य जीवांना तो कसा दिसेल? हा संभ्रम वा हे अज्ञानच माणसाला एकाकी बनवते काय? पण किती माणसे एवढा खोलवर विचार करतात? पण विचार करीत नसली तरी ते जे सत्य वा असत्य असेल ते तर असतेच की नाही? आणि त्याचा अनुभव वा त्याचे दुरस्थपणच माणसाला सार्यांपासून, अगदी स्वतःपासूनही दूर नेत असेल की नाही?
सार्या जीव व जगतात एकच एक ब्रह्मतत्त्व भरून आहे असे आपले प्राचीन तत्त्वज्ञान सांगते. पाश्चात्त्य व विशेषतः ग्रीक तत्त्वज्ञानानेही एकच तत्त्व सार्या जीव व जगताला जगविते व त्यांना परस्परांशी जोडते असे म्हटले आहे. पायथागोरस, अॅनाक्झिमँडर व अॅनाक्झिमिन या तिघांनी हे तत्त्व जलतत्त्व असल्याचे सांगितले. सार्या जीवजगतात जल आहे व ते सुकले वा संपले की जीव व जगताचाही तो शेवट असतो असे ते म्हणाले. जळाचे महात्म्य आपल्याही परंपरेत आहे. ऋग्वेदातला पहिला देवेश्वर वरुण हाच होता. जोवर पाऊस नियमित पडतो, पिके चांगली येतात, गायी-गुरे चांगली निपजतात व संततीही नीट असते तोवर वरुणच देवांचा ईश्वर असतो. त्या सार्या व्यवस्थेत बिघाड झाला, दुष्काळ पडले, अन्नाची कमतरता आली आणि त्यासाठी लढाया कराव्या लागल्या की वरुणाची जागा इंद्र घेतो. जोवर सारे व्यवस्थित असते तोवर वरुण (म्हणजे जलतत्त्व), जेव्हा सारे बिघडते वा मिळवावे लागते तेव्हा इंद्र (म्हणजे लढाऊ नेता). जलतत्त्वाचे हे महात्म्य दोन्ही परंपरांनी असे अधोरेखित केले आहे. जलतत्त्वाचे महात्म्य आजही मानले जाते व ते तसेच कायम आहे. मात्र सार्यात ते जलतत्त्व वा ब्रह्मतत्त्व असताना माणसे काय तुटतात, मनाने एकाकी का होतात? त्यांना जोडणारी बाकी परंपरा बाजूला ठेवली तरी हे मूलतत्त्व त्यांना जोडून का ठेवत नाही? देहाएवढेच मनाचे कोरडेपण जलतत्त्व का घालवीत नाही? वा ब्रह्मतत्त्व ते कसे येऊ देते? हे कोरडेपण काल्पनिक आहे असे मानले तरी जलतत्त्व वा ब्रह्मतत्त्व तरी याहून वेगळे कुठे आहे?
प्रश्न एकाकीपण घालविण्याचा वा ते समृद्ध करण्याचा आहे. त्यासाठीच ते का येते याचा हा विचार. माझे एकाकीपण याच्यामुळे वा त्याच्यामुळे संपले असे म्हणणारी स्त्री व पुरुष कितीसे खरे असतात? एखाद्याचे असणे वा नसणे औषधी असल्यासारखे वा नसल्यासारखे असते काय? औषधीने बरा होतो तो आजार मग एकाकीपण हा आजार असतो की त्या अवस्थेचे स्वरूप नेमके तसे असते. मला कधीही एकाकी वाटले नाही व मी कधीही एकटेपण अनुभवले नाही असे म्हणणारा माणूस एकतर ईश्वरतत्त्वाच्या आसपास असणारा वा ठार वेडाच असणारा असतो. एकाकीपण येते व जातेही. मनाच्या या अवस्था नैसर्गिक असतील तर त्यावर उपाय शोधण्याऐवजी त्या अनुभवण्यातच शहाणपण असेल काय? मुळात त्या दोन अवस्था असतात की एकाच मनाची दोन रूपे.
यातले काहीही वास्तव वा चुकीचे असले तरी एक गोष्ट मात्र निश्चितच खरी असते. एकाकीपण हे सत्य आहे आणि ते बहुदा कमालीचे दुःखद आहे. महाराष्ट्रातील मध्यमवर्गातला घरटी एक तरुण व त्याहून जास्तीचेही नोकरी धंद्यानिमित्त विदेशात वा दूरच्या शहरी घरापासून दूर राहणारे आहेत. ते कायमचे घरी राहायला येण्याची शक्यता धुसर होत जाऊन जवळजवळ संपली आहे. शहरातल्या मध्यमवर्गीयांच्या मोठमोठ्या वसाहतींचे आता वृद्धाश्रम झाले आहेत आणि त्यातली माणसेही एकाकी बनली आहेत. त्यात म्हातारपण आलेले आई-वडील आहेत, कधी त्यांच्या सेवेला एखाद् दुसरा गडी वा बाईमाणूस असते, बाकी सारा काळ त्यांच्या एकटेपणाचा व एकाकीपणा… कधीतरी सायंकाळी त्यातले पुरुष वसाहतीतील मैदानात कोंडाळे करून बसतात. कधी देवळाबाहेरच्या बाकावर तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्यांवर. त्यांच्या जवळ इतरांना सांगण्याजोगे फारसे काही नसते. असलेच तर त्यांच्या एकाकीपणाचे दुःख. महिन्याकाठी मुलांकडून येणार्या मनिऑर्डरींची प्रतीक्षा. त्या आल्या की त्याचे तात्पुरते समाधान. मग पुन्हा तीच रोजची वाटचाल. या वृद्धांशी कोणाला येऊन भेटावेसे व बोलावेसे वाटत नाही. त्यांच्या अनुभवाचे शहाणपण ऐकावेेसे वाटत नाही. त्यांना खूप काही कोणाला तरी सांगायचे असते, असे कोणी भेटलेच तर ते भरभरून बोलतात पण भेटणारेच नसतात. आले तरी केव्हा जातो याचीच वाट पाहणारे असतात. सोबतच्यांना सांगायचे काही उरले नसते, घरात बोलण्याचेही सारे संपले असते. देवळातले समाधानही फारसे पुरणारे नसते. मग काय? नुसतेच एकाकीपण, रिकामपण. आपण कोणालाही नकोसे झालो आहोत याची जीवघेणी जाणीव. आपण निरुपयोगी आहोत या एवढी दुःखद व वेदनादायक गोष्ट दुसरी कोणती असते? त्यातून आपल्याकडे वृद्धाश्रम रुजले नाहीत आणि आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात जे राहतात ते त्याहून दयनीय व लाचार. त्यांनी सारे केले असते, उभारले असते पण जे केले वा उभारले ते आता उपयोगाचे राहिले नसते आणि ज्यांच्यासाठी केले ते दूर गेले असतात. कधी मधी त्यांनाही या मागे राहिलेल्यांची आठवण येते आणि ते बहुदा दयाबुद्धीनेच येतात. काही दिवस कसेबसे घालवून जातात… मग पुन्हा त्यांच्या येण्याची वाट पाहायची आणि दिवस काढायचे.
ही अवस्थाच भीषण व भयकारी. ती कोणाच्या वाट्याला येऊ नये अशी. पण अपरिहार्यपणे येणारी. ती कशी टाळणार? आणि कोण टाळणार? प्रगत देशात त्यांच्या विरंगुळ्याची साधने व सोयी आहेत. पण ती सगळी कृत्रिम व्यवस्था आहे. आपलेपण नसणारी. पुन्हा नेपथ्यासारखी. दूरस्थ. आपली नसलेली… एकाकी अवस्थेचा हा प्रकार सर्वाधिक दुःखी करणारा व पाहणार्यालाही व्यथित करणारा आहे. तो आपल्या वाट्याला येऊ नये असे वाटायला लावणारा आहे.
या सबंध अवस्थेचा दोष नव्या पिढ्यांकडे वा मुला-मुलींकडे जात नाही. बदलत्या काळाच्या या बदलत्या गरजा आहेत. कामधाम, नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशांच्या मागे असलेल्या व त्यातील स्पर्धेला तोंड देत पुढे जाणार्या नव्या पिढीची यातील धावपळ समजून घेतली पाहिजे. त्यांना आई-वडिलांविषयीची आस्था नाही असे नाही. ती काळजी त्यांनाही आहे. पण त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत राहायचे म्हटले तर त्यांचे आयुष्य स्थिरावते वा आहे तेथेच थांबते. त्यांचे प्रगतीचे मार्ग खुंटतात. दर दिवशी त्यांच्या समोर नवी आव्हाने येतात. संधी येतात. त्या घेऊन त्यांनाही पुढे जायचे असते. ही पिढी नुसतीच आपल्यात रमणारी नाही. अलीकडे विदेशातील मुला-मुलींनी देशाच्या गंगाजळी वार्षिक ऐंशी अब्ज डॉलर्सची भर घातल्याचे सांगितले जाते. या तरुणाईने आपल्या घरांएवढीच देशाची श्रीमंतीही वाढविली आहे. येणारा काळही त्यांचा आहे. तो तसा समजून घेणेही गरजेचे व त्यानुसार आपली आयुष्ये आखणेही गरजेचे आहे.
एकाकीपण हे असे आयुष्यभर नकोशी वाटणारी सोबत करणारे, प्रसंगी जीवघेणी वेदना देणारे तर कधी आनंदाच्या झुळुका आणणारेही…
(लेखक नामवंत संपादक व विचारवंत आहेत)
9822471646