–सुनील तांबे
कुंदनलाल गुजरालांचा जन्म १९१० साली सध्याच्या पाकिस्तानातल्या झेलम जिल्ह्यातल्या चकवाल या गावी झाला. ते लहान असतानाच त्यांचं कुटुंब पेशावरला स्थायिक झालं. तिथे त्यांच्या वडिलांचं कापडाचं दुकान होतं. कुटुंब खाऊनपिऊन सुखी. एकुलते एक असल्यानं कुंदनलालांचे बरेच लाड होत. अभ्यासात लक्ष कमी, शिवाय चारदोन यत्ता झाल्या की दुकानांत काम करून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा हाच शिरस्ता असल्यानं वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी एका दुकानात काम करायला सुरुवात केली. या दुकानाच्या मालकाचं नाव होतं मुखा सिंग. पेशावराच्या गोरा बाजारातल्या एका लहानशा गल्लीत हे दुकान होतं. दोनचार प्रकारचे कबाब आणि जोडीला नान एवढंच इथे मिळायचं. ग्राहकांना बसण्यासाठी जागा नसल्यानं कबाब पत्रावळींत बांधून दिले जात. सुरुवातीला कुंदनलाल भांडी घासणं, मटण साफ करणं, कबाब बांधून देणं ही कामं करत. मग हळूहळू ते वेगवेगळ्या प्रकारचे कबाब करायला शिकले. हे कबाब कोळशाच्या शेगड्यांवर भाजले जात. कबाबांबरोबरची नान रोज सकाळी मुखा सिंग विकत आणत.
वर्षभरानंतरची गोष्ट. त्या दिवशी मुखा सिंगांची तब्येत फारशी बरी नव्हती. रात्री जेवायला जरा हलकं काहीतरी कर, असं ते कुंदनलालांना म्हणाले. कुंदनलालांनी कबाब करण्यासाठी आणलेली अख्खी कोंबडी घेतली आणि तिखट, आलंलसूण घातलेल्या दह्यात अर्धा तास मुरवून ठेवली. दुकानाच्या मागे कपडे वाळत घालायची जाड लोखंडी तार होती. कोंबडीला मीठ, मिरपूड लावून या तारेत खोचली. सोबत एक कांदाही खोचला आणि कोंबडीची रवानगी तंदुरात झाली. नीट भाजून कुंदनलालांनी तारेत खोचलेली कोंबडी बाहेर काढली आणि लिंबू पिळून मुखा सिंगांसमोर ठेवली. मुखा सिंगांना ही भाजलेली कोंबडी प्रचंडच आवडली. नेहमीच्या कबाबांपेक्षा हा वेगळा प्रकार. तेलकट नाही, शिवाय चविष्ट आणि हलका. पुढचे तीन दिवस मुखा सिंग आणि कुंदनलाल या दोघांनी हा नवीन पदार्थ अधिक चवदार कसा करता येईल, यासाठी अनेक प्रयोग केले, आणि गोरा बाजारातल्या त्या दुकानात १९२४ साली तंदुरी मुर्ग हा नवीन पदार्थ विक्रीसाठी ठेवला गेला.
मुखा सिंगांच्या दुकानात दोनतीन वर्षं काम केल्यावर कुंदनलालांच्या लक्षात आलं की, नान विकत आणण्यापेक्षा आपणच दुकानात तयार केले तर थोडेफार पैसे वाचू शकतील. पण हे नान भाजायचे कसे आणि कुठे? रोज घरी लागणारे नान आणि रोट्याही विकत आणल्या जात किंवा चौकाचौकांत असणार्या सार्वजनिक तंदुरांमध्ये भाजल्या जात. जिथे नान / रोट्या विकत मिळत त्या दुकानांमध्ये भाजायला फुर्न नावाच्या मोठाल्या भट्ट्या असत. घरी किंवा होटेलांमध्ये तंदूर असण्याची पद्धत नव्हती. तेरा वर्षांच्या कुंदनलालांच्या आग्रहावरून मुखा सिंगांनी मग दुकानासमोर तंदूर खणला. पेशावरच्या गोरा बाजारातला हा पहिला तंदूर. कुंदनलाल लवकरच नान भाजायला शिकले.
फाळणीनंतर कुंदनलाल दिल्लीला आले. दिल्लीत त्यांनी तंदूरी चिकन हा पदार्थ आणला. पुढे त्यांनी मोतीमहल हे रेस्त्रां सुरू केलं. बटर चिकन इत्यादी अनेक नवीन पदार्थ शोधले. जवाहरलाल नेहरू, निकिता ख्रुश्चेव, इत्यादी राजकारणी मोतीमहलचे षौकीन होते. मॉस्कोमध्ये तंदुरी चिकन सुरू करा असं निमंत्रण क्रुश्चेव यांनी कुंदनलाल यांना दिलं. कालपरवापर्यंत राष्ट्रपतीभवनातून मोतीमहलच्या खानसाम्यांना पाचारण केलं जायचं.
लेखक नामांकित पत्रकार व अभ्यासक आहेत)
9987063670
(maayboli.com वरून साभार)