वाद-प्रतिवाद :मनोरंजन क्षेत्रात मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच का दिसतात?

“मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. जेवढे मराठी चॅनल्स आहेत त्यातील मालिकांमध्ये ब्राह्मण नसलेली अभिनेत्री मुख्य भूमिकेत काम करते आहे का, ते शोधून पाहण्याचा प्रयत्न करा. या लोकांना जाधव, सोनावणे, टेंभुर्णी, मडके सापडत नाहीत का?’?”; असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेंनी ‘लोकसत्ता’ ला ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उपस्थित केला होता. त्यांच्या त्या वक्तव्यावर सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाली आहे . ब्राम्हण महासंघाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. “डहाके यांचे वक्तव्य हे निव्वळ मूर्खपणाचं आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचा हा उद्योग आहे,” अशी टीका ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

सुजय डहाके नेमकं काय बोलले? ऐका http://bit.ly/32Wa1UZ

या विषयात सोशल मीडियावर घमासान चर्चा सुरु आहे. विविध क्षेत्रातील माणसं या विषयावर व्यक्त होत आहेत. नामांकित लेखक, पत्रकार, कथाकार सुनील तांबे, संजय सोनवणी, बालाजी सुतार, गिरीश दातार यांच्या प्रतिक्रिया ‘मीडिया वॉच’ वाचकांसाठी -संपादक

………………………………………………..
-गिरीश दातार, कॉपी रायटर , रेडीओ मिर्ची

माझ्या मते सुजय डहाके, कला क्षेत्रातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादाबद्दल त्याची सल व्यक्त करतोय. आणि जे अतिशय योग्य असेच आहे. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकलावंताला अशी सल का वाटतीये, याचा ‘किमान विचारही’ न करता, त्याच्या बोलण्यात तात्विक पातळीवर खरच काही सत्य आहे का (मी तात्विक म्हणतोय. सांख्यिकी नाही त्यामुळे मूर्खासारखे कोणत्या सिरीयल आणि सिनेमांमध्ये किती ब्राह्मणेतर कलाकारांनी कामे केलीयेत याची उदाहरणे देत बसू नये) हे तपासून पाहण्याची, त्याच्यावर मूर्खासारखी टीका करणाऱ्यांना गरजही वाटत नाही – हीच खरी सांस्कृतिक वंचना आहे. ‘काहीही हां श्री’ असे म्हणून दुर्लक्ष करण्याइतकी ही क्षुल्लक टीका नाही.
काही अपवाद सोडल्यास, ब्राह्मणी चालीरीती, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी सण-सणवार, ब्राह्मणी पोशाख – हाच काय जणू epitome of ideal and standard culture अर्थात – भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक आदर्शाचा अत्युच्च नमुना आहे – अश्याच प्रकारे – ब्राह्मणांनी आपले सौन्दर्य निकष बहुजनांवर लादणे चालवले आहे. म्हणूनच सिरीयल, सिनेमांमध्येही बहुजन पात्रेही ब्राह्मणी चालीरीती आचरताना दिसतात. ( काही मोजके अपवाद वगळता ).ब्राह्मणांचा आणि सवर्णांचा वर्चस्ववाद अस्तित्वातच नसता तर फँड्री मधल्या जब्याच्या बापाला राष्ट्रगीत सुरू झाल्यावर हातचं सापडलेलं डुक्कर सोडून द्यायला लागताना होणारा क्लेश, मारलेलं डुक्कर वाहून नेताना बॅकग्राऊंड ला फुले, आंबेडकरांचे फोटो, कोर्ट सिनेमातल्या शाहिराला सातत्याने होणारी अर्थशून्य अटक, जब्याने सिनेमाच्या शेवटी प्रेक्षकांकडे भिरकावलेला दगड- या आणि अश्या दृश्यांची सिनेमांमध्ये हजेरीच लागली नसती. कलेतली ही अभिव्यक्ती – शोषितांना समजून घ्यायच्या आधी स्वतःला समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिल्यास – स्वतःत बदल घडवून आणण्याची शक्यता तरी निर्माण होईल.
ब्राह्मणी वर्चस्ववाद म्हणजे केवळ ब्राह्मण कलाकार संख्येने अधीक असणे, किंवा ब्राह्मणेतर कलाकारांची कलेच्या क्षेत्रात कमी संख्या असणे नव्हे तर याहून अधीक व्यापक स्वरूपात याचा विचार व्हायला पाहिजे. ‘न’ आणि ‘ण’ मधल्या फरकाने आपल्या सोबत काम करणाऱ्याला हीन लेखणे, ज्यांना तसे बोलता येत नाही म्हणून – त्यांना अत्यंत कळकळीने मराठीतले मोठे कवी तू कसे वाचले पाहिजेस ज्यामुळे तुझी भाषा कशी सुधारेल ( जणू काही मराठीतल्या मोठ्या कवींचा एकमेव जीवनोद्देश ‘पानी’ असा उच्चार करणाऱ्या लोकांची भाषिक आणि व्याकरणीय उन्नती घडवून आणणे हाच होता….), ‘जगात दोनच जाती – xxx आणि इतर’ – असे मेंदूतून न येता मोठ्या आतड्यातून बाहेर येणारे जातीवादी विनोद, किंवा सवर्णांनी आरक्षणाविरोधात व्यक्त केलेली खंत – ‘आणि बरंय बाई, आपल्या क्षेत्रात आरक्षण नाही’ म्हणून सोडलेला उसासा – अश्या असंख्य छोट्या- मोठ्या स्वरूपात हा सामाजिक, सांस्कृतिक वर्चस्ववाद पिढ्यानपिढ्या फोफावतोय – हे ध्यानात घेतले तर आपणही नकळत याचे वाहक कसे होत असतो – हे ध्यानात येईल.
ब्राह्मणी वर्चस्ववादाने तुकोबा, ज्ञानोबालाही सोडलं नाही हे आपल्या समाजातील कटू सत्य आहे. दि. पु. चित्रांनी यावर फार उत्तम आणि सडेतोड निरूपण केले आहे. ते म्हणतात – ‘उच्चवर्णीय भारतीयांचा पुनरुज्जीवनवाद, हिंदुत्वाच्या ब्राह्मणकेंद्रित कल्पनेवर आणि भाषेच्या संस्कृतकेंद्रित विकासावर अवलंबून होता आणि आहे’. आज मराठीत ‘दलित’ आणि ‘ग्रामीण’ वाङ्मयाचे निराळे शास्त्र मांडले जाते याचाच अर्थ हा की धर्म-वंश-वर्ण-वर्ग इत्यादी दृष्टींनी स्वतःला ‘निवडक’ आणि ‘अग्रेसर’ किंवा ‘सर्वोकृष्ट’ मानणाऱ्या ‘एलिट’ लोकांच्या वाङ्मयाच्या संकल्पना बहुजनसमाजाला बाहेर ठेवणाऱ्या आहेत. ‘दलित’ आणि ‘ग्रामीण’ असे वेगवेगळे कप्पे करणे हेच मुळी – संस्कृतीच्या भौगोलिक आणि वर्ण/वर्ग निरपेक्ष एकात्मतेलाच नकार देणारे आहे. रेड्याच्या तोंडून वेद वदवून, सांस्कृतीक वर्चस्ववाद राबविणाऱ्यांना रेड्याच्या पातळीवर आणणारे ज्ञानोबा – ब्राह्मणकेंद्रित सांस्कृतिक समाजव्यवस्थेवर कायमचा विनोद करून गेलेत हे विसरायला नको. दुर्दैवाने तो विनोद आजही वेगवेगळ्या स्वरूपात करता येऊ शकतो – ही खंत आहे.
……………………………………………………….
संजय सोनवणी , नामवंत लेखक , अभ्यासक

मला हे लिहायला अपार खेद होतो आहे पण लिहिलेच पाहिजे. ब्राह्मण स्त्रीयांवर ब्राह्मणांनी अनन्वित अत्याचार केले हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्या विरोधात सर्वाधिक बंड केले तेही ब्राह्मण स्त्रीयांनी.
इतर स्त्रीयांना कोणी अडवले नव्हते.
सर्वाधिक आंतरधर्मीय विवाह केले तेही ब्राह्मण स्त्रीयांनी. अगदी समाजबाह्य मानल्या गेलेल्यांशीही लग्ने केली. हे विवाह करुनही अपवाद वगळता अवहेलना झेलली तीही ब्राह्मण स्त्रीयांनी.

अनेकांनी ब्राह्मण पोरगी “झोपवायची” या विकृत लालसेने तिला लग्नाच्या बेडीत अडकवुन तिचे शोषण केलेले मी स्वत: पाहिलेले आहे.
ब्राह्मण स्त्रीयांनी बंड करत लावणी स्विकारली, गरबाही स्विकारला आणि भरतनाट्यमही.
वास्तव हे आहे की ब्राह्मण महिलांवर ब्राह्मणांनी अत्याचार केले पण तेवढेच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक अत्याचार अब्राह्मणी म्हणवणा-यांनी केले. या विकृतीबद्दल काय म्हणायचे आहे?
ब्राह्मण महिला सर्वाधिक बंडखोर निघाल्या असतील तर त्याचे कौतूक करायचे की निंदा? त्या पुढे जात असतील तर कौतुक करायचे की स्वत: आपल्या पोरींना बंधनात ठेऊनही त्या पुढे का येत नाहीत याबाबत गळे काढायचे आणि पुन्हा जात-धर्माला नांव ठेवा्यची दांभिकता करायची?
मला वाटते, आपण सारे दांभिक आहोत. सावित्रीमाईंचे नांव घेण्याचीही आपले लायकी नाही. त्यांनी जमेल तेवढ्या ब्राह्मण स्त्रीयांना वाचवले, बाळंतपणे केली. ममतेने सांभाळ केला. त्यांचाच एक अनाथ पुत्र दत्तक घेतला. ती महानता आम्हात नाही.
अधिकांश ब्राह्मण स्त्रीयांचा मला अभिमान आहे.
त्यांच्याशी इतर स्त्रीयांना स्पर्धा करता येत नसेल तर अंतर्मुख होत त्यांनी विचार केला पाहिजे!

…………………………………………………….
-सुनील तांबे , नामवंत पत्रकार व अभ्यासक

अब्राह्मण अभिनेत्री मराठी सिनेमात का नाहीत, या प्रश्नाचं उत्तर चित्रपटकर्मींनी द्यायला हवं.
कारण अभिनेता वा अभिनेत्री कोण असावी याचा निर्णय निवडणुकीने होत नसतो.
पण संस्कृतीमध्ये त्याची कारणं शोधता येतील. हा विषय समाजशास्त्रीय अभ्यासाचा, सर्वेक्षणाचा आहे. रयत शिक्षणसंस्था वा अन्य शिक्षणमहर्षींच्या संस्था या विषयाचा समाजशास्त्रीय अभ्यास का करत नाहीत?
माहिती वा डेटा, त्याचं विश्लेषण यावर आधारित लेख वा परिसंवाद मराठी समाजात का घडत नाहीत?
मतं, मतांतरं यावरच आपण का खूष होतो?
आपल्या समाजातील स्थित्यंतरांचा अभ्यास, सर्वेक्षण आपल्या शिक्षणसंस्था का करत नाहीत?
या प्रश्नाचा संबंध आपल्या म्हणजे मराठी व भारतीय समाजाच्या सौंदर्य कल्पनांशी (यामध्ये केवळ स्त्री देह वा वर्ण नाही तर उच्चार, देहबोली, चित्रपटांची कथावस्तू अर्थात प्लॉट, अशा अनेक घटकांशी संबंध आहे)
आपल्या समाजाची अभिरुची अशी का घडली?
हा अभ्यासाचा विषय आहे.

बालाजी सुतार , प्रतिभावंत कवी व कथाकार

भयावह जातीयुद्धाच्या ज्वालामुखावर आपण बसलो आहोत असं एकुणात चित्र आहे. इतक्या चिरफाळल्या लोकांच्या इतक्या कडवट हिंसक जत्थ्यांना महात्मा फुल्यांनी मांडलेली ‘एकमय समाजा’ची कल्पना कधी कळेल, उमजेल, आचरणात आणता येईल ही आशा व्यर्थ आहे.

मागच्या काही दिवसांत काही जातीवंत लोकांच्या पोस्टस-काॅमेंट्स आणि त्यावर प्रतिवाद म्हणून किंवा स्वतंत्रपणे अन्यत्र लिहिलेल्या आणखी काही जातीवंत लोकांच्या पोस्ट्स आणि काॅमेंट्स वाचल्या. जातीजातींनी मनामनांमध्ये इतकी अशक्य दुर्लंघ्य फाळणी करून टाकलेली आहे की ते कृष्णाचे वंशज यादव आपसात लढून मेले होते तसलं काही घडून एखाद्या दिवशी इथली सगळीच जातवान प्रजा कुत्र्याच्या मौतीने मरेल.

जातीधर्म समूळ सोडून लवकरात लवकर माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिकलो नाही तर एकमेकांना पाणीसुद्धा पाजणारं असणार नाही कुणी.
अंधारयुगात होता तसला गोठवणारा सन्नाटा उरेल फक्त.
……………………..

ऋतुराज फडके, अभिनेता

सुरू असलेल्या मालिकेतील नायिका
बाळू मामा – कोमल मोरे
राजा राणी – शिवानी सोनार
छत्रपती संभाजी – प्राजक्ता गायकवाड
स्वामींनी – सृष्टी पगारे
Mrs मुख्यमंत्री – अमृता घोंगडे
विठू माउली – एकता लब्धे
प्रेमाचा गेम सेम टू सेम – सायली जाधव
वैजु नं 1 – सोनाली पाटील

या पूर्वीच्या मालिकेतील नायिका
तू अशी जवळी रहा – तितिक्षा तावडे
आम्ही दोघी-. खुशबू तावडे
मानसीचा चित्रकार तो -अक्षया गुरव
एक राजकन्या – किरण धाणे
जुळून येती रेशीमगाठी. – प्राजक्ता माळी
छत्री वाली – नम्रता प्रधान
साता जन्माच्या गाठी – अक्षया हींदलकर
राधा प्रेम रंगली- वीणा जगताप
ललित 205- अमृता पवार
नांदा सौख्यभरे- ऋतुजा बागवे
सगळ्या उत्तम अभिनेत्री आहेत, आणि talent mule kaam मिळाली आहेत..
कोणतही चॅनल जात , धर्म बघून काम देत नाही तर talent बघून काम देत..
असो.
टिप – लोकसत्ता वाल्यांनी सुध्दा अभ्यास करून मुलाखत घ्यावी , हो ला हो करून मुलाखत नाही घेता येत

………………………………………

शर्मिष्ठा भोसले, पत्रकार व कवी

बरं का वाईट हे एकवेळ अलाहिदा, पण भारतीय समाजाचा भवताल जात, धर्म, लिंग,वर्ण, प्रादेशिकता आणि त्यासंदर्भाने ठरणारी उतरंड यानं ठासून भरलेला आहे. त्या उतरंडीत तुम्ही नक्की कुठल्या ‘लोकेशन’वर आहात हीच बाब ठळकपणे तुमची ‘दृष्टी’ घडवत आणि सतत प्रभावित करत राहते. काही लोक हा प्रभाव ओलांडतात, काही जाणता-अजाणता मरेपर्यंत त्याच्यातच अडकून बसतात. मात्र हे नक्की, की ही उतरंड आणि त्याचं बहुपदरी राजकारण कळल्याशिवाय तुम्ही भारतीय समाजच काय, स्वत:लाही समजून घेऊ शकत नाही.

हे माझं रिडिंग चुकीचंही असू शकेल, पण तुम्ही कथित उच्चजातीय असताना तुम्ही कास्ट ब्लाईंड (जातवास्तवाबाबत आंधळे/अज्ञानी) असण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही पुरुष असाल, जो बहुतेकदा पितृसत्तेचा लाभार्थी असतो, तर तुम्ही जेंडर ब्लाईंड असण्याची शक्यता जास्त असते. मग, आता कुठं उरलाय जातिभेद, आता कुठं स्त्रियांना भेदाचा सामना करावा लागतो असा भाबडेपणा किंवा चलाखपणा तिथं जन्मतो… हे असंच वर्ण, वर्ग, भाषिकबाबतीतही पडताळून बघता येईल.

तर, मुद्दा ‘दृष्टी’चा. सामाजिक सांस्कृतिक वर्चस्ववादाचं राजकारण आता अस्तित्वातच नाही, किंवा हे असं असेल तर असू द्यावं, त्याचं काय एवढं… शेवटी गुणवत्ताच समोर येते असं काय काय म्हणणारे लोक नेमके कुठल्या ‘लोकेशन’वर उभे आहेत हे बघणं मला इंटरेस्टिंग वाटतं.

…………………………………..

समीर दिलावर शेख

‘मराठी मनोरंजन विश्वातील ब्राह्मण पात्रं’ यावर सुजय डहाके अतिशय कॅज्युअली रिऍक्ट झाला, आम्ही काही वर्षांपूर्वी व्हायचो तसंच.. डिटीएच नव्हतं केबल चैन होती, तेव्हा कधीतरी मराठी चॅनेल पाहायला मिळायचे कुठे, आणि नाटकी वाटायचं सगळं. मी उपनगरात (त्यातली बरीच वर्षे मुस्लिम मोहल्ल्यात) लहानाचा मोठा झालो असल्यामुळे ब्राह्मण आणि ब्राह्मणी संस्कृती यांचा सहवास अंमल उशिराच लाभला. इथे नामदार गोखले रस्त्यावरील रानडेत आल्यावरच तो खऱ्या अर्थाने लाभला.

तोवर डिटीच घरोघर पोचले, टीव्ही असला तरी मालिका पहायला कुणाला वेळच नसायचा. कधीतरी मावशी राहायला आली जोडीने, की झी मराठी लावायची. लावूनच बसायची दोघं. एके दिवशी लागोपाठ चार पाच तास पाहिली ही वाहिनी (content analysis चं खुळ शिरलं होतं, नवीनच शिकलो होतो) हादरलोच.

तोवर कॉलेजात कम्युनिकेशन थेरीत ग्रामसीची कल्चरल हेजीमनीही डोक्यात जात होती, ती उदाहरणासकट याची देही याची डोळा पाहता आली मावशीच्या आवडत्या कार्यक्रमांत…
माझ्या मैत्रिणी ब्राह्मण आहेत, सहकारी ब्राह्मण आहेत याचा कोण अभिमान वाटायचा मावशी, काका, आज्जीला. ‘बम्मन के साथ रह्यता, सैल्या (सहेलियाचं दखनी रूप) भी बम्मन हय’ याचं अप्रूप वाटायचं त्यांना…

सुजय कार्यक्रमातील पात्रांच्या जातीविषयी बोलला, बहुतांश मंडळींना वाटलं तो मुख्य भूमिकेतील कलाकारांच्या जातीविषयी बोलला असं वाटतंय.. बरेच जण त्यावरच रिऍक्ट होताहेत. तोही मुद्दा महत्वाचा असला तरी तूर्तास विषय कल्चरल हेजीमनीचा आहे आणि त्यावर बोलणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

डहाकेवर बरीच जणं तुटून पडलेत..जात नाहीत, मनोरंजन क्षेत्रात नाही, आम्ही मानत नाही वगैरे.. शिल्पा कांबळेंनी एक कोट शेयर केलाय त्यांच्या wall वर. ‘If you are gender blind, then you are male., And if you are caste blind then you are upper caste’ या स्वरूपाचं ते वाक्य आहे.

हा हेजीमनी आणि रिप्रेजेंटेशनचा मुद्दा फक्त मनोरंजन विश्वापुरताच नाही. माध्यमांमध्येही हीच (किंवा याहून बिकट) अवस्था नाहीये का?

योगेंद्र यादव आणि अनिल चमडिया यांनी देशभरातील प्रमुख माध्यम समूहांच्या (विशेषतः मुद्रित माध्यमे. उदा वृत्तपत्र) संपादकीय मंडळाचा अभ्यास केला होता. त्यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. त्यावेळी केवळ एक दलित संपादकीय जबाबदारी सांभाळत असल्याचे त्यांच्या संशोधनातून पुढे आले होते. आताही फार बरी परिस्थिती आहे अशातला भाग नाही.

मी विचार केला (माझ्यातला मुसलमान आता वरचेवर जागा होत असल्यामुळे), की अशी वेळ केव्हा येईल जेव्हा मराठी वाहिन्यांवरील मुस्लिम पत्रांविषयी चर्चा होईल? (स्वप्नही पडत नाहीत हो अशी, अजिबात आशा नाहीये, विषय निघालाय म्हणून सांगतोय) मुसलमान पात्रं असतात की, ती ऐतिहासिक कार्यक्रमात. (मुघल सैनिक किंवा शिवाजी महाराजांचा निष्ठावान वगैरे) कंटेंमपररी कार्यक्रमात मुस्लिम पात्रं कधी येणार? मला वाटतं हिंदुराष्ट्र होईस्तोर शक्य नाही, ते एकदा झालं की मग येईल कार्यक्रम… ‘असे होते मराठी मुसलमान!’

……………………………………………

Acyme Rajeune

इथं पुरोगामी ब्राम्हण कलाकारांनी (अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, इत्यादी) भूमिका घेणं अपेक्षित आहे. सेव्हियर म्हणून नाही तर अँटी-कास्ट सॉलिडॅरिटीचा भाग म्हणून. प्रस्थापितांमधल्या पुरोगामीत्वाशी बांधिलकी असणाऱ्यांनी चार शब्द निर्भीडपणे बोलले तरी तर त्यांचं इंडस्ट्रीतलं स्थान लगेच धोक्यात येत नाही. तो प्रिव्हिलेज इतरांना असणं अवघड आहे.

मुद्दा व्यवस्थात्मक आहे, त्याला वैयक्तिक बनवून त्यावर “सगळं काही ठीकच चालू आहे” असं पांघरून टाकण्याचा कांगावा करणाऱ्या शशांक केतकर सारख्यांचे डोळे स्वजातीय अँटी-डोट मिळाल्याशिवाय उघडणार नाहीत.

मेघना भुस्कुटे

मी एका हिंदू ब्राह्मण, शहरी, शिक्षित कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आहे आणि या सवर्णतेमुळे, बहुसंख्याकपणामुळे, शहरीपणामुळे, शिक्षणामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या जातीतल्या लोकांना, मला जे काही दृश्यादृश्य फायदे झाले, त्यांचा परिणाम म्हणून मी ‘मी’ आहे. दोन्हींकडचे आजीआजोबा, पुढे आईवडील शिकलेले होते, शिक्षणाची किंमत जाणत होते, म्हणून मला शिक्षणाकरता काडीमात्र संघर्ष करावा लागला नाही. मी स्त्रीलिंगी व्यक्ती असल्यामुळे शालेय शिक्षण फुकट झालं, तर माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती, म्हणून माझं महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत कमी पैशांत झालं. आज ज्या भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळाला आहे, ती भाषा कुटुंबात-परिसरात बोलली जात होती, म्हणून प्रमाणभाषेवर प्रभुत्व कमावता आलं. स्वच्छता, साक्षरता, आर्थिक नियोजन, विवेक या सगळ्या मूल्यांकडे लक्ष्य देणं घरादाराला परवडत होतं, त्यामुळे माझ्यावर तसे संस्कार झाले. वाचन या छंदाला समाजात मान होता, म्हणून वेळ घालवण्यासाठी लागलेला माझा छंद मला आपोआप अभ्यासू ठरवून गेला. हे सगळं घडण्यामागे माझ्या कुटुंबीयांची ब्राह्मण ही जात कायम दृश्य वा अदृश्यपणे उपस्थित होती. थेट शोषण नसेल. पण पूर्वीच्या शोषणाच्या पायावरच हे फायदे बांधलेले होते. पांढरपेशेपणाला समाजात असलेला प्रतिष्ठितपणा माझ्या पथ्यावर पडला. सरकारी व्यवस्थेनं देऊ केलेले फायदे मी मनःपूत भोगले. आज त्याचे फायदे उपभोगते. त्यांच्या जिवावर माझा शाणपणा आज चालू शकतो.
मला, माझ्या मायबापांना, माझ्या आजूबाजूच्या माणसांना कुणाकुणाकडून कायकाय मिळालं आहे, त्याची स्वच्छ जाणीव मी मनाशी बाळगावी. मला त्याचा कदापि विसर पडू नये. आरक्षणांना, समाजवादी धोरणांना, स्त्रीसबलीकरणाला विरोध करण्याइतकं मी उतूमातू नये. आजूबाजूच्या विषमतेची जाण मनात कायम वसावी. तिला प्रश्न विचारण्याची हिंमत राहावी. इतकीच आज प्रार्थना.

सोनाली शिंदे

सुजय डहाकेंचं वक्तव्य चुकीचे आहे की बरोबर ते पाहूच…पण मला समजायला लागल्यापासून तरी हा प्रश्न कायम पडतो.

मालिकांची १०० टक्के कुटुंब सवर्ण आहेत … कुठल्या मालिकेतल्या कथेत कधी SC|ST कुटुंब लीड झालेय का ?… सर्व मालिकांतील कथांमध्ये गणपती, दसरा, दिवाळी, होळी साजरी केलेली दाखवली जाते… त्यात कधी महापरिनिर्वाण दिन, बौद्ध जयंती असते?

ता. क. इथे कोणत्याही जाती किंवा धर्माला दुखावण्याचा किंवा कमी-जास्त समजण्याचा मुद्दा नाहीये. पण हे वास्तव आहे

हेही वाचा-  यात कुठे आला जातीयवाद ?http://bit.ly/2TMXXkT

Previous articleतंदुरी मुर्ग ची जन्मकथा–
Next articleॲरिस्टॉटलचे विज्ञान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.