-मीडिया वॉच टीम
ABP माझा या वृत्तवाहिनीची लोकप्रिय News Anchor ज्ञानदा कदम हिची सध्या नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा आहे. तिच्या चाहत्यांनी ‘काय सांगशील ज्ञानदा..’ या नावाने फेसबुकवर खास पान तयार केले आणि त्यानंतर ज्ञानदाच्या नावाने कविता, चारोळ्या , मीम्स सोशल मीडियात सतत आदळत आहेत. विशेष म्हणजे ABP माझा व ज्ञानदानेही हे खिलाडूपणाने घेऊन ‘काय सांगशील ज्ञानदा..’ या title खाली काल स्पेशल News Bulletin सादर केले .
ज्ञानदा कदम ही चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही .आपल्या प्रसन्न व आत्मविश्वासपूर्ण निवेदनशैलीसाठी जाणारी ज्ञानदा याअगोदरही वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत असायची पण सध्या ती तुफान ट्रेंड होते आहे . ABP माझातील सहकारी News Anchor प्रसन्न जोशी याच्यासोबत वेगवेगळे शो किंवा चर्चेचे कार्यक्रम सादर करताना एखाद्या विषयाची अधिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी किंवा विषयाची अधिक उकल होण्यासाठी प्रसन्न जोशी तिला काय सांगशील ज्ञानदा..?असा प्रश्न करायचा . ते काय सांगशील ज्ञानदा…हे एवढं तुफान लोकप्रिय झालं की एखाद्या विषयात ABP माझाची चूक झाली किंवा या वाहिनीकडून कुठला अतिरेक झाला की सोशल मीडियावर लगेच ‘काय सांगशील ज्ञानदा…’म्हणत ABP माझाची खेचली जाते. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या…’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही श्रेया बुगडेने ज्ञानदाची नक्कल, विडंबन करून धमाल उडवून दिली होती.
‘कोरोना’ मुळे महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ABP माझाने News Anchor च्या घरातून News Bulletin च्या प्रसारणाचा प्रयोग केला . ज्ञानदा कदमने तिच्या डोंबिवलीच्या घरातून त्याची सुरुवात केली . तिने घरगुती वेशभूषेत आत्मविश्वासाने, अतिशय ‘कूल’ पद्धतीने Anchoring केले . सध्या लॉकडाऊनमुळे दिवसभर TV समोर ठाण मांडून बसलेल्या प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला यामुळे बहार आला नसता तरच नवल होतं. घरगुती ज्ञानदाला पाहून लोकांना लगेच कविता सुचायला लागल्यात.
ऐकूनी तुझा आवाज
पाहूनी तुझी अदा
महाराष्ट्र झाला फिदा
२१ दिवस आता फक्त
तुलाच बघायचं ज्ञानदा
काय सांगशील ज्ञानदा …
काल दिवसभर सोशल मीडियात ज्ञानदाबद्दलची ही कविता फिरत होती. ज्ञानदा कदमबद्दलचे काही मीम्सही खूप फिरत आहेत .एका मीम्समध्ये नमस्कार मी ज्ञानदा कदम…असे तिने म्हणताच समोरील प्रेक्षक फुटबॉलच्या सामन्यात करतात तसा जल्लोष (https://bit.ly/2UB7Tyi) करत असल्याचे पहावयास मिळते . ज्ञानदाची लोकांमधील क्रेझ पाहावयची असेल तर ‘काय सांगशील ज्ञानदा.,,या Facebook Page (https://www.facebook.com/kaysangshildnyanada/) वर जरा फेरफटका मारून या. ज्ञानदाच्या चाहत्यांनी २२ मार्चला हे फेसबुक पेज सुरु केले. ज्ञानदाबद्दलची क्रेझ दर्शविणारे खूप सारे फोटो,कविता,चारोळ्या,विनोद या Page वर दिसतात. केवळ चार दिवसात या फेसबुक पेजला १०,५०० लोकांनी like केले आहे. ज्ञानदा कदम Fan Club नावाचा एक ग्रुपही फेसबुकवर आहे . त्याचेही १५००० पेक्षा जास्त सदस्य आहेत.
‘काय सांगशील ज्ञानदा..’ या फेसबुक पेजची चर्चा होतेय आणि सोशल मीडियावर ज्ञानदा जोरात Trend होते आहे हे पाहून ABP माझाने काल दुपारी ‘काय सांगशील ज्ञानदा..’ या title खाली ज्ञानदालाच News Bulletin सादर करावयास सांगितले . या Bulletin मध्ये ज्ञानदा तुम्हाला हे सांगतेय असे सांगत , कोरोनाच्या साथीत काय काळजी घ्यायची हे तिने सांगितले . या बुलेटीनचीही जोरदार चर्चा झाली.(https://www.youtube.com/watch?v=p4hpiGLtDvM) हे बुलेटीन प्रसारित होताच ‘काय सांगशील ज्ञानदा.’.या फेसबुक पेजवर व ज्ञानदा कदम Fan Club या ग्रुपवर जोरात जल्लोष झाला.
काय सांगशील ज्ञानदा.. या News Bulletin नंतर नेटकऱ्यांमध्ये ज्ञानदाबदल अधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता दिसते आहे . Google Search मध्ये सध्या ज्ञानदा कदमबद्दल माहिती जाणून घेवू इच्छिणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे . यावर्षी महिला दिनानिमित्ताने ABP माझावर ज्ञानदाची रिपोर्टर ते अँकर, हा प्रवास उलगडून दाखविणारी जी मुलाखत झाली (https://www.youtube.com/watch?v=3Hm1XlPv14c) त्याची Viewarship ही दीड लाखाच्या घरात गेली आहे .