उदारमतवाद्यांनी समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवायला हवा!

बीइंग इन्क्विझिटिव्ह -२

-उत्पल व्ही. बी.

 दीड वर्षापूर्वी मी वैभव राऊतच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाबद्दल एक पोस्ट केली होती. ‘मी आणि गांधीजी’ या मालिकेत. यात माझा एक छुपा उद्देश होता हे प्रथम कबूल करतो. ही पोस्ट लिहिल्यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासाठी खरं तर मी पोस्ट केली होती. नेहमीचे आक्षेप घेतले जातात का हे मला पाहायचं होतं. काही मिनिटातच आक्षेप घेतले गेले. मग मी ठरवलं की आपला उद्देश तर पूर्ण झाला आहे त्यामुळे आता ही पोस्ट काढून टाकावी आणि आपलं म्हणणं वेगळं मांडावं. पण नंतर विचार केला की ती तशीच ठेवू आणि आपल्याला जे म्हणायचं आहे ते लिहूच. त्यामुळे ती पोस्ट तशीच ठेवली आहे.

‘बीइंग इन्क्विझिटिव्ह’ या शीर्षकाने मी एक मालिका सुरू करायचा विचार केला होता. पहिला लेख लिहिल्यानंतर समहाऊ परत लिहिलं गेलं नाही. पण आता या निमित्ताने लिहिलं जाईल असं वाटतंय. मागील काही महिन्यात काही घटना घडल्या. संविधान जाळलं गेलं, उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न झाला, स्वामी अग्निवेश यांच्यावर दोनदा हल्ला झाला. गोरक्षकांचे हल्ले नव्याने झाले नसले तरी अधून-मधून होत आहेतच. अटलबिहारी वाजपेयींच्या निधनानंतर एमआयएमच्या आमदाराचं प्रकरण झालं. काल फेसबुकवर एकाने एक पोस्ट शेअर केली होती. अटलबिहारी वाजपेयींबद्दल अपशब्द उच्चारले म्हणून भोसरीतील एका शिक्षकाला मारहाण झाली. ‘अभाविप आणि भाजपच्या समर्थकांनी कुत्र्यागत तुडवलं. घरातून बाहेर काढून – कपडेही घालू दिले नाहीत’ असं पोस्ट शेअर करणाऱ्याने लिहिलं होतं. त्याला या घटनेचा अभिमान वाटत होता. केरळमधील प्रलयाच्या दुःखद पार्श्वभूमीवरदेखील काही संतापजनक पोस्ट्स सोशल मीडियावर केल्या गेल्या.

एकूणात वातावरण अस्वस्थ आहे हे तर खरंच. एकीकडे टोकदार स्वरूपाचा हिंदुत्ववाद प्रबळ होत असताना दुसरीकडे बहुसंख्य ‘हिंदू मानस’ अजूनही ‘हिंदू असण्या’प्रती हळवं आहे आणि त्यांना हिंदू धर्माची चिकित्सा नको आहे किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा झाली तरच हिंदू धर्माची चिकित्सा मान्य आहे असं दिसतं. त्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे ज्या घटनांचा संबंध अतिरेकी हिंदुत्ववादाशी पोचतो त्याबद्दलही कुणी काही बोलू नये अशी अपेक्षा तयार झाल्यासारखी दिसते.

मला असं वाटतं की आज झुंडीची मानसिकता ज्याप्रकारे वाढते आहे ती लक्षात घेता आपल्या धर्माविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारी जी धार्मिक मानसिकता आहे (हिंदू आणि मुस्लिम दोन्ही) तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण जी मानसिकता आज सॉफ्ट आहे ती उद्या हार्ड होऊ शकते.  मी वर माझ्या ज्या पोस्टचा उल्लेख केला त्यावरील प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देणं शक्य असलं तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही हे दिसून आलेलं आहे. कारण धार्मिक दुखावलेपण हे तीव्र स्वरूपाचं असतं आणि तिथे प्रतिवाद केला तरी तो स्वीकारला जात नाही. एका धार्मिक कट्टरतेची चिकित्सा दुसऱ्या धार्मिक कट्टरतेच्या ‘रेफरन्स’नेच झाली पाहिजे यात ‘लॉजिकल फॅलसी’ आहे – म्हणजे ते तर्कदृष्ट्या योग्य नाही. पण भारतीय संदर्भात त्याला वेगळा आयाम आहे हे खरं. कारण कट्टर हिंदुत्ववाद हा कट्टर मुस्लिम धार्मिकतेची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिला आणि बळकट झाला असं म्हटलं जातं. याबाबत एक विचार करायला हरकत नाही. समजा भारतावर मुस्लिम शासकांनी राज्य केलं नसतं आणि पुढे मुस्लिम मूलतत्त्ववादाची झळ भारताला पोचलीच नसती तर हिंदू धार्मिकता कट्टर न होता जातीय कट्टरताच फक्त उरली असती असं म्हणता येईल का? ‘जर-तर’ च्या प्रश्नांना फारसा अर्थ नसतो हे खरं, पण हिंदू धार्मिकतेच्या स्वरूपाचा विचार करताना हा प्रश्न मनात डोकावतो आणि तो तितकाही अप्रस्तुत वाटत नाही. आणि गंमत म्हणजे आज धार्मिक कट्टरता जशी आहे तशीच जातीयही आहेच. धार्मिक आहे म्हणून सगळे एकत्र एका झेंड्याखाली आहेत असं झालेलं नाही. याला धार्मिक पुनुरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेलं अपयश म्हणायचं, मर्यादित यश म्हणायचं की याची अन्य प्रकारे चिकित्सा करायची हाही एक प्रश्न आहेच. सध्या तो नोंदवून पुढे जाऊ.

या मालिकेतील पहिल्या लेखाच्या शेवटी ‘फक्त हिंदू कट्टरतावादालाच फटकारे का या मुद्द्यावर आणि समंजस हिंदुत्व, पुरोगामी विचार यांच्या सहअस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवर पुढच्या भागात बोलू ‘ असं मी लिहिलं होतं. खरं तर यातील पहिल्या मुद्द्यावर मी याआधी लिहिलंच आहे. भारतातील उदारमतवादी मुस्लिम कट्टरतेबाबत शांत असतात आणि हिंदू कट्टरतेबाबत मात्र बोलतात या आरोपात तथ्य आहे हे मी खूप आधी मान्य केलेलं आहे. त्याबरोबर त्याची कारणमीमांसा करण्याचाही प्रयत्न मी केला आहे. ते कुणाला वाचायचं असेल तर मला संपर्क करावा. सगळ्याच पोस्ट सेव्ह केलेल्या नाहीत. पण काही नक्कीच असतील.

या टिपणात दुसऱ्या मुद्द्याला धरून थोडं बोलूया.

एक गोष्ट स्पष्ट आहे की धर्माची प्रस्तुतता मान्य केली तरी धर्म बहुसंख्य माणसांना हळवा आणि म्हणून कट्टर बनवत असल्याने धर्माच्या कक्षेच्या बाहेर राहून जे विचार करू शकतात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढे जाण्याआधी एक किस्सा सांगतो. ‘साइनफेल्ड’ ही एक गाजलेली अमेरिकन मालिका. ‘फ्रेंड्स’च्या आधीची. खूप आधी पाहिली होती. सध्या परत अ‍ॅमॅझॉन प्राइमवर बघतो आहे. यातील एका भागात एका स्री व्यक्तीरेखेच्या तोंडी असा संवाद आहे की तिचं आणि गांधींचं पॅशनेट प्रेमप्रकरण होतं. ‘गांधी त्यांचं टक्कल असलेलं डोकं तेलात बुडवून माझ्या शरीरावर फिरवत असत’ असं ती म्हणते. (मूळ इंग्लिशमध्ये ऐकायला हे अधिक गंमतीदार वाटतं). आता हे बघत असताना मी हसत होतो. याचं कारण काय? एक म्हणजे मी लिबरल आहे, दुसरं म्हणजे विनोदी म्हणूनही, त्या विशिष्ट संदर्भात मला ते मान्य होतं. पण हा किंवा असा विनोद एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याने केला असता तर मला तो चालला असता का? याचं उत्तर असं की विनोद जर खरंच दर्जेदार (आता यात सापेक्षता आहे, पण त्याला इलाज नाही) असेल तर आवडेल. नसता तर राग आला असता किंवा तिकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख लेखात वगैरे केला असता. मी जरी विनोद एंजॉय केला तरी तो ‘निखळ विनोद’ आहे की ‘राजकीय स्टेटमेंट’ आहे हे मला समजलं असतं.

आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. मी जर कट्टर हिंदू धार्मिकतेबाबत विनोदाने काही लिहिलं तर एखादा हिंदुत्ववादी ते विनोदाने घेऊ शकत नाही कारण त्याला त्यात निखळ विनोद दिसत नाही. त्याला त्यात राजकीय कोन दिसतो कारण विनोदाच्या मांडणीकडे तो त्या कोनातून बघतो. (आमच्या एका बऱ्यापैकी हिंदुत्ववादी काकांनी केलेला एक विनोद आठवला. कशावरून तरी तलाकविषयी बोलणं सुरू होतं. माझी आई उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. तिथे बऱ्याच मुस्लिम शिक्षिका होत्या. मी सहज म्हटलं की मला आठवत नाही कधी तलाक वगैरे झाल्याचं. त्यावर काका म्हणाले – नोकरी करणाऱ्या बायकोला कोण तलाक देईल? मी काकांना एक हिंदुत्ववादी टाळी दिली!)

हा एक तिढा आहे आणि विशिष्ट संदर्भात आपण निव्वळ व्यक्ती म्हणून राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेलच. पण याच्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की संघटित धर्माच्या कक्षेबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्याकडे जास्त जबाबदारी असली तरी जे कक्षेच्या आत आहेत त्यांनीही परिघाकडे थोडा प्रवास करायला हरकत नाही. मुळात एक तर गांधी, फाळणी, काश्मीर, हिंदू-मुस्लिम याबाबत पुष्कळ गैरसमज असतात. राजकीय स्थित्यंतराच्या काळात जे घडतं त्याचं सोपं आकलन करून दिलं जातं. नरेंद्र मोदींबाबत मला काहीही वाटत असलं तरी काश्मीरमध्ये तुम्हाला कुठे काय करता आलं असं विचारायचा मूर्खपणा मी करणार नाही. कारण तिथली गुंतागुंत समजून घेण्याइतपत आपला अभ्यास नाही हे मला माहीत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला असं दिसतं की समस्त हिंदुत्ववाद्यांचा हा अभ्यास  झालेला असून त्यांना दिल्लीत निर्णय घेण्यासाठी बोलवायचंच काय ते बाकी आहे! त्यामुळे हिंदुत्ववादाच्या स्वरूपाविषयी काही बोललं तर त्याचा संबंध काश्मीर, फाळणी, मुस्लिम तुष्टीकरण याच्याशी न जोडता ‘हे आपल्याच सामाजिक सुधारणेसाठी उपयोगी असू शकेल’ असा विचार तरी किमान करून पाहावा.

मुद्दे अजून आहेत पण सध्या आवरतं घेतो. आज जे अस्वस्थ करणारं चित्र दिसतं त्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन गोष्टी दिसतात –

  • एक म्हणजे माझ्यासारख्या उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची ‘ग्रॅव्हिटी’ लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं – जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.)

  • दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर माफी मागणं. यात भूमिका बदलायचा प्रश्नच येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता ‘माणूस दुखावला गेला’ म्हणून माफी मागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. (जबाबदारी जास्त आहे हे जे मी वर म्हटलं आहे ते इथे लागू होतं.)

  • तिसरं म्हणजे वर म्हटलं तसं धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपली कक्षा सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा थोडी अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत.

  • हेही वाचा- हिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का? https://bit.ly/33KlOWR-

  • (लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)

    9850677875

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous articleकाय सांगशील ज्ञानदा?
Next article‘हिंदू असणं’ म्हणजे नक्की काय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.