बांद्र्यातल्या गर्दीसाठी आज जरी राहुल कुलकर्णींच्या रूपानं गृहमंत्री अनिल देशमुखांसह सरकारला तोंड लपवण्यासाठी जागा मिळाली असली तरी काही प्रश्न त्यांचा पिछा सोडणार नाहीत. बांद्र्यातली गर्दी ही काही मजुरांची नसल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंच आहे. मग ही आगलावी गर्दी जमवली कुणी ? उद्धव ठाकरेंचं यश मिळवत असलेलं नेतृत्व कुणाच्या डोळ्यात खुपतंय याचा शोध खुद्द त्यांनीच घ्यायचाय. वाधवानचं प्रकरण आणि बांद्र्याची गर्दी हा योगायोग नक्कीच नाही. राहुलनं जी मुळ बातमी दिली त्याच्यात कुठलीच चूक नाही. तिच्या सादरीकरणावर मात्र वाद होऊ शकतो. काल रात्री माझं त्याच्याशी बोलणं झालं तर त्याला मी एकच प्रश्न विचारला. तू ज्या पत्राच्या हवाल्यानं बातमी दिलायस तर ते खरं आहे की खोटं? तो म्हणाला खरंय. रेल्वेनेही नंतर ते मान्य केलं की पत्र खरं असून आमच्या अंतर्गत कम्युनिकेशनचा तो भाग आहे. मग पुराव्यासहीत बातमी असेल तर द्यायची नाही ?
बरं एक वेळेस असं आपण मानू की, राहुलची बातमी पूर्णपणे चुकली तरी पण त्याच्या एका बातमीनं बांद्र्याचा गोंधळ झाला हे कसं मानणार ? त्याची बातमी चुकीची होती तर कालपर्यंत रेल्वेनं 39 लाख तिकिट बूक केले ते काय खार घालण्यासाठी होते ? बातमी चुकीची असेल तर त्याला नोटीस पाठवा, चौकशी करा, चॅनलच्या संपादकांना नोटीस पाठवा, त्याची कसलीच सत्यता न करता थेट अटक करून मुंबईत आणणार ? तेही ऐन कोरोनाचा कहर सुरु असताना? ही दमनशाहीची नवी सुरुवात म्हणायची ?