जगातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक

साभार: साप्ताहिक साधना

-रामचंद्र गुहा, बंगळुरू

निवडणुका पार पडण्यासाठी सर्वांत जास्त काळ ब्रिटिश घेतात, तर भारतीय लोक सर्वाधिक संख्येने मतदान करतात; मात्र अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका होतात, तेव्हा लोकशाही मताधिकाराचा जगातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतो. गेल्या शंभर वर्षांहूनही अधिक काळापासून आजपर्यंत असेच घडत आले आहे. कारण अमेरिका हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व बलवान राष्ट्र आहे. ते जगाचे नेतृत्व करते आणि संपूर्ण मानवजातीवर त्याचा प्रभाव असतो. बोरिस जॉन्सन यांच्या धोरणांमुळे युरोपबाहेर क्वचितच काही तरंग उमटत असतील. नरेंद्र मोदींच्या धोरणांचा दक्षिण आशिया खंडाबाहेर खरोखरच काही फरक पडत नाही, परंतु अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या, अथवा न केलेल्या एखाद्या कृतीचा संपूर्ण जगावर परिणाम होऊ शकतो. जॉर्ज बुश यांच्या ऐवजी अल गोर हे 2000 मध्ये अध्यक्षीय निवडणूक जिंकले असते, तर कदाचित इराक युद्ध टळले असते आणि आजचे जग अधिक सुरक्षित झाले असते.

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक जगाच्या दृष्टीने नेहमीप्रमाणेच महत्त्वाची असली तरी, COVID – 19 2020 मध्ये मुळे तिला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ अमेरिकेसाठी चांगला होता की नव्हता, याविषयी अमेरिकन लोक सांगू शकतील. मात्र जगासाठी तो वाईट होता, याविषयी शंका नाही. पॅरिस करारातून त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे पर्यावरणबदलाचा धोका अधिक गंभीर झाला आहे. नव्या तरतुदींसह इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे मध्य-पूर्वेतील नेहमीच संवेदनशील असणारी परिस्थिती अधिकच अस्थिर बनली आहे. ट्रम्प यांच्याच धोरणांचा परिणाम म्हणून निर्वासितांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. आशिया आणि आफ्रिकेतील लोकांविषयी त्यांनी वापरलेल्या अपरिपक्व व वंशद्वेष पसरवणाऱ्या भाषेची परिणती अधिक वैरभाव व अनिष्ट इच्छा निर्माण होण्यात झाली आहे; ते अमेरिकेच्या किंवा जगाच्याही दृष्टीने हितावह नाही.

आजचे जग हे 2017च्या तुलनेत कमी सुरक्षित आणि अधिक असंतुष्ट आहे. अर्थात याला खतपाणी घालणारे इतरही अनेक घटक आहेतच, परंतु ट्रम्प आणि त्यांची धोरणे नक्कीच त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळेच अमेरिकन नागरिक नसणारे अनेक लोकदेखील अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या चढाओढीकडे आस्थेने लक्ष ठेवून आहेत. या निवडणुकीत ट्रम्प पराभूत न होता पुन्हा विजयी झाले, तर जग अधिक सुरक्षित व संतुष्ट बनण्याची शक्यता फारच कमी आहे.

फेब्रुवारीमध्ये मी अमेरिकेत होतो आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांमधील वादविवादाच्या कार्यक्रमाचा काही भाग मी पाहू शकलो. व्हरमॉन्टचे सिनेटर बर्नी सँडर्स हे त्या मंचावर अग्रस्थानी होते. माझे अमेरिकन मित्र याबाबतीत (ज्यांमध्ये अपवाद म्हणूनही कुणीही न राहता सगळेच ट्रम्प यांचे टीकाकार होते) दोन मतांत विभागले गेले. काहींचे असे म्हणणे होते की, पांढरपेशा वर्गावरील आणि तरुणांवरील स्वतःच्या प्रभावामुळे केवळ सँडर्स हेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांना सध्याच्या अध्यक्षांविरुद्ध लढा देण्यासाठी (आवश्यक मतसंख्येमध्ये परिवर्तित होण्यासाठी) प्रेरित करू शकतात. काहींचा मात्र असा विश्वास आहे की, कुठलाही पश्चात्ताप न बाळगणारे सँडर्स यांचे ‘डावे’पण त्यांचे अतोनात नुकसान करू शकते; कदाचित त्यांच्या जीवावरही बेतू शकते.

मार्चच्या सुरवातीला मी न्यूयॉर्कहून निघण्यापूर्वी जो बायडेन यांनी सँडर्स यांना गाठले होते आणि डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठीच्या शर्यतीत ते लवकरच सँडर्स यांना मागे टाकणार होते. आता त्यांनी डेमोक्रॅटिकच्या वतीने उमेदवारी निश्चित केली आहे. माझ्या काही मित्रांचे असे म्हणणे आहे की, बायडेन यांची शालीनता आणि दृढता श्वेतवर्णीय मतदारांच्या एका गटाला नक्कीच पुन्हा जिंकून घेईल. त्याचबरोबर माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याशी असणारे त्यांचे संबंध आफ्रिकन-अमेरिकनांना मोठ्या संख्येने सोबत राहण्यास प्रोत्साहित करतील. याउलट काहींना असा विश्वास वाटतो की बायडेन यांचे वय, जोमदारपणाचा अभाव आणि त्यांच्या मुलाची युक्रेन-मधील कृत्ये हे घटक ट्रम्प यांना पायउतार करण्याच्या ‘डेमोक्रॅटिक’च्या आकांक्षेला मारक ठरू शकतील. COVID – 19 या विषाणूचा उदय आणि अमेरिकेत झालेला त्याचा फैलाव यांमुळे निर्माण झालेले प्रश्न अजूनही ताजे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची त्याबाबतची पहिली प्रतिक्रिया नाकबूल करण्याची आणि बढाईखोर होती. या विषाणूमुळे निर्माण होऊ शकणारा धोका त्यांनी कमी लेखला आणि असा (खोटाच) दावा केला की, त्यांच्या सरकारने पुरेसे प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. नोंदणीकृत रुग्णांची संख्या नाट्यमय पद्धतीने वाढली, तेव्हा त्यांनी उशिराने हालचाल सुरू केली. COVID – 19 निवारणार्थ योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी अमेरिकन काँग्रेसचे अधिवेशन बोलावले आणि मग आखलेल्या योजनेनुसार मोफत तपासणी व आपत्कालीन पगारी रजा देऊ करण्याचे ठरवले. भागधारकांसोबतच्या नेहमीच्या बैठका स्थगित केल्या. त्याचदरम्यान एका भाषणात वंशद्वेषी वक्तृत्वाचे दर्शन घडवत, या विषाणूला ‘चायनीज विषाणू’ असे संबोधले.

कदाचित सल्लागारांच्या दबावामुळे चीनवर आर्थिक निर्बंध लादण्याची कल्पना त्यांनी सोडून दिली. मात्र आता त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला बळीचा बकरा बनविण्याचे ठरवले आहे. त्यांनी असा दावा केला की, इतक्या झपाट्याने हा विषाणू पसरला, त्याची गती ओळखण्यात जागतिक आरोग्य संघटना कमी पडली आणि त्यामुळेच अमेरिकेनेही त्यासंबंधी तत्काळ काही कृती केली नाही. हे म्हणणे दोन कारणांनी दांभिकपणाचे होते. पहिले कारण म्हणजे त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेसारख्या राष्ट्रसमूहासाठी काम करणाऱ्या संस्थांबाबत नेहमी अनादरच दर्शवला आहे. अमेरिकन सरकारद्वारे त्या संघटनेला दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये त्यांनी कपात केली आहे आणि याआधीच्या त्यांच्या सल्ल्यांविषयीही तुच्छतादर्शक उद्गार काढले आहेत. दुसरे कारण म्हणजे- जानेवारीच्या उत्तरार्धात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे उद्योगविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी ‘कोरोना विषाणूचे संकट अमेरिकन अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त करेल व या विषाणूमुळे अनेक मृत्यू होतील,’ असा इशारा दिला होता. नवारो म्हणाले की, या विषाणूचा सामना करण्यासाठी कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे पुरेशा संरक्षणाअभावी हा कोरोना विषाणू पूर्णतः फैलावलेल्या अशा साथीच्या आजारात रूपांतरित होऊन, लाखो अमेरिकनांचे प्राण संकटात येण्याचा धोकाही वाढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने नवारो यांच्या निवेदनावर टिप्पणी करताना 29 जानेवारी रोजी असे नोंदवले आहे की, अमेरिकेला असणारा धोका ट्रम्प हे सुरुवातीला कमी लेखत होते. नंतर मात्र ते सांगू लागले की, इतक्या उद्‌ध्वस्त करणाऱ्या संकटाची कल्पनाही कुणी केली नव्हती. याच- दरम्यान नवारो यांचे वक्तव्य पुढे आले.

COVID – 19ने ट्रम्प यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेमध्ये अडथळा निर्माण केला आहे की मदतच केली आहे, हे सांगता येणे या घडीला अवघड आहे. एका बाजूला ट्रम्प यांचे अस्थिर व्यक्तिमत्त्व (तज्ज्ञ व ज्ञानी व्यक्तींविषयी त्यांना वाटत असणाऱ्या तिरस्काराप्रमाणेच) ही या कामातील एक वाढीव अडचण आहे. त्यामुळे एखादा असा विचार करू शकतो की, कोरोनाच्या या संकटामध्ये- निदान काही प्रमाणात किंवा बहुसंख्येनेही -मतदार खात्रीलायक व सुस्थिर असणाऱ्या बायडेन यांच्याकडे वळतील. दुसऱ्या बाजूला, हा विषाणू म्हणजे दगलबाज शत्रू राष्ट्रामधून येऊन अमेरिकेच्या किनारी धडकलेले परदेशी संकट आहे, असे चित्र निर्माण केले जाऊ शकते. 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी, परदेशा-विषयी द्वेष उत्पन्न करणाऱ्या भावनांनी ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली होती. त्याच प्रकारच्या भावना ते पुन्हा उद्दीपित करत आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये ते टोकाच्या देशाभिमानाची रणनीती वापरत आहेत, जिचा वापर आपल्या पंतप्रधानांनीही 2019ची (त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळा-साठीची) निवडणूक जिंकण्यासाठी केला होता. असेही एक निरीक्षण आहे की- महत्त्वाच्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जो कुणी सत्तेवर असेल; त्याच्याभोवती नागरिक एकवटतात, मग युनायटेड किंगडममध्ये बोरिस जॉन्सन असोत, भारतात नरेंद्र मोदी असोत किंवा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प.

ट्रम्प यांचे 2016मध्ये निवडून येणे ही जर जगासाठी दुःखद बातमी होती, तर त्यांचे पुन्हा निवडून येणे त्याहूनही अधिक दुःखद असणार आहे. हवामानबदलाने मानवजाती-समोर उभे केलेले आव्हान अधिकच संकटाचे होत चाललेले आहे. मध्य-पूर्वेतील यादवी युद्धे अधिक तीव्र होऊ शकतात. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कदाचित पूर्वीपेक्षा बिघडतील. असेच काहीसे अमेरिका व युरोप यांच्या संबंधांबाबतही होईल. जागतिक आरोग्य संघटना व निर्वासितांसाठीचे संयुक्त राष्ट्रांचे उच्चस्तरीय मंडळ (UN High Commission for Refugees) यांसारख्या राष्ट्रसमूहांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था अधिकच ढासळतील.

COVID – 19च्या उदयानंतर, या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराने जिंकावे म्हणून अमेरिकाबाह्य जगातून गुंतवण्यात आलेल्या भागभांडवलात वाढच झाली आहे. या विषाणूचे आर्थिक, सामाजिक व मानसिक मूल्य अवाढव्य असणार आहे, ज्याची तुलना केवळ दोन महायुद्धांशी करता येईल. COVID – 19ची साथ जेव्हा ओसरेल, किंवा तो सौम्य होईल, तेव्हा जग पूर्वपदावर आणण्यासाठी असामान्य प्रमाणात ऊर्जा, बुद्धिमत्ता व सहानुभूती लागेल.

या प्रयत्नांमध्ये आपणा सर्वांना- प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करण्याची यापूर्वीपेक्षाही अधिक गरज भासेल. नवी लस सर्वांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी लागेल. व्यापार आणि दळणवळणाचे नेहमीचे मार्ग पुन्हा सुरू करून द्यावे लागतील. आर्थिक यंत्रणांवरील विश्वास पुन्हा मिळवून द्यावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प हेच पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्राच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून येणार असतील, तर त्यांच्या लहरी पद्धती मात्र राष्ट्रा-राष्ट्रांतील विधायक सहकार्यासाठी- ज्याची जगाला तातडीची गरज आहे- प्रतिकूल आहेत.

नित्य नियमाप्रमाणे, अमेरिकेची प्रत्येक अध्यक्षीय निवडणूक हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा व जगातील सर्वांत मोठा कार्यक्रम आहे. त्यासाठी केवळ अमेरिकन नागरिकच मतदान करू शकत असले तरी, त्याचे परिणाम अमेरिकन नसलेल्या लाखो व्यक्तींचे प्राक्तन व भविष्य ठरवू शकतात. या अर्थाने 2020ची अध्यक्षीय निवडणूक या आधीच्या सर्व निवडणुकांपेक्षाही कदाचित अधिकच महत्त्वाची आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार व विचारवंत आहेत)

(अनुवाद : सुहास पाटील )

 

Previous articleझुगझ्वँग आणि एको चेंबर्सचा घोळ
Next articleराहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.