भाजपात नापासांची परंपरा सुरूच!

ती गोष्ट फार जुनी नाही. वीसेक वर्षे झाली असतील.नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं mundeमुख्यालय ज्या रेशीमबाग परिसरात आहे तेथे वास्तव्य असणारा संघ स्वयंसेवक अभय पुंडलिक याने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला होता. संघ स्वयंसेवकाचा हा गुन्हा अनेकांसाठी धक्कादायक होता. संघाचे तेव्हाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी ‘संघ स्वयंसेवक नापास झाला’ या शब्दात या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. वैद्य यांची ही प्रतिक्रिया तेव्हा देशभर गाजली होती. त्यावर चर्चाही झाली होती. तोपर्यंत संघाचा इतिहास, त्यांचा विचार, कार्यपद्धती यावर सडकून टीका होत असली तरी संघाचा स्वयंसेवक मात्र प्रामाणिक, चारित्र्यवान, नीतिमत्ता पाळणारा असतो याबद्दल विरोधकांमध्येसुद्धा फारसे दुमत नव्हते. संघाच्या चार तर जनसंघ व भाजपाच्या तीन पिढय़ातील वसंतराव ओक, उत्तमराव पाटील, सूर्यकांत वहाडणे, वसंतराव भागवत, मोतीराम लहाने, लक्ष्मणदादा मानकर, हशू अडवाणी, रामभाऊ म्हाळगी, राम नाईक, राम कापसे असे नि:स्पृह व त्यागी नेते आणि हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या वर्तणुकीतून हा विश्‍वास निर्माण केला होता. संघ-भाजपाच्या कार्यकर्त्यांना याचा सार्थ अभिमानही होता. या अभिमानातूनच काँग्रेस व इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते हे भ्रष्टाचारी, दुराचारी, बाहेरख्याली आणि आम्ही मात्र शुद्ध, सात्त्विक, पवित्र असा आविर्भाव संघ-भाजपा कार्यकर्त्यांच्या वागणुकीतून डोकावत असे. काँग्रेस आणि त्यांचे नेते हे सर्व प्रकारच्या दुर्गुणांची खाण असा प्रचार करत काँग्रेस नेत्यांची लफडी, त्यांची अफाट संपत्ती यावर संघ शाखेत व भाजपा कार्यालयांमध्ये खमंग चर्चा चालत असते.
मात्र आगामी काही वर्षांत संघ स्वयंसेवक वारंवार नापास होणार आहे हे मा. गो. वैद्यांना तेव्हा माहीत नसावे. संघ-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही आपल्यावर आपल्याच नेत्यांच्या कुलंगडी चघळण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटत नसावे. (ते भाबडे आपली सत्ता आली की अखंड भारत साकारून भव्य राममंदिर होईल याच स्वप्नात रममाण होते) तोपर्यंत सत्तासुंदरी भाजपापासून दूर असल्याने यांचं ‘कॅरेक्टर’ किती ‘असली’ आहे हे तपासण्याचे प्रसंगच आले नव्हते. ज्यांना ‘मोह’ म्हणजे नेमका वास्तवात काय असतो? मोहाचे प्रसंग कसे असतात याचा अनुभवच नसतो तेच आम्ही आयुष्यभर मोहापासून दूर राहिलो, आम्ही आमचे चारित्र्य, प्रामाणिकपणा जपला अशी टिमकी वाजवीत असतात. भाजप-संघाचं नेमकं असंच झालं होतं. १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदा यांच्या हाती सत्ता आली. सत्तासुंदरीचा यांना स्पर्श झाला आणि काही वर्षांतच यांच्या तथाकथित चारित्र्याचे टवके उडायला लागलेत. संघ-भाजपा परिवाराला पहिला मोठा धक्का बसला तो गोपीनाथ मुंडे यांच्या ‘बरखा’ प्रकरणामुळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या गोपीनाथजींची ही भानगड परिवारासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता. (त्याअगोदर अटलबिहारी वाजपेयी यांच्या रसिकतेची आणि ‘मै अविवाहित हँू, ब्रह्मचारी नही’ या वाक्याची संघ परिवारात दबक्या आवाजात चर्चा चालायची. त्यावर नाराजीही व्यक्त व्हायची.) मात्र गोपीनाथ मुंडे हे बहुजन समाजाचे ‘मास लिडर’ आणि त्यांचे साळे प्रमोद महाजन हे महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा असल्याने संघ त्यावेळी हातावर हात ठेवून बसण्याशिवाय काही करू शकला नाही. त्यानंतर राज्यात अनेक छोट्या-मोठय़ा नेत्यांच्या भानगडी आणि पैशाच्या गैरव्यवहाराचे प्रकार बाहेर यायला लागलेत.
संघासाठी हे प्रचंड धक्कादायक होतं. या प्रकारांना चाप लावण्यासाठी संघाने मग अनेक वर्षे पूर्णवेळ संघ प्रचारक राहिलेल्यांना भाजपात पाठविण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी संघाचे प्रचारक भाजपाचे संघटनमंत्री झालेत, पण संघाची संघटन बांधणी, शाखा लावणे आणि राजकीय पक्षाचं व्यवस्थापन या दोन गोष्टी अतिशय भिन्न असतात हे लवकरच या प्रचारकांच्या लक्षात आले. त्यापैकी अनेकांनी त्या-त्या ठिकाणच्या प्रभावी भाजपा नेत्यांचे ‘पिट्ट’ होण्यात धन्यता मानली. काही जण पार निष्प्रभ होऊन केवळ संघाला र्पिोटिंग करणारे ‘निरोप्या’ झालेत. काही जणांनी मात्र सत्तासुंदरीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. वर्षानुवर्षांचे कडक निर्बंध झुगारून त्यांनी लग्न केली. (भाजप-संघाचे प्रभावी नेते नानाजी देशमुख यांनी ‘ब्रह्मचर्य अनैसर्गिक असून संघ प्रचारकांनी लग्न केली पाहिजेत. भावनांचे संयमन करण्यात त्यांचा भरपूर वेळ खर्ची होतो’, असे म्हटले होते.) भरपूर पैसाही जमविणं सुरू केलं. आलिशान वातानुकूलित गाड्यातून कडक स्टार्चचे कपडे घालत ते फिरायला लागलेत.
या सर्वांंचा आदर्श प्रमोद महाजन होते. साधेपणा, त्याग, चारित्र्य, नीतिमत्ता या संघाच्या मूल्यांची पार ऐसीतैशी करत महाजनांनी कार्यकर्त्यांना ‘पॅ्रक्टिकल पॉलिटिक्स’चा मंत्र देत दिल्लीतील सत्तेपर्यंंत पोहोचविले होते. स्वाभाविकच ते ‘हीरो’ होते. त्यांच्या झगमगाटामुळे संघ परिवारही काही काळ दिड्मूढ झाला होता. मात्र २00४ च्या निवडणुकीत महाजनांच्या ‘शायनिंग इंडिया’चे रंग उडाल्यानंतर संघ-भाजपेयी भानावर आलेत. दरम्यानच्या काळात महाजनांच्या कर्तबगारीने ते थक्क झाले होते. कुठलाही धंदा-व्यवसाय करत नसलेले महाजन काही हजार कोटींचे मालक आहेत ही गोष्ट समोर आल्यानंतर परिवारातील अनेकांचे डोळे पांढरे झाले होते. २00६ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्याबाबत ज्या विषयांची चर्चा झाली ते संघ-भाजपाला खाली मान घालायला लावणारे होते. महाजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दिवट्या चिरंजीव राहुल पाचशेच्या नोटांमध्ये कोकेन पिताना सापडल्याचे वेदनादायक चित्रही भाजपावाल्यांना पाहावे लागले. दरम्यानच्या काळात महाजन संस्कृतीचा संसर्ग संपूर्ण देशात पोहोचला होता. पैसा खाणे, गैरव्यवहार करणे, उद्योजकांना फायदा मिळवून देणे, बायांच्या भानगडी यात कुठल्याच राज्यातील ‘भाजपेयी’ मागे राहिले नाहीत. बंगारू लक्ष्मणचा ‘लक्ष्मी अध्याय’ संपूर्ण देशाने टीव्हीवर पाहिला, पण असे छोटे-मोठे बंगारू प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात तयार झालेत. त्यामुळे अलीकडे मीडियात गाजत असलेल्या सुषमा स्वराज, वसुंधरा राजे शिंदे, स्मृती इराणी, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या गैरव्यवहारांचे नवल वाटण्याचं काहीही कारण नाही. भाजपवालेसुद्धा इतर पक्षातल्या माणसांसारखीच माणसं आहेत. त्यांनाही मोह, माया खुणावतातच, उलट हे इतरांपेक्षा अधिक वेगात प्रवाहपतीत होतात, हे आता अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ वगैरे बकवास केव्हाचीच मोडीत निघाली आहे. नाही म्हणायला संघ अशा सत्ताधुंद स्वयंसेवकांना वेसण घालण्याचा प्रय▪करत असते. प्रमोद महाजन उतले आहे हे पाहून ते नितीन गडकरींना ताकद देतात. गडकरींमध्ये मातण्याची लक्षणं दिसताच ते देवेंद्र फडणवीसांचं कार्ड समोर करतात. अडवाणींनी ताल सोडला हे बघताच ते मोदींना हीरो करतात. मोदी हाताबाहेर जाऊ लागतील तेव्हा आणखी कोणीतरी पुढे आणला जाईल. एक अद्र्भंंत संघटन उभं करणारा संघ आपली वेगळी ओळख टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असला तरी सर्वांंचे पाय शेवटी मातीचेच असतात. संपूर्ण आदर्श असा कोणीच नसतो हे वास्तव संघ परिवार जेवढय़ा लवकर लक्षात घेईल तेवढं वारंवार भ्रमनिरास होण्याचे प्रसंग टळतील.
अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – ८८८८७४४७९६

Previous articleसंघ-भाजपाचा कोतेपणा संपत नाही
Next articleतो एक तमोगुण …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here