संघ-भाजपाचा कोतेपणा संपत नाही

देशाने कधी नव्हे तो विश्‍वास टाकून एकहाती सत्ता सोपविली असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक Golavalkarसंघ व भारतीय जनता पक्षाचा कोतेपणा काही संपत नाही. २६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली नाही हा अपप्रचार विस्मरणात जात नाही तोच आता जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जाणीवपूर्वक गैरहजर राहिले, असा आरोप संघ परिवाराकडून केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीर्घकाळ प्रवक्ते राहिलेले आणि अलीकडेच संघाने आपला ‘खबर्‍या’ म्हणून भाजपात घुसविलेले भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी उपराष्ट्रपतींच्या विषयात ज्या पद्धतीने अकलेचे दिवे पाजळलेत त्यावरून संघ परिवाराच्या मनात मुस्लिमांबद्दल किती भयंकर विष पेरले गेले आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अन्सारी हे योगदिनाच्या कार्यक्रमाला निव्वळ अनुपस्थितच राहिले नाही तर त्यांच्या अधिपत्याखालील राज्यसभा टीव्ही या वाहिनीने राजपथावरील कार्यक्रमाचे प्रक्षेपणही केले नाही, असे आरोप राम माधव यांनी ट्विटरवर केले होते. (हे ट्विट करताना अन्सारी मुस्लिम असल्याने ते मुद्दाम गैरहजर राहिले हे ध्वनीत करण्याचा माधव यांचा प्रयत्न होता.) राम माधव यांचे दोन्ही आरोप खोडसाळ व खोटारडे होते हे उपराष्ट्रपती कार्यालयाच्या खुलाशाने लगेचच स्पष्ट झाले. योगदिनाच्या कार्यक्रमाचे उपराष्ट्रपतींना आमंत्रणच नव्हते, हे सांगतानाच राज्यसभा टीव्हीने योगदिनाच्या कार्यक्रमाचे जे थेट प्रक्षेपण केले त्याचा पुरावा म्हणून त्याचे व्हिडीओ उपराष्ट्रपती कार्यालयाने यू-ट्यूबवर टाकले. राम माधव आणि संघ परिवाराला ही सणसणीत चपराक आहे. आता राम माधव आणि केंद्र सरकार सारवासारव करत असले तरी संघ आणि भाजपा परिवार मुसलमानांबद्दल विचार करण्याच्या पद्धतीत काही बदल करतील याची सुतराम शक्यता नाही. नरेंद्र मोदी कितीही बेंबीच्या देठापासून ‘आमच्यावर विश्‍वास ठेवा. मला हक्काने मध्यरात्री हाक मारा,’ असे मुस्लिम नेत्यांना सांगत असले तरी गेल्या काही महिन्यांत साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, गिरीराज सिंग, साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारख्या अनेकांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यातून मुसलमानांबद्दलचा आकस स्पष्ट दिसतो.
संघ परिवार मुसलमानांचा टोकाचा द्वेष करतो हे असंख्य पुराव्यातून दाखवून देता येते. मुसलमान हा राष्ट्रद्रोहीच असला पाहिजे हा संघ परिवाराचा ठाम पूर्वग्रह आहे. मुसलमानच कशाला जो हिंदू नाही तो अराष्ट्रीय असेच ते समजतात. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा ठेका केवळ संघाला देण्यात आला आहे, असच त्यांचं वागणं असतं. संघ परिवाराच्या मुस्लिम द्वेषाची मुळं संघाच्या स्थापनेत आणि संघ, भाजप, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल आदी पन्नासेक संघटना ज्यांना प्रेरणास्थान मानतात त्या डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या विचारात आहे. एक देशभक्त, शिस्तबद्ध सांस्कृतिक संघटना असा मुखवटा लावून संघ समाजाची दिशाभूल करत असला तरी मुस्लिमांच्या कट्टरतेविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून संघाची स्थापना झाली, हा इतिहास आहे. मुसलमानांनी आमच्याकडून या देशाचं राज्य घेतलं, ते आपण परत मिळविलं पाहिजे या विचाराने वैदिक परंपरेचा दुराभिमान असलेल्या ब्राह्मणांनी ही संघटना स्थापन केली. ‘हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे आणि हे हिंदू राष्ट्र आहे,’ हे त्यांचं मार्गदर्शक तत्त्व ते कधीही लपवीत नाही. जैन, शीख, बौद्ध, पारशी, दलित हे सारेच हिंदू आहेत. एवढच कशाला या देशातील मुस्लिमही हे धर्मांतरित हिंदूच आहे, असे संघ परिवार ९0 वर्षांपासून ठामपणे सांगतो आहे. बाहेरून आलेल्या आक्रमक मुसलमानांनी या देशाची मूळ संस्कृती नष्ट केली, असं परिवार कित्येक वर्षांपासून सांगत आहे. त्यासाठी खोटेनाटे असंख्य पुरावेही ते देतात. ‘मुसलमान मनोवृत्ती नेहमी सत्कार्यात विघ्न आणणारी असते,’ असं डॉ. हेडगेवारांचं मत होतं. संघ परिवारालाही तेच वाटते. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे तर कट्टर मुस्लिमविरोधी होते. त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात त्यांच्या मुस्लिमविरोधी मनोवृत्तीचे भरपूर पुरावे सापडतात. त्या पुस्तकात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाबद्दल लिहिताना ते म्हणतात, ‘ज्यावेळी शूर स्वातंत्र्य सैनिकांनी बहादूरशहा जफरला दिल्लीच्या सिंहासनावर बसविले, त्याच क्षणी आमच्या दृष्टीने हे स्वातंत्र्य युद्ध संपलेले होते.’ अन्य एकेठिकाणी ते म्हणतात, ‘मुसलमान या देशात पंचमस्तंभी आहेत.’ हे असे खूप उल्लेख ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये आहेत. चातुर्वण्र्यावरची गुरुजींची वादग्रस्त मतंही या पुस्तकात नमूद आहेत. संघाची ‘गीता’ किंवा ‘बायबल’ असलेलं गुरुजींचं हे ‘बंच ऑफ थॉट्स’ (विचारधन?) वाचलं की संघ परिवारातील माणसं असा विचार का करतात, हे समजून घेणं सोपं होतं.
संघाला देशाच्या तथाकथित गौरवशाली परंपरेचा मोठा अभिमान आहे. ही परंपरा रानटी मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर खंडित केली. सोन्याचांदीचा धूर निघणार्‍या या देशाची त्यांनी रया घालविली. हिंदूंना बाटवून, नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठं जाळून धर्म व ज्ञान परंपरा नष्ट केली असं बरंच काही संघ परिवार सांगतो. खोलात जाऊन विचार न करणार्‍यांचा त्यावर विश्‍वासही बसतो. मात्र संघ परिवाराचा अभ्यास केला तर त्यांना वेगळ्याच गोष्टींचा अभिमान आहे हे लक्षात येतं. यज्ञ, कर्मकांडं, अन्याय, विषमता व गुलामीवर आधारित वैदिक परंपरा या परिवाराला आपली वाटते. त्यामुळे रामाचे गोडवे गाताना शंबुकाच्या खुनाबद्दल ते काही बोलत नाही. एकलव्याचा अंगठा मागणार्‍या द्रोणाचार्याचा ते अभिमान बाळगतात. शेतकर्‍यांचा राजा बळीला कपटाने संपविणारा वामन त्यांना ‘अवतार’ वाटतो. पेशवाईतील अस्पृश्यांना दिलेली अमानुष वागणूक, मंदिरप्रवेश बंदी, सतिप्रथा, विधवांवरील अत्याचार याबद्दल चकार शब्दही न बोलता अटकेपार स्वारीचे ते गोडवे गातात. कलयुगात ब्राह्मण सोडून सारेच शूद्र असं सांगताना शिवाजी महाराजांनाही ‘शूद्र’ संबोधणार्‍या परंपरेचा त्यांना अभिमान आहे. या देशात दलितांवर, बहुजन समाजावर मुसलमानांनी अधिक अत्याचार केले की येथील उच्चवर्णीयांनी… याबद्दल परिवारातील माणसं कधी बोलत नाही. देशातील धर्मांतरं तलवारीच्या धाकामुळे झालीत की जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देणार्‍या जातीव्यवस्थेमुळे झालीत यावर ते कधी बौद्धिक घेत नाहीत. हा देश मुसलमानांनी बुडविला की येथील उच्चवर्णीयांच्या यज्ञ आणि कर्मकांडावर भर देणार्‍या संस्कृतीने बुडविला यावर ते कधी मार्गदर्शन शिबिर घेत नाहीत. संघाच्या या दुटप्पीपणामुळेच या देशाने कायम त्यांच्याकडे संशयाने पाहिले आहे. १९२५ पासून प्रचंड परिश्रम घेऊन अद्भुत संघटना बांधणी केली असतानाही याच वृत्तीमुळे देशातील बहुजन समाजाला संघ कधीही आपला वाटला नाही. पुढेही वाटणार नाही. त्यांच्या या अशा वागण्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कृतीला संशयाच्या चष्म्यातून पाहिले जाते. संघ विचाराच्या मागील सरकारने त्यांच्या कालखंडात अभ्यासक्रमात ‘ज्योतिष’ घुसविलं होतं. आता योगासनाला धार्मिक आणि राष्ट्रवादी स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. योगासने शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने कितीही चांगली असलीत तरी त्या माध्यमातून संघ परिवार निर्थक कर्मकांड, उपासना पद्धती आणि इतरही बराच कचरा लोकांच्या डोक्यात घुसविणारच नाही याची कोणाला खात्री नाही.

(संदर्भ- बंच ऑफ थॉट्स- गोळवलकर गुरुजी)
(काही डावं काही उजवं- दत्तप्रसाद दाभोळकर)

अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleयालाच विकास म्हणतात का हो भाऊ?
Next articleभाजपात नापासांची परंपरा सुरूच!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.