दीनबंधूंनी उघडलंय मजुरांसाठी अन्नछत्र

-संतोष अरसोड

…………………………

हैदराबाद-नागपूर हायवे… वेदना ,विवंचना ,अगतिकता, घराची ओढ आणि डोळ्यात करपलेली स्वप्न घेऊन निघालेले हजारो मजूर रस्त्यावरून चालताहेत. त्यांच्या वेदना मानवी संवेदनेला हाक देत आहे. ज्या रस्त्यांना त्यांनी आकार दिला तेच रस्ते त्यांच्या वेदनांनी शोकविव्हळ झालेले आहेत.आपल्या चिल्यापिल्यांसह चंद्राचा उसना प्रकाश अन्  तप्त सूर्याची किरणे अंगावर झेलत एका अनामिक ओढीने ते गावाची वाट धरत आहेत. डोळ्यातील स्वप्न धूसर झालेली, भविष्य करपण्याची चिंता, मनामध्ये इथल्या यंत्रणेविरुद्धची असलेली चीड. पण काहीही करू शकत नसल्याची हतबलता.   सगळे सैरभैर आहेत. वेदनेचा रस्ता सरता सरत नाही. हा रस्ता किती दु:खाचा साक्षीदार ठरतोय साक्षीदार ठरतोय याची गणतीच नाही. एखादा भरधाव ट्रक येतो. त्यांच्यापैकी दोघातिघांना चिरडून जातो. एखादी बाळंतीण ४४ डिग्री तापमानात नवीन जीवाला जन्म देते. पण स्वतः दम तोडते.  कुठे  एखादं चिमुकलं बाळ आईच्या कुशीतच जगाचा कायमचा निरोप घेतो. रस्त्याची कूसच त्या लेकराची स्मशानभूमी होते.  काळजाच्या चिंध्या चिंध्या करणारी ही वाट अन् या वाटेवरील भळभळणाऱ्या या  जखमा मन छिन्नविछिन्न करून टाकतात.

अशा सुन्न करणाऱ्या परिस्थितीतही दीनबंधू शिक्षण व सामाजिक संस्था मानवी संवेदना जिवंत असल्याचे दर्शन हायवेवर घडवित आहे. ही संस्था भुकेकंगाल व स्वप्नांचं आकाश हरवलेल्या हतबल मजुरांच्या पाठीशी उभी ठाकली आहे. आभाळच फाटलं असताना  या संस्थेचे नितीन सरदार व त्यांचे मित्रमंडळी हरेक प्रकारे मजुरांची पुढची वाट सुसह्य करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी नागपूरपासून २१ किलोमीटर अंतरावर जामठा येथे मजुरांसाठी अन्नाछत्र उघडले आहे. हे अन्नछत्र मानवी संवेदनशीलतेचा आदर्श वस्तुपाठ आहे. रस्त्यावरून जाणारे मजुरांचे लोंढे पाहून त्यांना आधार देण्यासाठी हे अन्नछत्र उघडण्यात आले आहे.

नितीन सरदार सांगतात, ‘१९४७ मध्ये फाळणीमुळे दोन देश झाले. मात्र स्वातंत्र्योत्तर भारतात कोरोनाने जी फाळणी केली आहे, ती हादरवून टाकणारी आहे.  एकीकडे ‘शायनिंग इंडिया’ आणि दुसरीकडे ‘सफरिंग इंडिया’ असे चित्र मी अनुभवतो आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला कुणी पाणीसुद्धा देऊ नये हा मानवतेचा पराभव मन सुन्न करतो. आपल्याच माणसांच्या पाठीशी आपण राहू शकत नाही ही कल्पनाच सहन होत नाही. ही पृथ्वी श्रमिकांच्या हातावर तोलली गेलेली आहे. या श्रमिकांनी आमचं आयुष्य सुंदर केलं. त्यांचे हात राबतात म्हणून आम्ही सुख संपन्नतेच आयुष्य जगतोय. मात्र हा वर्ग आता संकटात सापडला असताना देशाला त्यांची किंमत नाही. गरज होती तेव्हा त्यांना वापरलं आणि संकटात मात्र वाऱ्यावर सोडून दिलं. पायाला भेगा पडलेल्या मजुरांच्या वेदना आम्हाला अस्वस्थ करीत होत्या. हे पाहून आम्ही ठरवलं की या रस्त्यावरून जाणारा एकही मजूर उपाशी जाता कामा नये.मित्र मंडळींना आवाहन केलं आणि संवेदनेचे अनेक हात आमच्या पाठीशी उभे राहिले. गुरुदेव सेवामंडळासारख्या अनेक संस्थाही मदत करत आहे.’

या अन्नछत्रात आतापर्यंत जवळपास पन्नास हजार मजुरांना जेवण देण्यात आले. रोज जवळपास १४ तास अन्नछत्र चालविले जाते. काही काळ मजूर येथे थबकतात तेवढा काळ चांगुलपणावरील त्यांचा विश्वास वाढावा हा दीनबंधूंचा प्रयत्न असतो. येथे जेवणासोबत मजुरांच्या जखमांची मलमपट्टी, वैद्यकीय तपासणी, आवश्यक असल्यास औषधोपचार केले जातात. अभिजित परागे ,सुलेखा परागे यासह अनेक जण मजुरांच्या रक्ताळलेल्या पायाची मालिश करून देतात. या मजुरांच्या शरीरावर तर जखमा आहेच मन त्यांच्या मनावरच्या जखमाही खोल आहेत. काल-परवा ची गोष्ट.  एक दुचाकी चालक आपल्या पत्नीला घेऊन या अन्नछत्रात आला. सोबत एक अडीच वर्षाचे,  एक साडेचार वर्षाचे आणि फाटक्या साडीमध्ये गुंडाळलेले एक चाळीस दिवसाचे मूल.हे कुटुंब विजयवाडा येथून गोरखपूरला जाण्यासाठी निघाले होते . सतराशे किलोमीटरचा वेदनादायी प्रवास त्यांना करायचा होता. दिलीप कुमार प्रजापती व चंदा प्रजापती व त्यांच्या मुलांना  भरपेट जेवण देण्यात आलं. सोबत पुढील प्रवासासाठी फळे, बिस्किट ,ग्लुकोज आणि फराळाचे साहित्य आणि काही पैसेसुद्धा देण्यात आले . जाताना दोघाही नवरा बायकोच्या डोळ्यात पाणी होतं.आम्हाला नितीन सरदार सारखा भाऊ मिळाला, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली .

अशा एक ना अनेक कहाण्यांचे साक्षीदार ठरत आहे जामठा येथील हे अन्नछत्र. रस्त्यावरून  चालणारे मजूर या ठिकाणी थांबतात. त्यांना कार्यकर्ते वरण-भात-भाजी-पोळीचे जेवण देतात. प्रवासात थकवा येऊ नये म्हणून शेंगदाणे, गुळ ,पाव ,दुध ,बोर्नविटा आणि ग्लुकोजची पाकिटे देण्यात येतात. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास साठ कार्यकर्ते अत्यंत सेवाभावी वृत्तीने याठिकाणी सहभागी झाले आहे. त्यांच्या या कामाला अनेकांचा हातभार लागतो आहे. गांधी आडनावाच्या एका माणसाने १०० किलो ढेमस ,१०० किलो काकडी आणि एक हजार ब्रेडची पाकीट पाठवलीत. अजित बेकरी  टोस्ट पाठवले. तिरपुडे महाविद्यालयाने तांदूळ पाठवले. मुस्लिम समुदायाने चपला पाठवल्या. आतापर्यंत ११, ००० मजुरांना चप्पल देण्यात आल्या.  हे कामपाहून नागपुरातील अनेक संस्था – संघटनांची मंडळी स्वयंस्फूर्तीने दिवसातील काही तास या कामासाठी देत आहेत. नितीन सरदार आणि त्यांच्या मित्रांसारखी माणसांचे प्रयत्न पाहून पराभूत मनालाही आशेची नवी पालवी फुटायला लागते. रात्रंदिवस उपाशीपोटी रस्त्यावरून चालणारी ही कामगार मंडळी आपलीच रक्तवाहिनी आहे या भावनेतून हे काम सुरु आहे.

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक आहेत)

9423434315/9623191923

Previous articleसंजय राऊत: भारतीय असंतोषाचे मराठी प्रतिक
Next articleनथुरामला नाहक फाशी दिले, गांधी तर सुखरूप बचावले!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here