जेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व

साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’

-अविनाश दुधे

न्यूझीलंडच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान आणि पदावर असताना लग्नाशिवाय आई झालेल्या पंतप्रधान अशी ओळख असलेल्या जेसिंडा आर्डेन यांनी केलेल्या परिणामकारक उपाययोजनांमुळे न्यूझीलंड कोरोनाला मात देण्यात यशस्वी ठरला आहे. ख्राइस्टचर्च बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा त्यांनी आपल्यातील कणखर नेतृत्वाचे दर्शन जगाला घडविले आहे.

…………………………………………………….

कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील देश घायकुतीला आले आहेत. या साथीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने डोनाल्ड ट्रम्पसह अनेक राष्ट्रप्रमुखांच्या लोकप्रियतेचा आलेख चांगलाच घसरला असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांची त्यांच्या देशातील लोकप्रियता २०.८ टक्क्याने वाढल्याची बातमी विस्मयचकीत करणारी आहे. Newshub-Reid या संस्थांनी मागील आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात देशातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक जनता त्यांच्यावर खूश असल्याचे निष्कर्ष समोर आले आहे. २०१७ ला जेसिंडा पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा निवडून गेल्या तेव्हाही त्या एवढ्या लोकप्रिय नव्हत्या. न्यूझीलंडमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत केवळ २१ मृत्यू झालेत. गेल्या अनेक दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण तिथे आढळला नाही. त्यामुळे न्यूझीलंड लवकरच कोरोनामुक्त झाल्याची घोषणा होणार आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केलेल्या परिणामकारक उपाययोजनांमुळे न्यूझीलंड कोरोनाला मात देण्यात यशस्वी ठरला, अशी तेथील जनतेची भावना आहे.

गंमत म्हणजे ज्या दिवशी त्यांच्या लोकप्रियतेत जबरदस्त वाढ झाल्याची बातमी आली, त्याच्या दुसऱ्या दिवशी राजधानी वेलिंग्टन येथील एका हॉटेलने कोरोनामुक्तीसाठी त्यांच्याच सरकारने निर्धारित केलेले नियम दाखवत त्यांना प्रवेश नाकारला. त्याचे झाले असे, की जेसिंडा या आपला जोडीदार (नवरा नव्हे) आणि त्यांच्या मुलीचा बाप असलेल्या क्लार्क गेफोर्डसोबत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या . (विचार करा… आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील एखाद्या महिला सहकाऱ्यासह किंवा राहुल गांधी त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये अल्पोपहाराला गेल्यास, काय गहजब होईल! ) मात्र कोरोनामुळे हॉटेल क्षमतेच्या ५० टक्केच ग्राहकांना प्रवेश द्यायचा, हा नियम असल्याने त्यांना नम्रपणे प्रवेश नाकारण्यात आला. मात्र जेसिंडा यांनी कुठलाही मानापमानाचा विषय न करता टेबल रिकामं होण्याची वाट पाहिली. काही वेळानंतर त्यांना टेबल मिळालं. वाट पाहावी लागल्याबद्दल हॉटेलमालकाने त्यांची माफी मागितली. पण, ‘माफी कशाला मागताय, इतरांसाठी जे नियम आहेत तेच माझ्यासाठी आहेत’, म्हणत जेसिंडांनी जेवण केलं आणि त्या निघून गेल्या . त्यानंतर हॉटेलमालकानेच ट्विट करून हा प्रसंग जगासमोर आणत त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यावर जेसिंडाचा जोडीदार क्लार्क रिट्विट करत म्हणाला , ‘आमचंच चुकलंय…आम्ही आगाऊ टेबल नोंदणी करायला हवी होती.’ हे संपूर्ण प्रकरण बाहेर येतात जेसिंडा न्यूझीलंडमध्ये अधिकच लोकप्रिय झाल्या आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन मैत्रीण कॅरी सायमंड सोबत

खरं तर जेसिंडा आर्डेन या सत्तेवर आल्यापासूनच चर्चेत आहेत. २०१७ ला त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या केवळ ३६ वर्षाच्या होत्या. न्यूझीलंडच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान अशी ओळख मिळाली असताना २०१८ मध्ये त्या एका मुलीच्या आई झाल्या. लग्न न करता आई होणाऱ्या त्या पहिल्या पंतप्रधान आहेत. त्यांच्या अगोदर पाकिस्तानच्या बेनजीर भुत्तो या पंतप्रधानपदावर असताना दोनदा आई झाल्या होत्या. मात्र त्या विवाहित होत्या. (कोरोना काळात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची मैत्रीण कॅरी सायमंड यांनाही कन्यारत्न झाले. या दोघांचेही अद्याप लग्न व्हायचे आहे. ) जेसिंडा यांचा जोडीदार क्लार्क गेफोर्ड हा टेलिव्हिजन प्रेझेंटर आहे. एका टीव्ही शोच्या निमित्त्ताने त्यांची ओळख झाली. पुढे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या रिलेशनची न्यूझीलंडमध्ये कौतुकाने चर्चा होते. जेसिंडा संसदेच्या किंवा कार्यालयीन कामात व्यस्त असतात, तेव्हा नीव्ह या त्यांच्या चिमुकलीला सांभाळण्याचे काम क्लार्क करतात. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात जेसिंडा भाषण करत असताना नीव्हला मांडीवर घेऊन लक्षपूर्वक भाषण ऐकत असल्याचे क्लार्कचे छायाचित्र सर्वत्र प्रसिध्द झाले होते. जेसिंडा व क्लार्क यांची मुलगी आता दोन वर्षाची झाली आहे .क्लार्कने जेसिंडांना प्रपोज केले आहे मात्र अद्याप या दोघांनी लग्न केले नाही.

‘गेल्या वर्षी ईस्टर दरम्यान एके दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फेरफटका मारताना क्लार्कने अचानक मला प्रपोज करून चकित केले’, अशी माहिती स्वतः जेसिंडांनीच पत्रकारांना दिली होती . ‘त्याने त्याच्या आजीची हिऱ्याची अंगठी माझ्या बोटात सरकवत मला मागणी घातली’, असे चक्क लाजत जेसिंडांनी सांगितले होते. त्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे. तो बघण्याजोगा आहे .(क्लिक करा –https://bit.ly/2X3yvdu) आता लग्न कधी करणार, या प्रश्नाला त्यांनी ‘पुढचा प्रश्न विचारा’, म्हणत हसत टाळले होते. अशा या जेसिंडा म्हणजे शोभेची बाहुली आहे की काय, अशी जर कोणाची समजूत झाली असेल, तर तसं मात्र अजिबात नाही . गेल्या वर्षी ख्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ५१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर ज्या दृढपणे त्यांनी परिस्थिती हाताळली तेव्हा त्यांच्यातील कणखर नेत्याचे दर्शन जगाला घडले होते. ते बॉम्बस्फोट गोऱ्या कट्टरवाद्यांनी घडविले होते. त्यानंतर काही ठिकाणी मुस्लिमांना असाच धडा शिकवायला हवा, अशा विकृत प्रतिक्रिया उमटल्या होत्या . त्यामुळे धार्मिक विद्वेष पसरण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. मात्र जेसिडांनी तेव्हा तडफेने कारवाई करत हल्लेखोरांना तातडीने अटक केली होती. त्यानंतर दहशतीत असलेल्या ख्राइस्टचर्चच्या मुस्लिम समुदायाला भेटण्यासाठी त्या हिजाब घालून गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी मुस्लीम स्त्री- पुरुषांना जवळ घेवून आश्वस्त केले होते. ‘धार्मिक वेडाचाराला न्यूझीलंडमध्ये जागा नाही . तो खपवून घेणार नाही’, हे अतिशय ठामपणे त्यांनी तेव्हा सांगितले होते. (क्लिक करा-https://bit.ly/2LV5NFA) असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी बंदूक व इतर शस्त्र बाळगण्याच्या विषयातील नियम त्यांनी कठोर केले. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वातील संवेदनशीलता व दृढता पाहून जागतिक माध्यमांनी त्यांचे कौतुक केले होते.

आता कोरोनाचा त्यांनी ज्यापद्धतीने बंदोबस्त केला आहे, त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिकच उजळून निघाले आहेत. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे आगमन होताच त्यांनी देशाच्या सर्व सीमा बंद केल्या . पाच आठवड्याचा कठोर लॉकडाऊन जाहीर केला. अधिकाधिक नागरिकांच्या थ्रोट स्वाबची तपासणी केली. उत्तम उपचार सुविधा देत संसर्ग पसरणार नाही, याची काटेकोर काळजी घेतली. त्याचा परिणाम म्हणजे आज संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झालं असताना न्यूझीलंडमध्ये संपूर्ण जनजीवन पूर्वीप्रमाणेच सामान्य झालं आहे. तेथील नागरिक याचं संपूर्ण श्रेय जेसिंडा आर्डेन यांना देतात. त्यामुळे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्या पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही…!

(लेखक मीडिया वॉच नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleलॅम्बाडा: बेभान करणारा सौंदर्य, तारुण्य आणि कलात्मकतेचा अफाट संगम
Next articleविचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. फार छान स्टोरी.राजकीय जीवन व वैयक्तिक नाते यांची फारकत करत जीवन जगण्याच स्वातंत्र भारतीय समाजव्यवस्था निर्माण करीत नाही तोपर्यंत भारतातील नेते एकतर खोटं व ढोंगी जिवंत जगतात किंवा सामाजिक चौकटीत गुदमरून मृत्यू पावतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here