मॅक्सिम गॉर्की: लेखणीने क्रांतीचं वादळ आणणारा लेखक

-सानिया भालेराव

रशियातल्या एका छोट्या खेड्यामध्ये २८ मार्च १८६८ रोजी एक मुलगा जन्माला आला. वयाच्या सहाव्या वर्षी त्याचे वडील वारले. आईने दुसरा विवाह केला. त्याचा सांभाळ प्रेमळ आजीने आणि कडक व शिस्तप्रिय आजोबांनी केला. त्याची आजी त्याला खूप साऱ्या लोककथा सांगत असे. कालांतराने आजोबांना घर चालविणे कठीण झाले.त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी मजूर म्हणून हा मुलगा जहाजावर काम करू लागला. त्या जहाजावर भांडी घासणं , साफसफाई करणं, अशी कामं लहान मुलांकडून करवून घेतल्या जाई. इतक्या कोवळ्या वयात हा  त्या कामांमध्ये जुंपला गेला. कायम मळलेले कपडे, पोटात अन्न न मिळाल्या मुळे सतत खवळलेली भूक… अशा कित्येक विदारक गोष्टी त्याने लहान वयातच अनुभवल्या. मजुरीची कामं करता करता जसं जमेल तसं तो मुलगा शिकत गेला. पुढे एकविसाव्या वर्षी वर्षी भटका मजूर म्हणून काम करताना तो पाच वर्ष संपूर्ण रशिया पायी फिरला आणि साधारण १८८० मध्ये आयुष्यातला हा कडवटपणा लेखणीच्या माध्यमातून त्याने कागदावर उतरवायला सुरवात केली . हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध रशियन लेखक ‘अलेक्सेई मॅक्सिमोविच पेशकोव्ह’ (Alexei Maximovich Peshkov). या मुलाने स्वतःच असं एक टोपणनाव निवडलं. ते म्हणजे ‘मॅक्सिम गॉर्की’.

‘गॉर्की या शब्दाचा अर्थच मुळी होतो कडवट. तब्ब्ल पाच वेळा साहित्यातील नोबल पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आहेत, असा हा लेखक “मॅक्सिम गॉर्की”. ( रशियन उच्चार- माक्सिम गोर्की). मला खऱ्या अर्थाने (बि)घडवणाऱ्या लेखकांमध्ये यांचं स्थान अव्वल आहे. गॉर्कीसारख्या मोठ्या लेखकाला खरं तर “तू” असं म्हणणं अयोग्यच पण एखादा लेखक जेव्हा खूप आवडतो, बोटाला धरून शिकवतो तेव्हा आपलाच वाटून जातो.. केवळ म्हणून हे अरे – तुरे म्हणायचा हा आदरमिश्रित आपलेलपणा!

‘माकर चुद्रा’ (Makar Chudra) या पुस्तकापासून सुरु झालेला त्यांच्या लेखन प्रवासात ‘आई’ (The Mother), ‘चेल्काश’ (Chelkash), ‘चिल्ड्रन ऑफ द सन’ (Children of the Sun), ‘माय चाईल्डहूड’ (My Childhood), ‘द लोवर डेप्थ्स’ (The lower depths) अशी कित्येक पुस्तकं गाजली. विशेषतः “आई” हे त्यांचं पुस्तक स्पेन, फ्रांस, जर्मनी, इंग्लड आणि जगाच्या कित्येक कोपऱ्यांमध्ये पोहोचलं, वाचलं गेलं, विविध भाषांमध्ये अनुवादित केलं गेलं. या पुस्तकाने गॉर्की यांना लोकप्रियता मिळवून दिली. तसं पाहायला गेलं तर गॉर्की यांच्या कथा कायमचं वास्तवतावादी आणि सामाजिक दृष्टीकोन देणाऱ्या असल्या तरीही सुरवातीच्या काळातली त्यांची शैली रिव्होल्यूशनरी रोमँटिक अशी होती. नंतरच्या काळात त्यांच्यावर प्रोलिटेरियन रिव्होल्यूशनचा ( सर्वत्ववादी क्रांती / श्रमजीवी क्रांती) प्रभाव पडल्याने त्यांचं लिखाण सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारं ठरलं.

गॉर्की ने जेव्हा “द मदर” हे पुस्तक लिहिलं तेव्हा सगळीकडे खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं. खुद्द रशियामध्ये पुढची काही वर्षं हे पुस्तक वाचण्यास, त्याबद्दल मत मांडण्यास आणि चर्चा करण्यास मनाई होती. हे पुस्तक जगभरात पोहोचलं, कित्येक भाषांमध्ये अनुवादित झालं. मुळात मदर ही गोष्ट होती एका मजुराच्या आयुष्याची आणि त्याच्या आत्मभान जागृत होण्याच्या प्रवासाची.. त्याकाळात एक मजूर हा गोष्टीचा नायक असू शकतो हीच मुळात बंडखोर कल्पना . हा मजूर पुढे तो जागतिक क्रांतीचा भाग बनतो हे तर अगदीच न पटणारं. रशियामध्ये याच काळात मार्क्सवाद आपली मुळं घट्ट रोवत होता. सामाजिक , राजनैतिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा तो काळ होता. स्वतः गॉर्की उघडपणे मार्क्सवादी सामाजिक लोकशाही चळवळीशी जोडला गेला होता. ‘मदर’ या पुस्तकाबद्दल लेनिन असं म्हणाला होता की, हे पुस्तक कामगार वर्गाला अंतर्बाह्य सजग करणारं, त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करण्याची प्रक्रिया रुजवणारं असं आहे. मदर हे पुस्तक म्हणूनच गॉर्कीच्या लेखनप्रवासामधलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक ठरतं. कामगार वर्ग हाच समाजामध्ये खरा बदल घडवून आणू शकतो, असं क्रांतिकारी मत या पुस्तकातून गॉर्कीने पहिल्यांदा पुढे आणलं.

आपल्या क्रांतिकारी विचारांमुळे आणि सजग लेखणीमुळे गॉर्कीवर दोनदा तुरुंगवास भोगण्याची पाळी आली, त्यावर कित्त्येक खटले चालवले गेले. गॉर्की नुसताच लेखक नव्हता.. तो क्रांतिकारक होता. त्याला सर्वहारा वर्गाविषयी आस्था होती.स्वतः ज्या बिकट परिस्थितून तो वर आला होता,त्याची त्याला जाण होती. त्याला विश्वास होता की सर्वहारा वर्ग हाच क्रांतीचा वाहक आहे. ‘पायातील साखळदंडांशिवाय तुमच्याकडे हरण्यासासारखं आता काहीही नाही’ या मार्क्सच्या वाक्याशी तो सहमत होता. नुसतंच लिहिणं यापुरतं त्याने स्वतःला मर्यादित ठेवलं नाही आणि म्हणूनच गॉर्की इतर लेखकांपेक्षा वेगळा भासतो. त्याने स्वतः राजकारण, समाजकारण यात सहभाग घेतला. लेखक फक्त लेखणीपुरता मर्यादित असतो, या चौकटीला तडा देणाऱ्यांपैकी गॉर्की एक. पुढे त्याचे स्टॅलिन, लेनिनशी सुद्धा मतभेद झाले. नंतरच्या काळात त्याला अप्रत्यक्ष अशा गृहकैदेत ठेवण्यात आलं. त्याचा शेवट तसा दुर्दैवीच होता. पण लेखणीपलीकडे जाणारा लेखक, कामगार वर्गांमध्ये क्रांतीची चेतना पेटवणारा क्रांतिकारी आणि मुळात आपण चळवळ करतो म्हणजे काय?  ती नक्की कशा करता करायची, अशा बेसिक प्रश्नांवर लिखाण करणारा हा लेखक होता. .

“This fear is what is the ruin of us all. And some dominate us; they take advantage of our fear and frighten us still more. Mark this: as long as people are afraid, they will rot like the birches in the marsh. We must grow bold; it is time!” गॉर्कीचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. त्याला क्रांतीदूत का म्हटलं जातं, हे या छोट्या वाक्यातून सुद्धा समजू शकतं. दुर्दैवाने आजच्या काळातही हे वाक्य लागू पडतं आहे. वर्गभेद हा कमी होण्याऐवजी वाढतच आहे आणि हा भेद सतत उफाळत कसा राहील, यावर आजही राजकारणी जगत आहे आणि म्हणून तगत सुद्धा आहे.

ज्या वयात फुलायचं असतं त्या लहान वयात समाजातल्या विखारी विषमतेमुळे ज्याच्या मनात कायमचा कडवटपणा उतरला तो मॅक्सिम गॉर्की. याच कडवटपणाला त्याने हत्यार केलं आणि जगभरात आपल्या लेखणीने क्रांतीचं वादळ आणलं.. अंतोन चेकॉव्ह हा सुद्धा एक नावाजलेला रशियन लेखक आणि नाटककार. त्याचा आणि गॉर्कीचा पत्रव्यवहार खूप सुंदर आणि तरल. गॉर्कीच्या मार्क्सवादी चळवळीमुळे त्याच्या प्रोफेसरशीपवर जेंव्हा बंदी घालण्यात आली होती तेव्हा निषेध म्हणून चेकॉव्हने सुद्धा आपलं पद सोडून दिलं होतं. गॉर्कीबद्दल चेकॉव्ह असं म्हणाला होता..
“A time will come when people will forget Gorky’s works, but he himself will hardly be forgotten even in a thousand years.”
“एक वेळ अशी येईल की लोक कदाचित गॉर्कीचं लिखाण विसरतील,पण खुद्द गॉर्कीला विसरणं मात्र त्यांना हजार वर्ष उलटली तरी शक्य होणार नाही”

कारण गॉर्कीसारख्या लेखकांना फक्त त्यांच्या लेखणीपुरतं मर्यादित ठेवता येत नाही. त्याचे विचार हे परिवर्तनाचे, क्रांतीचे जनक आहेत. आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत, त्यामध्ये तू जे सांगून गेला आहेस ते आठवायची आत्यंतिक गरज आहे. काळाला देखील बंदिस्त न करता येणारे, भौगोलिक सीमा रेषांपलीकडे जाणारे आणि समाज वर्गीकरणाच्या क्रमवारीत सगळ्यात तळाशी असणाऱ्या सर्वहारा वर्गाला नवीन दिशा देणारे तुझे लिखाण. गॉर्की, तू कायम राहशील आमच्या मनात. जोवर आमच्या मनातली सजगता, अनुकंपा, सहृदयता, संवेदनशीलता, माणुसकी आणि जाण जिवंत आहे तोवर…

मॅक्सिम गॉर्की यांच्यावरील ही दुर्मिळ चित्रफित

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )

सानिया भालेराव यांचे वेगवेगळ्या विषयांवरील लेख वाचण्यासाठी उजवीकडे वरच्या कोपऱ्यात Search मध्ये Saniya Bhalerao टाईप करा व क्लिक करा . त्यांचे यापूर्वीचे सगळे लेख वाचता येतील.

[email protected]

Previous articleबड्या माध्यम समूहांचं ‘पब्लिक ऑडिट’ करा !
Next articleबजाज म्हणाले ते खरंच आहे !गुजरात मॉडेलचा पोपट मेलाय !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here