‘गॉर्की या शब्दाचा अर्थच मुळी होतो कडवट. तब्ब्ल पाच वेळा साहित्यातील नोबल पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आहेत, असा हा लेखक “मॅक्सिम गॉर्की”. ( रशियन उच्चार- माक्सिम गोर्की). मला खऱ्या अर्थाने (बि)घडवणाऱ्या लेखकांमध्ये यांचं स्थान अव्वल आहे. गॉर्कीसारख्या मोठ्या लेखकाला खरं तर “तू” असं म्हणणं अयोग्यच पण एखादा लेखक जेव्हा खूप आवडतो, बोटाला धरून शिकवतो तेव्हा आपलाच वाटून जातो.. केवळ म्हणून हे अरे – तुरे म्हणायचा हा आदरमिश्रित आपलेलपणा!
आपल्या क्रांतिकारी विचारांमुळे आणि सजग लेखणीमुळे गॉर्कीवर दोनदा तुरुंगवास भोगण्याची पाळी आली, त्यावर कित्त्येक खटले चालवले गेले. गॉर्की नुसताच लेखक नव्हता.. तो क्रांतिकारक होता. त्याला सर्वहारा वर्गाविषयी आस्था होती.स्वतः ज्या बिकट परिस्थितून तो वर आला होता,त्याची त्याला जाण होती. त्याला विश्वास होता की सर्वहारा वर्ग हाच क्रांतीचा वाहक आहे. ‘पायातील साखळदंडांशिवाय तुमच्याकडे हरण्यासासारखं आता काहीही नाही’ या मार्क्सच्या वाक्याशी तो सहमत होता. नुसतंच लिहिणं यापुरतं त्याने स्वतःला मर्यादित ठेवलं नाही आणि म्हणूनच गॉर्की इतर लेखकांपेक्षा वेगळा भासतो. त्याने स्वतः राजकारण, समाजकारण यात सहभाग घेतला. लेखक फक्त लेखणीपुरता मर्यादित असतो, या चौकटीला तडा देणाऱ्यांपैकी गॉर्की एक. पुढे त्याचे स्टॅलिन, लेनिनशी सुद्धा मतभेद झाले. नंतरच्या काळात त्याला अप्रत्यक्ष अशा गृहकैदेत ठेवण्यात आलं. त्याचा शेवट तसा दुर्दैवीच होता. पण लेखणीपलीकडे जाणारा लेखक, कामगार वर्गांमध्ये क्रांतीची चेतना पेटवणारा क्रांतिकारी आणि मुळात आपण चळवळ करतो म्हणजे काय? ती नक्की कशा करता करायची, अशा बेसिक प्रश्नांवर लिखाण करणारा हा लेखक होता. .
ज्या वयात फुलायचं असतं त्या लहान वयात समाजातल्या विखारी विषमतेमुळे ज्याच्या मनात कायमचा कडवटपणा उतरला तो मॅक्सिम गॉर्की. याच कडवटपणाला त्याने हत्यार केलं आणि जगभरात आपल्या लेखणीने क्रांतीचं वादळ आणलं.. अंतोन चेकॉव्ह हा सुद्धा एक नावाजलेला रशियन लेखक आणि नाटककार. त्याचा आणि गॉर्कीचा पत्रव्यवहार खूप सुंदर आणि तरल. गॉर्कीच्या मार्क्सवादी चळवळीमुळे त्याच्या प्रोफेसरशीपवर जेंव्हा बंदी घालण्यात आली होती तेव्हा निषेध म्हणून चेकॉव्हने सुद्धा आपलं पद सोडून दिलं होतं. गॉर्कीबद्दल चेकॉव्ह असं म्हणाला होता..