संघाला ओळखा, मग विरोध करा!

सौजन्य – दिव्य मराठी
प्रकाश बाळ, ज्येष्ठ पत्रकार

‘पानिपत’ला मराठे हरले, ते शत्रूचं स्वरूप न ओळखल्यामुळे. अहमद शहा अब्दालीकडे बंदुका होत्या, त्यानं राखीव फौज ठेवली होती, त्याच्या सैन्याबरोबर बाजारबुणग्यांचा मोठा कुटुंबकबिला नव्हता, याची दखलच मराठ्यांनी घेतली नाही. नुसता शौर्यावर त्यांचा भरवसा होता. शत्रूचं स्वरूप लक्षात घेऊन आखलेली सुनियोजित रणनीती मराठ्यांकडे नव्हती.
आज पानिपतच्या लढाईचा उल्लेख करायचं कारण म्हणजे मराठ्यांनी जी घोडचूक केली, तीच मोदी सरकारचे विरोधक करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वरूप, त्याची रणनीती इत्यादी लक्षात न घेता हे विरोधक टीका करत आहेत किंवा विरोधाचे पवित्रे घेत आहेत. त्यामुळे या विरोधकांच्या हाती काहीच लागणार नाही. उलट जनमनातील त्यांची जी काही उरलीसुरली विश्वासार्हता आहे, तीही घसरण्याची शक्यता जास्त आहे.

अशा पोकळ व निरर्थक टीकेचं ताजं उदाहरण म्हणजे मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील RSSमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला हजर राहण्यावरून उठलेल्या वादंगाचं.भारतात ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्दिष्ट आहे. त्यापासून संघ कधीही ढळलेला नाही. चारित्र्य, नैतिकता, संस्कृती इत्यादी गोष्टी संघ बोलत असला तरी आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी रणनीती आखताना व त्याबरहुकूम वागताना अनैतिकता, अप्रामाणिकपणा, संधिसाधूपणा इत्यादीचं संघाला कधीच वावडं नसतं. सरसंघचालक देवरस आणीबाणीच्या काळात तुरुंगात असतानाही इंदिरा गांधी यांची स्तुती करणारी पत्रे त्यांना लिहीत होते आणि गांधी खुनानंतर बंदी घालण्यात आल्यावर संघानं सरदार पटेल यांच्याशी केलेला पत्रव्यवहारही हेच दर्शवतो. अंतिम उद्दिष्ट ‘हिंदू राष्ट्र’ हे आहे, त्यामुळे त्या दिशेनं वाटचाल करताना तत्त्वाला मुरड घालणं, अनैतिक वागणं, अप्रामाणिकपणा करणं हा संघाच्या दृष्टीनं डावपेचांचा भाग आहे.

या देशात ‘हिंदू राष्ट्र’ केवळ राजकीय सत्ता स्वबळावर हाती घेतल्यासच निर्माण करता येऊ शकते, याबद्दलही संघात पूर्णतः स्पष्टता आहे. अशा रीतीनं सत्ता हाती घेण्यासाठी संघानं या ना त्या वैचारिक भूमिका जनसंघ व भाजप यांना घ्यायला लावल्या आहेत. भाजप स्थापन करताना घेतलेली ‘गांधीवादी समाजवाद’ ही तशीच भूमिका होती. आज आता ‘विकास’ हा मुद्दा महत्त्वाचा बनवण्यात आला आहे. कालपर्यंत पाक हा शत्रू होता. आज तो कौरव ठरवून संघ त्याला सावत्र भाऊ मानू लागला आहे आणि त्याच्याशी संवाद साधायला हवा, असं म्हणत आहे. त्या त्या वेळच्या जनभावना लक्षात घेऊन संघ सोईस्कर पवित्रे घेत आला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची प्रतीकंही संघ सोईस्करपणं आपलीशी करून घेत असतो. गांधी हे त्याचं उत्तम उदाहरण. आंबेडकर हे दुसरं. जेथे विरोधकांना आपलंसं करून घेता येत नाही, तेथे संघ त्यांचा काटा काढतो. आता ‘हिंदू-बौद्ध’ असं एक वैचारिक प्रारूप (मॉडेल) संघ गेली काही महिने पुढे करत आहे. हिंदू धर्म व बौद्ध धर्म जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही धर्मांची जी काही तत्त्वं आहेत, त्यांच्यात संयोग घडवून आणून जग पर्यावरणस्नेही व सुस्थित बनवता येऊ शकतं, असं संघ म्हणत आहे. तशा आशयाची एक परिषदही दिल्लीत गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आली होती.

‘आता विचारसरणीच्या पलीकडे तत्त्वज्ञानाकडे गेलं पाहिजे’, असं मोदी यांनी या परिषदेत सांगितलं. विचारसरणीला तत्त्वज्ञानाचा आधार असतो. पण ‘हिंदुत्वा’च्या विचारसरणीला हिंदू धर्माचा आधार घेता येत नाही; कारण हिंदू धर्मातील सर्वसमावेशकता हा कमकुवतपणा आहे व तो दूर करण्यासाठीच हिंदुत्वाची चौकट उभी करण्यात आली आहे. ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदू धर्म’ हे समानार्थी शब्द नाहीत. ‘विकासा’च्या नावाखाली सत्ता हाती घेतल्यावर आता ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करायचं असल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंचं पाठबळ लागणार आहे. त्यामुळे बहुधा संघ रणनीती आखत आहे, ती हिंदू धर्माला एका विशिष्ट साचेबंद चौकटीत बसवण्याची. एकूण हिंदू धर्माचं स्वरूप लक्षात घेता, हे शक्य होईल की नाही, हेही सांगता येत नाही. वेळ पडल्यास संघ रणनीतीही बदलू शकतो. पण संघ या दिशेनं वाटचाल करण्याच्या प्रयत्नांत आहे, असं मोदी यांचे उद्गार दर्शवतात एवढं निश्चित. संघानं राजकीय सत्ता स्वबळावर हाती घेतली आहे. ‘आम्ही हिंदू आहोत’ अशी जाणीव बहुसंख्याकांत रूजवण्यात संघाला मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळंच ‘यापुढं देशाचं भविष्य आमच्या हाती आहे’, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी व इतर मंत्र्यांशी चर्चा केल्यावर सांगितलं आहे. हा टप्पा संघ गाठू शकला आहे, तो जागतिकीकरणाच्या ओघात भारतीय जनतेच्या ज्या आशा-आकांक्षा बदलत गेल्या आहेत, त्या लक्षात न घेऊन, जुन्याच राजकीय भूमिकांना चिकटून बसलेल्या पक्ष व संघटना यांना लोक विटले आहेत, हे लक्षात घेतल्यानं. या जनसमुदायाला आकर्षित करण्यासाठी ‘विकासा’ची रणनीती आखून ती प्रसारमाध्यमाच्या प्रभावी वापर करून संघानं अमलात आणली.

हे असं संघाचं स्वरूप व रणनीती आहे. संघाच्या हातात सत्ता आल्यानं पंतप्रधान मोदी व मंत्री चर्चेसाठी सरसंघचालकांच्या पुढे हजेरी लावणारच. संसदेच्या इमारतीच्या पहिल्या पायरीवर मोदी यांनी डोकं टेकवलं व राज्यघटना हा माझा धर्म आहे, असं त्यांनी जाहीर केलं, हा निव्वळ डावपेचाचा भाग आहे. कोणत्याही स्वयंसेवकाचा व प्रचारकाचा भारताच्या राज्यघटनेवर विश्वासच असूच शकत नाही. तसा तो असेल, तर गोळवलकर गुरुजींना त्यांना प्रथम नाकारावे लागेल आणि तसं कधीच ते करणार नाहीत.

थोडक्यात मोदी व मंत्री सरसंघचालकांना भेटतात आणि त्यांच्याशी चर्चा करतात, यावर टीका करून काही हाती लागणार नाही. खरा मुद्दा आहे, तो मतं मोदींच्या पारड्यात का पडली हाच. निदान आज तरी देशात लोकशाही आहे आणि जोपर्यंत मतदार पाठीशी उभे करता येत नाहीत, तोपर्यंत खर्‍या अर्थानं संघाच्या सत्तेचा पाया हादरवता येणार नाही. तसं होण्यासाठी देशात तयार होणार्‍या संपत्तीचं समाजाच्या सर्व थरांपर्यंत वाटप होईल, असा पारदर्शी, कार्यक्षम व परिणामकारक राज्यकारभार करण्याचं राजकीय पारूप आखून, ते आम्ही कसं अमलात आणू, हे देशात जेथे जेथे व ज्या स्तरांवर सत्ता हाती असेल, तेथे दाखवून देणं, हे मोदी सरकारला खरा विरोध करण्याची पहिली पायरी आहे.
सौजन्य – दिव्य मराठी
प्रकाश बाळ, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]

Previous articleधर्माचे धोकादायक राज्य.
Next articleगांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here