या गुंगाऱ्यात लोकांचे मूलभूत प्रश्न तसेच राहावेत, ही इच्छा असतेच. पण त्याचबरोबर त्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजनाच करायची नसते, म्हणून हा सगळा झोलझाल सुरू असतो. अलीकडच्या काही वर्षांत ही प्रॅक्टिस इतकी तीव्र झालीय की, रोजगार, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांची पार वाट लागल्यावरच लोकं जागे होतात. मगच त्यांना मुख्य विषय महत्त्वाचे वाटू लागतात. तेव्हा त्यांना पाहिलेले – वाचलेले – ऐकलेले शे-पाचशे उपविषय आठवतही नाहीत. सुशांतसिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू आणि महानायिका कंगना रनौट हे उपविषय आहेत. पण राजकीय कुरघोड्यांच्या खेळात, असे उपविषय ‘मीडिया’द्वारे मुख्य विषयाच्या वेष्टनात गुंडाळून सादर केले जातात. परिणामी, मुख्य विषयाचे परिणाम गळ्यापर्यंत येईपर्यंत लोकांना जाग येत नाही.
देशाची अखंडता आणि एकात्मतेच्या दृष्टीने जम्मू-काश्मीरचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. कधीकधी तो आपल्या देशातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसमोरचाही प्रश्न बनतो. तो प्रश्न कायमचा निकाली काढल्याच्या आविर्भावात गेल्या वर्षी ‘३७० कलम’ रद्द करण्यात आले. तरीही काश्मीर- पाकिस्तान हे झेंगट सुटलेलं नाही. कंगनाने मुंबईतील सुरक्षेची तुलना ‘पाकव्याप्त काश्मीर’शी करून एक प्रकारे मोदी सरकारला चिमटा काढलाय. असो. काश्मीर प्रश्न संपविणे अथवा तो नियंत्रणात आणणारा तोडगा काढणे, हा ‘मोदी सरकार’ पुढचा मुख्य विषय असायला हवा. पण तो टाळण्यासाठी कधीमधी खर्या-खोट्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ ची कल्हई केली जाते. गेले वर्षभर जम्मू-काश्मिरात राष्ट्रपती राजवट आहे. ती ‘केंद्र सरकार’च्या सोयीची असली, तरी लोकशाही व्यवस्थेला पोषक व भूषणावह नाही. या राजवटीत काश्मिरी नेते नजरकैदेत आहेत. जनतेच्या विहार आणि विचार स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत. ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न तिथल्या लाखो लोकांना पडलाय. पण या प्रश्नावर कधी चर्चा वा ‘मन की बात’ झाली नाही. चर्चाच नसेल तर उपाययोजना काय डोंबलाची होणार ?