मिरज हे महाराष्ट्रातील छोटेसे गाव संगीतवाद्ये निर्मितीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच मिरजेत कडू भोपळ्यातून संगीताचे मधुर सूर निर्माण करणारा एक मनस्वी कलावंत राहतो. त्या प्रसिद्ध वाद्यनिर्मात्याची ओळख करून देणारा हा लेख…
– मॅक्सवेल लोपीस, वसई
भारतीय संगीतात तंतुवाद्यांचे एक वेगळे स्थान आहे. भारतात ही तंतुवाद्ये मिरज, कलकत्ता, तंजावर आणि लखनौ अशा ठिकाणी घडवली जातात. ही वाद्ये तयार करताना विज्ञान आणि कला यांचा योग्य मेळ साधावा लागतो. कलाकाराप्रमाणे या वाद्यांचे कारागीरदेखील त्या वाद्यांसंबंधात एखाद्या गोष्टीत निपुण असतात. जसे की… कुणाला जवारी (गवयाच्या सुरानूसार वाद्याचा आवाज खुलवण्याची क्रिया) चांगली लावता येते, कुणाला कलाकुसर उत्तम जमते, कुणी रंगकामात वाकबगार असतो… परंतु या सर्व विशेषता एकाच कारागिरात असल्या तर तो एक दुग्धशर्करा योगच!
बशीर घुडूलाल मुल्ला हे मिरजेतील असे एक तंतुवाद्य कारागीर आहेत जे या सर्व कलांत निपुण आहेत. बशीरजींचा जन्म मिरजेचा. त्यांचे आजोबा सिराजसाहेब मुल्ला हे प्रा.देवधरांचे वर्गमित्र… अशा प्रयोगशील संगीतसम्राटाच्या सहवासात त्यांचे सुरांचे सूक्ष्म ज्ञान अधिकच परिपक्व झाले होते. रोजगार मिळवण्याच्या निमित्ताने ते मिरजेपासून 30 किलोमीटर दूर असलेल्या ‘देशिंग’ गावाहून मिरजेला येऊन स्थायिक झाले. आजोबांकडून बशीरजींना ही कला वारशानेच मिळाली. वडिलांकडून विधीवत प्रशिक्षण घेण्यापेक्षा स्वानुभवांतून आणि निरीक्षणातून त्यांनी ही कला आत्मसात केली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
बशीरजींचे शालेय शिक्षण दहावीपर्यंतचे. वडिलांचे अनुकरण करत छोटी-छोटी वाद्ये तयार करणे हा बशीरजींचा लहानपणापासूनचा उद्योग. त्यांनी तयार केलेली वाद्ये शोपीस म्हणून विकली जात. सारंगी, सतार, दिलरुबा, तानपुरा, संतूर, ताऊस, बीन, सरोद ही वाद्ये बशीरजी हळूहळू कधी तयार करू लागले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही.
संगीतवाद्ये तयार करताना लागणारा कच्चा माल मिळण्यापासून ते तयार झालेला माल ग्राहकांना पोहोचवण्यापर्यंत या कारागिरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते… (याविषयीचा विस्तृत लेख साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध होणार आहे.) शिवाय त्यातून मिळणारा नफा इतका तुटपुंजा असतो की, त्यासाठी या कारागिरांना जोडधंदा म्हणून शेतीदेखील करावी लागते. हे सर्व गणित सांभाळताना बशीरजी एक मनस्वी कलावंत या जाणिवेतून कलेतून आनंदानुभूती घेत ही वाद्ये घडवत असतात हे विशेष! तसेच ही कला जोपासताना स्वरज्ञान अधिकाधिक पक्के होण्यासाठी आवश्यक असलेला दिग्गज कलाकारांचा सहवास अनुभवायला ते कायम उत्सुक असतात. या पेशाकडे व्यवसाय म्हणून न पाहता कलाकारांशी आयुष्यभराचे नाते जोडण्याचा त्यामागचा उद्देश ते व्यक्त करतात.
प्रवासात सोयीस्कर म्हणून फक्त लाकडात तयार केलेले वेगवेगळ्या साईजचे तानपुरे आजकाल प्रचलित झाले आहेत… बशीरजींसारख्या परंपरेतील योग्य ते जपणाऱ्या आणि टिपणाऱ्या कारागिराला ते पटत नाही. तशा तानपुऱ्यातूनदेखील भोपळ्याच्या तानपुऱ्याइतकाच गुंजणारा स्वर निघावा म्हणून त्यांचे शोधकार्य अविरत चालू असते.
मोठ्या प्रमाणातल्या उत्पादनाऐवजी (Mass Production) दर्जेदार उत्पादनावर (Quality Production) भर देणारे बशीरजी वाद्ये पारंपरिक पद्धतीने घडवणे आणि राखणे (Seasoning) यासाठी एका वाद्याची निर्मिती करायला ते कमीत कमी तीन महिने घेतात.
बशीरजींनी तयार केलेला एक तानपुरा माझ्याकडे आहे. या तानपुऱ्याचा सूर इतका सुरेल, गोलाकार आणि मोकळा आहे की, तसा सूर मी केवळ माझे गुरू पं. चंद्रकांत लिमये यांच्याकडील पं. वसंतरावांचा तानपुरा वाजवत असताना अनुभवला होता.
प्रो. बी. आर. देवधर, पं. विनायकबुवा पटवर्धन, राम कदम, नारायण बोडस अशा दिग्गजांचा बशीरजींना सहवास काही काळासाठी लाभला… तर मधुकर पणशीकर, माणिक वर्मा, सी.आर. व्यास, बबनराव हळदणकर, इंदिरा केळकर, वसंतराव कुलकर्णी, मधुसूदन पटवर्धन, जे.आर. आठवले, ए.पी. नारायण गावकर, श्याम गोगटे, जे.व्ही. भातखंडे, शंकर अभ्यंकर अशा दिग्गजांचा सहवास दीर्घ काळ मिळाला. सध्याच्या काळातल्या शुभा मुद्गल, संजीव चिम्मलगी, वैजयंती जोशी, भाग्येश मराठे, सुहास व्यास, केदार बोडस आणि माझे गुरू मधुसूदन आपटे अशा कलाकारांचा कारागीर म्हणून ते चोखपणे आणि आत्मसन्मानाने भूमिका पार पाडत असतात.
अलीकडेच माझ्या एका तानपुऱ्याचे काम त्यांच्याकडे दिल्यावर त्यांच्या या वाद्यसाधनेशी आणि तिच्यातील अनंत समस्यांशी माझा जवळून परिचय झाला. आजकाल तानपुऱ्यासाठी लागणारे मोठ्या आकारांचे भोपळे मिळणे खूपच कठीण होऊन बसले आहे. किंबहुना साधारणतः 53 इंचांचा घेर असलेल्या भोपळ्यात पुरुषी तानपुरा कसाबसा बसवावा लागतो. अशा वेळी ‘मोठा भोपळा हवा’ या माझ्या जिद्दीपायी बशीरजी लॉकडाऊनच्या काळात मिरज ते सोलापूर प्रवास करून महत्प्रयासाने तब्बल 61 इंच घेर असलेला भोपळा मिळवतात… यातच व्यवसायापलीकडील त्यांची कामाप्रति असलेली तळमळ दिसून येते.
गेली 52 वर्षे बशीरजी हा व्यवसाय करत आहेत. आज वयाच्या 65 व्या वर्षीही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. तानपुरा, सतार अशा वाद्यांची जवारी लावण्यासाठी त्यांना देशातील निरनिराळ्या प्रांतांत ये-जा करावी लागते. मुंबईत आल्यावर प्रो. देवधर स्कूल गिरगाव इथे दहापंधरा दिवस त्यांचा मुक्काम असतो.
सध्या इलेक्ट्रिक तानपुऱ्याचा वापर वाढल्यामुळे तसेच मोठमोठ्या कलाकारांकडून त्याच्या होत असलेल्या उदात्तीकरणामुळे या वाद्यकारागिरांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्येची खंत बशीरजींना सतावते. इलेक्ट्रिक तानपुरा या कारागिरांसाठी जितका समस्या ठरला आहे; तितकाच त्याचा अतिवापर भारतीय संगीताच्या प्रगतीतदेखील अडसर ठरणारा आहे.
बशीरजींची पुढची पिढी आणि सर्वच वाद्यकलावंतांची पुढची पिढी हा वारसा पुढे नेण्यास सक्षम आहे… परंतु मागणीतील घट, त्याप्रति सरकार पातळीवरील निष्क्रियता आणि वर उल्लेखलेल्या समस्यांपायी ते आता या व्यवसायाच्या बाबतीत आशावादी नाहीत. येणाऱ्या काळात उदारीकरणाच्या वाहत्या वाऱ्यात नवनवीन पाश्चिमात्य वाद्ये भारतात गुंजू लागतील. शॉर्टकट्सचा पर्याय शोधणारी आजची पिढी तानपुरा लावणे, जवारी काढणे अशा कटकटीत न पडता इलेक्ट्रिक तानपुऱ्यावर नैसर्गिक स्वर लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहील आणि त्या वेळी तानपुऱ्याची जवारी लावणारे बशीर मुल्लांसारखे कारागीर विरळ झालेले असतील. लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या तानपुऱ्याची जवारी लावण्यासाठी पाचसहा महिने त्यांची वाट पाहणे कदाचित त्या वेळी चिरंतन वाट पाहण्यात बदललेले असेल.