भागवती हिंदुत्वाचे कर्मकांड

■ ज्ञानेश महाराव

——————————————-

     ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि परिवार आपण कोदंडधारी रामाचा आदर्श ठेवून देशकार्य करीत असल्याचं दाखवत असला, तरी प्रत्यक्षातलं त्यांचं दिसणं- वागणं दहातोंडी रावणासारखं आहे. ह्याची साक्षच खुद्द सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी संघाच्या ‘विजयादशमी’ मेळाव्यातील भाषणातून दिलीय. नागपुरात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चं मुख्यालय आहे. तिथे दरवर्षीच्या दसऱ्याला संघ सेवकांच्या भव्य उपस्थितीत संघाचा ‘विजयादशमी’ उत्सव होतो. यंदा तो ‘कोरोना’च्या नियमावलीच्या कारणात्सव ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. परंतु, त्यात मोहन भागवत जे ‘हिंदू-हिंदुत्व-हिंदूराष्ट्र’ अनुषंगाने बोलले ; त्याचे पडसाद त्याच संध्याकाळीच मुंबईत दादर येथील ‘वीर सावरकर स्मारक सभागृहा’त झालेल्या ‘शिवसेना’च्या दसरा मेळाव्यात उमटले.

     अलीकडेच, ‘कोरोना लॉकडाऊन’च्या नियमानुसार बंद करण्यात आलेली मंदिरं दर्शनासाठी खुली करावीत, यासाठी ‘संघ-भाजप’ संबंधित संघटनांनी घंटानाद आंदोलन केले होते. या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदनही दिले होते. त्या संबंधाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यपालांनी पत्राद्वारे विचारणा करताना, ‘हिंदुत्ववादी शिवसेना ‘सेक्युलर’ झालीय का,’ अशा आशयाचा खोचक प्रश्न विचारला होता. तो देशाच्या ‘सेक्युलर संविधान’नुसार राज्यपाल झालेल्या कोश्यारी यांना मारक ठरला. राज्यपालांच्या या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कोश्यारी यांना फटकारले.

       या प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात केला नाही. पण त्याच अनुषंगाने ते म्हणाले, ‘संघासाठी ‘हिंदुत्व’ हा शब्द आपल्या प्रथा-परंपरांवर आधारित मूल्यपद्धतीचा आहे. हिंदुत्व हे देशाच्या सत्त्वाचे सार आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून, त्याला पूजापद्धतीशी जोडून संकुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय!’

       हा नादान प्रयत्न कुणी केला वा कोण करतंय, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालकांना केला पाहिजे होता. परंतु त्यांना ‘भाजप’च्या राजकारणावर टीका करायची असल्याने, त्यांनी ‘भाजप’ला ‘संघाकडून हिंदुत्व नीट शिकून घ्या,’ असा सल्ला सरसंघचालकांच्या भाषणातील विधानांच्या दाखला देऊन दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका जाहीर केल्यापासून (१९८६) ‘संघ-भाजप परिवारा’तर्फे ‘शिवसेना’च्या हिंदुत्वाला ‘बेगडी’ ठरवण्याची खोड अधूनमधून काढली जाते. त्याला ‘शिवसेना’ नेतृत्वाकडून उत्तर देताना, कधी सावरकरांच्या तर कधी संघाच्या ‘हिंदुत्ववादी’ भूमिकांचे दाखले देत ‘शिवसेना’चे हिंदुत्व ‘दगडी’ (भक्कम) कसे ते सुनावले जाते. त्यातून सावरकरांनी आणि संघाने एकमेकांच्या हिंदुत्वाला खोटे ठरवण्यासाठी काय काय उद्योग केले, याची जाण ‘शिवसेना’ नेतृत्वाला नाही ; हेच स्पष्ट होतं. तसं यावेळीही झालं.

       संघाने आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या प्रसार-प्रचारासाठी ‘जनसंघ- भाजप’ या आपल्या राजकीय शाखांमार्फत गायीला ‘गोमाता’ करून वापरली. त्यातून समाजात मुस्लीम द्वेष वाढवला. याउलट, सावरकर म्हणतात, ‘गाय हा उपयुक्त पशू आहे. ती महामाता असेल तर ती बैलाची ! गायीच्या पोटात म्हणे, ३३ कोटी देव असतात ! मग मालकाने गायीला फटके मारल्यावर तिच्या पोटातील देव-देवता लंबे झाले पाहिजेत !’ सावरकरांनी कर्मकांड, पोथ्या-पुराणातली चमत्कार नाकारलेत. त्या सावरकरांना संघाने आपल्यात सामावून घेतले असते, तर मोहन भागवतांवर ‘हिंदुत्व कर्मकांडात नाही,’ असे म्हणण्याची वेळ आज आली नसती.

       तथापि, ‘आजही हिंदूंनी सार्वजनिक पत्थरी देव-देवतांचे उच्चाटन आणि भट-ब्राह्मणांना रिटायर केल्यास; कर्मकांड व फालतू पूजापद्धती आपोआप विसर्जित होईल,’ असे काही व्यावहारिक बोलण्याचे भागवतांना सुचत नाही! आणि तसे काही त्यांना सुनावायचे, ‘देव-देवळात भटाचे पोट असते,’ हे सत्य ठणकावून सांगणार्‍या ‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्या नातवालाही सुचत नाही! प्रबोधनकारांचं हिंदुत्व ज्वलंत आहे. त्यावर भागवतांनी संघाचं हिंदुत्व एकदा तपासून घ्यावं आणि मगच ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा देशाचे आणखी तुकडे पाडणारा ‘पांचजन्य’ फुंकावा. हा ‘भारताच्या संविधाना’ला आव्हान देणारा ‘शंख’ उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची प्रेरक शक्ती वाटतो.

      असो. प्रबोधनकारांच्या ज्वलंत हिंदुत्वात संघाच्या सोवळ्या आणि सावरकरांच्या ओवळ्या हिंदुत्वाची राख होते. प्रबोधनकारांचं हिंदुत्व हे सर्व प्रकारची थोतांडं, कर्मकांडं यांचं उच्चाटन करून देशाला एकसंध ठरवणारं मूल्य लोकांत प्रस्थापित करणारं आहे. ते मूल्य मानवतेचं आहे. समानतेचा आग्रह धरणारं आहे. ते अस्सल हिंदुत्व आहे.

……………………….

दूध ओतायचं, शेण खायचं

    इस्लामींची ‘इस्लामीयत’ आहे. ख्रिस्त्यांची ‘ख्रिश्च्यानिटी’ आहे. जैनांचा ‘जैनिझम’ आणि बौद्धांचा  ‘बौद्धिझम’आहे. या सार्‍यात थोड्या-फार प्रमाणात कट्टरता आहे. याउलट हिंदूंचे हिंदुत्व तसे नाही. ते इतर धर्मीयांनाही त्यांच्या संस्कृतीसह सामावून घेते. हिंदूधर्मात कट्टरता आणि सनातनी वृत्ती आहे. तसा त्यांचा अतिरेक मोडून काढणारा पुरोगामीपणाही आहे. नीच भटशाहीने लादलेली अस्पृश्यता, जातीयता, वर्ण्यव्यवस्था आहे. पण ती झुगारून टाकणारी संत- सुधारकांची दीर्घ परंपराही आहे. हिंदुत्व असे व्यापक आहे. ते राष्ट्रीयत्वाची जोडणे, हा इतर धर्मीयांना डिवचणारा खोडसाळपणा झाला.

      हिंदुत्व हे परधर्मीयातलं जे लोकोद्धाराचं कार्य आहे, ते सामावून घेणारं आहे. हिंदू संस्था-संघटनांचं सेवाकार्य ही ख्रिस्ती मिशनऱ्यांची देन आहे. अनाथ-गरिबांसाठी  दान-देणगी देणं, हे मुस्लिमांच्या ‘जकाती’मधून आलंय. बौद्ध धर्माचं उगमस्थान भारतात आहे. पण तो धर्म परदेशात विस्तारला. ‘फॉरेन रिटर्न’ झाल्यावर त्याने भारतालाही शांततेचा मंत्र दिला. ‘जैन’, ‘शीख’ हे भारतातच वाढ- विस्तार झालेले धर्म आहेत. या सार्‍यांना सामावून घेण्याची शक्ती- बुद्धी केवळ हिंदुत्वात आहे. ही सर्वसमावेशकता म्हणजेच हिंदुस्तानी संस्कृती. इतकी व्यापकता संघाच्या हिंदुत्वात असती, तर देशात हिंसक  दहशतवादाला आमंत्रण देणारा अयोध्येतला मंदिर-मशीद वाद ‘संघ- भाजप’ परिवाराने  ३०-३५ वर्षं खेळवला नसता. सत्ताप्राप्तीसाठी वापरला नसता. यांच्या सत्तालोभाने सावरकरांचे हिंदुत्वही ट्रकच्या साखळीला धरून सायकलस्वार जसा प्रवास करतो, तसे पळाले. ते ‘शिवसेना’ नेतृत्वाने डबलसीट बसून वापरले आणि ते अडगळीत निघालेल्या सावरकरवाद्यांनी सोयीने वापरूही दिले‌. यातून आंधळ्याच्या हाताला लागलेल्या हत्तीसारखे हिंदुत्वाचे दर्शन घडले. त्यात कर्मकांडांचे, थोतांडांचे, अंधश्रद्धांचे प्रदर्शन मांडले गेले; अंधभक्त माजवले गेले. भगव्या शेमल्या-फेटेवाल्या नामट्यांची वर्दळ वाढली. जत्रा- पत्थरा- यात्रा वाढल्या. हिंदूंत कट्टरता आणि परधर्मद्वेष वाढला.

     अल्पसंख्याकांच्या कट्टरतेतून वाढणारा दहशतवाद बहुसंख्याकांच्या विवेकबुद्धीने शमवता येतो. याउलट, बहुसंख्याकांची कट्टरता, दहशत ही अल्पसंख्याकांचं जीणं हराम करतेच ;  पण त्यापेक्षा अधिक ती बहुसंख्याकांच्या नाशाला आणि देशाच्या अखंडतेला घातक ठरते. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी गोमांसाच्या संशयाखाली दलितांची चामडी सोलून काढली. ख्रिस्ती धर्मप्रसारकांना जाळून मारले. मुस्लीम अखलाक याला झुंडीने घरात घुसून ठार केले. याची चर्चा खूप झाली. त्याचवेळी नरेंद्र दाभोलकर,कॉम्रेड पानसरे, कुलबर्गी या विद्वान समाजकार्यकर्त्यांचे खून ते हिंदू असूनही झाले, याची चर्चा मात्र फारशी झाली नाही.

      हे तिघेही हिंदू धर्माच्या २५ दार्शनिकांपैकी एक असणाऱ्या चार्वाकाच्या देव-धर्म- तत्त्वज्ञान यांच्या चिकित्सा परंपरेचे पाईक होते. ते हिंदूंचेच देव-धर्म यांच्या माध्यमातून होणारे शोषण जगजाहिर करीत होते. त्यांची हत्या हिंदू सनातनी प्रवृत्तींनी केली म्हणून शंकराचार्यांनी अश्रू ढाळले नाहीत की, सरसंघचालकांनी हळहळीचे दोन शब्द व्यक्त केले नाही. हा खुनशीपणा  हिंदूंच्या कर्मकांडापेक्षा अधिक धर्मविघातक आहे. तो कोणाच्या हिंदुत्वाची शोभा वाढवतो ?

     हिंदुत्व हे गायीसारखं आहे. गाय चारा खाते. पचवते. मग ती दूधही देते आणि शेणही देते. दूध हे पौष्टिक. शेण हे जळणासाठी, निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त. पण दूध हंडे-हंडे भरून पत्थरी देव-देवतांवर ओतायचं आणि शेण-गोमूत्र खायचं- प्यायचं, असले उलटे उद्योग, गेली ३० वर्षं ‘हिंदू व्होट’ बँक तयार करून वापरण्यासाठी  देशात सुरू आहेत. त्यासाठीच आसाराम- रामरहीम यांसारखे बुवा- महाराज वाढवण्यात आले. सत्संग- अध्यात्माचा बाजार फुलवण्यात आला. हे सारे बोगस असल्याचे ‘कोरोना’ने स्पष्ट केलंय.‌ हा चोरबाजार ‘कोरोना’ चं संकट संपताच उठणार आहे. तो या बाजाराचा आद्यप्रवर्तक असलेल्या संघावर उलटू नये, याची काळजी घेण्यासाठी मोहनपंतांनी कर्मकांड-पूजापद्धती यापेक्षा संघाचं हिंदुत्व कसं वेगळं आहे, ते सांगण्याची मखलाशी केलीय.

     हे शेण खाल्ल्याने मळमळू लागल्यावर, गोमूत्राच्या गुळण्या घेऊन ओकाऱ्या काढण्यासारखं आहे. अशाचं हिंदुत्व इतकं बाजारू असेल, तर हिंदुराष्ट्राचं स्वप्न किती बोगस असेल, याचा अंदाज यावा.

………………………….

प्रबोधनकारांची वाट, हिंदुत्व सफाचाट

    ‘जनसंघ’ (कार्यकाल : १९५१ ते ७७) असल्यापासून ‘संघ -भाजप’ परिवाराची ओळख ही भटजी- शेठजींची पक्ष- संघटना अशीच होती आणि आहे. ‘भाजप हा कधीच बहुजनांचा पक्ष नव्हता,’ असं आता ‘राष्ट्रवादी काँग्रेसवासी’ झालेले एकनाथ खडसे म्हणतात‌. तथापि, त्यांनी ‘भाजप’मध्ये असतानाच ‘संघाच्या गाळणीतून भाजपचं नेतृत्व’ कशाप्रकारे तयार होतं,’ याची माहिती दिली आहे. तेव्हा ते म्हणाले होते, ‘संघात गाढव जरी पाठवले, तरी तो संस्काराने चांगला माणूस म्हणून तयार होतो !’ याच न्यायाने ‘मोदी सरकार’ देशात आल्यापासून गेल्या सहा वर्षांत अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी संघाच्या शिबिरात, कार्यक्रमात हजेरी लावून गाढवाचे गोविंदराव झाले आहेत. अर्थात, ही चलाखी खऱ्या नोटा घेऊन खोट्या ‘नोटांचा पाऊस’ पाडणाऱ्या बुवाबाजीपेक्षा वेगळी नाही‌.

       हा खोटेपणा संघ परिवार स्थापनेपासून (१९२५) करीत आहे. त्यासाठी ‘हिंदुराष्ट्र निर्माणासाठी हिंदू संघटन’ असा शंखनाद सुरू असतो. सावरकरांचे जेलमुक्ततेसाठीचे माफीनामे, मुस्लीमद्वेषी हिंदुत्व हे वादाचे मुद्दे आहेत. तथापि, त्यांच्या अखंड हिंदुराष्ट्राच्या आग्रहात स्पष्टता होती, प्रामाणिकता होती, ती नाकारता येण्यासारखी नाही. ती संघ परिवाराच्या हिंदुत्वाचे गिलिट साफ करण्यासाठी पुरेशी आहे. सावरकरांनी आपल्या पक्ष-संघटनेचं नाव ‘हिंदू महासभा’ असं ठेवलं. याउलट, संघ परिवाराने आपल्या पक्ष संघटनांच्या नावापासूनच ‘हिंदू’ या शब्दाला दूर ठेवीत हिंदुत्वनिष्ठेचे सोंग-ढोंग सत्तालाभासाठी नाचवत ठेवले. हे १८५७ च्या बंडापासून सुरू आहे.

        त्याची चिरफाड करताना ‘प्रबोधन’कार केशव सीताराम ठाकरे म्हणतात, ‘महाराष्ट्रात पेशवाईच्या म्हणजे ब्राह्मणी सत्तेच्या पुनर्घटनेशिवाय ब्राह्मण क्रांतिकारकांच्या डोक्यात, मस्तकात दुसरे वेडच नव्हते. आजही ते नाहीसे झालेले नाही. (हे सावरकरांना उद्देशून आहे.)  किंचित स्पष्टच बोलायचे तर, चालू घडीला हिंदुत्वनिष्ठेच्या मुखवट्याखाली चाललेल्या या (‘मी परत येईन’ छापाच्या) लोकांच्या उघड-गुप्त खटपटी, या ब्राह्मणी सत्तेच्या प्रस्थापनेसाठी आहेत. ही दीर्घ सूचनेची मख्खी महाराष्ट्रातला तमाम ब्राह्मणेतर वर्ग पुरेपूर ओळखून आहे. ( तथापि, ‘भाजप’ बरोबरच्या युतीत ‘शिवसेना’च्या प्रगतीची २५ वर्षं सडली, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येण्यास २०१४ ची विधानसभा निवडणूक यावी लागली.)  महात्मा गांधींच्या राजकारण प्रवेशापूर्वी हे लोक स्वतःला ‘राष्ट्रीय’ म्हणवीत असत. यांचा पक्ष राष्ट्रीय, सभा राष्ट्रीय, पुढारी राष्ट्रीय, व्याख्यान राष्ट्रीय; यांची वर्तमानपत्रे, कीर्तने, ग्रंथ, गणपतीचे मेळे, सर्व काही राष्ट्रीयच राष्ट्रीय ! आता नेमका तोच ‘राष्ट्रीय’ शब्द शिवी म्हणून काँग्रेसी राजकारणाला वापरून ते आता ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणून मिरवण्यात धन्यता मानतात! स्वजातीच्या अभिमानावर लांबरुंद तणाव्याची विश्वबंधुत्वाची शालजोडी पांघरून इतर जनांना भुरळविण्याच्या कामात या लोकांचा हात कोणीही धरू शकणार नाही !’ ( वाचा :  ‘प्रबोधन’कार ठाकरे लिखित ‘हिंदवी स्वराज्याचा खून’ (प्रकाशन : १९२२) व ‘प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी’ (१९४८) हे ग्रंथ.)  या पार्श्वभूमीवर संघ परिवाराचे हिंदुत्व तपासायला हवे !

……………………………………..

संघाचे सावरकर, तोंडी लावण्यापुरते

     कोणते हिंदुत्व योग्य आणि कोणते अयोग्य, याबाबत सरसंघचालक  मार्गदर्शन करतात‌. मात्र, त्यासाठी कर्मकांडी हिंदुत्वाला भट-ब्राह्मणसह नाकारणाऱ्या सावरकरांच्या हिंदुत्वाचा

दाखला म्हणून देत नाहीत. महात्मा फुले, ‘प्रबोधन’कार ठाकरे यांची नावं जीभ झडून पडण्याच्या भयास्तव ते घेत नसावेत, हे समजू शकते. परंतु, जातीनिशी ब्राह्मण्याचे श्राद्ध घालणाऱ्या सावरकरांना तोंडी लावण्यापुरतेच वापरण्याचे कारण काय ?

      संघाला जर अस्सल हिंदुत्वाचं मूल्य प्रस्थापित करून हिंदूराष्ट्र निर्माण करायचे होतं, तर हिंदू- हिंदुत्ववादाऐवजी ‘जनसंघा’ला ‘एकात्म मानवता’ वादाच्या आणि ‘भाजप’ला ‘गांधीवादी-समाजवादा’च्या पाळण्यात टाकण्याची गरज काय होती ? या पक्षांना थेट ‘हिंदुत्व’वादी अवतारात प्रकट करण्याची हिंमत संघाने का दाखवली नाही ? याउलट थेट हिंदुत्व सांगणाऱ्या, पक्ष-संघटना ठसठशीत ‘हिंदू’ कुंकू लावून चालवणाऱ्या सावरकरांना नाकारण्याचा आणि सोयीप्रमाणे वापरून बदनाम करण्याचा उद्योग संघ परिवाराने केला आहे.

     ‘भारतरत्न’साठी सावरकरांचं नाव चर्चेला आणायचं आणि त्यांची ‘माफीवीराची बदनामी’ नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची, हा खेळ गेली २५ वर्षं सुरू आहे. त्यात सावरकरांना पुढे करून हेडगेवार- गोळवलकर- देवरस या सरसंघचालकांच्या दिव्य विचारधनाचं संरक्षण केलं जातं.

       सावरकरांचं हिंदुत्व हे ग्रंथप्रामाण्य नाकारीत, आधुनिक हिंदुराष्ट्राचा पुरस्कार करणारं आहे. तरीही गोळवलकर गुरुजींच्या लेखी सावरकर ‘बाटगे हिंदू’ ठरले ! त्यांनीच सावरकरांच्या ‘अखंड भारत’च्या लढ्याला विरोध केला‌. त्यांनीच ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या’ असा संदेश साहित्यिकांना देणाऱ्या सावरकरांना ‘ब्रिटिश सरकार’चे ‘रिक्रूटवीर’ म्हटलंय. याउलट, १९४५-४६ च्या फाळणी प्रश्नाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकीत संघ परिवार ‘काँग्रेस’बरोबर होता‌. ‘संघ- भाजप’ परिवाराचा ‘हिंदुत्व’वाद हा स्थापनेपासूनच फसवा आहे. तो सत्याचा नाही, तर सत्तेचा भुकेला आहे.

………………………..

सत्तेसाठी हिंदुत्व, सोयीसाठी भारतीय

    ‘संघ स्वयंसेवक’ नरेंद्र मोदी हे देशाचे दोनदा प्रधानमंत्री झाल्याने संघकार्याचं मोठं कौतुक होतंय. ती सत्तेची किमया आहे. मात्र, ही सत्ता हिंदुत्वाचं दर्शन घडवून नाही, तर  ‘अच्छे दिन’च्या भूलथापा मारून आणि ‘सर्जिकल स्ट्राइक’ची ‘हव्वा’ करून प्राप्त झालीय. या ‘छाछू’गिरीची जाणीव भारतीय जनतेला झालेली आहे. त्याचे परिणाम संघावर उलथू नयेत, यासाठी ‘भाजप’ सत्ताधारी उन्मादी हिंदुत्वापेक्षा, संघाचं हिंदुत्व कसं वेगळं आहे, ते दाखवणारी शाब्दिक कसरत सरसंघचालकांच्या भाषणातून दिसते.

     हा भक्त मंडळींना आत्मवंचनेच्या धोक्यात टाकून सटकण्याचा प्रकार आहे. त्यासाठी संघाने पळवाटा ठेवूनच आपल्या परिवाराचा वाढ-विस्तार केलाय. त्यासाठी बाता हिंदूहिताच्या मारायच्या ; पण भारतीय जनतेची लाथ टाळण्यासाठी संस्था- संघटनांच्या नावात ‘हिंदू’ येऊ नये, याची खबरदारी घेतलीय. यासाठीच ‘हिंदू जनसंघ’ ऐवजी ‘भारतीय जनसंघ’ आणि ‘हिंदू जनता पक्ष’ ऐवजी ‘भारतीय जनता पक्ष’ अशी नामकरणं झालीत. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘भारतीय किसान सभा’, ‘भारतीय मजदूर संघ’ या लोकांत काम करणार्‍या पक्ष- संघटनांना ‘भारतीय’करणाचा मळवट फासलाय. अपवाद ‘विश्व हिंदू परिषद’चा ! ती संघ कार्यासाठी विदेशातल्या हिंदूंच्या मदतीचा ओघ  खेचण्यासाठीची युक्ती आहे !

     अशा युक्त्यांवर युक्त्या वापरायच्या आणि वर हिंदू- हिंदुत्व, हिंदूराष्ट्राच्या नावाने ओरड करायची. हा संघाचा कावा ना संघ स्वयंसेवकांना कधी कळला ; ना गाढवाचे गोविंदराव झालेल्यांना समजला ! अहंकाराला ज्ञान समजणे ; आम्ही सांगतो तेच खरे ; देशाचे-हिंदूंचे काही होवो, संघ (नव्हे संघ नेते) टिकला पाहिजे, एवढ्यापुरतेच संघाचे हिंदुत्व मर्यादित आहे. देशातील हिंदूंनी आपल्या प्रचंड त्यागाने ‘संघ- भाजप’ला सत्ता दिलीय. पण हे ‘सेवक’ होण्याऐवजी ‘धनी’ झालेत. त्याच मिजाशीत अर्थतज्ज्ञांना डावलून अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी ‘नोटाबंदी’ मोदींनी लादली. विरोधी पक्षांच्या राज्यातील सत्तेचं नाक दाबण्यासाठी ‘जीएसटी’चा चाप लावला.

     या दोन्ही ‘तुघलकी’ निर्णयांतून शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजकांना आणि तिथल्या कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त केल्यावर; चुकीच्या पद्धतीने ‘कोरोना- लॉकडाऊन’ लादून देशाची अर्थव्यवस्थाच पार खड्ड्यात नेली. स्वयंसेवकाच्या या नुकसानकारी मनमानीचा समाचार घेण्यासाठी, हिंदुत्वाची उठाठेव करणाऱ्या सरसंघचालकांची दातखीळ कधी सुटणार?

    स्वयंसेवकाचीच सत्ता असताना देशाची, हिंदूंची प्रगती किती झाली, ते सांगण्यास संघाचे ‘थिंक टँक’ तयार नाहीत. कारण, याबाबत सत्य सांगायचे तर, चुकांचीची यादी भलीमोठी आहे. ती देशाचा शक्तिपात आणि हिंदूंचा भ्रमनिरास करणारी आहे. या काळातच शत्रुत्व असलेल्या  चीन-पाकचे प्रमुख प्रधानसेवकाचे मित्र झालेत; तर जाब विचारणारे स्वकीय देशद्रोही झालेत.

     अशा खोट्या हिंदुत्वाची ओझी वाहणारी गाढवं,  रावणासारख्या दशमुखी संघाच्या विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून ‘भक्त’ म्हणून वावरतात. ‘संघ-भाजप’ परिवाराची सोवळी फाडणाऱ्यांच्या अंगावर जातात. त्यांना त्यांचा गाढवपणा समजावून सांगण्यातच खरं हिंदुत्व आहे. तेच भारताची लोकशाही सशक्त आणि मजबूत करणारं  राष्ट्रकार्य आहे !

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत.)

9322222145

Previous articleगांधीजी आणि सरदार पटेल
Next articleबाईत खोल काय असतं?…आईपण की बाईपण?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here