-किशोर देशपांडे
पृथ्वीवर लाखो वर्षे इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच मानवप्राणीदेखील निसर्गाचा एक हिस्सा बनूनच वावरत होता. कोणती वनस्पती कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे उगवावी व विकसित व्हावी आणि कोणत्या प्राण्यांनी कोणत्या जागी कशा प्रकारे जन्म घ्यावा व जीवन कंठावे यावर मानवाचे काहीही नियंत्रण नव्हते. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले खाद्यान्न शोधत फिरणे; फळे, कंदमुळे व मिळाल्यास शिकार केलेल्या प्राण्याचे मांस खाणे; हिंस्र प्राण्यांपासून आणि निसर्गाच्या कोपापासून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणे—एवढेच त्याच्या हाती होते.
गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका यांसारखी तृणधान्ये अत्यल्प प्रमाणात रान-गवताच्या स्वरूपात कुठे-कुठे उगवत होती. परंतु, आग हाताळण्याची सवय झाल्यानंतर निरीक्षणांती सेपियन्स मानवाच्या हे लक्षात आले की या तृणधान्यांना पाखडून, भरडून, शिजवून खाल्ल्यास बऱ्यापैकी भूक भागते. परंतु पाखडणे, भरडणे, शिजवणे वगैरे प्रक्रिया करण्यासाठी धान्याची कणसे, ओंब्या त्यांच्या झाडावरून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी हलविणे भाग होते. या प्रवासात काही दाणे जमिनीवर सांडणे आणि त्यांपैकी काहींतून पुन्हा झाड उगवणे स्वाभाविक होते. असे करता करता आपल्या मुक्कामाच्या जवळपास गव्हाचे पीक वाढू शकते आणि तो थोडा खोलवर जमिनीत पुरल्यास पिकाचे प्रमाण चांगले वाढते हे मानवाच्या लक्षात आले. हळूहळू माणसांना गहू-तांदूळासारख्या तृणधान्यांची लागवड करून शेतीचे तंत्र गवसले आणि सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी मानवजातीने कृषीयुगात प्रवेश केला. बहुतांश भटके समूह स्थिर झाले. काही थोड्या समूहांना हे स्थित्यंतर आवडले नाही, ते भटकेच राहिले. तथापि, खाद्यान्नाचा भरपूर साठा करून ठेवण्याची क्षमता मानवाला प्राप्त झाली.
हेही वाचा- आकलनाची उत्क्रांती–https://bit.ly/2T6ai3L
पण या कृषीक्रांतीमुळे सामान्य माणसांचे जीवनमान सुधारले का? आपल्या अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या शिकारी पूर्वजांच्या तुलनेत शेतीशी बांधलेले मानव अधिक सुखी झाले का? केवळ उत्क्रांतीच्या जीवशास्त्रीय निकषानुसार पाहिले तर तीच प्रजाती यशस्वी मानली जाते, जी केवळ टिकूनच राहत नाही तर स्वतःच्या D.N.A. च्या प्रतीही (म्हणजे लोकसंख्या) वाढवत राहते. त्या अर्थाने मानवजात निश्चितच यशस्वी मानावी लागेल. पण मानवाचे जीवन पूर्वीपेक्षा शेतीमुळे अधिक सुसह्य झाले असे आढळत नाही. फळे-कंदमुळे आणि शिकारीच्या शोधात भटकणाऱ्या पूर्वजांचे त्याकामी रोज फारतर पाचेक तास खर्च होत असत. त्यांना मोकळा वेळ बराच मिळायचा. त्यांचा आहार हा तुलनेने अधिक विविधतापूर्ण व पोषक असायचा. त्यांच्या बालकांना जन्मल्यावर तीन-चार वर्षे आईचे दूध मिळायचे. त्यामुळे ती बालके निरोगी राहायची. स्वाभाविकच दोन मुलांमध्ये वयाचे अंतरही बरे राहायचे. शेतकरी वंशजांच्या तुलनेत हे भटके पूर्वज अधिक समाधानी असायचे.
उलटपक्षी, शेतकरी मनुष्य सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोज दहा-बारा तास शारीरिक कष्ट उपसू लागला. जमीन नांगरणे, बी पेरणे, पिकांना पाणी देणे, तण काढणे, पिकांची नासाडी करणारे पक्षी व जनावरे हाकलणे, चोर पकडणे, कापणी करणे, पाखडणे, भरडणे, दळणे, शिजवणे, साठवलेले धान्य सुरक्षित राखणे अशी असंख्य कामे त्याला करत राहावी लागली. त्याचा आहार एकारला. धान्य हाच मुख्य आहार झाला. दाटीवाटीच्या गाव-वस्तीत जीव-जंतूंचे संसर्ग व साथीचे रोगही बळावू लागले. लोकसंख्येचा स्फोट झाला आणि बालमृत्यूंचे प्रमाणही वाढले. वाढत्या कामासाठी वाढीव दोन हातांची गरज होतीच. पण त्यामुळे खाणारी तोंडेही वाढली. धान्याचा साठा ही वाढलेली संख्या गिळंकृत करू लागली. शेत-जमिनीच्या कब्जासाठी, धान्य-साठ्यांच्या व पाळीव प्राण्यांच्या चोरीसाठी किंवा लुटीसाठी शेजारी गावांसोबत भांडणे, मारामाऱ्या, लढाया होऊ लागल्या. शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी राज्यसंस्था अस्तित्वात आली तीच ‘अतिरिक्त’ धान्याची मोठी वाटेकरी ठरली. शिवाय पूर्वजांचे आत्मे, देवी-देवता संतुष्ट राहावेत म्हणून पुजारी मंडळींना वाटा देणे भाग पडले. शेतीमध्ये काबाडकष्ट करून उपजीविका चालवणारा कास्तकार कंगालच राहिला.
हेही वाचा–मानवजातीचे प्रश्नांकित भविष्य!–https://bit.ly/30chGhS
डॉ. हरारी एक गमतीदार प्रश्न विचारतात. गहू हे मानवाचे ‘पाळीव पीक’ झाले की मानव हा गव्हाचा ‘पाळीव प्राणी’ झाला? कारण, उत्क्रांतीच्या कसोटीनुसार तर गव्हाची मानवापेक्षाही प्रचंड पैदास झाली. मध्य-पूर्वेतल्या छोट्याश्या भागात बारा हजार वर्षांपूर्वीपर्यंत एक रान-गवत म्हणून तुरळक उगवणारा गहू अल्पावधीतच माणसांना राबवून जगभर पसरला. सध्या पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी साडे-बावीस लक्ष चौरस किलोमीटर भूभाग गव्हाने व्यापला आहे. उत्तर अमेरिकेच्या मैदानी प्रदेशात दहा हजार वर्षांपूर्वी गव्हाचे एकही रोप नव्हते. तिथे आता शेकडो किलोमीटर गव्हाशिवाय दुसरे पीक दिसत नाही. गव्हाला दगड आणि खडे आवडत नाहीत म्हणून माणसांनी शेतजमिनी स्वच्छ करताना स्वतःच्या पाठी मोडून घेतल्या. गव्हाला आपला भोवताल, पाणी आणि इतर पोषकद्रव्ये इतर वनस्पतींसोबत वाटून घेणे आवडत नाही. त्यामुळे, मानवी स्त्री-पुरुष तळपत्या उन्हात गव्हासोबत उगवलेले तण काढत राहिले. गहू आजारी पडतो म्हणून मानव त्याचे अळ्या आणि किड्यांपासून रक्षण करण्यासाठी झटत राहिला.
गव्हावर ससे आणि टोळधाडी यांनी आक्रमण करू नये म्हणून शेतकऱ्यांनी शेतीला कुंपण घातले आणि पहारे सुरु केले. गव्हाची तहान भागवण्यासाठी मानवाने विहिरी खोदल्या, कालवे खणले आणि जड-जड बादल्यांनी पाणी उपसून गव्हाला घातले. गव्हाची भूक भागवण्यासाठी मानवाने जनावरांचे शेण देखील हातात घेऊन गव्हाला चारले. ‘मालक’ गहू मस्त मोकळ्या हवेत, सूर्य-चंद्राच्या प्रकाशात डोलत राहिला तर ‘गुलाम’ मानव त्याच्या सेवेसाठी गावातल्या गलिच्छ, अंधाऱ्या पिंजऱ्यासारख्या झोपड्यांत/घरांत कोंडल्या गेला. वास्तविक मानवाची शरीर-रचना अशा प्रकारचे कष्ट उपसण्यासाठी अनुकूल नव्हती. लाखो वर्षे मानव-प्राण्याने चालणे, धावणे, झाडांवर चढणे, पोहणे, निशाणा साधणे अशी हलकी-फुलकीच कामे केली होती. शेतीच्या कष्टांमुळे मानवाला स्लिप-डिस्क, संधिवात, हर्निया यासारख्या अनेक व्याधींनी ग्रासले. कृषीक्रांतीने मानवाची मोठीच फसवणूक केली असे हरारींचे मत आहे.
पण माणूस मुळात शेतीकडे का वळला? आणि आपली फसगत लक्षात आल्यावर त्याने शेती करणे सोडून का दिले नाही? आपले जीवन अधिक सुसह्य व कमी कष्टाचे व्हावे या आशेने मानवाने शेती करणे सुरु केले. परंतु भटक्या जीवनापासून स्थिर कृषी-जीवनापर्यंत झालेले हे परिवर्तन सावकाश व दीर्घ कालावधीत घडले. त्याचे जास्त चटके बसायला लागले त्यावेळी लोकसंख्येचा स्फोट झालेला होता. शेती सोडून जुनी भटकी जीवन शैली परत स्वीकारणे मानवाला अशक्य होते. शिवाय, आपले पूर्वज अन्न-शोधक भटके होते हे मानव विसरूनही गेला होता. शेतीला पर्याय नव्हता. असेच एक उदाहरण आजही दिसते. उच्च-तंत्रशिक्षण किंवा व्यवस्थापन शिक्षण घेतलेली विशी-पंचविशीची तरूण मुले स्वतःचे जीवन-मान सुधारेल या आशेपोटी ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांची नोकरी स्वीकारतात. वयाच्या पस्तीशीनंतर नोकरी सोडून थोडे आरामशीर आयुष्य जगण्याचे त्यांच्यापैकी अनेकांचे स्वप्न असते. पण पस्तीशी गाठता-गाठता कर्जाचे ओझे वाढलेले असते. आधी चैनीच्या समजल्या जाणाऱ्या वस्तू कधी गरजेच्या बनतात हे लक्षातही येत नाही. उंच जीवन-मानासाठी मोठे घर, वाहन, फर्निचर इत्यादी गोष्टींकरीता ते कर्ज घेतलेले असते आणि कर्जफेडीसाठी नोकरी करत राहणे त्यांना भाग पडते. ही नोकरी त्यांची दमछाक करते. त्यामुळे ते कमी पगाराची थोडी आरामदायी नोकरी स्वीकारू शकत नाहीत आणि सुखासीन वा समाधानी आयुष्य हे स्वप्नच राहते.
हेही वाचा-मानवजात ‘अव्दितीय’ आहे का?https://bit.ly/2Sqw15U
अर्थात, शेतीचा शोध लागून मानवाची जीवनशैली बदलण्यामागे केवळ जीवन अधिक सुसह्य व्हावे हे एकमेव कारण असेल असे निश्चित सांगता येत नाही. शेतीपूर्व काळातील आदिमानवांनी देखील अतिभव्य वास्तू उभारल्याचा पुरावा सापडला आहेत. अशा वास्तू उभारण्यासाठी हजारो माणसांना बराच काळ तिथे काम करावे लागले असणार. त्या वास्तुजवळच त्याकाळी गव्हाची शेती असल्याचेही पुरावे दिसतात. म्हणजेच या सर्व कारागीरांना अन्नपुरवठा व्हावा म्हणूनही शेतीची निर्मिती झाली असावी असे दिसते. भटक्या अवस्थेतील मानवांनाही सांस्कृतिक, धार्मिक जाणीवा होत्या आणि त्यासाठीच त्यांनी मंदिरांसारख्या भव्य वास्तूंची उभारणी केली असणे संभवते. कालांतराने त्या वास्तूभोवती गाव वसले असू शकते.
शेती आणि पशुपालन यांच्या इतिहासासंबंधी डॉ. हरारी यांचे अधिक रोचक विवेचन पुढील लेखांकात पाहू.
(युवाल नोआ हरारी यांच्या ‘सेपियन्स’ ग्रंथाच्या आधारे)
(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)
9881574954
How wheat domesticated Humans? | Yuval Noah Harari | Agriculture Revolution | Ancient History |