व्हिएतनाम: अमेरिकेला झुंजविणारा देखणा देश

-राकेश साळुंखे

‘ हनोई ‘ (Hanoi) ही व्हिएतनामची राजधानी असून या शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे . व्हिएतनामी भाषेत Ha Noi असे दोन शब्द आहेत . Ha म्हणजे मध्ये आणि Noi म्हणजे नदी . हे शहर Red river व Nhue river यामध्ये वसलेले आहे . हनोई हे शेकडो वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा नमुना असलेल्या इमारतींसाठी प्रसिद्ध आहे . व्हिएतनाम पूर्वी फ्रेंच वसाहत होती. फ्रेंचांनी आपल्या पाऊलखुणा फ्रेंच शैलीतील इमारतीतून मागे सोडल्या आहेत.

हनोईमध्ये एक मजेशीर किस्सा सांगितला जातो , येथे एकदा खूप उंदीर झाले होते तेव्हा तेथील सरकारने उंदीर नष्ट करण्यासाठी एखादी व्यक्ती जितके उंदीर मारेल तितके पैसे त्याला मिळतील असे जाहीर केले. मग काय लोकांनी अक्षरशः उंदीर पाळून पैसे कमावले .हनोईत सिल्क कपडे , हस्तकलेच्या वस्तू यांची प्रसिद्ध बाजारपेठ आहे . हनोईला गेल्यावर पाहायलाच पाहिजेत अशी काही ठिकाणं म्हणजे अनेक अरुंद रस्त्यांच जाळं असलेलं ओल्ड क्वार्टर , १२ व्या शतकातील ट्रेन ऊ पॅगोडा , व्हिएतनाममधील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी टेम्पल ऑफ लिटरेचर . या शहरात खूप तळी आहेत . ही तळी व त्याचे शहरात फिरवलेले पाणी हे फ्रेंच आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे . त्यामुळे युरोपियन देशातील शहरात असल्याचा भास होतो .

ओल्ड क्वार्टर या भागाला हनोई शहराचं ह्रदय म्हटले जाते . अरुंद अशा जवळपास ७० रस्त्यांनी एका तळ्याच्या ( Hoan Kiem Lake ) सभोवताली हा भाग वसलाय . या रस्त्यांवर निरनिराळी दुकाने आहेत . सुमारे २००० वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावातील कारागीर , विक्रेते या ठिकाणी आपापला माल विकायचे . त्यावरून या रस्त्यांना नावे आहेत . येथील घरे खूपच अरुंद आढळून आली . कारण विचारता असे कळले की टॅक्स कमी भरावा लागावा, यासाठी ही योजना आहे. तेथे दुकानदारांना बिल्डिंगच्या रुंदीप्रमाणे टॅक्स भरावा लागतो आणि जवळजवळ प्रत्येक घरात काही ना काही व्यवसाय ( दुकान ) सुरूच असतो .

व्हिएतनाममधील Ho Chi Minh हे दुसरे महत्वाचे शहर आहे. व्हिएतनामची आर्थिक राजधानी तसेच व्हिएतनाम युद्धात महत्वाची भूमिका बजावलेले शहर , अशी याची ओळख आहे . या शहराला ‘ सायगाव ‘ असेही म्हटले जाते . हो ची मिन्ह या नावाचे व्हिएतनामचे राष्ट्रपिता होते , त्यांच्या नावावरूनच या शहराला Ho Chi Minh हे नाव पडले .

येथे मोठ- मोठे चायना बझार आहेत . त्यापैकी Binh Tay , Ben Tanh हे प्रसिध्द आहेत . या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींची घाऊक दुकाने तसेच कपडे , सोव्हेनिअर्स , सिरॅमिक्स च्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवलेल्या दिसतात . येथील वॉर म्युझियम खूप वेदनादायी अनुभव देते . एक माणूस दुसऱ्या माणसाशी असा का वागतो? हा प्रश्न युध्दग्रस्त लोक , सैनिक यांचे फोटो पाहून पडल्याशिवाय रहात नाही . छिन्न – विच्छिन्न झालेली लहान मुले ,महिला , वृद्ध यांचे पळतानाचे न बघवणारे फोटो पाहून डोळ्यात पाणी येते .

या चिमुकल्या देशाने गनिमी काव्याने युद्ध करून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला जेरीस आणले होते . स्त्रियांनी त्या युध्दात महत्वाची भूमिका बजावली होती . व्हिएतनाम युद्धाचाच एक मागे राहिलेला ठसा म्हणजे जमिनीखाली खोदलेली टनेल्स . अमेरिकी सैन्याने जमिनीवर जागोजागी भुसुरुंग पेरले होते . त्यामुळे व्हिएतनामी नागरिकांनी अमेरिकन सैन्याशी गनिमी काव्याने दोन हात करण्यासाठी ही टनेल्स खोदलेली होती . अमेरिकेने युध्द जिंकण्यासाठी सर्व तऱ्हेचे क्रूर प्रयत्न केले होते. अगदी पाण्यात विष सुद्धा मिसळले होते . चू ची टनेल हे हो ची मिन्ह पासून एक तासाच्या अंतरावर आहे . साधारण १२० किमी लांबीचे हे टनेल असून आपल्याला काही भागात आतमध्ये जाता येते . आत जाण्यापूर्वी एक शॉर्ट फिल्म दाखवतात त्यामुळे टनेल सिस्टीम कसे कार्य करते ते समजते .टनेल आतमधून खूपच अरुंद आहे . दर १० मीटरवर इमर्जन्सी EXIT आहेत . परंतु ज्यांना अरुंद जागेचा फोबिया आहे, त्यांनी न गेलेले बरे .

हो ची मिन्ह शहरात रस्त्याला लागून सुंदर बगीचे आहेत . या बगीच्यामध्ये व्यायाम करण्यासाठी साधने, नृत्य सराव करण्यासाठी स्टेजेस आहेत . युद्धाचे घाव झेलून पुन्हा नव्याने उभ्या राहिलेल्या शहराचा निरोप घेऊन पुढे निघालो . आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांची पुढची पिढी मात्र अमेरिकेत नोकरी करून सुखी होण्याची स्वप्ने पाहत आहे . अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली पहायला मिळते . येथून रेडिमेड कपडे अमेरिकेला निर्यात केले जातात . व्हिएतनाममध्ये फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते , ती म्हणजे रस्त्यावरील मोटरबाइक्स ची संख्या . बहुतांश लोक मोटरसायकलवर फिरत असतात . सायकल रिक्षाचा एक अजब प्रकार येथे दिसला , रिक्षाला पुढे दोन चाके व मागे एक चाक होते .रिक्षासायकलची सफर कोनिकल हॅट घालून करण्यातील मजा काही औरच आहे .

व्हिएतनामची कॉफी प्यायला विसरू नका . जगात कॉफी निर्यात करणारा हा दोन नंबरचा हा देश आहे . खरेदीची आवड असणाऱ्या लोकांना सिल्क कापड , सिरॅमिकच्या वस्तू ,इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा खूप वाव येथे आहे . एक गम्मत म्हणजे डोमेस्टिक एअरपोर्ट आपल्या बस स्टँड प्रमाणे आहेत . आपल्या स्टँडप्रमाणे तेथेही खूप गर्दी होती.  काही ठिकाणी लोक रिंगण करून जेवायला बसलेली दिसत होती . मला मजा वाटली.  पण स्वच्छता अफलातून . येथे देशांतर्गत फिरण्यासाठी विमान सोयीचे पडते . एअरपोर्टवर स्वतः चे पाणी नेण्याची परवानगी देणारा हा देश आहे . येथे मसाजही खूप प्रसिद्ध! पण थायलंड परमाणे नव्हे! फूट मसाज सेंटर तर खूप आहेत . इथे बॉडी मसाजची खुर्चीवजा आधुनिक मशीनही पाहायला मिळाली. प्रत्येक देशात खूप काही पहायला , अनुभवायला असते . कोणताही देश आपण एका भेटीत पाहू शकत नाही . भविष्यात मला या देशातील अजून काही ठिकाणी जायचे आहे . बघू , कधी जमतेय. तुम्ही मात्र या सुंदर आशियाई देशाला संधी मिळताच अवश्य भेट द्या .

(लेखक ‘लोकायत’ प्काशनाचे संचालक आहेत)

84849 77899

हेही वाचा- व्हिएतनाम: निसर्गसौंदर्याने उधळण केलेला स्वस्त आणि मस्त देशhttps://bit.ly/3jHMY7i

10 Top Tourist Attraction in Vietnam- क्लिक करा

 

Previous articleअ सुटेबल बॉय: विक्रम सेठची भन्नाट कादंबरी छोट्या पडद्यावर
Next articleशेतीचा शोध: एक ऐतिहासिक फसवणूक?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here