अ सुटेबल बॉय: विक्रम सेठची भन्नाट कादंबरी छोट्या पडद्यावर

©सानिया भालेराव

संध्याकाळची मस्तं गुलाबी थंडी.. फार बोचरी नाही.. जॅकेट हलकेच फक्त अंगावर चढवायला लावणारी अशी.. तर एक दिवस अशा थंडीत संध्याकाळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गाड्यांवर बसून चकाट्या पिटत असतांना घोळक्यातली एक मैत्रीण म्हणाली, “लेफ्ट को देखो जरा.. कयामत है..”.. मग हळूच एक एक जण करत, खास मुली ज्या स्टाईलने हिरवळ बघतात, त्यानुसार डावीकडे सगळ्यांनी बघून घेतलं.. आपापली विशेषणं देऊन झाली होती त्यांची.. मी पण लेफ्टला नजर टाकली आणि तोंडातून पहिला शब्द निघाला.. “काय कॅड आहे राव.. आईशप्पथ”.. यावर बाकीच्या पोरी कॅड म्हणजे काय या टेक्नीकॅलीटीमध्ये अडकल्या आणि अर्थ विचारायला लागल्या.. मी आपली बहार निरखण्यात बिझी होते कारण मुली, स्त्रियांच्या नशिबात हिरवळ फार क्वचित बघायला मिळते.. म्हणून कॅड नामक पुरुषांचा लै दुष्काळ असतो बघा.. सो नीट बघून घेतल्यावर मग कॅड म्हणजे काय यावर उत्तर द्यायला मी सुरवात केली आणि ती झाली “अ सुटेबल बॉय” नावाच्या कादंबरीपासून.. कॅड म्हणजे कॅडबरी सारखा पुरुष/मुलगा.. देखणा, रुबाबदार आणि चॉकलेटी! या कादंबरी मधली मुख्य नायिका लता आणि तिची मैत्रीण मालती यांचा हा खास शब्द.. जेव्हा त्यांना असा एखादा मुलगा दिसत तेव्हा हे विशेषण त्या वापरत असत. अर्थात माझ्या मैत्रिणींनी ती कादंबरी वाचली नव्हती आणि आणि मी हे सांगितल्यावर त्यातल्या एका अतीव रोम्यांटिक मैत्रिणीने ती मागितली आणि माझी पहिली कॉपी गेली ती कायमची… पण त्या दिवसापासुन “कॅड” हा आमच्या ग्रुपचा ऑफिशियल शब्द झाला आणि आज चाळीशीच्या जवळ पोहोचतांना सुद्धा क्वचित हिरवळ दिसली की सगळ्यात आधी हाच शब्द ओठावर येतो…

“अ सुटेबल बॉय” ही विक्रम सेठ लिखित कांदबरी माझ्या आयुष्यात आली मी सोळा वर्षांची झाले तेव्हा.. हे इतकं परफेक्ट आठवतंय कारण माझ्या बाबाने सोळाव्या वाढदिवसाला मला जी गिफ्ट्स दिली होती त्यात ही कांदबरी देखील होती आणि तेव्हा पासून मी कितीदा ही कादंबरी वाचली असेल देवास ठाऊक.. कधी संपूर्ण तर कधी तुकड्यात.. काही पुस्तकं मनात इतकी ठसून जातात की आयुष्याच्या प्रवासाचा ती एक भाग बनून जातात. विशेषतः फुलण्याच्या वयात जी पुस्तकं हातात पडतात ती नंतर कधीही वाचली तरी त्या काळात पोहोचवतात आणि ही त्या पुस्तकाची जादू असते. असंच माझ्या आयुष्यातलं जादूवालं पुस्तक म्हणजे विक्रम सेठ यांचं “अ सुटेबल बॉय”. ही कादंबरी १९९३ साली प्रकाशित झाली होती. ही कादंबरी मी वाचली अत्यंत धोक्याच्या वयात.. सोळाव्या वर्षी.. मी ही कादंबरी मूळ इंग्रजीमध्येच वाचली पण मराठीमध्ये सुद्धा शुभमंगल या नावाने ही अनुवादित झाली आहे. “अ सुटेबल बॉय” ही माझ्यासाठी खूप साऱ्या कारणांमुळे खास आहे. साधारण १४०० पानांची ही कांदबरी मी ज्या वयात वाचली ते वय फार गुलाबी होतं आणि अगदी आजही या पुस्तकामुळे तो गुलाबी रंग अनुभवता येतो.

नेटफ्लिक्सवर मीरा नायर दिग्दर्शित याच कादंबरीवर आधारित अ सुटेबल बॉय ही सिरीज प्रदर्शित झाली आहे. सो मी हे जे लिहिते आहे तो ना या सिरीजचा रिव्ह्यू आहे ना या कादंबरीचं परीक्षण… गेल्या चोवीस वर्षात या कादंबरीवर आणि लेखकावर असलेलं मी प्रेम व्यक्त करते आहे..बस इतकंच! तर नेटफ्लिक्सवर जेव्हा ”अ सुटेबल बॉय” या कादंबरीवर सीरिज येणार आहे हे कळलं तेव्हापासून माझ्या मनात फुलपाखरं उडायला लागली होती. ही कादंबरी वाचतांना मला फार वाटायचं की यावर पिक्चर निघायला हवा. लता, कबीर, मान, सईदा बाई यांना मोठया पडद्यावर पाहायला किती मजा येईल वगैरे.. सो सांगायचा मुद्दा हा की माझी टीनएज फँटसी होती कबीर आणि लताची ही गोष्ट बघायला मिळावी म्हणून. आता मी आहे नाईंटीज कीड त्यामुळे आपली टीनएज फॅन्टसी हीच असणार बॉस… आता यामुळे झालं काय की ही टीव्ही सिरीज बघतांना पृथ्वी गोल फिरायचं बंद करणार, वक्त थम जायेगा वगैरे वगैरे होणार असं मला वाटत होतं. धडधडत्या हृदयाने मी ही सिरीज बघायला घेतली आणि… मला जे वाटलं होतं ते झालं नाही.. म्हणजे सिरीज वाईट आहे असं नाही.. उत्तम आहे पण प्रॉब्लेम माझा आहे. ही मूळ कादंबरी मी आजवर सपूंर्ण म्हणाल तर सहा सात वेळा वाचली आहे आणि अधून मधून तर चिक्कार वेळा वाचली आहे. जसं फ़्रेंड्स या सिरीजचे डायलॉग्ज मी झोपेत सुद्धा म्हणू शकते तसंच या पुस्तकातले प्रसंग मला पाठ आहेत.. मी जर माझी अर्धवट सोडलेली पीएचडी यावर करायला घेतली असती तर जगातल्या सगळ्या विद्यापीठांनी मला गोल्ड मेडल दिलं असतं इतका अभ्यास आहे माझा यावर.. तर यामुळे झालं काय की मी पुस्तकाशी या सीरिजला कम्पेअर करत गेले आणि त्यामुळे दिग्दर्शकाने (मीरा नायर) काही गोष्टी दाखवतांना जी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे ती मला फार रुचली नाही. हा एक मुद्दा वगळता मला सिरीज आवडली पण मूळ कादंबरीत जो सोल होता तो पूर्णपणे या सिरीजमध्ये कॅप्चर झाला नाही असं वाटून गेलं..

गोष्ट काय आहे.. तर ती वाचा राव.. कारण ही फक्त हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा अशी लव्ह स्टोरी नाहीये. या कादंबरीमध्ये मुळात चार कुटुंब आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण १९५२ सालच्या इलेक्शनच्या काळातलं वातावरण, समाजातला वर्णभेद, जातीभेद, अपर क्लास कुटूंबातलं वातावरण, लहान खेड्यांमधली परिस्थिती.. आर्थिक, सामाजिक दरी.. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या आहे कदंबरीतली/सिरजमधली नायिका लता आणि तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधणारी तिची आई रूपा मेहरा.. लताचा जीव जडतो कबीरवर.. तिच्या कॉलेजमधला हँडसम कबीर दुर्रानी.. क्रिकेट खेळणारा, पोएट्रीमध्ये रमणारा.. चार्मिंग कबीर.. लता आणि तिची मैत्रीण मालती यांनी कबीर साठी वापरलेलं विशेषण म्हणजे कॅड.. कॅडबरी ( चॉकोलेट) सारखा पोरगा. लता आणि कबिरची लव्ह स्टोरी ही फार सट्ल आहे आणि इथे विक्रम सेठ यांची पोएटिक लेखणी कमाल करते. मूळ कादंबरीमध्ये या दोघांमध्ये नदीच्या घाटावर एक किस होतो.. हा या लव्ह स्टोरीचा हाय पॉईंट.. पण विक्रम सेठ यांनी लिहिलं इतकं जबरदस्त आहे की या दोघांमधला रोमॅन्स, यांच्या प्रेमातली पॅशन काहीही विशेष न लिहिता सुद्धा आपल्या पर्यंत पोहोचते. त्यामाने या सिरीजमध्ये बऱ्यापैकी फिजिकल क्लोजनेस दाखवला आहे.. आता आजकाल किस वगैरे दाखवणं किस झाड की पत्ती.. आणि खरं तर जितकं नैसर्गिकरित्या अधिक हे दाखवल्या जाईल तितका या बद्दलचा बाऊ कमी होईल असं मला वाटतं असलं तरीही या कादंबरीचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव असल्याने फिजिकल प्रोग्झीमिटिचे सीन्स मला खटकले. तसेही ते फार फार कमी आहेत आणि खूप साधे आहेत तरीही ही सिरीज पाहतांना मी सोळाव्या वर्षाच्या बालिकेच्या नजरेने ते पाहिले असल्याने मला खटकले.

बाकी १४०० पानं वाचणं ज्यांच्या जीवावर येतं पण ही अमेझिंग गोष्ट जाणून घ्यायची आहे त्यांनी ही सिरीज जरूर बघावी. या सिरीजमधले परफॉर्मन्स जबरदस्त आहेत. तब्बूची सईदा बेगम कहर आहे. इशान खट्टरचा मान देखील जबरदस्त.. ओम कपूर, अमीर बशीर यांची क्लास ऍक्टिंग आहे. रुपा मेहरा यांची भूमिका करणारी महिरा कक्कर मला जाम आवडली. रूपा मेहेरा यांचं इरीटेटींग कॅरॅक्टर तिने सॉलिड पकडलं आहे. विजय वर्मा हा ऍक्टर सध्या माझ्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. ‘शी’ या सीरिजमध्ये त्याने जे कमाल काम केलं आहे ते बघण्यासारखं आहे. या सिरीजमध्ये त्याने साकारलेला रशीद, रणविर शौरीचा वारीस, रसिका दुग्गलने साकारलेली सविता, विवान शाहचा वरून, निमित दासचा हरेश, शहाना गोस्वामीची ओव्हर द टॉप मीनाक्षी आणि दनेश रिझवीचा हँडसम कबीर.. सगळं परफेक्ट.. फक्त लताची भूमिका करणारी तान्या मला ‘लता’ वाटली नाही.. मूळ कदंबरीमध्ये लता ही दिसायला फार गोरी नसते.. इनफॅक्ट तिचं तिच्या मोठ्या बहिणीसारखं गोरं नसणं हे तिच्यासाठी योग्य स्थळ मिळण्यातली एक अडसर आहे असा काहीसा सेन्स कादंबरी वाचत असतांना सुरवातीच्या काही पानांमधून येतो.. सो हा एक फरक सोडला तर बाकी भूमिका चपखल आहेत.

पुस्तकावर जेव्हा एखादी कलाकृती बेतलेली असते तेव्हा तुलना होणारंच.. पण ती केली जाऊ नये कारण पुस्तकाचा इसेन्स मोठ्या पडद्यावर जसाच्या तसा कॅप्चर करणं अवघड आहे. ही मूळ कादंबरी मला अतीव प्रिय आहे आणि या निमित्ताने विक्रम सेठ यांची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि यासाठी दिग्दर्शक मीरा नायर यांचे आभार मानायला हवेत. या कादंबरीमधला काळ त्यांनी सुरेखरित्या उभा केला आहे. ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा बरीच खळबळ उडाली होती आणि आज कित्येक लोक ज्यांना या कादंबरीबद्दल काहीही माहित नव्हत त्यांना निदान हे नाव माहित होतंय ही नक्कीच माझ्या सारख्या वाचन वेड्यांसाठी आनंदाची बाब आहे. या कादंबरीचा अजून एक हाय पॉईंट हा आहे की अनुक्रमणिकेमध्ये प्रत्येक चॅप्टरचं नाव लिहितांना लेखकाने एक कप्लेट लिहीलं आहे. विक्रम सेठ यांची लिरीकल लेखणी अशीच या पुस्तकात जागोजागी सापडते..या पुस्तकावर मी पानंच्या पानं लिहू शकते पण आता इथे थांबते.. या कादंबरीच्या सुरवातीलाच विक्रम सेठ यांनी वॉल्टेयर यांचा माझा अत्यंत आवडता कोट लिहिला आहे.

” The superfluous, that very necessary thing” —Voltaire

सुप(र)फ्लुअस म्हणजे गरजेपेक्षा जास्तं, अनावश्यक… मला वाटतं या वाक्याला जितके पदर आहेत तितकेच पदर विक्रम सेठ यांच्या या कादंबरीतील लिखाणाला आहेत.. ते पदर उलगडून जे ज्याला दिसेल ते त्याचं.. शेवटी आपल्याला काय गवसतं, त्यातलं आपण काय घेतो आणि किती जवळ बाळगतो हे आपल्यावर असतं…

Cheers to A suitable Boy.. Cheers to The Vikram seth and Cheers to superfluously loving this very Novel…

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे .)

[email protected]

A Suitable Boy | Official Trailer | Tabu, Ishaan Khatter, Tanya Maniktala | Netflix India

 

Previous articleविमानवाहू युद्धनौकांचे अद्भुत विश्व
Next articleव्हिएतनाम: अमेरिकेला झुंजविणारा देखणा देश
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here