‘रिमेक तर सोडाच पण मूळ कुली नंबर १ हा तरी काही बघण्यासारखा चित्रपट आहे का?’ असं तुम्हाला वाटत असेल तर इथून पुढचा एक शब्द सुद्धा वाचू नका… उगाच कोणाच्या टाईमची खोटी नाही करायची आपल्याला! हं, पण जर गोविंदा टाईप चित्रपट कधी नं कधी एन्जॉय केले असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पादण्यापासून ते घोरण्यापर्यंत, कशातूनही फिलॉसॉफीचा सुगंध आणि आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत असेल, तर पुढचे शब्द नक्कीच तुमच्यासाठी आहेत. आता सगळ्यात आधी तर हे सांगून मोकळं व्हायला हवं की ‘कुली नं १’ हा रिमेक अत्यंत टुकार आहे. आवडला वगैरे अजिबातच नाहीये. पण या पिक्चरने भारी नॉस्टॅलजिया दिला राव आणि म्हणून हे शब्द उगवले.
तसंही आता नाही आवडत असले सिनेमे काही जणांना.. ठीक आहे बॉस.. प्रत्येकाच्या आयुष्याच्या फेजेस असतात. “हे असले” चित्रपट कसे काय बघतात लोक?” यात “हे असलं” असं म्हणायची प्रत्येकाची एक फेज असते. आता खोटं कशाला बोला, आपल्या आयुष्यात पण होती अशी फेज.. म्हणजे ती फेज असते नं, जेव्हा पेस्ट्री शॉपमध्ये गेल्यावर ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री मागवणाऱ्या लोकांकडे एक ‘खास कटाक्ष’ आपण टाकतो किंवा एखाद्या रेस्टरॉंटमध्ये गेल्यावर ‘अमूल पाव भाजी’ मागवतात लोक, तेव्हा मनातल्या मनात आपण छद्मीपणे हसतो आणि विचार करतो “हे असलं” काय मागवायचं बाहेर गेल्यावर.. तर “हे असलं” असं म्हणायची ती फेज.. म्हणजे थोडक्यात अतिप्रचंड जजमेंटल असण्याची फेज.. सो ही फेज असतेच आयुष्यात.. जेव्हा आपल्या आयुष्यात ही फेज होती तेव्हा आपल्याला पण गोविंदाचे चित्रपट सडकछाप वाटायचे.. ज्यांना हे चित्रपट आवडायचे त्यांचं बौद्धिक पातळी मोजून बिजून मोकळी व्हायचे मी…
आता आयुष्याचा एक नियम आहे यार.. आयुष्याच्या फेजेस कोणालाही चुकत नाहीत. जब जिंदगी अच्छी तरह से लेती है ना.. तो सबसे पेहली चीज वो लेती है, वो है जजमेंटल होना.. त्यानंतर च्यायला तुम्हाला लाख वाटलं तरी तुम्ही जज करूच शकत नाही दुसऱ्याला.. ते झेन बिन असतं ते हेच..आता अशा वेळी गोविंदाचे सो कॉल्ड सडकछाप चित्रपट पण तुम्हाला आवडायला लागतात. इतकंच काय ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्रीमधलं ते सॉफ्ट व्हाईट क्रीम, त्यावर बारीक किसलेलं लज्जतदार चॉकलेट, त्यावर सॉफ्ट क्रीमचा एक गोळा आणि त्यावर ती गुलाबी गुलाबी चेरी.. आय हाय.. जगातली बेस्ट पेस्ट्री होऊन जाते ब्लॅक फॉरेस्ट.. हे तर काहीच नाही.. तुम्ही बाहेर गेल्यावर अमूल पाव भाजी मागवता. मग समोर आलेल्या प्लेटमध्ये ती मस्त वाफाळलेली लालसर पावभाजीची भाजी , त्यावर वितळत जाणार अमूल बटरचं तळं, बाजूला बारीक किसलेला कांदा, अर्धवट तोंडाचं लिंबू.. हे जन्नत वगैरे वाटायला लागतं.. इनशॉर्ट आयुष्याने घेता घेता तुमच्याकडून जजमेंटल होण्याचा माज घेऊन टाकला असतो..
सो मूळ मुद्दा आहे कुली नंबर १ च्या रिमेकचा.. तर आधी हे स्पष्ट सांगायला हवं की मला हा रिमेक काही फार ग्रेट वाटला नाही. इतकंच काय तर गोविंदा सुद्धा मला कधी हिरो टाईप हँडसम वगैरे वाटला नाही. पण जेव्हा मी हा रिमेक पाहिला तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवलं की यार गोविंदा कमाल होता. इनफॅक्ट गोविंदापेक्षा करिष्मा कपूर मला जाम भारी वाटली. मला आठवतंय जेव्हा गोविंदा – करिष्माचे धांगडधिंगावाले पिक्चर यायला लागले, तेव्हा मी टीन्समध्ये होते. कुली नंबर १ आला तेव्हा मी होते सहावीत. मी पहिला असेल आठवीत वगैरे.. पण तेव्हा मला वाटायचं की यार ही करिष्मा किती यंटमछाप आहे. एवढी राज कपूरची नात.. ही काय ‘आ आ ई’ वगैरे करते या गोविंदा बरोबर.. कपूर खानदान की इज्जत मिट्टीमध्ये मिळवते आहे वगैरे ही….
आता मी आधीच कबूल केल्याप्रमाणे ती माझ्या आयुष्यातली दुसऱ्यांना माती खायला घालायची फेज होती कारण तोवर माती खायची फेज आपल्या आयुष्यात आलेली नव्हती.. तर ‘मोहब्बते’ मधल्या अमिताभच्या गुरुकुलचे तीन स्तंभ PPA म्हणजे परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन तेव्हा माझ्याही लाईफचे तीन स्तंभ होते सो मी करिश्माला पाण्यात पाहायचे. अर्थात नंतर आपली अक्कल आली ठिकाणावर आणि करिष्मा ग्रेट वाटू लागली.. तर या रिमेकमध्ये सारा अली खान दिसली आहे छान, पण तिला अभिनय येतंच नसल्याने ती बिचारी तरी काय करणार.. तिची फिगर वगैरे छान आहे पण करिष्मामध्ये जो एक्स फॅक्टर होता ना तो तिच्यात नाहीये राव.. आता तुम्ही म्हणाल, की तू म्हातारी झाली आहेस… तर तसं असेल सुद्धा पण एक सांगू? आजकालच्या मोस्टली हिरोइन्स या सारख्याच दिसतात. म्हणजे सगळ्यांनी जिम मारून मारून पोट नामक अत्यंत कमनीय अवयवाची पार हकलपट्टी करून तिथे ऍब्स उगवले आहेत, चेहेऱ्यावर काही बाही कलाकुसर करून ओठच मोठे कर, नाकच छोटं कर, थोबाडाची पार वाट लावली आहे, बाकी उरलेल्या शरीरात अजून काय काय छोटं मोठं होत असेल ते करून एक कस्टम मेड प्लॅस्टिक साच्यात स्वतःला बसवून घेतलं आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच काहीतरी खरं खुरं असणाऱ्या नट्या आज सापडतील. आणि हे प्रकर्षाने जाणवतं जेव्हा जुन्या पिक्चरवर हे असले रिमेक होतात. (मधुबाला आणि जुने पिक्चर तर नकोच काढायला.. ते सोनं होतं)
आता ‘हुस्न है सुहाना…’ मध्ये करिष्मा काय नाचली आहे राव.. तिचे कपडे त्यावेळीसाठी रिव्हलिंग होते पण आज सारा जेव्हा सतत उघडे वाघाडे कपडे घालून नसलेली कंबर आणि सपाट पोट आत बाहेर करते, तेव्हा या नट्या किती प्लॅस्टिक होत चालल्या आहेत हे अधिक जाणवायला लागतं… इव्हन ‘मै तो रस्ते से जा राहा था’.. या गाण्याचा पण पार कचरा केला आहे तिने.. वरूण धवन ऑन द अदर हॅन्ड चार्मिंग वाटतो. अफकोर्स गोविंदाचं स्क्रीन टायमिंग कोणीही कॅच करू शकत नाही पण वरुण प्रॉमिसिंग वाटतो. तो डायरेक्टर्स ऍक्टर असल्याने बदलापूर, ऑक्टोबर मधून त्याने स्वतःमधला नट दाखवून दिला आहे. सो त्याला इथे टॉलरेट करता येऊ शकतं. बाकी पिक्चर फुल टीपी असल्याने त्यावर काय वेगळं लिहिणार? पण मला वाटतं काही चित्रपट हे थेरपी या कॅटेगरीमध्ये मोडणारे असतात.
आता काही जणांना वाटेल की शी.. गोविंदाचे चित्रपट वगैरे, त्यात त्याचा रिमेक हे काही लिहिण्याचे विषय आहेत का? तर काय आहे ना बॉस, काही चित्रपट थेरपी या कॅटेगरीमध्ये मोडणारे असतात. जसे की गोविंदा – कादर खानचे चित्रपट.. एक विशेष अगम्य, टुकार आणि अत्यंत बोगस मूड झाला असेल तेव्हा लावले की मी त्या क्षणी जगात सगळ्या गोष्टी विसरून कादर खान नामक मार्व्हल माणसाला ऍप्रिशिएट करत, मनोरंजन या शब्दाचा खरा अर्थ अनुभवत बसते. तर हे जे थेरपीवाले पिक्चर असतात नं ते तुमचा मूड चुटकीसरशी ट्रान्सफॉर्म करू शकतात. या चित्रपटांमधले काही सीन्स जरी पहिले तरी ते वर्क करतं. मी वर म्हणाले तसं या चित्रपटांची एक जाम भारी फिलॉसॉफी आहे.. आता समजा की एक कढई शेगडीवर आहे. त्यात मस्तपैकी तेल ओतलं आहे. खालून आता आग पेटवली आहे. तेल गरम व्हायला सुरवात झालीय आहे. तेलामध्ये चिंगू पिंगू बुडबुडे यायला लागले आहेत. मग तेल उकळायला लागतं आणि आपल्याला गरम गरम वाफा दिसायला लागतात. आता उकळलेल्या तेलाच्या पण डिग्रीज असतात आणि वडे तळले जाण्याच्या या नुसार दोन कॅटेगरीज होतात. जेव्हा मध्यम आचेवर उकळलेल्या तेलात जेव्हा वडे सोडले जातात तेव्हा ते वडे तेलात पडल्या क्षणी अगदी मऊसर चर्रर्र असा आवाज येतो, मग ते वडे तेलामध्ये छान फुगतात, आणि त्याला अलगद उलटं करून, छान तळल्यावर ते वडे गोल्डन ब्राऊन होतात आणि एकदम झकास दिसतात. पण जेव्हा गरम गरम रापलेल्या तेलामध्ये वडे सोडले जातात, तेव्हा ते तेल इतक्या वेळेपासून भयंकर प्रमाणात तापलेलं असल्यामूळे वडा पडता क्षणी फर्रर्रर्रर्रर्रराक असा आवाज येतो, तेलाचे शिंतोडे बाहेर पडतात, आणि दुसऱ्या सेकंदाला वडा करपून जातो… आपण अगदी कितीही उठाठेव केली तरीही वडा उलटवायच्या आत करपून जातो..
तर जेव्हा जिंदगीने आपल्याला प्रचंड गरम रापलेल्या तेलात तळण्याचे प्लॅन बनवले असतात, आणि करपलेले वडे तळण्याचं रुटीन चालू असतं तेव्हा हे असे पिक्चर म्हणजे थेरपी असते बॉस! कोणी काहीही म्हणो, कोणी तुमची कुवत काढो हे असले पिक्चर बेस्टम बेस्ट वाटतात तेव्हा. हे चित्रपट खरंतर फार गहिरं तत्वज्ञान सांगतात भिडू लोक.. म्हणजे आता बघा.. एक कुली ढिंचॅक गॉगल घालून, भयानक रंगाचे कपडे घालून एका पोरीला पटवण्यासाठी हर्षवर्धन राय या करोडपतीचा मुलगा असल्याचं नाटक करतो, त्या पोरीचा बाप या माकडचाळयांवर विश्वास ठेवून लग्न लावून देतो, मग त्या कुलीचा जुडवा भाई येतो.. म्हणजे काहीही अर्तक्य गोष्टी घडत असतात.. आता हे इतकंच नाही तर रिमेक करताना हा २०२० चा काळ आहे हे डायरेक्टर, रायटर विसरून जातात ही अजून एक मॅड गोष्ट… आजची मॉडर्न तरुणी सारा अली खान, तिला एकदाही वाटू नये या हर्षवर्धन राय कपूरच्या पोराचं इन्स्टा, फेसबुक वगैरे सोशल मीडिया अकाउंट चेक करावं, किंवा जस्ट गुगल करावं?
हे म्हणजे “कैच्या कै” च्या पुढचं आहे राव… म्हणजे जर हे होऊ शकतं तर आयुष्यात काहीही होऊ शकतं राव.. “सब कुछ हो सकता है” ही जी महान फिलोसॉफी आहे त्याची पहिली पायरी ती हीच! सो हे असेल मॅड पिक्चर पाहिले की जगात आपण काहीही करू शकतो हे फिलींग येतं आणि आपल्याला ती एनर्जी फील होते.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हसू येतं बॉस .. आता गरम तेलाच्या कढईत बसल्यावर बुडाला पोळत असतांना सुद्धा जर खदखदायला येणार असेल तर अजून काय हवंय आयुष्यात ? .. जजमेंटलपणाचा किडा चावलेला असेल, तेल वाली फेज आली नसेल तर सॅडली हे असले पिक्चर तुमच्यासाठी नाही.. पण उच्च अभिरुची, बौद्धिक कुवत बिवत याची पुंगळी करून हे असले चित्रपट जे पाहू शकतात त्या आपल्या भावा बहिणींना मात्र आवर्जून सांगेन.. हा रिमेक टुकार आहे पण यानिमित्ताने जुने गोविंदा – डेविड – कादर खानचे चित्रपट पार्ट पार्टमध्ये बघून घ्या.. कढईत बसलेले असतांना सुद्धा नाही आलं हसू, तर आपण नाव बदलून टाकू.. तुमचं! सो हसून घ्या.. दात असतील तर आहेत म्हणून आणि नसतील तर नाहीयेत म्हणून.. एन्जॉय भिडू लोक…
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात काम करतात . त्यांची स्वतःची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे) [email protected]
Coolie No. 1 – Official Trailer | Varun Dhawan, Sara Ali Khan | David Dhawan