हमने तो दिल को आप के क़दमो पे रख दिया…

-वसुंधरा काशीकर

आयुष्यात मी कधीच कोणावर प्रेम केलं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ती व्यक्ती एकतर खोटं बोलतेय वा ती माणूस नाही असं समजावं…

प्रेम ही माणसाच्या आयुष्यातली इतकी तरल, सुंदर आणि मानवीय भावना आहे…मला स्वत:ला तरी ती अनपॅरलल वाटते..

प्रेमात असलेला माणूस कायम सुंदरच दिसतो. पण अनेकदा सौंदर्य स्वत:सोबत अपरिहार्य जटीलता, कुरूपता आणि गुंतागुंतही घेऊन येतं. ते प्रेमाबाबतही लागू आहे.

आज अचानक ‘मेरे सनम’ सिनेमातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं

हमने तो दिल को आपके कदमो में रख दिया

इस दिल का क्या करेंगे ये अब आप सोचिये

हे गाणं ऐकलं. मजरुह सुलतानपुरी यांचे अद्भूत शब्द. ओ.पी. नय्यर यांचं खास नय्यर शैलीतलं संगीत.

एका अद्भूत, मुलायम, आनंदी अवस्थेत असलेले ते दोघं एकमेकांना सांगताहेत. दोघांनीही स्वत:चे अहंकार, प्रतिष्ठा, मान्यता, व्यक्तित्व या सर्वांचा विलय केलाय. त्यामुळे दोघांच्याही मनाची अवस्था अतिशय हलकी, वजनविरहीत अशी झालीय.

दोघंही एकमेकांची

कमळावरी भ्रमर, पाय ठेवती हळुवार

कुचंबेल केसर, इया शंका….इतकी काळजी घेताहेत.

ती म्हणते…

हम आप की वफा की क़सम खा रहे है आज

कैसे वफा करेंगे अब आप सोचिये…

आयुष्य, नशीब, नियती, मुकद्दर सगळं समोरच्याच्या भरवश्यावर सोडलेलं…पण नातं आणि प्रेम स्वत:ची गुंतागुंत घेऊन येतं. त्यात पदरी घोर निराशा, दु:ख, वंचनेची वेदना, अपमान, प्रतारणा, गृहीत धरणं, वापरल्या गेल्याची भावना, यातल्या एक किंवा असंख्य गोष्टी येऊ शकतात.

पण तरीही आणि तरीही प्रेम करावं, समर्पण करावं, करत रहावं कारण मुक्तीचा तोच एक मार्ग आहे. त्यात ठोकरा खाणं, पडणं, जखमी होणं, विव्हळ होणं हे worth आहे. प्रेमात धोके खाऊन, ठोकरा खाऊनही ज्यांच्यात कडवटपणा आलेला नाही, उलट ते अधिक कनवाळू झाले आहेत अशा सर्वांना मला सलाम करावासा वाटतो.

‘प्यार में डुबा हुआ हर व्यक्ती बुद्ध होता है’ असं म्हणतात ते उगीच नाही.

कोण्या एका शायर नं गमतीनं म्हटलंय..मला तो शेर फार आवडतो..

अपनी तो आशिक़ी का क़िस्सा ये मुख़्तसर है

हम जा मिले ख़ुदा से दिलबर बदल बदल के

प्रेम जीवन भारविरहीत करतं. रजनीशांनी सांगितलेली गोष्ट आठवतेय. एक साधू एक गाठोडं घेऊन एक टेकडी चढत असतो. वजनी गाठोडं घेऊन साधू घामाघूम झाला असतो. तेवढ्यात त्याला एक ७ वर्षांची मुलगी आपल्या २ वर्षांच्या लहान भावाला घेऊन टेकडी चढताना दिसते. साधू तीला विचारतो, ‘बेटा इतकं ओझं घेऊन तू टेकडी चढते आहेस. तू थकशील नं’…

मुलगी त्वरीत उत्तर देते, ‘महात्मन, बोझ तो आप उठा रहे हैं..मेरे पीठ पर मेरा भाई हैं’…

ओझं आणि भाऊ यातला फरक काय चट्कन सांगितला त्या मुलीनं.

‘जहा प्रेम होता है वहा जीवन निर्भार हो जाता है’….

तेव्हा या नवीन वर्षात तुम्हा सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा…ज्यांच्या आयुष्यात प्रेमाचा वृक्ष बहरलेला आहे तो अधिक बहरावा, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाच्या वृक्षाची पानं कोणत्याही कारणानं झडली आहेत..त्यांच्या आयुष्यात नवी पालवी यावी…या शुभेच्छांसह…

……………………………………………….

Hum ne toh dil ko aap ke qadmon mein rakh diya Asha Bhosle, Muhammad Rafi

 

ता.क. (वरील गाणं ऐकलं तर गाणं सुरू झाल्या झाल्या व्हायोलीनचा जो piece वाजतो तो जरुर ऐका आणि background ला वाजणाऱ्या पियानोच्या कॉर्ड्सही. आणि मोहमद रफी, आशा भोसलेंच्या गाण्याबद्दल काय बोलावं…तुम्ही अनिर्वचनीय मनस्थितीत जाल याची हमी देते)

 

(लेखिका उर्दू शायरीच्या अभ्यासक व नामवंत स्तंभलेखक आहेत.)

[email protected]

Previous articleकुली नंबर १ : अत्यंत टुकार पण भारी नॉस्टॅलजिया देणारा रिमेक
Next articleओ मेरे दिल के चैन….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.