ओ मेरे दिल के चैन….

-मिथिला सुभाष

राजेश खन्ना हा काही महान कलावंत वगैरे कधीच नव्हता. पण तो ‘राजेश खन्ना’ होता आणि त्याच्या चाहत्यांना तेवढंच पुरेसं होतं…! आज तो आपल्यात नाहीये. त्याच्याबद्दल त्याच्या मृत्युनंतरही भरभरून बोललं/छापलं गेलं. कारण तो ‘राजेश खन्ना’ होता..आणि आपल्यालाही तेवढंच पुरेसं आहे…!

आपला स्वत:चा ओरिजिनल अभिनय करणारे कलावंत हिंदी सिनेमात फार कमी. दिलीपकुमार, मोतीलाल, बलराज साहनी, राजेश खन्ना आणि गोविंदा. बस्स. संपली यादी. या एकाच कारणापाई राजेश खन्नाचं कृतज्ञ स्मरण करणं प्रत्येक सिनेचाह्त्यासाठी आवश्यक आहे. राजेशने ते तसं करूनच ठेवलंय. त्याने किती सिनेमे केले, त्यातला पहिला कुठला, दुसरा आणि तिसरा कुठला, त्याला किती पुरस्कार मिळाले, त्याचे किती सिनेमे तूफान चालले, किती रखडले, त्याचा ‘आखरी खत’ हा कसा ऑस्करसाठी गेलेला भारतातला पहिला सिनेमा होता, वगैरे, वगैरे माहिती गुगलवर आहे. तिथून ती घेऊन जागा भरण्यापेक्षा, आता तो नसताना काळजातल्या त्याला याद करणे, त्याच्या आयुष्यात त्याच्या जन्मापासून येणाऱ्या नाट्यमय वळणांची आठवण काढणे अधिक गरजेचे वाटते आहे…! त्याची आठवण काढून रडणं त्याला आवडणार नाही. आणि ज्याने आपल्याला आयुष्यभर स्वप्नं दिली, रंग दिले, गोड गाणी दिली त्याच्यासाठी रडायचं कशाला? त्याच्या आठवणींची मैफल सजवूया…! जनाज़े उनके उठते हैं, जो मर जाते हैं…! कायम मनात दरवळत राहणारे कधीच मरत नाहीत.

‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ म्हणत गोरखा कॅप घातलेला राजेश खन्ना काळजात शिरला आणि अनेक मुलींना आपण तरुण झाल्याची जाणीव झाली. ‘कोरा कागज था ये मन मेरा’मधे किशोरने त्याच्यासाठी केलेल्या ‘हेऽ हेऽऽ.. हेऽ हेऽऽ.. हेऽ हेऽऽ..’वर स्वार होऊन अनेक तरुण प्रेमाच्या राज्यात मुशाफिरी करायला निघाले…! राजेश खन्ना सुपरस्टार झाला…!

देव आनंदनंतर निखालस रोमॅन्टिक प्रतिमा दिली ती राजेशनेच. दिलीप, देव, राज या त्रिकुटाला लोक थोडे कंटाळले होते…! शम्मी म्हातारा होत होता, शिवाय त्याचं प्रेम धसमुसळं…! टक्कल पडलेल्या आणि पोट सुटलेल्या शम्मीचा जुना धसमुसळेपणा बघवेनासा झाला होता. आणि अशा वेळेला राजेश खन्ना आला. त्याने किशोर कुमारला जीवनदान दिलं, नाहीतर रफीने गिळूनच टाकलं होतं त्याला. राजेश आणि किशोर या जोडीची तुलना फक्त राज आणि मुकेश या जोडीशीच होऊ शकते.

‘आराधना’ ‘हाथी मेरे साथी’ ‘दो रास्ते’ ‘सच्चा झूठा’ ‘कटी पतंग’ ‘अमर प्रेम’च्या लाटेत ‘मर्यादा’सारखे त्याचे सिनेमेही चालून गेले. पण राजेश खन्नाच्या कारकिर्दीला प्रत्येकवेळी जे वळण मिळालं ते योगायोगाने दिलं अमिताभ बच्चनने.

पहिलं वळण, आनंद! तरुणांच्या मनात नाजूक जागी जाऊन बसलेल्या राजेश खन्नाने या सिनेमामुळे दर्दी लोकांच्या भावविश्वात मानाचे पान मिळवले. दुसरं वळण, नमक हराम! समोर पुन्हा अमिताभ बच्चन. एका मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाला होता, ‘नमक हराम का प्रीमियर देखा और मै समझ गया कि एक और सुपरस्टार पैदा हो गया है…अमिताभ बच्चन!’ अमिताभने त्यात केलेली भूमिका राजेशला हवी होती, पण हृषीदांनी ती त्याला दिली नाही, अशी तक्रार राजेश आणि त्याचे चाहते करायचे. हृषीकेश मुखर्जी म्हणायचे, मी त्याला तीच श्रीमंत तरुणाची भूमिका देऊ केली होती, पण राजेश खन्नाला ती तेव्हा आवडली नाही आणि त्याने दुसरी गरीब मुलाची भूमिका मागून घेतली. खरं-खोटं देव जाणे! पण त्याला पुन्हा एकदा आडवा गेला अमिताभच.

आणि शेवटचं वळण. राजेश खन्नाच्या अंताची सुरुवात…पुन्हा अमिताभ बच्चन…! त्याबद्दल पुढे बोलू.

राजेश खन्नाचं स्वत:चं एक युग होतं. सिनेमा बोलायला लागल्यावर ईश्वरलाल नावाच्या नटाचे एका वेळी दहा सिनेमे वेगवेगळ्या थेटरात सुरु होते. राजेश खन्नाने ते रेकोर्ड मोडलं. त्याचे एका वेळी अकरा सिनेमे देशभर वेगवेगळ्या पडद्यावर झळकत होते. त्या काळात तरुण पोरं लांडे गुरु शर्ट घालून स्वत:ला राजेश खन्ना समजायचे. पोरी त्याला रक्ताने पत्र लिहायच्या, त्याच्या गाडीच्या चाकाखालची धूळ सिंदूर म्हणून कपाळाला लावायच्या. त्याने डिंपलशी लग्न केलं तेव्हा २-४ मुलींनी आत्महत्या आणि ५-१५ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दिल तर लाखो मुलींचे तुटले. आपल्या आवडत्या हिरोने ओढून फेकलेली सिगारेट उचलून पिणाऱ्यांचे किस्से आपण खूप ऐकले. पण या पठ्ठ्यानं स्वत:च्या सिगारेटची राख झाडायला एक पगारी माणूस ठेवला होता. इतिहास घडवणाऱ्या माणसांची पायाखालची जमीन अनेकदा सुटते. राजेश खन्नाचे तेच झाले. त्याला यश आणि अपयश दोन्हीही पचवता आले नाहीत. प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्याच्या डोक्यात गेली. पैसा त्याने खूप पाहिला होता. स्वत:च्या एमजी स्पोर्ट्स कारमधून काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करणारा तो कदाचित एकमेव ‘स्ट्रगलर’ असावा. साधनसमृद्ध माणसाला जो एक विशिष्ट तऱ्हेचा बेफिकीर आत्मविश्वास येतो तो राजेशकडे जन्मजात होता. ‘युनायटेड प्रोड्युसर्स’नी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरून तो सिनेसृष्टीत आला होता. त्या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीचा किस्सा नमुनेदार आहे. मुंबईच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीतल्या एका आलीशान दालनात नामचीन निर्माते बसले होते. जतीन खन्ना (राजेशचे खरे नाव) अंतिम मुलाखतीसाठी उभा राहिला. परीक्षकांनी त्याला काही संवाद दिले. त्या संवादात मुलगा आपल्या आईशी बोलत होता. जतीनने विचारले, ‘आई कोण आहे?’ परीक्षक चक्रावले, म्हणजे काय? जतीन म्हणाला, ‘अचला सचदेव हैं, दुर्गा खोटे हैं, ललिता पवार, या निरुपा रॉय? कौन है? बेटे के बोलने की स्टाईल मां से मिलतीजुलती होनी चाहिये ना? इसलिये पूछ रहा हूँ..!’ आणि जतीन खन्ना त्या मुलाखतीत पास झाला…!

पण निर्णय घेण्याच्या बाबतीत मात्र राजेश खन्ना बहुतेक वेळा चुकायचाच. नाही, डिंपलबद्दल नाही बोलत मी. डिंपल काय, त्याआधीची अंजू महेंद्रू काय आणि नंतरची टीना मुनीम काय, ते त्याचे खाजगी मामले. त्यात कुणीही पडू नये. पण सलीम-जावेदने ‘शोले’चं स्क्रिप्ट राजेशला हवं होतं त्या निर्मात्याला दिलं नाही म्हणून त्याने ‘शोले’ सोडला…पुन्हा वर्णी लागली अमिताभचीच. असो! शेखर कपूरने राजेश खन्नाला ‘मिस्टर इंडिया’ची गोष्ट ऐकवली तेव्हा त्यातला अदृश्य होण्याचा भाग त्याला आवडला नाही आणि त्याने तो सोडला. प्रत्येकवेळी नशीब साथ देत नाही, कधीतरी बुद्धीची भूमिकाही महत्वाची असते, हे खरेच.

कदाचित नशिबातलं खुंटलं म्हणून बुद्धी साथ देईनाशी झाली होती. असं असेल का? काळ बदलत होता…! राजेश खन्नाच्या अंताची सुरुवात झाली होती. अमिताभ नावाचं वादळ घोंघावू लागलं होतं. राजेशचा प्रेमविव्हल, कुटुंबवत्सल नायक कात टाकत होता. हळूहळू तो मवाली झाला…रॉबिनहुड झाला…प्रेमाच्या कथा सूडाच्या रंगाने भळभळू लागल्या. देशातली सामाजिक स्थिती बदलत होती. गाणी गाणारा नायक निरुपयोगी झाला होता….लोकांच्या मनात खदखदणारा राग दातात धरलेली विडी चावत, कमरेवर शर्टच्या सुट्या पाखांची गाठ मारून पडद्यावर अवतरला होता…!

गर्दीने आपला मोहरा वळवला. गर्दीला दया-माया नसतेच. भान आपण ठेवायचं असतं. राजेश खन्नाला प्रेक्षकांनी घरी बसवलं. तो संपला.

राजेश खन्ना संपला??? … नाही…! आज जाणवतंय की तो संपला नव्हता…नजरेआड झाला होता…! ‘जिस गली में तेरा घर न हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं’ अशी खात्री देणारा माणूस संपेल कसा? त्याच्या वाट्याला ‘मरण’ येऊ शकतं, ‘विस्मरण’ नाही…! एका संपूर्ण पिढीला नि:स्वार्थ, समर्पित आणि एकनिष्ठ प्रेमाची संथा देणारा भारतीय सिनेसृष्टीचा हा पहिला ‘सुपरस्टार’ ती पिढी जिवंत असेपर्यंत तरी विस्मरणात जाऊ शकत नाही..! ‘दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिये’ असा हट्ट धरून बसलेल्या चाहत्यांसाठी आता राजेशनेच परमेश्वराकडे रदबदली करावी…! ‘ओ मेरे दिल के चैन, चैन आये मेरे दिल को दुआ कीजिये…!’

(साभार: दैनिक ‘दिव्य मराठी’)

(मिथिला सुभाष नामवंत पटकथाकार आणि संवादलेखिका आहेत)

[email protected]