त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मी मुंबईतल्या एका साहित्य महोत्सवात माझ्या या नव्या पुस्तकाविषयी बोललोही होतो. माझे व्याख्यान संपल्यानंतर एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने स्वतःची ओळख ‘एक उदयोन्मुख लेखक’ अशी करून दिली. तो म्हणाला की, त्याला काहीतरी महत्त्वाची चर्चा करायची आहे. मात्र माझे बंगळूरचे परतीचे विमान असल्याने मला तत्काळ तिथून निघून विमानतळावर जावे लागणार होते. त्याच्याशी काही बोलण्यासाठी मी तिथे थांबू शकलो नाही. त्यामुळे मी त्या तरुणाला माझा इमेल अॅड्रेस दिला. जेणेकरून त्याला माझ्याशी जे बोलायचे होते ते त्याला लिहून पाठवता यावे.
नरेंद्र मोदी भारताचे पुढील पंतप्रधान होणार अशी 2013 च्या डिसेंबरमध्ये प्रचंड शक्यता दिसत होती. तसे जेव्हा घडले तेव्हा गौतम अदानी यांच्यावर बहुधा अधिकच मेहेरनजर झाली. त्यामुळे आता ते अधिक प्रभावशाली व महत्त्वाचे होतील हे ताडून ते स्वतःचे चरित्र प्रकाशित करण्याच्या विचारात होते. आणि त्यांच्या सल्लागारांना असे वाटले की, ते चरित्र लिहिण्यामध्ये (किंवा ‘घोस्ट-रायटिंग’ करण्यामध्ये) या गांधी-चरित्रकाराने प्रमुख भूमिका निभवावी. तर गौतम अदानी यांचे चरित्र लिहिण्याची संधी हे अनाहूतपणे माझ्याकडे चालून आलेले काम होते.
माझ्या खऱ्या भावना मोकळेपणाने सांगण्याइतका या ग्रंथपालांना मी ओळखत नव्हतो. ‘वेरीयर एल्विन ही खरेतर लहान व्यक्ती होती.. पूर्वाश्रमीचे मिशनरी पुढे अपरिपक्व अभ्यासक बनले…’ असं मी काहीतरी पुटपुटलो. ‘त्यामुळे एल्विन यांच्याविषयी लिहू शकलो असलो तरी मी स्वतःला आपल्या सन्माननीय पंतप्रधानांसारख्या आदरप्राप्त व्यक्तीवर लिहिण्यास पात्र समजत नाही.’