अदानी आफ्टर गांधी

साभार: कर्तव्य साधना

– रामचंद्र गुहा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना सुरु असताना ‘स्टॉप अदानी’ या संस्थेचे दोन कार्यकर्ते भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधातील फलक घेऊन मैदानात उतरले होते. अदानी यांच्या ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरणीय दृष्टीकोनातून स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे. या प्रकल्पासाठी भारतीय स्टेट बँकेकडून अदानी यांना 100 कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. ‘स्टेट बँकेने अदानी यांना 100 कोटींचे कर्ज देऊ नये’ या आशयाचे फलक घेऊन हे आंदोलक सामना सुरु असताना मैदानात उतरले होते. या पार्श्वभूमीवर उद्योजक गौतम अदानी यांच्याविषयीचा रामचंद्र गुहा यांचा हा लेख वाचायला हवा… 

नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यांत आणि गेल्या काही वर्षांत गुजरातमधील एका उद्योगपतीच्या संपत्तीत जी आश्चर्यकारक वाढ झाली; तिचे काटेकोर तपशिलांसह आणि वस्तुनिष्ठपणे वर्णन फायनान्शियल टाईम्समध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात केले गेले आहे. त्यातील एक परिच्छेद असा :

‘श्री. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला;त्यावेळी ते गुजरातहून राजधानी नवी दिल्लीला श्री. अदानी यांच्या खासगी जेटमधून गेले. आपसांतील मैत्रीचे हे उघड प्रदर्शन म्हणजे जणू एकाचवेळी दोघेही सत्तास्थानी पोहोचल्याचेच प्रतीक होते. श्री. मोदी सत्तेत आल्यामुळे श्री. अदानी यांना अनेक सरकारी कंत्राटांचा लाभ झाला. आणि त्यामधून पायाभूत क्षेत्रांतील अनेक प्रकल्प देशभरात उभे केल्यामुळे त्यांच्या संपत्तीत जवळपास 230 टक्क्यांनी (2600 कोटी डॉलर्सपेक्षा अधिकची) वाढ झाली.’

श्री. मोदी यांना मी कधीही भेटलेलो नसलो तरी तो लेख वाचल्यानंतर गतकाळातील स्मृती जाग्या झाल्या – ज्यावेळी इच्छा असती तर मी श्री. अदानी यांना भेटू शकलो असतो आणि त्यांच्यासोबत काम करू शकलो असतो. त्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे. ‘Gandhi Before India’ (भारतात येण्यापूर्वीचे गांधी) नावाचे पुस्तक मी 2013 मधील सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केले. काठीयावाड संस्थानात गांधींचे लहानाचे मोठे होणे, लंडनसारख्या साम्राज्यशाली शहरात घेतलेले शिक्षण, आणि दक्षिण आफ्रिकेत एक वकील व कार्यकर्ता म्हणून घडलेली कारकीर्द या सगळ्यांवर आधारित ते पुस्तक होते.

त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मी मुंबईतल्या एका साहित्य महोत्सवात माझ्या या नव्या पुस्तकाविषयी बोललोही होतो. माझे व्याख्यान संपल्यानंतर एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने स्वतःची ओळख ‘एक उदयोन्मुख लेखक’ अशी करून दिली. तो म्हणाला की, त्याला काहीतरी महत्त्वाची चर्चा करायची आहे. मात्र माझे बंगळूरचे परतीचे विमान असल्याने मला तत्काळ तिथून निघून विमानतळावर जावे लागणार होते. त्याच्याशी काही बोलण्यासाठी मी तिथे थांबू शकलो नाही. त्यामुळे मी त्या तरुणाला माझा इमेल अ‍ॅड्रेस दिला. जेणेकरून त्याला माझ्याशी जे बोलायचे होते ते त्याला लिहून पाठवता यावे.

काही दिवसांनंतर त्या तरुणाचा मला मेल आला. त्यात त्याने लिहीले होते की, तो गौतम अदानी यांचे चरित्र लिहिण्याच्या प्रकल्पाशी संबंधित एका सल्लागार संस्थेसोबत काम करतो. त्याने सांगितल्यानुसार या चरित्रासाठी त्याची संस्था श्री. अदानी यांच्याशी विचारविनिमय करत होती. त्याने असेही सांगितले की, साहित्य क्षेत्रातील एका ख्यातनाम एजंटने असे सूचित केले आहे की, पुष्कळ उत्तमोत्तम प्रकाशक या प्रकल्पासाठी उत्सुक आहेत.

या पत्रकर्त्याने मला सांगितले की, त्याची संस्था आणि अदानी समूह दोन्हीही ‘उच्च दर्जा, सखोल अभ्यास यांविषयी काटेकोर आहेत. आणि ‘आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत; जी या प्रकल्पासाठी मार्गदर्शक आणि सल्लागार राहू शकेल.’ त्यांना अशी आशा होती की, त्यांचा हा मार्गदर्शक आणि सल्लागार मी असू शकेन. त्यामुळे पत्रकर्त्याने त्याच्या संस्थेचे काही प्रतिनिधी, श्री. गौतम अदानी आणि मी, अशा बैठकीचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला.

मी (महात्मा गांधी यांच्यावर संशोधन करण्यासाठी) गुजरातला वारंवार भेट देत असल्यामुळे डिसेंबर २०१३मध्येही मला गौतम अदानी म्हणजे कोण याची काहीशी कल्पना होतीच. त्यांची मला असलेली ओळख ‘2001 पासून गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचा निकटवर्ती असणारा उद्योजक’ अशी होती. त्याही काळामध्ये श्री. मोदी काहीवेळा श्री. अदानी यांच्या खासगी विमानातून प्रवास करत. किनारपट्टीवरील अदानी समूहाच्या प्रकल्पांकरता मंजुरीसाठीचे अर्ज गुजरात सरकारने कसे तातडीने मार्गी लावले ते मला अहमदाबाद येथील माझ्या मित्रांनी सांगितले होते. या प्रकल्पांमुळे तिथले मासेमारी करणारे लोक विस्थापित झाले आणि खारफुटीची जंगले नष्ट झाली.

नरेंद्र मोदी भारताचे पुढील पंतप्रधान होणार अशी 2013 च्या डिसेंबरमध्ये प्रचंड शक्यता दिसत होती. तसे जेव्हा घडले तेव्हा गौतम अदानी यांच्यावर बहुधा अधिकच मेहेरनजर झाली. त्यामुळे आता ते अधिक प्रभावशाली व महत्त्वाचे होतील हे ताडून ते स्वतःचे चरित्र प्रकाशित करण्याच्या विचारात होते. आणि त्यांच्या सल्लागारांना असे वाटले की, ते चरित्र लिहिण्यामध्ये (किंवा ‘घोस्ट-रायटिंग’ करण्यामध्ये) या गांधी-चरित्रकाराने प्रमुख भूमिका निभवावी. तर गौतम अदानी यांचे चरित्र लिहिण्याची संधी हे अनाहूतपणे माझ्याकडे चालून आलेले काम होते.

गांधींवरील पुस्तकाच्या कामाला सुरुवात करण्याच्या अनेक वर्षे आधी मी वेरीयर एल्विन यांचे चरित्र लिहिले होते. जन्माने ब्रिटीश असणारा हा मानववंशशास्त्रज्ञ भारतातील आदिवासींच्या संदर्भातील अग्रगण्य अधिकारी व्यक्ती होता. हे चरित्र ‘Savaging the Civilized’ या शिर्षकासह ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस कडून 1999 च्या मार्चमध्ये प्रकाशित झाले. वेरीयर एल्विन यांच्या मी लिहिलेल्या चरित्राला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आणि एक अभ्यसनीय काम या दृष्टीने  त्याची माफक प्रमाणात विक्रीही झाली.

ते पुस्तक छापील स्वरूपात उपलब्ध झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांतच मला नवी दिल्लीतील एका ज्येष्ठ आणि सन्माननीय ग्रंथपालांचा फोन आला. त्यांची मला जुजबी ओळख होती. ग्रंथपाल मला म्हणाले की, आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे चरित्र लिहिण्यास तुम्ही उत्सुक आहात का? वाजपेयी यांच्या कुटुंबाने त्यांना त्यासाठी नावे सुचवण्यास सांगितले होते. आणि माझे एल्विन यांच्यावरील पुस्तक पाहून ग्रंथपालांच्या मनात माझा विचार आला होता. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसशी त्यांचे आधीच बोलणे झालेले होते आणि त्यांनाही या प्रकल्पात रस होता.

ग्रंथपालांनी मला सांगितले की, पंतप्रधानांवरील पुस्तकांची असलेली सार्वत्रिक प्रतीक्षा वगळता प्रत्येक सरकारी विभाग आणि उपविभागदेखील या पुस्तकाच्या अनेक प्रती विकत घेईल यात शंका नाही. अनेक राज्य सरकारांसाठी ते हिंदीत भाषांतरीत होईल आणि रा. स्व. संघाच्या सगळ्या शाखांतून ते मागवले जाईल. याचा (आर्थिक) मोबदला भरभक्कम असेल. मात्र या सगळ्याला मी बधलो नाही.

‘नेमलेला’ चरित्रकार सत्तेत असलेल्या राजकारण्यांविषयी मोकळेपणाने आणि पूर्ण स्वातंत्र्याने लिहू शकत नाही, हे त्याचे पहिले कारण होते. आणि श्री. वाजपेयी स्वतः बुद्धिमान आणि भुरळ पाडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे असले तरी भाजप हा त्यांचा पक्ष माझ्या अतिशय नावडीचा होता. त्या पक्षाचा हिंदू बहुसंख्याकवादी ब्रँड हा गांधींच्या स्वतःच्या बहुलतावादी आणि सर्वसमावेशक हिंदु संकल्पनेच्या सर्वस्वी विरुध्द होता, हे दुसरे कारण होते.

माझ्या खऱ्या भावना मोकळेपणाने सांगण्याइतका या ग्रंथपालांना मी ओळखत नव्हतो. ‘वेरीयर एल्विन ही खरेतर लहान व्यक्ती होती.. पूर्वाश्रमीचे मिशनरी पुढे अपरिपक्व अभ्यासक बनले…’ असं मी काहीतरी पुटपुटलो. ‘त्यामुळे एल्विन यांच्याविषयी लिहू शकलो असलो तरी मी स्वतःला आपल्या सन्माननीय पंतप्रधानांसारख्या आदरप्राप्त व्यक्तीवर लिहिण्यास पात्र समजत नाही.’

अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्याविषयी लिहिण्यासाठी दिलेला प्रस्ताव ही मला अधिकृत चरित्र लिहिण्याविषयी केली गेलेली पहिली विचारणा होती. मात्र ती शेवटची नव्हती. मी माझे क्रिकेटवरचे पुस्तक 2002 मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर दोन क्रिकेटपटूंनी – त्यापैकी एक तेव्हाही खेळत होता आणि दुसरा नुकताच निवृत्त झालेला होता – त्यांच्या जीवनकथा सांगण्यासाठी त्यांच्यासह एकत्र काम करण्याकरता विचारणा केली.

2007 मध्ये मी स्वतंत्र भारताचा इतिहास प्रकाशित केला; त्यानंतर नुकत्याच निधन पावलेल्या एका काँग्रेस नेत्याच्या मुलाने त्याच्या पित्याविषयीच्या पुस्तकासाठी मदत करण्याकरता मला विचारणा केली होती. त्याचबरोबर, अजूनही कार्यरत असलेल्या दुसऱ्या एका कॉंग्रेस नेत्याने मला त्याच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी विचारणा केली होती.

या कालक्रमात भारतातील एका अतिशय प्रसिध्द शास्त्रज्ञाच्या सहाय्यकाने तेव्हा हयात असलेल्या त्यांच्या महानायकाविषयीचे पुस्तक त्याच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिण्याविषयी विचारले होते. त्याचबरोबर भारतातील सर्वात सन्माननीय अर्थतज्ज्ञ – प्रशासकाच्या कुटुंबाने नुकत्याच निधन पावलेल्या त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे चरित्र लिहिण्याविषयी विचारले होते. हे देखील इतर काही प्रसिध्द, समर्थ, किंवा धनाढ्य भारतीयांच्या आयुष्यांविषयी लिहिण्यासाठी अनाहूतपणे आलेले प्रस्ताव होते.

हे सगळे प्रस्ताव मी नाकारले. काहीवेळा मला स्वतःचे लिखाण विशिष्ट वेळांत पूर्ण करायचे होते म्हणून मी प्रस्ताव नाकारले, तर काहीवेळा मी त्या प्रस्तावित कामांकरता पात्र नव्हतो. निवृत्त क्रिकेटपटूचा अहंकार कुरवाळण्यासाठी मदत करण्याची मला मुळीच इच्छा नव्हती आणि प्रथितयश शास्त्रज्ञाच्या संशोधनविषयांबद्दल किंवा बौद्धिक कामगिरीविषयी लिहिण्याची क्षमता किंवा विश्वासार्हता माझ्यापाशी मुळीच नव्हती.

‘आणि या प्रत्येक प्रस्तावाबाबतीत असाही मुद्दा होता की, मला ‘खास जबाबदारी देऊन लिहून घेतलेल्या’ किंवा ‘अधिकृत’ चरित्रांबाबत सौंदर्यविषयक तिटकारा होता. केवळ आतून येणाऱ्या ओढीपोटी आणि एखाद्या व्यक्तीमध्ये स्वतःला रस असला तरच मला त्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी लिहावेसे वाटते; कुणीतरी भरल्या खिशाने मला लिहिण्याकरता विचारते म्हणून नाही.

एल्विन यांच्यावर मी पुस्तक लिहिले कारण त्यांनी माझे आयुष्य बदलले होते. त्यांचे कार्य आणि लेखन यांच्याशी परिचय होईपर्यंत मी अर्थशास्त्राविषयी उदासीनता असणारा विद्यार्थी होतो. एल्विन यांचे साहित्य वाचल्यानंतर मला समाजशास्त्र आणि सामाजिक इतिहास या विषयांचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. विद्यार्थी असल्यापासूनच मला गांधींचे जीवन आणि त्यांचा वारसा या विषयांत रस होता, त्यामुळे मी त्यांच्याविषयी लिहिले. कालांतराने, इतिहासकार म्हणून काम करू लागल्यानंतर गांधींविषयीच्या दुर्मिळ साधनांचे मोठे साठे मला जगभरातील अर्काईव्हमध्ये मिळाले. आणि त्यामुळे मला त्या गांधींच्या दोन खंडांतल्या चरित्रावर काम करण्याची प्रेरणा मिळाली.

गौतम अदानी यांच्या चरित्रावर काम करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2013 मध्ये माझ्या इनबॉक्समध्ये येऊन पडेपर्यंत चरित्र लिहिण्यासाठीचे काम करण्याचा अनुभव मला आलेला होता. त्यामुळे मी त्या तरुणाला आणि त्याच्या सल्लागार संस्थेला उत्तर पाठवले की, गांधी चरित्राच्या दुसऱ्या खंडावर काम करण्यात व्यस्त असल्यामुळे मी त्यांच्या अदानी प्रकल्पासाठी मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून काम करू शकत नाही.

माझ्या काही मित्रांना मी हे प्रलोभन दाखवणारे मूळ पत्र पाठवले, आणि त्यासोबत मी असा मजकूर लिहिला : मला वाटते की, हा प्रस्ताव स्वीकारायचे ठरवलेच तर त्याचे एकमेव कारण हेच असू शकते की, त्यामुळे मला माझ्या आठवणींच्या पुस्तकाचे नाव ‘A Biographer’s Journey: From Gandhi to Adani'(एका चरित्रकाराचा प्रवास : गांधींपासून अदानींपर्यंत) असे ठेवता येईल. मात्र तेव्हा एका मित्राने त्या भावी (जे कधीही लिहिले जाणार नाही आणि त्याचा आनंदच आहे) पुस्तकाला त्याहून चांगले आणि चटपटीत नाव सुचवले : ‘Adani After Gandhi’ (गांधींनंतर अदानी).

(अनुवाद: सुहास पाटील)

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात ‘India after Gandhi’, ‘Gandhi before India’, ‘Gandhi: The Years That Changed the World’ ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Previous articleद हिल वी क्लाईंब
Next articleस्त्रीचे मन आणि तिची कामेच्छा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.