बाबांच्या या सामाजिक कार्यात अनेक दानशूर लोकांचा सहभाग होता. या दानशूर लोकांविषयी ते पत्रांमधून कायम कृतज्ञता व्यक्त करायचे. धर्मशाळेत अनेक गरीब, श्रीमंत येत असत. या लोकांशी आपण अत्यंत आदरपूर्वक वागले पाहिजे. आहो, काहो, या, बसा अशा आदरपूर्वक शब्दांचा वापर करावा, अशा त्यांच्या सूचना असायच्या. यात्रेकरूंची गैरसोय करू नका, स्वच्छता पाळा इथपासून तर स्वयंपाकीन अथवा झाडू मारणाऱ्या बाईस अत्यंत आदराने बाईसाहेबच म्हणावे हे सुध्दा ते पत्रातून सांगायचे. स्वच्छता, वृक्ष संवर्धन याकडे बाबांचे विशेष लक्ष असायचे. काडी, कचरा, घाण याचा नियमित बंदोबस्त करा, शनिवारी झाडांना पाणी द्या, फुलझाडांची काळजी घ्या, घाट स्वच्छ ठेवा, जुने बेकार सामान फेकून द्या, कचरा पेट्या तयार करून स्वच्छतेवर अधिक भर देत चला आदी बारीकसारीक सूचना संत गाडगेबाबा आपल्या अनुयायांना पत्रांमधून द्यायचे. “घार उडे आकाशी, परी लक्ष तिचे पिला पाशी” अशीच भावना यातून दिसून येते. ज्या-ज्या देणगीदात्यांनी सहकार्य केले. त्यांना आभाराची सुंदर पत्र लिहून पाठवा, असे सांगण्यास ते कधीच विसरत नसत. ज्यांची देणगी घेतली, त्यांना पावती द्या. घाट बांधणीसाठी मदत केलेल्याची नावे संगमरवरी दगडावर कोरून काढा अशा कृतज्ञतेच्या सूचना असायच्यात. आजही ऋणमोचन येथील घाटावर देणगीदात्यांची नावे कोरलेले संगमरवरी दगड आपल्या नसरेस पडतात. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी सेवकांच्या प्रकृतीची काळजी घेतल्याचे अनेक पत्रांमधून दिसून येते. लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या या कामात गैरव्यवहार होऊ नये याची त्यांनी पत्राच्या माध्यमातून प्रचंड दक्षता घेतली आहे. एकदा एका अनुयायाकडून दूध, चहा, बिस्कीट, बाकीचा खर्च बांधकाम खर्चात लिहिला गेला हे लक्षात येताच बाबांनी ही चूक लगेच लक्षात आणून देऊन नाराजी सुध्दा व्यक्त केली होती.